©सौ.वैशाली प्रदीप जोशी
भाग 1
दुसऱ्या दिवशी शलाका ऑफिमध्ये आली अन् आल्याआल्या तिनं भाग्यश्रीच्या टेबलकडे पाहिलं. आज प्रथमच शलाकानं भाग्यश्रीकडे पाहून स्मित केलं.
आपल्या मनातल्या भावना व्यक्त झाल्याने तिला बरंच हलकं वाटत होतं. भाग्यश्रीलाही तिच्यातला हा छोटासा बदल सुखावून गेला.
आज दुपारी लंच टाईम मध्ये शलाका स्वतःहून लंचग्रुप ला जॉईन झाली. भाग्यश्रीनं स्वतःहून कालचा विषय काढायचा नाही हे ठरवलं होतं.
ती सगळ्यांमध्ये ह्या विषयावर बोलेल की नाही.. किंबहुना तिला ह्या विषयावर बोलायचं आहे की नाही हे अजून कळलं नव्हतं. उगाच घरगुती विषय काढून शलाकाला दुखवायची भाग्यश्रीची इच्छा नव्हती.
पण शलाकानं स्वतःच विषयाला हात घातला...
"अगं, तू होतीस म्हणून कालच्या पावसात मला धीर आला बाई! नाहीतर घाबरायला होतं मला!
माझा रेनकोट फाटलाय. कधीचे मागे लागलेय योगेशच्या. मला नवीन रेनकोट हवाय म्हणून पण मनावरच घेत नाहीये तो.
नाहीतर काल पावसात अडकून पडले नसते मी!
त्यात माझा मोबाईलसुद्धा बदलायला झालाय. आवाजच स्पष्ट ऐकू येत नाही... कधी नवीन घेऊन देणार कोण जाणे!
"मग तू का नाही आणलास रेनकोट? आपण कमावतो ना मग नवऱ्याला का मागायचं? बाजारात जायचं आणि घेऊन यायचा रेनकोट!" हर्षदाची प्रश्नार्थक नजर शलाकाला जाणवली.
"माझ्याकडे पैसे नसतात अगं. सगळे पैसे नवऱ्याच्या ताब्यात..... शलाकानं प्रस्तावना केली.
काल भाग्यश्रीशी बोलून तिला आधार वाटला होता आणि आता ह्या प्रकाराला वाचा फोडायची असंच जणू तिनं ठरवलं होतं.
"कधी बरं नसलं तर सासूबाई काढा करून देतात आणि सासऱ्यांना पटलं की मोठं आजारपण आहे तरच जायचं दवाखान्यात नाहीतर घरगुती उपाय करायचे आणि बरं व्हायचं. उठसूठ दवाखान्यात जायचं नाही म्हणतात.
सगळी कामं घरीच करायची... आधीचं ठीक होतं... पण आता बेबी प्लॅन करायचं ठरतंय आमचं तर निदान धुणं-भांड्याला बाई लावूयात म्हटलं तर "नाही" म्हणतात घरचे.
अगं सकाळी सासूबाईंनी जास्तीचे डबे घासायला काढले, चादरी धुवायला काढल्या तर ऑफिसला उशीर होतो.
तसं स्वैपाक करतात सासूबाई, पण कधी सगळं नाही झालं त्यांचं तर लोणचं-पोळी किंवा वरणभात खाऊन येते मी. पण इथे सहा वाजेपर्यंत थांबायचं तर एव्हढयानं नाही होत नं. पैसे असतील तर बाहेरचं मागवायचं खायला नाहीतर.
माझे अंडरगारमेंट्ससुद्धा मला माझ्या आवडीने नाही घेता येत. सासूबाई सोेबत येतात दुकानात आणि पेमेंट करतात. कुठली वस्तू किती वापरली पाहिजे ह्याचं गणित पककं आहे त्यांचं... त्यात कमी-जास्त झालं की उलट तपासणी सुरु..." शलाका पुटपुटली.
माझ्या पॉकेटमनी मधून जरा काही जास्त खर्च झाला की मग अशी कठीण वेळ येते माझ्यावर.
सध्या जरा व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतोय. सासूबाईंनी सांगितलेले घरगुती इलाज केले पण आराम नाही... शिवाय हे दुखणं दिसून पडणारं नाही त्यामुळे मला खूप त्रास होतोय हे योगेशला मान्यच नाही म्हणून तो दवाखान्यात न्यायला तयार नाही.
गेले दोन तीन महिने स्त्रीरोगतज्ञाकडे उपचार घेतेय... योगेशने दिलेल्या पैशांमधून डॉक्टरची फी, सोनोग्राफी, औषधं हा खर्च झाल्यावर पैसेच उरत नाहीत माझ्याकडे. मग रेनकोट ही परवडत नाही आणि टॅक्सी ही... "
"अगं, पण तू कमावतेस, तुझा पैसा आणि तुझ्या मनाप्रमाणे तुला खर्च करता येऊ नये?" चित्रा विचारमग्न झाली. "तुझ्या आईबाबांना माहितेय का हे?"
"कसं सांगणार आणि काय सांगणार? त्यांची मुलगी सुखात आहे असं वाटतंय त्यांना.... मी वाटू देते.
तसं एकदा माझ्या बाबांशी बोलले होते मी... हे सगळं सांगितलं त्यांना..."
"मग?"
"बाबा म्हणतात की "ते" सासुरवास करतात का तुला?, मारझोड करतात, उपाशी ठेवतात का चटके देतात...? तसं असेल तर सांग... आत्ता जाऊन बोलतो तुझ्या नवऱ्याशी...
त्यांचं म्हणणं की तुला पैसे हवेत का ट्रीटमेंटसाठी?-मी देतो! तुझे कपडे खराब झालेत का लवकर?- कितीला मिळतात नवीन?-सातशे रुपये?- चल मी देतो हजार रुपये!
ऑफिसमध्ये चहा घ्यायचाय? पार्टी करायचीय?एव्हढ्या तेव्हढ्या कारणासाठी भांडणार आहेस का सासरच्यांशी?आणि आम्हाला नाही दिलेस पैसे तर काय आभाळ कोसळणार आहे? तू तुझी सुखी रहा म्हणजे झालं!
मग काय बोलणार मी! गप्पच बसले झालं!" शलाकानं निश्वास टाकला.
"अगं पण तू आहेस का मग सुखी?" दिवसभर ऑफिमध्ये मरमर करायची, घरातली कामं करायची अन् दोन पैश्यांवरही आपला अधिकार असू नये?"
संध्याकाळी घरी जाताना स्कुटीच्या वेगाबरोबरच शलाकाच्या विचारांनीही वेग धरला.
तिच्या नजरेसमोर भाग्यश्री होती. तिच्याच वयाची, विवाहित, एकत्र कुटुंबात राहणारी...आत्मविश्वासाने कार चालवणारी, स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी.... भाग्यश्री तिची पर्स उघडत असताना एकदोनदा शलाकानं डोळ्याच्या कोपऱ्यातून बघितलेलं.... तिच्या पर्समध्ये पाच-पाचशेच्या नोटा असतात!
मैत्रिणींसोबत जाते, पार्टी करते, शॉपिंग करते आणि हो,घरखर्चात काँट्रीब्युशनही देते... तिनंच बोलताबोलता सांगितलेलं एकदा!
वास्तविक भाग्यश्री नोकरीत शलाकाला ज्युनियर.... त्यामुळे तिला पगारही शलाकापेक्षा कमीच... पण ती आर्थिकदृष्टया स्वतंत्र आहे, जे काही कमावते ते खर्च करण्याचा अधिकार आहे तिला....
"आणि फक्त भाग्यश्रीच का? माझ्या ऑफिसमधल्या चित्रा, हर्षदा, योगेशची आई एव्हढंच काय तर वन्स नोकरी नाही करत तरी आपल्या मनाने आणि इच्छेने खर्च करण्याचं स्वातंत्र्य आहे त्यांना.... आणि मी???
माझ्यात नेमकं काय कमी आहे... का मी स्वतः कमवत असून दोन पैश्यांसाठी लाचार होतेय? हे योग्य आहे का? की बाबा म्हणतात तसं मी एव्हढया तेव्हढ्यावरून संसार मोडायला निघालीये?
फक्त मारझोड केली, उपाशी ठेवलं, डागण्या दिल्या तरच तो छळ असतो. म्हणजे माझा छळ होत नाहीये? पण इथे माझ्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीयेत.
मला बरं नसेल तर तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांकडून सहजी उपचार घेता येत नाहीत. कित्येकदा अती होईपर्यंत दुखणं अंगावर काढायला लागतं...माझ्या पैश्यांवर माझी काडीची सत्ता नाहीये...कधी घरी वेळेअभावी किंवा काही कारणास्तव जेवण नाही झालं तर माझ्याजवळ बिस्कीटचा पुडा विकत घेण्याइतकेही पैसे नसतात...कारण माझा पगार माझ्या ताब्यात कधी येतच नाही.
हा माझा छळ नाही?
विचारांच्या गर्तेत घर कधी आलं ते तिला कळलंच नाही. खूप विचारांती रात्री तिनं मनाशी काही निश्चय केला अन् शांत झोपी गेली.
पुढच्या महिन्याच्या एक तारखेला ती ऑफिसमधून घरी परतली तेव्हा तिचा नवरा, सासूबाई-सासरे, दीर आणि नणंदबाई बैठकीच्या खोलीत बसले होते.
घरात नक्कीच काहीतरी चर्चा घडल्याचं त्यांच्या चर्येंवरून शलाकानं ओळखलं.
"आज एक तारीख आहे" तिनं घरात पाऊल टाकताच सासरेबुवांनी प्रश्न टाकला.
"हो" तिनं त्रोटक उत्तर दिलं.
"पगार जमा झाला नाही तुझा" योगेशने बँकेचं पासबुक फडकवत विचारलं.
"झाला ना, माझ्या नवीन अकाऊंटमध्ये... मी माझा पगाराचा बँक अकाऊंट बदलून घेतलाय" शलाका मनातली भीती चेहऱ्यावर दिसू न देण्याचा प्रयत्न करत होती.
दुर्दैवाने शलाकाची भीती खरी ठरली. तिनं घरातले नियम पाळले नाही म्हणून सासरेबुवा चिडले, योगेश तणतणला आणि सासूबाई नेहमीप्रमाणे मख्ख!
शलाकाने तिचं म्हणणं समजावून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण सासरचे कुणीही तिची बाजू ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.
शब्दाने शब्द वाढत गेला अन् योगेशने सर्वांदेखत तिच्यावर हात उचलला.
हा अपमान शलाका सहन करू शकली नाही.
तसंही तिच्या आणि योगेशच्या नात्याचं भवितव्य तिच्या सहनशक्तीइतकंच आहे हे तिला कळून चुकलं.
ती सहन करेल तर संसार होईल आणि जिथे सहनशक्तीचा अंत झाला तिथे संसारही संपुष्टात येणार हे तिनं जाणलं होतं.
संसार टिकवण्यासाठी लागणारी तडजोड करण्याची योगेशची इच्छा नाही आणि तयारीदेखील नाही हे सत्य तिनं स्वीकारलं होतं. तिनं ते घर सोडलं.
तिच्या अपेक्षेप्रमाणे आईनं तिच्या घर सोडून येण्याला नाराजी दर्शवली. "जावई दारू पीत नाही, मारझोड करत नाही, त्याचं बाहेर लफडं पण नाही मग हिला सासरी नेमका कश्याचा त्रास आहे " हेच तिच्या आईच्या लक्षात येईना.
लोक काय म्हणतील ह्या प्रश्नानं तिला भंडावून सोडलं...पण ती माऊली तिच्या "पोटच्या गोळ्याला" नाकारू शकली नाही आणि माहेरच्या अंगणात शलाकाला "आधार" तर मिळाला पण बाबांची तिरस्काराची नजर तिला जाळून टाकत होती.
ह्या घटनेला आज एक वर्षं झालंय , शलाकाच्या सासरचे तिनं घरी परतावं म्हणून येऊन शब्द टाकून गेलेत.
एव्हाना शलाका "तिच्या किमान स्वातंत्र्याची" संकल्पना आईबाबांच्या गळी उतरवण्यात यशस्वी झालीय आणि तिनं "शितावरून भाताची परीक्षा" करत योगेशच्या घरी जायला साफ नकार दिलाय.
तिच्या आईबाबांसोबतच तिच्या मैत्रिणींनी हर्षदा, चित्रा आणि भाग्यश्रीने तिला ती आहे तसंच स्वीकारलंय....आणि ज्यांनी नाही स्वीकारलं त्यांना क्षमा करून पुढे जाण्याइतकी maturity तिच्यात आलीये आता....
आणि तिनं एक मोठ्ठा श्वास घेतलाय....एक मोकळा श्वास.....जणू आत्ताच तिचा नवीन जन्म झालाय...
समाप्त
©सौ.वैशाली प्रदीप जोशी
सदर कथा लेखिका सौ.वैशाली प्रदीप जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.