खुदा महेरबान तो

© अपर्णा देशपांडे




सूर्य वर आला होता .ऊन चांगलं चट चट पोळायला लागलं होतं . 

रमाकांत ला काही फरक पडला नाही . आई , दादा पहाटेच उठून गच्चीवरून खाली गेले होते .

घड्याळ सारखी तद्दन निरुपयोगी वस्तू कोणी आणि का बनवली असेल असा मूलभूत प्रश्न त्याला पडायचा .

निसर्गाने सूर्य तिथे ठेवलाय ना , तो बरोबर माणसाला उठवतो , घरचे उगाच त्रास करून घेतात हे त्याचं ठाम मत .
आपले काटकुळे पाय अजून लांब करत त्याने मोठ्ठा आळस दिला ..हा s ..इथे मात्र तो बिलकुल कंटाळा करत नसे . आळस न करता दोन हात ,दोन पाय ( म्हणजे चार असते तरीही चाललं असतं बरं) चांगले ताणून तो आळस देत असे .
 
आता खाटेवरून उठून खाली जायचं आणि अंघोळ करायची या विचारानेच त्याला शहारा आला . एक दाढ काढल्या पासून तो दात मात्र नीट घासत असे . 

दादांना वाटलं होतं , निदान ह्या कारणासाठी त्या डेंटिस्ट चा जाहीर सत्कार करायला पाहिजे होता .

आई दादांनी पंचवीस वर्षांपूर्वी ह्या सुपुतला जन्म दिला होता , तेही नऊ वर्षांच्या अथक प्रयत्नांनी . मग नऊ वर्षांनी ,नऊ महिने पोटात वाढवलेल्या चिरंजीवांचे लाड याला कारणीभूत होते .

तर मंडळी ,भर मे महिन्यात पहाटे नऊ वाजता दिवटे उठले होते कारण कुठेतरी काम केल्याशिवाय गिळायला मिळणार नाही असे दादांनी ठणकावून सांगितले होते . 

असं आईसमोर ठणकावून सांगायची त्यांची हिम्मत नव्हती तो भाग वेगळा . म्हणून ती भजनाला गेल्यावर मगच हिम्मत केली होती . आपले 25-26 वर्षाचे चिरंजीव अजूनही कुठे कमावते आणि स्थिर झालेले नाहीत याची दादांना भारी काळजी असायची .

तसं नाही म्हणायला दोन चार ठिकाणी छोट्या मोठया नोकर केल्या होत्या. ते दादांना आठवलं की पोराची काळजी अजूनच वाढायची.

त्याचं काय झालं होतं रमाकांत च्या मामासाहेबांनी त्याला एका मोठ्या लेडीज टेलर च्या दुकानात लावून दिले . रमाकांत च्या 'तल्लख बुद्धधी' बद्दल आपल्या मित्राला कल्पना दिली होती . 

मालक साहेबांनी महिला ग्राहक आल्यावर कसे बोलायचे याची रिहर्सल चालू होती .

" बघ रमाकांत , महिला आल्या ,की म्हणायचं , मास्टर मापं घेतील , डिझाइन प्रमाणे पैसे पडतील ,प्लिज बसा "

दहा वेळा प्रॅक्टिस झाली , मालक म्हणाले ,साहेब तुमचा भाचा म्हणजे आमचा भाचाच की हो !! अजिबात चिंता करू नका ,तुम्हाला वाटतो तसा मंदबुद्धी नाहीये तो .

रमाकांत चा पहिलाच दिवस : गावातील साखर कारखान्याचे संचालक यांच्या पत्नी लतिका ताई आल्या .अत्यंत उत्साहात रमाकांत पुढे गेला ,म्हणाला,
" मॅडम ,तुमच्या मापांप्रमाणे मास्टर बसायचे चार्जेस सांगतील " ........ साटकन थोबाडीत बसली होती आणि मालकांनी धु धु धुतला होता . 

रमाकांत ला कळालेच नव्हते , आपलं काय चुकलं .

आता ह्याला कुठे कामाला लावावे म्हणून दादांनी खूप ठिकाणी शब्द टाकला होता . 

मध्ये एक डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये रिसेप्शन चे काम केले होते , तिथेही आपल्या 'असामान्य ' बुद्धी ची चुणूक दाखवल्यामुळे त्याला नोकरी सोडावी लागली होती .

मग दादांनी त्याला शर्मा वकिलांकडे चिटकवलं . 

आधी ची डॉक्टर कडची शिकवणूक विसरून नवीन काम शिकणे म्हणजे रमाकांत ला आव्हानच होते . 

तरी बिचारा लागला कामाला .

वकील साहेबांकडे एक अशील आला .

हिट अँड रन ची केस होती .

" वकील साहेब आहेत ? "

" इतक्या लवकर का जातील ते ? "

" तेच ! आहेत न ? "

" हो , अजून पुष्कळ आयुष्य आहे त्यांचे . "

" नाही हो , तसे नाही , माझी केस आहे न , म्हणून . "

" आधी वजन करा ." त्याला डॉ . कडची सवय ! कुणी पेशंट आल्यास आढज वजन करणे .

" वजन ?...का ? "

" तुमची केस अभ्यासणार न ते ! "

बिचारा मुकाट वजनकाट्यावर उभारला .

" 55 किलो ? गोड खा जरा , वजन वाढवा "

तो जाम चिडला
" कमाल आहे ! तुम्हला काही अक्कल आहे की नाही ? माझा भाऊ वारलाय अपघातात !! मी केस घेऊन आलोय वकील साहेबांकडे ! गोड खा का म्हणताय !!! "

त्यांचा आवाज ऐकून वकील साहेब बाहेर आले . पाच मिनिटात रमाकांत बाहेर ....वजनकाट्या सहित !

दादांना हे सगळे आठवले ...आणि त्यांचे मन काळजीने भरून गेले

तर असा हा रमाकांत आता आणखी कुठे तरी कामावर जाणार होता , दादांनी ताकीदच दिली होती तशी .

कशी बशी अंघोळ करून , पच पच तेल लाऊन , चप्प भांग पाडून राजकुमार स्टाईल मध्ये साहेबजादे बाहेर पडले.

 मातोश्री ना कोण कौतुक ! " कसा राजबिंडा दिसतो ग माझा कांता " म्हणून बोटे मोडले माउलीने . 

लाल पॅन्ट , पिवळा शर्ट , काळा गॉगल ....रुपडं काय बघायचं ...टोलवाटोलवी करत तो चालला होता . रस्त्यात एक शितपेयाचा पत्र्या चा डबा पडला होता . साहेबांनी जोsरात लाथ मारली .

समोरून एक चोर पर्स हिसकावून पळत होता , तो डब्बा बरोबर नेम धरल्या सारखा टाणकन त्याच्या
डोक्यावर जाऊन आदळला . बिचारा चोर तोल जाऊन पडला ,आणि लोकांच्या हातात सापडला ,...

लोकांनी धू धू धुतला त्याला ....त्या पर्स मध्ये बरीच मोठी रक्कम होती .

मग काय महाराजा ...त्या महिलेला अतिशय कौतुक वाटले . सगळ्या जमावाने
' काय हिम्मत वान आहेस रे , '
' काय निशाना आहे '

' असे असतात असली हिरो ' करून त्याचे कौतुक केले . लगेच सेल्फी , फोटो अन कायकाय...

तिने चक्क पाच हजार रुपये दिले कांता ला बक्षीस म्हणून !!!

गर्वाने छाती पुढे काढून कांताराव घरी आले . मातोश्रींना तर लेकाला कुठे ठेऊ कुठे नको असे झाले होते .
दादांना मात्र थोडी शंका होती , पण झाकली मूठ म्हणून गप्प बसले .
 
काही काळा करता का होईना चिरंजीव 'शेलिब्रिटी ' झाले होते .

असच एकदा कांता मित्रा बरोबर गावातील जलतरण तलावावर गेला . अनेक जण पोहायला आले होते . काही महिला आपल्या मुलांना पोहण्या साठी घेऊन आल्या होत्या .

चिरंजीवांची नजर एका देखण्या तरुणीवर पडली . त्याच्या डोळ्यात दोन लाल लाल बदाम तयार झाले . मनात गाणे वाजायला लागले ' अखियो से गोली मारे ..लडकी कमाल ..'

तीच्या भाच्याचे स्वीमिंग चालू होते . कांता सगळ्यात कमी खोली असलेल्या बाजूने काठावर पाय सोडून बसला होता ....त्याला कुठे येत होते पोहायला . 

खालचा टॅंक चा काठ गुळगुळीत झाला होता . कांता घसरत होता ,अन त्याच वेळी ' ती ' चा भाचा गटांगळ्या खायला लागला . नशीब असे बलवत्तर की त्याच वेळी कांता ही घसरून धप्पकन पाण्यात पडला . 

मग त्या पोरानेच कांता ला पकडले . त्याची पार घाबरगुंडी उडाली ..पण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या ..तो म्हणणार होता ..की मला पोहोता ...येत ...नाही ....पण मागील अनुभवाने शहाणपण आलं होतं , गप्प बसला .

त्या मुलाला घेऊन तो काठावर आला ..पाणी खोल नव्हतेच ,नाहीतर .........
' ती ' धावत आली , आणि म्हणाली ,
" थॅंक्यु सो मच ! " .

रमाकांत च्या अंगावर जसं मोरपीस फिरलं .
उत्तरा दाखल काही न सुचून

रमाकांतनेही म्हटले ,
" थॅंक्यु . मी कांत " असे अर्धेच नाव जरा जास्त इम्प्रेसिव्ह वाटते असे त्याला त्याच्या लवगुरू विन्या ने सांगितले होते . 
विन्याला प्रेमात पडण्याचा प्रचंड अनुभव होता . म्हणजे तो त्याच्या बाजूने बिनधास्त प्रेमात पडत असे .समोरच्या मुलीकडून त्याची तशी काही अपेक्षा नसायची .

तर मंडळी , ते ' कांत ' नाव खूप आवडून ' ती ' म्हणाली ,
" wow कांत , कित्ती छान पोहोता तुम्ही , आमच्या बंटी चा जीव वाचवला . "

त्याने मनोमन बंटी चे आभार मानले . बंटी तिला मावशी ,मावशी म्हणतोय हे त्याने ऐकले होते . तो ही तिला थॅंक्यु मावशी म्हणणार होता ,पण वेळेत जीभ आवरली . 

शब्दांचे अपभ्रंश ही त्याची खासियत होती . त्या मुळे कधी घाबरला किंवा खूप जास्त एक्साईट झाला की शब्द हमखास चुकत असत .

ही रमाकांत ची चूक नव्हतीच मुळी ,त्या शब्दांना नको का कळायला की आपण आपल्या मूळ रूपातच प्रकट व्हावे , अर्थाचा अनर्थ होईल असे नको . म्हणून ह्यावेळी 'मावशी ' शब्द शहाण्यासारखे आतच पडून राहिले .
" ओह ,म्हणजे ते जलतरणपटू कांत तुम्हीच का ?"

...त्याच्या घशाला कोरड पडली .हो म्हणावं तरी पंचाईत , नाही म्हणावं तरी .......म्हणून त्याने हो आणि नाही याच्या मधली स्टाईल पकडून आपली बगळ्या सारखी मान गोल गोल हलवली.

पुन्हा एकदा साहेबजादे 'शेलिब्रिटी' झाले होते .

पण ह्या कौतुक सोहळ्यात 'ती ' चे नाव विचारायचे राहिले की ....
"आप जैसा कोई मेरे ........ " गाणं म्हणतच रमाकांत घरात गेला . आईला सगळा किस्सा त्याने रंगवून , थोडं स्वतःच्या मनाचं वाढवून सांगितला .
 
हे जरी घडलं तरी त्याने दादांची अट अजूनही पूर्ण केली नव्हती . त्याने कुठेतरी कायम नोकरी करणं आवश्यक होतं ..... नाहीतर हकालपट्टी होणार होती .

ह्यावेळी मातोश्री मदतीला धावून आल्या . त्यांच्या ओळखीच्या एक मावशी होत्या . त्यांनी रमाकांत ला एका धनाढ्य खानदानी कुटुंबाकडे पाठवलं . मोठ्ठे पोर्च , समोर आलिशान महागडी गाडी , हवेली सारखं ऐसपैस घर ...रमाकांत बघतच राहिला .

प्रवेश केल्यावर आत एक मोठा दिवाणखाना होता . समोर गुबगुबीत सोफ्यात त्याहीपेक्षा गुबगुबीत रावसाहेबीण आणि साहेब बसले होते .

रावसाहेबांना एक विश्वासू सहाय्यक हवा होता .

आपल्या चिरंजीवांचा देखील काय कमी दिमाख होता का .....
" आधी कुठे काम केलंय ?"
>

" मोठ्ठ्या टेलर ..(च्या हाताखाली म्हटलेच नाही ) पुढचे शब्द घशातच अडकले .
" वाह टेलरिंग चा बिझनेस ..

" नाही ..म्हणजे ..
" असो , आम्हाला एक स्वीय सहायक हवा आहे ."

रमाकांत ला स्वीय म्हणजे जरी डोक्यावरून गेले असले तरी सहायक हवाय हे नक्की कळाले होते .

त्याने मागील चोराचा पकडण्याचा पराक्रम केला ,त्याची पेपरमधील बातमी दाखवली . साहेब खूप खुश झाले ..
त्यांचा बांधकाम व्यवसाय होता .

मग त्यांनी दुसऱ्याच दिवशी कामासाठी ऑफिस मध्ये बोलावले .

कांताराव गेले तर खरं ,पण अतिशय घाबरून बोबडी वळली होती .
" मेक अ नाईन सर ? " शब्द धोका देत होते...
" ......."
" मेनक आईन सर ?"
.........
" मे कप आय इन सर ?"

" ओह ,रमाकांत ? कम ,कम "

" सर ,गुदर मॉर्निंग सर "

" गुड मॉर्निंग ,म्हणावं रमाकांत "

" तेच ते सर " आज शब्द वाट लावत होते .

" बस "
रमाकांत समोर खुर्चीत बसला .

" सर तुमची बेकिंन मस्त आहे "

" व्हॉट ? "

" ही रूम ..बेनिक ..केनिब ..

" केबिन !!! " साहेब चिडले होते .

" हा हा तेच ते " रमाकांत पार पार गडबडून गेला होता .

साहेबांनी त्याला काम समजावून सांगितले .

रमाकांत नि सगळं नीट ऐकून कामाला सुरुवात केली .

आता आठ दिवस झाले होते . त्या आठ दिवसात फार नाही ,थोs sडीशीच गडबड झाली होती . म्हणजे दोनदा चहा सांडला , एकदा महत्वाच्या फाईल ला ग्लास भर पाण्याने अंघोळ घातली ,

सरांच्या अनुपस्थितीत येणाऱ्या क्लाएंट ला LIC एजंट समजून पळवून लावले , अशा ' किरकोळ ' घटना सोडल्या तर ... ' बाकी ' ठीक होते .

दुसरा कुणी भेटेपर्यंत राहूदे म्हणून साहेब ' सहन ' करत होते .
 
एक दिवस गाणे गुणगुणत काम करतांना रमाकांत ची नजर पडली आणि त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना . 'ती ' समोर कार मधून उतरत होती . आपले नाक कान डोळे एकवटून तो तिकडे बघत होता . बघता बघता त्याने झाडू टेबलावर ठेवला आणि फाईल कोपऱ्यात नेऊन ठेवल्या . 

ती आली , इकडे धडधड वाढली . तिला बघून रावसाहेब पुढे आले " oh my darling !!" म्हणत त्यांनी तिला जवळ घेतले .

" बाप रे !! म्हणजे ' ती ' साहेबांची मुलगी !!"
 
थोड्याश्या प्रयत्नांनी कळाले की तिचे नाव निशा आहे . झालं !! रमाकांत च्या मनात निशा चा जप सुरू झाला .
त्याची निशाशी वारंवार भेट होऊ लागली . विन्या , ' द लव्ह गुरू ' ने सांगितले होते की त्याने तिच्या समोर कमीत कमी बोलावे . तरीही गडबड होतच असे .

एकदा निशा त्याला म्हणाली ,
"तुमच्या सोबत असले न , की मला उत्साह येतो . फ्रेश वाटतं ."

तर हे यडं काय म्हणालं , " माझ्या सोबत रहात जा तुम्हाला बाळ
मिळेल ".

" व्हॉट ??"

" हा s ss , सोबत राहिल्याने ताकद मिळेल ना !!"

" अहो मग बळ म्हणा न !! "

" हे हे हे !! तेच ते !!"

इतका सगळा आनंद होता .

कंपनीचे फार मोठे प्रोजेक्ट सुरू होते .त्यात एकूण सहा दहा मजली टॉवर्स उभे राहणार होते . म्हणजे जवळपास अडीचशे सदनिका होत्या . 

कंपनीचे मॅनेजर श्रीकांत यांच्यावर बरीच मोठी जबाबदारी होती . स्टील रॉड्स , सिमेंट , वाळू , टाईल्स , खिडक्यांना लागणारे ग्रील्स ,ह्याची ऑर्डर देणे , माळ आणणे हे सगळं त्यांच्या अखत्यारीत होते .

आधीपासूनच श्रीकांत ची नजर ह्या मालावर होती . रावसाहेबांचा त्याच्यावर वीश्वास होता , त्यामुळे ते व्यवहारात खूप खोलात दखल देत नसत .
>

श्रीकांत नि तीन ट्रक वेगळे ठेवले होते . रावसाहेब बाहेरगावी असतांना त्याने दोन कर्मचारी आपल्या बाजूने घेऊन एक ट्रक स्टील मटेरियल , एक ट्रक वाळू आणि एक ट्रक सिमेंट दुसऱ्या बिल्डरला विकण्यासाठी बाजूला काढले होते . 

ते रात्री अकरा ला दुसऱ्या बिल्डर कडे जाणार होते .

पण अचानक संध्याकाळी सात वाजता रावसाहेब आले ....

 साहेबिण बाईचा वाढदिवस होता . साहेबांनी रमाकांत ला केक ची ऑर्डर द्यायला सांगितली . 

रमाकांत च्या मातोश्रींनि सुचवलं की केक हा साहेबांच्या व्यवसायाशी निगडित असावा . मग रमाकांत ने तशी स्पेशल ऑर्डर दिली .

संध्याकाळी तो साहेबांच्या ऑफिस मध्ये गेला . 

श्रीकांत तिथे होताच . रमाकांत ने केक ची थीम ' ट्रक आणि सामान ' ही ठेवली होती . 

श्रीकांत ला बघून तो म्हणाला ,
" आमचे ट्रक बघा एकदा s , मस्तं भरलेत ."

श्रीकांत ला वाटलं , आपली चोरी ह्याने पाहिली .

" रमाकांत , प्लिज कुठे बोलू नकोस . मी तुला भरपूर पैसे देईन "

" अहो , सरांनीच सांगितलंय मला जातीने लक्ष घालायला . " तो केक बद्दल बोलत होता .

साहेबांनी श्रीकांत ला बोलावले . सोबत आपले चिरंजीव होतेच .

" गुड इविनिंग सर "

"अरे श्रीकांत , रमाकांत , या "

रमाकांत ला केक बद्दल सांगून शाबासकी मिळवायची होती म्हणून तो मधेच बोलला ..

" सर ते ट्रक्स तयार आहेत सर , जरा एकदा बघता का ?"

झा s s लं !! श्रीकांत ला दरदरून घाम फुटला . कापरं भरलं . 

त्याने साहेबांच्या पायावर लोळण घेतली .
" सर , मला माफ करा . मी लालची झालो होतो . ह्या रमाकांत मूळे माझी चोरी पकडल्या गेली ...माफ करा साहेब , तीन ट्रक पुन्हा कंपनीत जमा करतो ,पुन्हा नाही होणार असं ........"

श्रीकांत ने सगळं कबूल केलं .

सुरुवातीला रमाकांत ला समजलच नाही , हा काय बोलतोय ते . पण नंतर लक्षात आले ...त्यात त्यांचे बोलणे निशा ऐकतेय म्हटल्यावर तर त्याने तिखट मीठ लावून सांगायला सुरुवात केली ( ते मात्र फार छान जमायचं त्याला ) की कशी त्यांनी ह्या लोकांची चोरी पकडली ..वगैरे ..

साहेब आ वासून ऐकत होते .हा रमाकांत नसला असता तर आपले कसे झाले असते ...त्याच्यामुळे केवढे नुकसान वाचले .

निशा तिथे आली होती . रमाकांत तिला बघून वितळलेली मेणबत्ती झाला होता .

" थॅंक्यु कांत !! आज केवढं मोठ्ठ नुकसान वाचवलस . यु आर सिम्पली ग्रेट !! कसं कळालं तुला ह्याच्या बद्दल ?"

एक नंबर थापाड्या रमाकांत म्हणाला ,
" ते , मला खूप लघुशंका आली होती "

" का s s य ? शंका म्हणायचं का तुला ?"

" हा , तेच ते !"

मग काय विचारता महाराजा , साहेब इतके सप्रेस , आय मिन इम्प्रेस झाले की त्यांनी आपल्या चिरंजीवांना कंपनीचा सिनिअर मॅनेजर म्हणून जाहीर केले आणि ...आणि ... सरळ जावयाची 'पोस्ट ' ऑफर केली .

निशानेही चक्क लाजून संमती दिली .

दादा मात्र आजही आश्चर्य करत आहेत की ह्याने हे कसंच जमवलं असेल !!! 

काय ना , खुदा मेहेरबान तो .......बाकी तुम्ही समजताच!!


© अपर्णा देशपांडे

सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

















टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने