©️ धनश्री दाबके
' अरे हो रे. मी ठीक आहे. जेवायलाच बसत होतो पण आता जावयाचा फोन आल्याने आधीच पोट भरलं' अरुण हसत म्हणाला.
' नको बाबा. नुसत्या फोनने पोट नका भरु. खरोखरचं पोटभर जेवून घ्या कारण आता तुम्हाला येणाऱ्या वादळाचा सामना करायचाय.
तुमचं.. म्हणजे आपलं.. वादळ निघालय इथुन माझ्याशी भांडून. पोचेलच तिकडे तासाभरात. तेव्हा तयार रहा.
तसं काही विशेष नाही. नेहमीचच भांडण आहे. पण बाईसाहेबांनी जरा जास्तच ताणलंय. आली तिकडे की मेसेज करा मला. म्हणजे तेवढीच माझ्या जीवाला शांती.'
' Ok. Done ' म्हणून अरुणने फोन ठेवला.
स्निग्धा.. अरुण व मीराची एकुलती एक लेक.
स्निग्धा दहावी झाली आणि साध्या काविळीचे निमित्त होऊन मीरा गेली. कायमची. तेव्हा सगळे धैर्य एकवटून अरुणने स्वतःला आणि सिग्धाला सांभाळले. तिला आईबाप दोघांचीही माया देत वाढवले.
स्निग्धाचे कॉलेज पूर्ण झाले आणि ती शाळेपासून तिचा मित्र असलेल्या राजेशला घरी घेऊन आली. आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचय म्हणत दोघांनी अरुणची परवानगी मागितली.
सुस्वभावी, हुशार, होतकरू राजेश अरुणला आवडला. हसतमुख असला तरी समंजस, शांत आणि जरा गंभीरतेकडे झुकणारा विचारी राजेश आपल्या ह्या अवखळ, अल्लड, झऱ्यासारख्या वाहणाऱ्या मुलीसाठी योग्य आहे अशी आशा बाळगत अरुणने लग्नाला परवानगी दिली. राजेशनेही अरुणची पारख आपल्या वागण्याने सार्थ ठरवली.
स्निग्धा म्हणजे मीराची दुसरी कॉपीच. तिची अखंड बडबड, मनात काहीही न ठेवण्याची वृत्ती, जे काही वाटतय ते समोरच्याला लगेच सांगून टाकायची सवय सगळं अगदी मीरासारखं.
मीराही तशीच होती. मनातल्या सगळ्या भावना लगेच चेहऱ्यावर यायच्या तिच्या. खळखळून हसणं आणि तितकंच भरभरून रडणं. एकदा तर कुठल्यातरी पिक्चर मधल्या क्लायमॅक्सवर तिला रडतांना पाहून अरुण हसल्याने दोघांचं वाजलं होतं.
मीराला कसलंही निमित्त पुरायचं भावनांचे भांडार उघडायला. अरुणची आई नेहमी म्हणायची जरा म्हणून काही हातचं राखून ठेवता येत नाही हिला. सतत वाहत असते उथळ झऱ्यासारखी.
मला तर बाबा काळजीच वाटते तुमची. कधी काय बिनसेल काही सांगता येत नाही. एखाद वेळेस नाही काही आवडलं तर मनात ठेवताही आलं पाहिजे माणसाला. अशाने जवळचे दुरावतात. सगळे नातेवाईक म्हणतात तुमची सून फारच स्पष्ट आहे हो. लगेच प्रत्येक गोष्टीचा सोक्षमोक्ष लावते. अरुणसारखा शांत नवरा मिळालाय म्हणून बरंय. नाहीतर काही खरं नव्हतं तिचं.
पण अरुण म्हणायचा, "आई, त्या उथळ झऱ्यासारखं happening आयुष्यही जगता यायला हवं ग. सगळ्यांनीच डोहासारखं सगळं मनात ठेवत जगायला पाहिजे असे थोडीच आहे?
आत एक बाहेर एक राहून मनात काही साचवायचा प्रकारच नाही बघ मीराचा. त्यामुळे तिच्या मनाचा तळ स्पष्ट दिसतो मला. भरभरून आनंद घेत जगते मीरा.
आनंद, कौतुक, हसणे, रुसणे, रागावणे सगळेच दिलखुलास. हा आता इतरांना तिचं असं वागणं उथळ वाटत असेल पण तिच्या ह्या खळखळाटाने नाती दुरावत नाहीत उलट फुलतात. कारण तिच्या मनात काही काळंबेरं येतच नाही. आणि हे ज्यांना समजले त्यांना ती कधीच उथळ वाटत नाही."
आज अरुणला हे सगळे संभाषण परत आठवत होते. त्याने मीराच्या विचारातच जेवण संपवले. आणि थोड्यावेळात स्निग्धा आलीच.
अरुणला वाटले भांडून आलीये. काय माहिती बाईसाहेबांचा मूड कसा असेल. पण स्निग्धा बऱ्यापैकी शांत होती.
"काय ग आज एकदम मला सरप्राईज का? अचानक आलीस ते? आणि राजेश कुठे आहे? ' अरुणने विचारले.
"अहो बाबा नाही. आज मलाच सरप्राईझ दिलय तुमच्या जावयाने.
आम्ही दोघं आज आमच्या नवीन घरासाठी फर्निचर बुक करायला जाणार होतो. पण कोणी मित्र आलाय म्हणे अमेरिकेतून. त्याच्या बरोबर सगळ्या मित्रांची पार्टी ठरली अचानक.
तसं फर्निचर उद्याही जाऊन बघता येईल तो प्रश्न नाहीचे. प्रश्न राजेशच्या बेजबाबदारपणाचा आहे. मला सांगा अमेरिकेहुन कोणी अचानक येतं का?
म्हणजे ही पार्टी अचानक ठरलेली नाहीये. राजेश नेहमीप्रमाणे ती ठरवून विसरलाय. पण तो ते कबुल करत नाहीये. मी त्याला ह्यावरुन बोलेन ना म्हणून अचानक अचानक करतोय.
त्या पार्टीपेक्षा त्याचा विसरभोळेपणा लपवण्याचा मला राग आलाय. मी असते तर सरळ कबुल करुन सॉरी म्हणून मोकळी झाली असते.
पण नाही. तो त्याची चूक कधी ॲक्सेप्ट करतच नाही. मग भडकले आणि आले इथे. पण येतांना विचार केला जाउ दे. करु देत त्याला मजा. मीही जरा जास्तच ताणून धरले प्रकरण.
आता तो माझ्या काळजीत असेल. तर त्याला कळवुन टाकते मी इथे पोचलेय आणि बाबांबरोबर पार्टी करणारे आज. तू तुझी पार्टी एंजॉय कर. उद्या सकाळी येते घरी" असं म्हणून स्निग्धा फोन घेऊन आत गेली.
अरुणला वाटले चला आपोआपच वादळ शमले. मीरा काय आणि स्निग्धा काय. भावनांचा नुसता खळखळाट.. मग तो उथळ असला तरी खराखुरा.. तळात गाळ साचवुन वरवर शांत वाटणाऱ्या डोहापेक्षा ह्या स्वच्छ मनाचा झराच बरा. स्वतःही खळखळून वाहतो आणि आजुबाजुच्यांवर हळूच तुशार उडवत त्यांनाही खुलवतो.
समाप्त
©️ धनश्री दाबके

So nice....very well written story.
उत्तर द्याहटवाThank you so much dear Neelima
उत्तर द्याहटवा