आई हरली, बाबा जिंकला

© वर्षा पाचारणे.





विशाखा आणि विनय दोघांचं अरेंज मॅरेज. दोघंही इंजिनिअर. विनयचे आई बाबा अगदी साधी माणसं. समोरच्या व्यक्तीला मग ते लहान असो किंवा मोठं, मनापासून मान देणारी माणसं. 

शेतीवाडी, पैसा पाणी, जमीन जुमला अगदी बक्कळ.. गावाकडे शेतातच बांधलेलं मोठं घर. 

विशाखा म्हणजे त्यांच्या एकुलत्या एक लेकाची बायको. पण विशाखाचा स्वभाव खूपच हेकेखोर. हट्ट म्हणजे तर अगदी पराकोटीचे. कुठलीही गोष्ट पाहिजे म्हटलं, की ती कशीही मिळवायची तिची तयारी असायची.

तिच्या हट्टाला कंटाळून आई बाबांनी विनयला त्याच्या ऑफिस जवळ एक आलिशान फ्लॅट घेऊन दिला. त्यांना वाटलं, सुनेला आपला खूप त्रास होत असेल, तर तिला तिचा राजा राणीचा संसार थाटून आनंदात राहू दे.

वेगळं घर मिळाल्यावर तर विशाखा अगदीच मनाला वाटेल तसं वागू लागली. 

आता तर घरामध्ये दोघच असून देखील ती दोन माणसांच्या कामाला सुद्धा वैतागलेली असायची. जमेल तेवढं काम विनयच त्याच्या सवडीने उरकायचा. 

विशाखा मात्र ऑफिस वरून मुद्दाम उशिरा घरी येणं, येताना खूप खरेदी करणे, स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून दर दोन दिवसांनी हॉटेल वारी करण यातच मग्न असायची. 

विनय अगदी साधा, परिस्थितीची जाणीव असणारा मुलगा होता. वास्तविक विशाखाच्या वागण्याला तो खूप कंटाळला होता.. पण फक्त संसार म्हटलं की तडजोड आलीच असा विचार करत, गप्प राहायचा. 

एक दिवस विशाखा खूप खुशीत घरी आली . तिला नोकरीत बढती मिळाली होती. ती आता वेगळ्याच विश्वात रमली होती. प्रमोशन होणार या आनंदात आज ती भरपूर शॉपिंग करून आली होती. 

बाहेर जेवायला जायचं हा प्लॅन तर तिने आधीच ठरवून ठेवला होता.. 'माझी पात्रता जास्त असल्याने, मी प्रमोशनसाठी योग्यच होते'... अशा गर्वाने आज ती फुलून गेली होती. 

बरं घरच्या इतकाच रुबाब ती ऑफिसमध्ये यांवरही करत होती. तिच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीवर अंकुश लावण्यात आणि त्यांना हिणवण्यात तिला एक वेगळेच समाधान मिळायचं. 

अश्यातच मासिक पाळी चुकल्याने तिने प्रेग्नंन्सी टेस्ट केली. टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने विनय आणि त्याच्या घरचे खूप आनंदात होते. 

विनयने मनातल्या मनात भावी स्वप्न पहायला सुरुवात केली होती. लग्नानंतरचं विशाखाच्या वागण्यामुळे निरस झालेलं आयुष्य त्याला आता या बातमीमुळे सुखद वाटू लागलं होतं. 

बाबा म्हणून आपण कुठे कमी पडू नये यासाठी आधीच समजूतदार असलेला विनय आणखी समजूतदारपणे वागू लागला होता. 

पण विशाखाला मात्र मूल नको होतं. 

तिने विनयला निक्षून सांगितलं," मला मूल नकोय". डॉक्टरांनी तिला abortion साठी उशीर झाल्याचं सांगितलं आणि विशाखा अधिक चिडखोर बनली.

 कामावरून आल्यावर तिची चिडचिड अधिकाधिक वाढत चालली होती. बरं सुट्टी घे म्हटलं तर या मॅडम काही ऐकायला तयार नव्हत्या.. मुळात पोटातल्या बाळाच्या विचाराने तिची आणखी चिडचिड व्हायची. 

"मला हे बाळ नकोच आहे, असं ती दहादा विनयला बडबड करताना म्हणायची. तिच्या आदळ आपट करण्याचा परिणाम गर्भावर होईल याचा जराही विचार करत नव्हती. 

आठव्या महिन्यातच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. 'आता आपण मोकळे', असा विचार करून बाळंतपणानंतर अवघ्या दोन महिन्यातच ती पुन्हा नोकरीवर रुजू झाली. 

मातृत्वाच्या भावना तिला कधी जाणवल्याच नाही किंवा त्या तिला कधी जाणवून घ्यायच्याच नव्हत्या.

विनयने मात्र बाळाला आईप्रमाणे जीव लावला. बाळाचं नाव त्याने 'सई' ठेवलं होतं. 

सईच्या ओढीने तो ऑफिस वरून धावत पळत घरी यायचा. पाळणाघरात राहणारा आपला ईवलासा जीव बघून या बाबांचा जीव तीळ तीळ तुटायचा. 

सई तीन महिन्याची असल्यापासून तिला वरच्या दुधाची सवय लावली होती. 'विनयच्या आई बाबांनी इकडे यायचे नाही', अशी सक्त ताकीद विषाखाने आधीच दिली होती. 

सईचे जेवणखाण, शी शू चे कपडे बदलणे सगळ्या गोष्टी तो अगदी मनापासून करायचा.
 
सई तीन वर्षांची झाली. 'आईपेक्षा सईला बाबाच जवळचा वाटतो', असं विशाखा हिणावून म्हणायची. 

ऑफिस वरून आल्यावर सईच्या खेळण्यांचा पसारा घरात दिसला, की विशाखाच्या तळपायाची आग मस्तकात जायची. 

एवढ्याशा त्या चिमुरडीला धारेवर धरत ती दोन फटके देत सारा पसारा उचलायला लावायची आणि विनयला म्हणायची ,"तू तिला लाडाने वेडं करून ठेवलं आहेस... जरा म्हणून कसली शिस्त नाही... मी आल्यावर बघ कशी अगदी शहाण्यासारखी वागते"...

 नंतर नंतर सईला देखील आईने दारावरची बेल वाजवताच ,'आता आपलं काही खरं नाही', असं कदाचित जाणवू लागलं होतं... बेल वाजताच ती घरात तुरुतुरु पळत साऱ्या वस्तू नीटनेटकेपणाने जागेवर ठेवायला धावायची. 

तिची ती धावपळ पाहून स्वयंपाक घरात सईसाठी खाऊ बनवणारा बाबा मात्र कासाविस व्हायचा... 'लहान मुलांना त्यांचं बालपण जगू द्यावे... एवढ्याशा वयात एवढा धाक लावून त्यांचे बालपण हिरावून घेऊ नये', असं त्याला मनोमन वाटायचं. 

परंतु विशाखाला समजावणं म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यासारखे होते..

सईचा तिसरा वाढदिवस उद्यावर येऊन ठेपला अन् विशाखाच्या डोक्यात काही वेगळंच विचारचक्र सुरु झालं. तिने सईला आजपर्यंत फक्त महागडी खेळणी, कपडे आणले होते. 

तिच्या मते हेच प्रेम होतं. पैशाने सार्‍या गोष्टी विकत घेऊ पाहणारी विशाखा घरात स्वत:च्या पोटच्या लेकीचे प्रेमही असेच महागड्या वस्तूंनी मिळवू पाहत होती. 

वाढदिवसाच्या दिवशी सकाळी तिने सईला विचारलं," तुला आई आवडते की बाबा?". सई पटकन म्हणाली,"मला फक्त बाबा आवडतो". विशाखा रागाने लालबुंद झाली, आणि ताडकन उठली अन् म्हणाली "मग कर माझ्याशिवाय वाढदिवस. बघू तुझा बाबा काय देतो तुला".

सई रडून 'सॉरी' म्हणाली.. पण विशाखा दार आपटून निघून गेली.सईला वाईट वाटू नये, म्हणून तिच्या बाबाने सगळा तिच्या आवडीचा बेत आखला होता. 

आज विनयने खास सईसाठी सुट्टी काढली होती. आज पूर्ण दिवस तो सही बरोबर हसत खेळत मस्त मज्जा करत दिवस घालवत होता. 

संध्याकाळी त्याने विशाखाचा राग जावा म्हणून खास तिला आवडणारे पदार्थ हॉटेलमधून मागवले होते. पण सात वाजले, आठ वाजले तरी विशाखाचा घरी यायचा काही पत्ता नाही.

फोनही तिने सायलेंट मोडवर ठेवला. विनयने खूप फोन केले, पण व्यर्थ. विनयला मनातून खूप काळजी वाटत होती, परंतु आपली काळजी चेहऱ्यावर न दाखवता, तो बाबा लेकीसाठी तोंडावर उसनं हसू आणत होता... 

शेवटी त्याने सईला केक कापायला सांगितला. सई सतत दरवाजाकडे नजर लावून बसली होती.. लहान लेकरू ते... बाबा आवडतो म्हणाली तरीही आईसाठीही पोटात तितकीच माया होती की... पण प्रतिष्ठा आणि गर्वाने नखशिखांत भरलेल्या विशाखाच्या स्वभावाला हे पटण्यासारखं नव्हतं... जणू सकाळी सईने बाबाच्या सांगण्यावरूनच आपल्याला असं बोलावं, असं तिला वाटून गेलं... शेवटी विनयने केक कापल्याचे फोटो काढून विशाखाला whatsapp वर पाठवले. 

विशाखा रात्री दहा वाजता घरी आली. आई वाढदिवसाला नाही, म्हणून सई रडून बाबाच्या कुशीत झोपून गेली होती. 
विशाखाने ती गाढ झोपेत असतानाही तिला उठवले आणि म्हणाली," सई, हे बघ मी तुझ्यासाठी केवढा मोठ्ठा टेडी बिअर आणलाय. अगदी तुझ्या उंचीएवढा!" आणि खूप सारे चॉकलेट्स." विशाखाला मनातून वाटलं, 'एवढे सारे गिफ्ट बघून सई क्षणात उठुन तिच्या कुशीत येईल आणि विनयकडे एक विचित्र कटाक्ष टाकत 'आपणच जिंकलो', असं दाखवता येईल.. 

परंतु सई मात्र आधीच हिरमुसलेली होती... तिला गिफ्ट पेक्षा तिच्या बरोबर तिच्या आई हवी होती.. बाबांसारखी आईनेही सुट्टी काढावी आणि तिच्याबरोबर दिवस आनंदात घालवावा एवढी साधी अपेक्षा त्या लेकराची होती..

आईचा आवाज कानावर पडताच सई म्हणाली," आई मला यातलं काहीच नको. मला फक्त तू हवी होती. मला बाबाने सांगितले की तुला ऑफिसमध्ये खूप काम असतं पण एवढं असतं का ग? तू मला पण विसरून जाते. माझ्यासाठी माझा बाबाच जवळचा...." असं म्हणून सई पुन्हा रडत बाबाच्या कुशीत शिरली. 

आता तिघांच्याही डोळ्यात पाणी होतं फक्त कारण वेगवेगळं.. गलेलठ्ठ पगाराची नोकरी, मोठी पोस्ट, उंची राहणीमान असं सारं असूनही आज विशाखा हरली होती. 

तिच्या अहंकारी, पैश्यामागे धावण्याच्या शर्यतीत तिने स्वतःची माणसं गमावली होती. स्वतःच्याच घरात परकी ठरली होती. 

आजही तिच्याच स्वभावामुळे आई हरली अन् बाबाच जिंकला होता.....

हातात चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर भूतकाळात जाऊन पोहोचला होता. तो मनात एकच विचार करत होता की शिकलेली बायको जर समजूतदार नसेल, तर त्या शिक्षणाचा उपयोग काय? करिअर करायचं हे मान्य पण पोटच्या मुलांना जर वेळच देता आला नाही, तर कमावलेला पैसा काय कामाचा? 

गमावलेले सोनेरी क्षण पुन्हा मिळणं अशक्य...भूतकाळातल्या आठवणी पुसून एका नव्या पर्वाची सुरुवात व्हावी, विशाखाला किंचित का होईना पण मातृत्वाची जाणीव व्हावी, असं त्याला वाटून गेलं.

विनय नकळत हातावर पडलेल्या अश्रूच्या थेंबामुळे भानावर आला. बघतो तर बाबा आपल्याशी कट्टी घेऊन शांत बसला की काय म्हणून सई हिरमुसली होती. तिला घट्ट मिठी मारत विनय पुटपुटला," जशी सई फक्त बाबाचीच तसा बाबा पण फक्त माझ्या या सईचाच..."

पैश्यामागे धावताना फक्त करिअर करायचं म्हणून नाती विसरून चालत नाही. नात्याला जेवढं खतपाणी घालणार, तेवढं ते फुलत जाणार हे कायम ध्यानात ठेवावं.

©वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने