© वर्षा पाचारणे.
मिहीरला मात्र घरच्यांनी इतक्या दूर न जाता आपल्याच देशात नोकरी कर असे सांगितले. मिहिरचे मन खट्टू झाले.. पण थोड्याच दिवसात त्याला देखील मुंबईमध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळताच तो त्यामध्ये रमून गेला.
या गोष्टीला जवळपास दहा वर्षे उलटली होती. दरम्यान फोन वरून मिहीर आणि अद्वैत एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांचेही लग्न झाले होते.
मिहीरला चार वर्षांची गोड मुलगी होती.. मिहिरच्या आईने तिचं नाव 'मुक्ता' असं ठेवलं होतं... दिसायला गोंडस असलेली ही चिमुरडी बऱ्याचदा मुक्ताई सारखं परकर पोलकं घालून घरभर बागडायची, तेव्हा घरभर जणू चैतन्याचा सडा पडला आहे, असं वाटायचं.
अद्वैत नुकताच भारतात आला होता. आज सकाळीच तो आणि त्याची मुलगी जेनी मिहिच्या घरी भेटायला आले. इतक्या वर्षांनी जीवश्चकंठश्च मित्र इतक्या दुरून आपल्याला भेटण्यासाठी आल्यावर दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली.
मुक्ता जेनी बरोबर मैत्री करण्यासाठी म्हणून तिला घर दाखवायला घेऊन गेली... पण जेनी काय बोलते ते मुक्ताला कळेना आणि मुक्ता काय बोलते ते जेनीला कळेना... जेनीचं ते फ्लुएन्ट इंग्लिश बघून मिहीरला मनातल्या मनांत 'आपण देखील मुक्ताला सुरुवातीपासून उत्तम इंग्लिश शिकवायला हवं होतं', असं वाटून गेलं..
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर परदेशातील निरनिराळ्या प्रकारची चॉकलेट्स आणि मिहिरसाठी आणलेलं ब्रांडेड वॉच देत अद्वैत म्हणाला," यार मिहीर, तू त्या वेळी इथे नोकरी करण्याचे ठरवून मोठी चूक केली... काय ठेवलंय इथे तूच सांग?"... "अरे साधं पंधरा दिवसांसाठी मी इकडे आलोय तर मला पोल्युशनचा भरपूर त्रास होतोय.. आमच्या तिकडे सगळं कसं चकचकीत असतं.
आता कालच रात्री इथे लाईट गेले तर जेनी अक्षरशः घामेघूम होऊन हैराण झाली.. आमच्याकडे लाईट जाण्याचा कधी प्रश्नच येत नाही... बरं एज्युकेशन म्हणशील तर अगदी लहानपणापासूनच अभ्यासाबरोबर निरनिराळ्या ॲक्टिविटी शिकवल्या जातात... आणि आपल्याकडे मुलांना स्वतःचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही देत नाहीत.. मात्र तिथे बघ शालेय शिक्षण संपलं की मुलं स्वतःचा निर्णय स्वतः घेऊन मोकळी होतात"
'अद्वैतने हा टोमणा आपल्यालाच मारला' असं समजून मिहीर मनातल्या मनात चरफडत होता.
"जाऊ दे यार, आता काय! गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी", असं म्हणत कसंनुसं हसत मिहीरने जणू स्वतःच्या नशिबाला दोष देत वेळ मारून नेली.
जेनीला मात्र थोड्याच वेळात मुक्ताचं घर फार आवडलं... बागेतील वेगवेगळ्या प्रकारची फुलं गोळा करून दोघीजणी छान पैकी खेळत होत्या... एकमेकींची भाषा समजत नसली तरी हातवाऱ्यांनी समजावत होत्या.
जाता जाता अद्वैत मुक्ताला म्हणाला,"बाळा शिकून मोठी हो... बाबा सारखी इथेच राहू नकोस... तुझा अद्वैत काका तुझ्यासाठी परदेशातही सगळी व्यवस्था करेल".... असं म्हणत मिहीरला डोळा मारत अद्वैतने मिहीरचा निरोप घेतला..
'खरंच माझं चुकलंच'... 'त्यावेळी आई-बाबांचं न ऐकता मी देखील अद्वैत सारखं परदेशात स्थायिक व्हायला हवं होतं... तिथे आलिशान राहणीमान, चार दिवस पुन्हा मायदेशी परतल्यावर मिळणारा मान, मुलांचं उज्वल भवितव्य या साऱ्याच गोष्टी मी इथे राहून गमावून बसलो का काय?', असं वाटून आज मिहिरची भलतीच चिडचिड होत होती..
रात्री उशिरापर्यंत त्याचा डोळ्याला डोळा लागला नव्हता. बारा साडेबारा नंतर कुठे त्याला झोप लागली.
त्याच्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या स्वप्नांची जणू शृंखलाच तरळू लागली... सार्वजनिक नळावर आज कचाकचा भांडणार्या बायका पुन्हा दुसऱ्या दिवशी एकमेकींशी गुण्यागोविंदाने गप्पा मारत होत्या.
ज्या दिवशी पाणी येणार नाही त्या दिवशी आईने आधीच भरपूर पाणी भरून घरात छोटी छोटी पातेली तांब्या इथपर्यंत साऱ्या भांड्यांची उतरंड लावून ठेवली होती. मिहिर शाळेत जाताना शर्टाचं तुटलेलं बटणे आईने एका मिनिटात शिवून दिलं होतं. आईने जागेवर ठेवायला सांगितलेला सुईदोरा तिथेच गादीवर ठेवल्याने, मिहीरला नेमकी ती सुई पायाला जोरात टोचली होती..
आईने वाळवण करायला घेतल्यानंतर हळूच जाऊन पापडाची लाटी खाणं, साबुदाण्याच्या पापड्या अर्धवट कच्च्या असताना हळूच तोंडात टाकणं, सर्दी खोकला झाल्यावर आईने प्रेमाने दिलेला तुळशीच्या पानांचा काढा स्वप्नात देखील घशाला वेगळीच ऊब देत होता.
ताटात हार, फुले, दुर्वा, अष्टगंध, धूप, कापूर अशी देवपूजेची जय्यत तयारी डोळ्यासमोर दिसताच झोपेतदेखील मिहीरला प्रसन्न सकाळ असल्याचा भास होत होता.
सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, चार वाजता पुन्हा काहीतरी हलकं खाणं आणि रात्री गरमागरम भाकरी आणि रस्स्यावर ताव मारतानाचं चित्र दिसताच जणू झोपेतही मिहिरच्या तोंडाला पाणी सुटलं होतं..
अकरावीत गेल्यानंतर आई-वडिलांचा विरोध असून देखील दहीहंडीच्या थरावर लावलेली हजेरी डोळ्यासमोर येताच तोच जोश जणू त्याच्या अंगात संचारला होता. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या काही दिवस आधी ढोल-ताशांची चाललेली जय्यत तयारी, तो ढोलांचा आवाज जणू त्याच्या कानात घुमत होता.
छत्रपती शिवाजींच्या राज्यात आपण राहतोय हा अभिमान मिटल्या डोळ्याआड देखील झळकत होता... मराठी शाळेत शिकण्याची खंत न वाटता तो एक चिरंतन टिकणारा अभिमान मनात ठसला होता.
लग्न होऊन माधुरीचा जोडीदार बनताना पार पडलेले लग्नविधी डोळ्यासमोर जसेच्या तसे दिसत होते.. लग्नात एकमेकांना दिलेली वचनं, आयुष्यभर संसार सुखाचा होण्यासाठी केलेल्या तडजोडी देखील डोळ्यासमोर येत होत्या.
कधी हसू, कधी आसू लपवत प्रत्येक प्रसंगात आपल्या कुटुंबाने दिलेली भक्कम साथ देखील त्याच्या स्वप्नातला महत्त्वाचा भाग ठरली होती.. लग्नात होणारे कुलाचार, जेजुरी गडावर माधुरीला उचलून घेत चढलेल्या पाच पायऱ्या, एकमेकांची केलेली थट्टा मस्करी, वेळ प्रसंगी अडीअडचणीला माधुरीच्या आई-वडिलांना दिलेला खंबीर आधार, अंथरुणावर खिळलेल्या आजीची वर्षानुवर्ष सेवा करणारी आई,
कधी वाणसामान कमी असेल तर असेल त्यात भागवून घेण्याची कला, लाईट गेले तरीही मेणबत्तीच्या प्रकाशात अंगणात येऊन साऱ्यांनी एकत्र मारलेल्या गप्पा, तर जेवताना लाईट गेल्यास 'आज कँडल लाइट डिनर करूयात' असे म्हणत एंजॉय केलेलं जेवण, उन्हाळ्यात माठातलं वाळा घातलेलं थंडगार पाणी, तर कधी दारात उभे राहून कुल्फी खात त्याचे हातावर आलेले ओघळ देखील जिभेने चाटत घेतलेली मजा एक ना अनेक.
किती चित्रांची मालिका डोळ्यासमोरून झरझर जात होती.
स्वतःला मिळालेल्या पहिल्या नोकरीच्या ठिकाणी जाताना आईने हातावर दिलेले दही साखर कुठल्याही बेस्ट लक पेक्षा मोठी भूमिका पार पाडायचे.
रेल्वेच्या गर्दीची सवय नसलेला प्रत्येक जण हळूहळू त्या गर्दीतला अविभाज्य घटक बनून जातो आणि मग त्या गर्दीत देखील काही चेहरे हक्काचे बनून राहतात या सार्या गोष्टी अस्पष्टपणे दिसत होत्या... कधी रेल्वेत गाणं म्हणणाऱ्या भिकाऱ्याला पैसे देताना त्याची आलेली किव असो किंवा लाच घेणाऱ्या अधिकार्याची आलेली चीड असो, गावाला झाडाच्या पारावर बसलेले आबालवृद्ध असो किंवा गावच्या कौलारू घरासमोरचा पेटता तांब्याचा बंब असो... सारं काही अवर्णनीय.
वर्षभर जरी पैशाची चणचण असली तरीही दिवाळी मात्र जल्लोषात साजरी करण्याचा उत्साह असो, किंवा मुलाला चांगले मार्क मिळाले म्हणून शेजाऱ्यापाजाऱ्यांना पेढे वाटण्याची पद्धत असो, घरातून बाहेर पडताना वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे असो, किंवा क्वचित प्रसंगी वडिलांनी कानाखाली मारलेली थप्पड असो.
त्या मारण्या मागे देखील त्यांचा हेतू काय होता हे समजल्यावर स्वतःची चूक उमगल्याची भावना असो, देशभक्तीपर गाणं लागताच उरात तुडुंब भरून वाहणारं देशप्रेम असो, किंवा आपल्या आया-बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहताच उसळलेलं रक्तं असो. हे सारे चित्र डोळ्यापुढुन जाताना नकळत मिहिरच्या तोंडातून शब्द बाहेर पडले ,"मला अभिमान आहे, मी या भूमीवर जन्मल्याचा"
इतक्यात माधुरीने मुक्ता आणि मिहीरला उठवले... 'काल अद्वैत घरी येऊन गेल्यापासून थोडा डिस्टर्ब असलेला मिहिर आता उठल्याउठल्या पुन्हा चिडचिड तर करणार नाही ना?', या विचाराने तिने त्याला थोडं घाबरतच उठवलं...
"अहो, उठा आज स्वातंत्र्यदिन आहे ना... मुक्ताला तयार करायचं आहे.. तिची आज वक्तृत्व स्पर्धा आहे ना".. असं म्हणत माधुरी पुन्हा तिच्या कामाला निघून गेली. मुक्ता देखिल पटकन उठून नित्यनेमाप्रमाणे समोर हात जोडत कराग्रे वसते लक्ष्मी म्हणत श्लोक पूर्ण करून अंघोळीला गेली.
ती एवढीशी चिमुरडी त्या खणाच्या परकर-पोलक्यात अगदी देखणी दिसत होती... गळ्यात छान मोत्याच्या माळा, केसांमध्ये गजरा माळलेली मुक्ता पाहून काल वाटणारी उदासीनता मिहिरच्या मनातून पूर्ण निघून गेली...
माधुरी देखील मस्त पांढरीशुभ्र साडी नेसून तयार होती... कॉलनीतल्या झेंडावंदनासाठी आई-बाबा देखील छान पैकी तयार झाले होते.
गरमागरम थालीपीठांचा नाश्ता करत मिहीर आणि माधुरी मुक्ताला घेऊन शाळेत निघाले. पण शाळेत जाण्यापूर्वी नित्यनेमाप्रमाणे मुक्ताने आजी-आजोबांना आणि आई-बाबांना वाकून नमस्कार केला. आजीने देखील तिच्यावरून बोटं मोडत 'माझी लाडाची गं मुक्ता'... असं म्हणत तिचा पापी घेतली... टाटा बाय बाय च्या जमान्यात बाहेर जाताना 'अच्छा, येते', असं म्हणणारी आपली छोटी लेक पाहून या बाबाचा उर कौतुकाने भरून आला.
शाळेत सगळीकडे प्रसन्न वातावरण होते... निरनिराळ्या फुलांची सजावट करण्यात आली होती... मैदानावर काढलेली भव्य रांगोळी, आणि सोबतीला देशभक्तीपर गीते ऐकताना आपण या देशाचे नागरिक आहोत याचा अभिमान ओसंडून वाहत होता.
मुक्ताने 'आमची संस्कृती' या विषयावरचे तिचे वक्तृत्व न अडखळता सादर केल्यानंतर मिहिरचे डोळे पाणावले होते... 'इंग्रजी भाषा व्यवहार ज्ञानासाठी अत्यावश्यक आहेच, परंतु आपली संस्कृती जपत तोच वारसा पुढे नेण्याचं काम आपण नाही करणार तर कोण?', या विचाराने कालच्या त्याच्या वागण्यावर त्याला आज लाज वाटत होती...
प्रमुख पाहुण्यांच्या हातून बक्षीस घेताना ,'माझी सगळी तयारी माझ्या आईने करून घेतली होती', हे सांगताना मुक्ताच्या चेहऱ्यावरचे निरागस हसू तिच्या मनातला घरच्यांबद्दलचा आदर, प्रेम दाखवून गेलं.
पुन्हा घरी परतत असताना वाटेत नेमकी अद्वैतची आई भेटली.
माधुरीने त्यांना घरी येण्यासाठी आग्रह केला... 'ही परकी पोर आपल्याला इतका आग्रह करते', हे पाहून त्यांचे डोळे पाणावले... "मिहिर, बरं झालं बाबा तू इथेच राहिलास... नाहीतर तुझ्या आई बाबांची अवस्था देखील आमच्यासारखी झाली असती... करियरमागे धावणारी मुलं अगदी पाहुण्यासारखी आई बापाला भेटायला येतात आणि उपकार केल्यासारखी दोन चार गिफ्ट हातावर टेकवून जातात... आज तुझ्या मुक्तेला बघून खरंच तुझ्या आई बाबांचा हेवा वाटतो... असेच सुखी रहा", असं म्हणून अद्वैतची आई मागे वळणार तोच अद्वैत मागे उभा होता.
'आपण आपल्या आई वडिलांच्या निर्णयाचा मान न ठेवत परदेशात स्थायिक होऊन, त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत जबाबदारीची झटकल्याची जाणीव', त्याला आईच्या या शब्दातून झाली होती..
'परदेशाचं गुणगान गाताना आपण आपलं खूप काही इथं हरवून गेलोय', याची जाणीव त्याच्या अश्रुंना थांबवू शकली नाही.
काल 'बाबा सारखी चूक करू नको' असं सांगणाऱ्या मुक्ताला जवळ घेत अद्वैत म्हणाला," बेटा या अद्वैत काका सारखी चूक तू करू नकोस"... "आता मीच माझ्या जेनीला आपली संस्कृती शिकवून आपण किती संपन्न आहोत हे दाखवेल"... आज मात्र त्याच्या या बोलण्यामुळे साऱ्यांच्याच डोळ्यात देशाबद्दलचा अभिमान आणि आनंदाश्रू झळकत होते... आयुष्यभर जगलेल्या गोष्टींचं स्वप्न मिहीरला देखील खूप काही शिकवून गेलं होतं.
समाप्त
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.