अशीहि एक दिवाळी

© धनश्री दाबके




"अगं उद्या पहाटे चारचा गजर लावायचाय ते लक्षात आहे ना तुझ्या?  लाव बर का नक्की." जेवतांना अप्पा म्हणाले. 

सुधाताईंनी हळूच मितालीकडे बघुन डोळे मिचकावले आणि म्हणाल्या "अहो हो, आहे लक्षात माझ्या. तिसऱ्यांदा सांगताय तुम्ही हे मला. आणि ही काही आपली आश्रमातली पहिली दिवाळी आहे का? मला माहितिये की आपल्याला उद्या पहाटे पहाटे निघायचंय ते. " 

"मिताली तू सुद्धा तयार राहा ग वेळेवर. उगीच उशीर नको. मुलं खूप वाट बघत असतात आपली." अप्पा ताटावरुन उठताना म्हणाले.

"हो अप्पा. मी तयार असेन वेळेवर उद्या " मितालीने सांगितले.

"आई,  मी समीरकडून ऐकलंय की तुम्ही आणि अप्पा आपले बहुतेक सगळे सण आश्रमातच साजरे करता. खुप ग्रेट आहात तुम्ही दोघंही. आता ह्यावर्षीपासून मी ही तुमच्या टीममधे." मितालीचे हे बोलणे ऐकून सुधाताईंना तिचे खुप कौतुक वाटले. 

सहा महिन्यापूर्वी लग्न होऊन घरात आलेली मिताली किती पटकन आपल्यात रुळली आणि पहिली दिवाळी असूनही आश्रमात यायला तयार झाली. 

नुसतीच बरोबर यायला तयार झाली नाही तर तिथल्या मुलामुलींसाठी गिफ्ट्स , फराळाचे पदार्थ , रांगोळी, रंग, फटाके सगळ्याच्या खरेदीत किती उत्साहाने सहभाग घेतला तिने. प्रत्येकासाठी नेहमीच्या गिफ्ट्स आणि एकेक चांगले पुस्तक भेट म्हणून द्यायची आयडियाही तिचीच.

"बरंय गं, तुलाही आवड आहे माणसं जोडायची नाही तर एखादी म्हणाली असती कशाला करायचं हे सगळं ? लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे तर घरीच जोरदार साजरी करु. पण तू आमच्या बरोबर यायला तयार झालीस. तू आणि समीर येताय उद्या आमच्याबरोबर त्यामुळे खुप बरं वाटतय." असे म्हणून सुधाताई झोपायला गेल्या.

खरंतर सकाळी लवकर उठायचे होते पण तरीही सुधाताईंना काही झोप लागत नव्हती. 

आज मिताली त्यांना व अप्पांना त्यांच्या आश्रमातल्या कामाबद्दल ग्रेट म्हणत होती आणि सुधाताईंना मात्र राहून राहून साठेबाईंची आठवण होत होती. 

साधारण २० वर्षांपूर्वी, सुधाताईंची निमकर मराठी विद्यालयाच्या अशोक नगरच्या शाखेत गणिताच्या शिक्षिका म्हणून बदली झाली आणि तिथे मुख्याध्यापिका असलेल्या साठेबाई त्यांच्या आयुष्यात आल्या. 

साठेबाई विद्यार्थ्यांच्या आवडत्या बाई तर होत्याच पण सगळ्या शिक्षकांच्याही प्रिय मुख्याध्यापिका होत्या. बाई शाळेतल्या प्रत्येकाशी आपुलकीने वागायच्या. शिक्षकांना प्रेमाने आपलसं करुन घ्यायच्या आणि तरीही शाळेची शिस्तही जपायच्या. सुधाताईंना तर बाईंचा खूप आधार वाटायचा. 

बाई दर रविवारी एका आसरा नावाच्या अनाथाश्रमात मुलांना शिकवायला जायच्या. तिथल्या पोरक्या, निराधार मुलांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवून त्यांना जीवनाश्यक गोष्टींचे शिक्षण देण्यासाठी झटायच्या. 

आधीच सुधाताई बाईंच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे आणि सगळ्यांना आपल्या बरोबर घेत पुढे जाण्याच्या वृत्तीमुळे प्रेरित झाल्या होत्या, त्यात बाईंच्या आश्रमातील कामाबद्दल कळल्यावर तर बाईंसारखेच सत्कार्य आपल्या हातूनही व्हावे असं त्यांना प्रकर्षाने वाटायला लागलं. 

मग घरी सगळ्यांशी बोलून, सुधाताईंनीही बाईंबरोबर दर रविवारी आश्रमात जायला सुरुवात केली. आश्रमात जायला लागल्यावर सुधाताईंचा स्वतःच्या आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलला.

आश्रमातल्या मुलांच्या जीवनातील समस्या, अनारोग्य, आईवडीलांचे आणि इतर कोणाचेच प्रेम व आधार न मिळाल्याने झालेली मानसिक कुचंबणा पाहून त्यांचे मन हेलावून गेले. 

आपल्याला जगात कोणीच नाही ह्या भावनेने आत्मविश्वास गमावलेली ही मुलं जगण्यासाठी लागणारे कुठलेच कौशल्य आत्मसात करु शकत नसत. 

त्यामुळे त्या मुलांशी मोकळेपणाने बोलून , त्यांना समजून घेत त्यांच्या कलाने जमेल तेवढा वेळ सुधाताई तेव्हा साठेबाईं सोबत मुलांना शिकवू लागल्या आणि ते शिकवणे आजपर्यंत अखंड चालू राहिले. 

किती तरी मुलं आश्रमात आली आणि सज्ञान झाल्यावर तिथून बाहेर पडली. खुप जणांना हक्काचे आईवडील व घर मिळाले. तर बरेच जण १८ वर्षांपर्यंत आश्रमात राहिल्यानंतर बाहेर पडून यशस्वी जीवन जगायला लागले पण सुधाताईंनी त्यांच्या उपक्रमात खंड पडू दिला नाही. 

लहानपणी समीर बरेचदा त्यांच्या बरोबर आश्रमात जायचा. त्याची तिथल्या मुलांशी छान मैत्री व्हायची. अप्पाही सुधाताईंना खुप सपोर्ट करायचे. 

संचालकांना आश्रमासाठी देणग्या मिळवून द्यायला मदत करण्यापासून ते मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करणे, त्यासाठी लागणारे सामान आणून देणे हे सगळे अप्पा आनंदाने करायचे. 

मुलांना शिक्षणा बरोबर आपल्या संस्कृतीचीही ओळख व्हावी म्हणून गुढीपाडवा, गोपाळकाला, गणपती, दसरा, दिवाळी, होळी असे सण सुधाताई व अप्पा आश्रमात जाऊनच साजरे करायला लागले.

आश्रमातल्या मुलांसाठी पैसा देणारे देणगीदार तर खूप असतात पण आपला वेळ देऊन त्या मुलांना जीव लावत  निरपेक्ष प्रेमाची ओळख करून देणारा आणि मुलांची भावनिक गरज समजून घेणारा आपला नवरा मात्र खरच ग्रेट. सुधाताईचे मन अप्पांबद्दलच्या आदराने भरून आले. 

विचार करता करता शेवटी एकदाचा डोळा लागला सुधाताईंचा.

सकाळी ठरल्याप्रमाणे बरोबर साडेपाचच्या सुमारास अप्पा, सुधाताई, समीर व मीताली आश्रमात पोचले. 

लहान, मोठी सगळी मुलं व आश्रमातले मदतनीस सगळेच त्यांची वाट पाहात होते. 

पोचल्यावर  सगळ्या मुलांनी चौघांभोवती गलका केला. 

