© वर्षा पाचारणे.
"तानी, अगं कवर असं त्या बिस्तऱ्यात लोळत पडनार गं?... उठ, आन आवर बिगिबिगी... शाळंत मास्तरीन बाय घेनार न्हाय बग तुला... अन् मंग परत वर्गाभायिर उबं केलं, की भोकाड पसरून येशील घरला".... आयशीच्या आवाजानी तानी डोळे चोळत मोठ्ठा आळस देत उठली.
बाबा दारात रोजच्यासारखा खेळण्याचं भलं मोठं टोपलं घेऊन, पायात त्या तुटलेल्या चपलांना कसाबसा सावरत, आयशीला म्हणाला ,"नंदे, जातो गं... देवाच्या कृपेने आज तरी बरा धंदा व्हावा म्हंजी तानीच्या दप्तराची चैन आन पट्टा बसवून आणता येईल... रोज माझी पोर ते फाटकं दप्तर कसं बसं उराशी कवटाळून, तो नाला पार करती, तेव्हा वाटतं एखाद्या दिशी त्या दप्तरापायी पोर घसरून पडा बीडायची.
मला डोक्याची टोपलं सावरु, का त्या पाण्यातनं तानीचा हात पकडत, तिचं दप्तर सावरू?, याचं रोजच्याला संकट असतंया बघ"... नंदी पण मग त्याच्या हो ला हो म्हणत म्हणाली," व्हय तर... अजून जिंदगीभर अशा किती फाटक्या गोष्टींना ठिगळं लावत लावत जगाया लागतंय, ते त्या देवालाच ठावं".
तितक्यात तानी डोळे चोळत चोळत दारापाशी आली आणि म्हणाली ," बाबा, तू रोज खेळणी इकाया जातो... मला पण एक भावली पायजे.. तू रोज उद्या देईन, उद्या देईन असं म्हणतो... आणि तो पैसे साठवायचा गल्ला पण पायजे... मंग तू रोज घरी येताना आणलेलं पैकं मी त्या गल्यात टाकिन"....
तिच्याकडे पहात मनातली चिंता मनातच लपवत दिगंबरने तानीच्या निष्पाप चेहऱ्यावर हात फिरवला... "आज संध्याकाळी नक्की देतो बघ तुला भावली... पर आता आवर आन शाळेला जा.... शिकून मोठ्ठं व्हायचंय ना तुला"... असं म्हणत त्यानी तिच्या गालावरून हात फिरवला आणि तो निघाला...
तितक्यात नंदिने मागून त्याला परत एकदा आवाज दिला..
"आन हे बघा, आज संध्याकाळच्याला येताना घरातलं डाळ-तांदूळ संपल्याती, त्यात घरातलं त्याल, मीठ सगळ्यांची डबडी उलथीपालथी झालीत... आज सामान आणलं नाय तर रात्री उपाशीच झोपाया लागतंय बघा"... तिचं बोलणं ऐकून दिगंबरच्या अंगातलं होतं नव्हतं अवसान देखील गळून पडलं.
कसाबसा पायात वहाणा अडकून तो रस्त्याला लागला. चालता चालता डोक्यात विचारांची गर्दी झाली होती. गर्दीने भरलेल्या रस्त्यात देखील दिगंबर जणू एकटाच असल्यासारखं भासत होता...
विचारांचे थैमान चालू असतानाच, तो कधी बाजारात येऊन पोहोचला, त्याचे त्यालाही कळले नाही. येणाऱ्या जाणाऱ्याकडे आशेने बघत दिगंबर ओरडू लागला... 'ए बाहुलीsss, चेंडूsss, गल्लाssss, फुगाssss घे.... खुळखुळाssss, माकडssss घे.... रिक्षाsss, तलवारss चिमणीss घे'....
बाजारात आईबरोबर आलेलं एखादं चिमुरडं पोर मग दिगंबरच्या जवळ येत आईजवळ हट्ट करायचं.. 'आई मला चेंडू पाहिजे', म्हणत कधी मध्ये रस्त्यातच लोळण घ्यायचं... मग दिगंबर देखील म्हणायचा "ताई, घ्या की वं लेकरासाठी.... वाटलं तर थोडं पैकं कमी लावतो बघा... पण न्हाय नका म्हणू".... आणि मग लेकराच्या हट्टासाठी ती माऊली पाकिटातून पैसे काढत दिगंबरकडे घासाघीस करत कमी पैशात वस्तू खरेदी करत असे.
आजही सकाळपासून दुपारच्या दीड दोन वाजेपर्यंत फक्त एक गल्ला आणि एक बाहुली कशीबशी विकली गेली होती. संध्याकाळच्या किराणा सामानाची भूणभूण डोक्यात पिंगा घालत होती.. चार साडेचार होत आले, तरीही गिऱ्हाईक काही केल्या या खेळणीवाल्याकडं ढुंकून देखील पाहात नव्हतं... डोळ्यातले अश्रू देखील आता या रोजच्या मरण यातनेने कोरडे झाले होते....
सूर्य मावळतीला लागला होता... सुन्न अवस्थेत टोपलीतली खेळणी पुन्हा व्यवस्थित दोरीने गुंडाळत दिगंबर परतीच्या वाटेला लागला... डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं... डाळ, तांदूळ, खेळण्यासाठी हट्ट केलेलं बाजारातील लेकरू, तानीच फाटकं दप्तर, घरातली रिकामी डबडी, संध्याकाळी बाहुलीच्या आशेने आपली वाट बघत उभी असलेली तानी.... सारी चित्रं डोक्यात पिंगा घालत होती...
आता या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आजही सुटू शकत नाही, या विचारात तो पुलावर पोहोचला... पुलाखालून रेल्वे भरधाव वेगाने जात होती... इतक्यात मागून एक चोरटा काहीतरी चोरून वेगात धावत दिगंबरच्या मागून जात असताना त्याचा जोरदार धक्का दिगंबर लागला... दिगंबरच्या डोक्यावरची खेळण्यांची पाटी धाडकन पुलाखाली पडली... रेल्वेच्या त्या सुसाट वेगात खेळण्यांचा कुठल्या कुठे चुराडा झाला.
जिथे आयुष्यच फाटलं होतं, तिथे आज नियतीने पुन्हा एकदा दिगंबरला त्याच्या दारिद्र्याची आणखी एक झळ पोहोचवली होती... डोक्यात चाललेल्या विचारांचे चक्र क्षणात काटे तुटलेल्या घड्याळासारखं बंद पडलं. डोळ्यासमोर अंधारी आली... शुद्ध हरपावी, तसा दिगंबर जागच्या जागी मटकन बसला...
'कसं तोंड दाखवू आज बायको, पोरीला?'.... 'काय सुख दिलं आजवर मी त्यांना?'.... 'रोज बाजारात जाऊन खेळणी विकणारा मी... स्वतःच्या पोरीला साधी दहा रुपयाची बाहुली पण देऊ शकत नाय... 'अरे थू तुझ्या जिंदगी वर'..... 'तुला असलं लाजिरवाणं जगणं जगण्याचा काहीच अधिकार नाय.... बाप म्हणायच्या लायकीचाच नाहीस तू'.... खेळणी सोड... स्वत:च्या बायको, पोरीला साधं पोटभर दोन येळचं जेवण बी देऊ शकत नाय'... विचारांच्या नादात घळाघळा अश्रू वाहत होते.
पण आता काहीच पर्याय उरला नव्हता... जे पैसे कमवण्याचे साधन होतं, तेच उद्ध्वस्त झालं होतं.
तो पूल घराजवळच असल्याने आजूबाजूच्या परिसरात बातमी पसरली... पुलावरून उडी मारून रेल्वेखाली कोणीतरी जीव देऊन आत्महत्या केल्याची बातमी दिगंबरच्या वस्तीत पसरल्याने नंदी धास्तावली... 'मृताच्या आजूबाजूला खेळण्यांचा ढीग विखुरला होता', हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली.... 'म्हणजे माझ्या धन्याने तर आत्महत्या केली नसल न्हवं?'... तिच्या काळजाचा थरकाप उडाला.
संध्याकाळ झाल्याने बाबाची दारात उभं राहून वाट बघत असलेली तानी आईला रडताना पाहून जवळ आली आणि म्हणाली ,"माय तु का रडती गं?'... 'अजून बाबा आला नाय, म्हणून तुला भीती वाटती का?'... 'अगं येईल ना तो... बहुतेक त्याला आज बाजारात माॅप पैकं मिळालं असत्याल... म्हणून काही बाही आनाया गेला असंल'.
तानीला उराशी कवटाळत, नंदी म्हणाली, "पोरी, आत्ताच शेजारचा पिंट्या आरडत आला व्हता... की पुलावरून कोनत्या तरी खेळणीवाल्यानं जीव दिला"... असं म्हणत नंदी तोंड दाबत रडू लागली.
तिला वारंवार सकाळी चिंतेत बाहेर पडलेला दिगंबर आठवू लागला... आईचे बोलणे ऐकून तानी पटकन कोनाड्यातल्या गणपती बाप्पाच्या फोटो समोर उभी राहिली... आणि म्हणाली ,"देवा मला भावली, गल्ला, कायss कायss बी नगं... पर माझ्या बाबाला लवकर घरी पाठव... तो लय चांगला हाय"... 'आम्हाला शाळेतल्या बाईनी शिकवले की, जो सगळ्यांना आवडतो, तोच देवाला बी आवडतो... पर तू माझा बाबा आवडून घेऊ नकोस रे'.. मला भावलीसारखा जपणारा माझा 'बाबा' म्हणजेच माझ्यासाठी देव हाय'.... 'मी आजपासून त्याच्याकडं कसला बी हट्ट करणार नाय... पर तू माझ्या बाबाला लवकर मला भेटव'.... असं म्हणत तानी डोळ्यावर हात घट्ट दाबत हमसून हमसून रडू लागली...
तिला पोटाशी कवटाळून नंदी दिगंबरला शोधण्यासाठी म्हणून घराबाहेर पडणार तितक्यात लांबून दिगंबर येताना दिसला.
इतर वेळी पैशावरून कचाकचा भांडणारी 'नंदी', आज मात्र डोक्यावर खेळण्यांची पाटी नसलेला दिगंबर पाहूनदेखील आनंदाने भारावून गेली.... 'मन चिंती ते वैरी न चिंती', असे का म्हणतात याची प्रचिती आज आली होती.... तानी दोन्ही हात पुढे करत बाबाकडे धावली..
इतका वेळ विचारांच्या गर्दीत हरवलेला दिगंबर आपल्याकडे धावत येणाऱ्या तानीला पहात मात्र अश्रू वर्षावात चिंब भिजला होता... तानीने बाबाला येऊन कडकडून मिठी मारली आणि म्हणाली ,"बाबा, मला भावली, गल्ला, काय बी नको... मला फकस्त तू पायजे"... "मी आजपासून तुझ्याकडं कसला बी हट्ट करणार नाय... पण तू मला सोडून कधीsss बी जायचं नाय"...
दिगंबरने आपल्या लेकीचं असं समजुतदारपणांच बोलणे ऐकून तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि म्हणाला "नाय गं ताने, तुला सोडून मी कधीच कुठ्ठंच जाणार नाय बघ"...
बाजूच्या रिक्षा स्टॅन्डवर तेव्हा रिक्षामधून गाण्याचे सूर ऐकू येत होते...
हळुवार हाक तू, पापणीची जाग तू,
उसवून नाते असे जाऊ नको दूर....
उरातली ओढ तू, मनातलं वेड तू,
आठवणी तुझ्या देती नवी हुरहुर....
ना कोणी तुझ्यासारखे..... तुझ्यासारखे...
दिगंबरच्या मनात विचार आला, 'कदाचित आज मी माझं जीवन संपवलं असतं, तर माझ्या बाहुलीसाठी तिचा 'बाबा' एक हरलेला, कायम तिच्या अपेक्षांना उद्यावर ढकलणारा आणि होरपळलेल्या आयुष्याला अजून आगीत लोटणारा वाटला असता'..... 'पण आज खरंतर माझ्यामध्ये जगण्याची पुन्हा नवी उमेद जागवणारी ही छोटीशी पालवी म्हणजे माझी तानी... 'खेळण्यांची पाटी उध्वस्त झाली म्हणून काय?'.…. 'पण माझ्या लेकरासाठी मी वेळ पडली, तर स्वतःला इकन, पन तिची सगळी स्वप्न पूर्ण करन'... असं म्हणत दिगंबरने देखील तानीच्या त्या इवल्याशा मिठीने पुन्हा उद्याची खडतर वाट पार करण्याची तयारी केली.
वाचकहो, बाबा श्रीमंत असो वा गरीब, देखणा असो वा दिसायला अगदी सामान्य, बोलका असो वा अबोल.... पण प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या बाबासाठी एक हळवा कोपरा मात्र नक्कीच असतो... 'त्याने आपल्यासाठी काय काय केलं?', हे आपण कधी बोलून दाखवलं नाही, तरीदेखील 'त्याच्या'शिवाय आपलं जगंच नाही', हे मात्र आपण मनोमन जाणत असतो... स्वतःचं संपूर्ण आयुष्य लेकरांसाठी वेचणाऱ्या आणि कायम आपल्या भावना अव्यक्त ठेवणाऱ्या साऱ्या सुपर हिरो बाबांसाठी ही आजची कथा समर्पित...
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
Tags
marathikatha