कावेरीने तर सुधाताईंना घट्ट मिठीच मारली. तिची ही इथली शेवटची दिवाळी होती. आता वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्याने, आश्रमातल्या नियमानुसार कावेरी पुढच्या महिन्यात आश्रम सोडून बाहेर रहायला जाणार होती. 
त्यामुळे तिला खुप भरुन आले होते. 

कावेरी मितालीला म्हणाली, "माझ्यासारख्या अनाथ मुलीला माया लावून जीवनाचा अर्थ शिकवला तुझ्या अप्पा आणि आईंनी. मी इथून बाहेर कुठेही गेले तरी सगळ्या सणांना मात्र इथेच येणार. आई अप्पांचा वारसा चालवत इथल्या मुलांना सणांचा मला देता येईल तितका आनंद देणार."

कावेरीचे ते बोलणे ऐकल्यावर मितालीचे डोळे पाणवले. खरंच किती वेगळं जग आहे या सगळ्यांचं. इतकी वर्ष आपण फक्त आपल्या सुखी व सुरक्षित जगातच रमलो होतो. पण आज आई, अप्पांमुळे आपल्याला आयुष्याची ही दुसरी बाजूही समजली.

मग समीर व मितालीने सगळ्यांना उटणे, सुगंधी तेल व साबण वाटले. दुपार नंतर रांगोळ्या काढायला रंग व रांगोळी मुलींकडे दिले. सगळ्यांनी मिळून फटाके उडवले. 

अप्पा आणि सुधाताईंनी मुलांसाठी आणलेली गिफ्ट्स आणि पुस्तकं सगळ्या मुलांना दिली. सगळ्यांनी यथेच्छ फराळ केला. सुधाताईंच्या हातचे बेसनाचे लाडू तर सगळ्यांचे फारच आवडीचे.
मुलांनी आनंदाने फराळावर ताव मारला.
आता परत निघायची वेळ झाली. 

कावेरी अप्पा व सुधाताईंच्या पाया पडून म्हणाली, "मी पण तुमचा आश्रमात येउन सगळे सण साजरे करण्याचा वारसा चालवू शकेन असा आशीर्वाद द्या मला." 

 " तथास्तु" म्हणून दोघेही समाधानाने आश्रमातून निघाले.

मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद मनात साठवत मिताली म्हणाली, "आई, मी आज पहिल्यांदाच अशी ही वेगळी आणि फक्त स्वत:चा विचार न करता इतरांना आनंद देणारी दिवाळी साजरी केली. देण्यातला आनंद आज मला तुमच्यामुळे खर्‍या अर्थाने कळला. मला या मुलांच्या जीवनात आनंदाचे मळे फुलवणारे तुमच्यासारखे सासूसासरे मिळाले. मी खरंच खूप लकी आहे. आज अगदी छान आणि समाधानी वाटतंय."

त्यावर प्रसन्नतेने सुधाताई म्हणाल्या " अगदी बरोबर. अगं, हे सणवार आपल्या माणसांचा आनंद जपण्यासाठी तर असतात. या मुलांच्या नजरेतला आपलेपणा व चेहऱ्यावरचा आनंद यातून मिळणारे हे समाधानच आम्हाला परत परत इथे घेऊन येते. आता इथून पुढे या कार्यासाठी आम्हाला तुझीही साथ मिळणार मग आम्हीही लकी नाही का? आपण सगळे मिळून आपल्याला जमेल तितके या मुलांसाठी करत राहू. म्हणजे आपल्या घरात हा समाधानाचा वारसा असाच सुरू राहील. " 

"हो आई, नक्की.." असं म्हणत मिताली आई, अप्पा आणि समीर बरोबर गाडीत बसून निघाली.

आज मितालीच्या आयुष्यातली समाधानाने भरलेली एक  अविस्मरणीय दिवाळी साजरी झाली. 

समाप्त 

©  धनश्री दाबके

📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.








टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने