ती कशीही वागली तरी ते नाक मुरडणारंच

© वर्षा पाचारणे


स्त्री-पुरुष समानता कितीही म्हटलं, तरीही आजही स्त्रीला अनेक ठिकाणी दुय्यम समजले जाते. तिला घरात किंवा बाहेर वावरतानाही अनेक विचित्र आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यातच घरच्यांनीदेखील तिला समजून न घेता तिच्या असण्यावर, वावरण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर तिला सगळ्यात जास्त त्रास होतो. 

अशाच महिलांशी संबंधित असलेल्या अनेक प्रश्नांचा, कदाचित छोट्या-छोट्या वाटणाऱ्या पण मोठ्या डोकेदुखीची कारणं ठरलेला गोष्टींचा बटवा आज तुमच्यासमोर उघडणार आहे. कारण एकंच...  'ती कशीही वागली तरीही ते नाक मुरडणारंच' आहेत. 

अगदी गरीब कुटुंबापासून ते थेट श्रीमंती थाटापर्यंत प्रत्येक स्त्रीचे प्रश्न इथे समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रसंग १:

नंदिनी... झोपडपट्टीत राहणारी, तीन मुली आणि एका मुलाची आई असलेली, अतिशय कष्टाळू महिला. नवरा देखील दिवसभर हमाल म्हणून राबत असे. 

घरची परिस्थिती अगदी हालाखीची. 'आपल्यासारखी वेळ आपल्या मुलींवर येऊ नये' म्हणून मुलींना रात्रशाळेत पाठवायचं, शिकून मोठं होऊन मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, असं तिचं स्वप्न होतं. स्वप्नात अडथळे आणणाऱ्या तिच्या वस्तीत अनेक प्रवृत्ती होत्या. 

मुली शाळेत निघाल्या, की आजूबाजूची टवाळखोर मुलं त्यांना दम द्यायची. 'शाळेत न जाता घरी चालती हो', म्हणत हुसकावून लावायचे. 

त्यात कधीतरी नंदिनी नाहीतर तिचा नवरा मुलींना शाळेत सोडायला गेलाच तर टवाळखोरांचा त्रास तर टाळला जायचा, पण इतरांच्या कुटाळक्या करत बसलेल्या बायका नंदिनी दिसली की तिला म्हणायच्या,' नंदे, तू स्वतःला लय शहाणी समजतीस... तुला वाटतं, तुझ्या पोरी शिकून काय सायबीन होणार हाय काय?"...  असं सतत टोमणे मारून छोट्या छोट्या गोष्टीत वाद घालत त्या तिचे मानसिक खच्चीकरण करू पाहत होत्या. 

कधीकधी वैतागून नंदिनीलाही वाटायचे,' जाऊ दे, आपण खूपच मोठं स्वप्न पाहतोय.... जे आपल्याला झेपणार नाही, त्याची उगाच आशा का लावून ठेवायची? कितीही शिकवलं तरी मुलींना पुढे शिकवायला आपल्याकडे ना पैसा असणार आणि ना असल्या वस्तीत राहुन ती जिद्द टिकवली जाणार.... त्यापेक्षा सोडून द्यावी ती शाळा म्हणजे लोकांची तोंड तरी बंद होतील. 

पण मग तीनेच निर्धार करत मुलींबरोबर स्वतः शिकण्याचा निश्चय केला... आता नंदिनी रात्र शाळेत स्वतः मुलीं बरोबर शिकू लागली... व्यवहारज्ञान आणि अक्षरज्ञान दोन्ही वृद्धिंगत होत होतं. 

आता तिने मनाशी निश्चय केला होता की,' काही प्रसंगात समाजाचं नाही तर मनाचं ऐकायचं असतं... कारण 'ती कशीही वागली, तरी लोक नाक मुरडणारंच'..…

प्रसंग २:

अर्चना काकूंना एक मुलगा आणि मुलगी होती. सामान्य कुटुंबात रहाणाऱ्या अर्चना काकूंनी काटकसर करत संसार उभारला होता. 

मुला मुलीचे लग्न झाले तरी सतत त्यांनी केलेल्या काटकसरीच्या संसाराचे त्या स्वतःच सतत गुणगान गात रहायच्या. आता त्यांना सून आली होती. मुलगीही लग्न झाले तरी जवळच घर असल्याने सतत आईकडे येत राहायची. 

सून शैला आणि मुलगी मनीषा एकमेकींशी अतिशय प्रेमाने वागायच्या. दोघीही नोकरी करत असल्याने दोघींची मुलं अर्चनाकाकू दिवसभर सांभाळायच्या. 

पण रोज संध्याकाळी शैला घरी आली की, त्या तोंड फुगवून बसलेल्या असायच्या. तिच्या मुलीचे करताना त्यांना किती त्रास होतो, याचा सतत पाढा वाचायच्या. पण तेच मनीषा आली की, 'तिची मुलगी किती छान वागते, त्यांनी सांगितलेलं सगळं किती छान ऐकते, असं म्हणत सतत शैलाला टोमणे मारायच्या. 

शैलाची आणि मनीषाची मुलगी एकाच वयाची असूनही त्या खूप भेदभाव करत होत्या. ऑफिसला जाताना शैलाने छान साडी घातली की लगेच त्या बोलून मोकळ्या व्हायच्या,' आज-काल बायका ऑफिसात कामं करायला जातात की मिरवायला तेच कळत नाही'. त्यांचे हे बोलणे ऐकून शैलाचा दिवसभराचा सगळा उत्साह क्षणात गळून पडायचा.... पण तेच मनीषाने छान ड्रेस घेतला की लगेच त्या म्हणायच्या," आज तुझी नक्कीच दृष्ट काढावी लागेल".

शैलाने कितीही काम केले आणि पाच मिनिट तिने वर्तमानपत्र हातात घेतले तर सासूबाईंचा तिळपापड व्हायचा आणि मग उगाच सासऱ्यांना त्या म्हणायच्या, "आज-काल पेपर वाचला नाही तर जगात उद्यापासून घडामोडीच होणार नाहीत, अशी आजकाल परिस्थिती झाली आहे"... त्यांचं बोलणं ऐकून शैला निमुटपणे हातातला पेपर ठेवून पुन्हा घरातलं एखादं छोटे-मोठे काम करत राहायची. 

सुट्टीचा एक दिवसही तिला आनंदाने जगता येत नव्हता. पण मग तिनेही यावर उपाय शोधून काढला की 'माझ्या वागण्यात काहीच वावगं नसताना मी दुसऱ्याचा विचार का करू आणि त्यात त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर परिणाम करुन स्वतःला काळजीत का टाकू?", असा विचार करत त्या दिवसापासून तिने स्वत:ला वेळ द्यायला सुरुवात केली. 

मुलीला पाळणा घरात ठेवून आता बिनधास्तपणे कोणाच्याही मदतीशिवाय ती सारे काही करत होती. तिच्या या निर्णयावरही तिला खूप ऐकून घ्यावं लागलं.... पण आता तिने एकच गोष्ट ठरवली होती ती म्हणजे,' ती कशीही वागली, तरीही ते नाक मुरडणारंच'...  आणि स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हे ती मनापासून जाणत असल्याने तिने कधीही समोरच्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला नाही पण 'स्वतःचं आयुष्य स्वतःच्या कलेने जगता यावं' हे तंत्र मात्र ती शिकली.

प्रसंग 3:

उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातली नयना स्वभावाने अतिशय प्रेमळ होती, पण मितभाषी असल्याने शिष्ट असल्याचा लोकांचा गैरसमज झाला होता. 

त्यामुळे सोसायटीतील इतर महिलांनी तिला जवळजवळ टार्गेट बनवले होते. ती येता-जाता दिसली की, तिच्याबद्दल कुजबुज करायच्या.. एक दिवस असेच सोसायटीतून जाताना तिच्या कानावर बाजूच्या काकुंचे बोलणे पडले.. त्या सानेआज्जींना सांगत होत्या की," पाहिलं का, नवरा गेला की काय काम असते का? 

घरात इन मीन दोघंजणं... असं नुसतं घरात बसण्यापेक्षा एखादी चांगली नोकरी केली तर काय बिघडतं का? त्यात एवढ्या मोठ्या साहेबाची बायको, पण काय ते तिचं राहणीमान! एवढी मोठी वेणी, असले सैलढैल पंजाबी ड्रेस आणि माणूस दिसलं तरी नुसतं हसून पुढे जाते.. तोंडातून साधा एक शब्द निघत नाही"... त्यांचं बोलणं ऐकून नयनाला खूप वाईट वाटलं. 

तिने एका ठिकाणी नोकरीसाठी तसंही अॅप्लिकेशन केलं होतं. तिला एका मोठ्या कंपनीत तात्काळ नोकरी मिळाली, कारण ती तेवढी पात्र होती. 

आता रोज सकाळी नयना घरातली सारं कामं आवरून नोकरीला जात होती. सकाळच्या गडबडीत एवढे लांब सडक केस नीटनेटके ठेवताना आता तिची फार गडबड व्हायची. त्यातच रेल्वेचा प्रवास असल्याने तिने खांद्यापर्यंत छान हेअर कट करून घेतला. 

प्रवासात आणि ऑफिसमध्ये सुटसुटीत वावर असावा याकरता तिने लग्नाच्याआधी सारखे जीन्स आणि टॉप घालायला सुरुवात केली. आता तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं. 

पण मग सोसायटीतील सदस्यांना नवीन चर्चेचा विषय मिळाला. नयना ऑफिसला निघाली की, मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या मंडळींना तिच्यावर कमेंट करायला संधीच मिळाली होती. 

आजही असंच गडबडीत असतानादेखील नयनाच्या कानावर त्यांचं बोलणं पडलंच... त्यातील एक आजीबाई म्हणाल्या," आज-कालच्या मुलींना लांब केस म्हणजे ओझं वाटू लागलेय.. खांद्यापर्यंत केसांच्या या झिरमिळ्या घेऊन फिरायची आणि पुरुषासारखे शर्ट पॅन्ट अडकून कामाला जायची अशी पद्धतच झाली आहे".... पण आता नयना त्यांच्या बोलण्याने दुःख वाटून घेणारी राहिली नव्हती.

 तिला कळून चुकले होते की,' ती कशीही वागली तरीही ते नाक मुरडणारंच'.

प्रसंग ४:

समृद्धी म्हणजे कुलकर्ण्यांची एकुलती एक लेक. जन्मत:च अंगाने धष्टपुष्ट असलेली समृद्धी शाळेपासून अगदी कॉलेज पर्यंत सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली होती. 

'घरात बनवलेले जेवण काय एकटीच खातेस की काय?' असं म्हणत मित्रमंडळी तिची खिल्ली उडवायचे... तर स्कुटी घेऊन ती कॉलेजला निघाली की बिल्डींगमधील बायका तिच्याकडे बघत विचित्र पद्धतीने हसत म्हणायच्या," ती गाडी केवढीशी, तिची बॉडी केवढी!" आणि मग एकमेकांना टाळ्या देत तिच्यावरती विनोद करणे हा त्यांचा रोजचा कार्यक्रम बनला होता. 

आपल्या दिसण्यावर लोक इतके कमेंट करतात, यामुळे समृद्धीला मनातून खूप वाईट वाटायचे. तरीही ती चेहऱ्यावर तसे कधी दाखवून देत नसे. 'कायम हसरा चेहरा' हा तिच्या व्यक्तिमत्त्वातला एक महत्त्वाचा पैलू होता. 

जसं कॉलेजचे शिक्षण संपलं तसं तिने डायटिंग आणि एक्ससाइज करून स्वतःचं वजन बऱ्यापैकी आटोक्यात आणलं. दरम्यान तिने चार चाकी गाडी शिकून आता ती बिनधास्तपणे कुठेही आई बाबांना घेऊन जाऊ शकत होती. 

योगा आणि डायटिंगमुळे तिने स्लिम फिट म्हणावं इतकी तब्येत कमी केली होती. तरीही पुन्हा ती चर्चेचा विषय ठरली होती. आता मित्रमंडळी तिला झुरळ म्हणून चिडवू लागली होती, तर ती जेव्हा फोर व्हीलर घेऊन बाहेर पडत असे, तेव्हा सोसायटीतील महिला म्हणायच्या, "अंगात काडीचं मांस नाही आणि चार चाकी गाडी घेऊन फिरते", आणि पुन्हा तशाच टाळ्या देत विनोद करायला त्या मोकळ्या व्हायच्या.

पण मेहनतीने स्वतःची तब्येत आटोक्यात ठेवल्याने समृद्धीमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आला होता आणि त्यामुळेच तिने लोकांकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले होते कारण तिला आता समजुन चुकले होते कि,'ती कशीही वागली, तरीही ते नाक मुरडणारंच'.

प्रसंग ५:

सुनिता मावशी साधारण ४५ वर्षांच्या असतील, तेव्हा त्यांचे पती वारले. मुलांचे शिक्षण नुकतेच संपले असल्याने अजून त्यांना नोकरी, त्यांचे लग्न हे प्रश्न सुनिता मावशींसमोर होते. 

इतकी वर्ष भडक लाल कुंकू लावत असलेल्या सुनिता मावशी आता पांढरेफट्ट कपाळामुळे वेगळ्याच दिसू लागल्या होत्या. स्त्रीचे सौभाग्य गेले की तिचे सौंदर्यच जणू झाकोळलं जातं, असं त्यांना दर दिवसाला आरशात पाहताना वाटायचं. 

मनात कितीही दुःखाचा पूर असला तरी तो ओसंडून वाहू द्यायचा नाही म्हणून त्या बाहेर पडताना खाल मानेने जणू काही पती गमावण्यात त्यांची काही चूक आहे ,असे वाटून जायच्या... त्या लांबूनच दिसल्या की इतकी वर्ष त्यांच्याकडे येणाऱ्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनी त्यांना दुर्लक्षित केल्यासारखे वागणे बदलून टाकले होते. 

त्या दिसताच बायका एकमेकींशी बोलण्यात मग्न असल्यासारखे दाखवत असत किंवा तिथून निघून जात.

तरीपण एक दिवस त्यांच्या कानावर बायकांचे बोलणे पडले .. त्या दोघी आपापसात कुजबुजत होत्या," अ,गं आज-काल कोण एवढं पाळतंय विधवेचे जगणं...  हल्ली विधवा बायका पण चांगल्या टिकल्या लावून फिरतात, गळ्यात मंगळसूत्र घालतात आणि ही तर अशी अडनिड्या वयाची आहे... उगाच बाईच्या कपाळाला कुंकू दिसलं नाही की लोकांच्या वाईट नजरा पडतात.. त्यात दोन्ही मुलं नुकतीच कामाला लागल्याने घरात एकटीच असते... उगाच कशाला धोका पत्करायचा? 

बाहेर पडताना एखाद्याने लक्ष ठेवलं तर केवढ्यात पडेल हिला? काय झालं टिकली लावून फिरायला? आजकाल सगळीकडे सर्रास लावतात टिकल्या. हवं तर बाहेर पडताना टिकली लावायची आणि घरात गेल्यावर काढून ठेवायची"... 

सुनिता मावशींंनाही मनातून वाटलं,' खरंच आहे की, बाहेर पडताना टिकली लावली तर आपल्यालाही  किमान सुरक्षितता जाणवेल. टिकली म्हणजेच आधार समजणाऱ्या समाजात सुनितामावशी पुन्हा एकदा लाल रंगाची टिकली लावून फिरू लागल्या.

एक दिवस अचानक मावशी भाजीला जात असताना पुन्हा त्याच बायका आपापसात कुजबुजत होत्या," नवऱ्याला जाऊन वर्षही नाही झालं आणि ही बघा, पुन्हा एकदा कुंकू लावून फिरायला मोकळी... कुणास ठाऊक फक्त कुंकू लावले की गळ्यात मंगळसूत्रही घातले आहे?"... त्यांचं बोलणं ऐकून सुनिता मावशी भाजी न घेता डोळ्यातले अश्रू लपवत पुन्हा घरी परतल्या.. 

तिने कपाळाची टिकली आरशाला चिकटवली आणि ती विचारात मग्न झाली. नक्की कुठलं बोलणं खरं?.... ते जे मी महिन्याभरापूर्वी ऐकलं होतं ते?  का आज जे कानावर पडलं ते? 

या विचारात असतानाच तिने मनाशी एक खूणगाठ पक्की केली की,'आजपासून ती बिनधास्तपणे टिकली लावूनच घराबाहेर पडेल... जरीही नवरा हयात नसला तरीही त्याचं प्रेम आपल्यासोबत मरेपर्यंत राहणार आहे.. त्याच्या आठवणी, त्याच्यासोबत घालवलेले क्षण, हे जसे आपण सांभाळून ठेवले आहेत, तशीच त्याच्या नावाने इतके वर्ष लावलेली टिकलीही, आता मी सोडणार नाही.

केवळ विधवा आहे म्हणून काही नियम पाळण्यापेक्षा ज्याच्यामुळे आज आपण आज वर जे प्रेम अनुभवलं, आयुष्य जगलो, त्याची आठवण म्हणून तरी मी टिकली लावणारच आणि त्या दिवसापासून सुनिता मावशी अगदी बिनधास्तपणे लोक काय म्हणतील याचा विचार न करता टिकली आणि मंगळसूत्र दोन्ही वस्तू वापरू लागल्या... कारण त्यांना मनापासून जाणवलं होतं की,' त्या कशाही वागल्या तरीही लोक नाक मुरडणारंच'.

तर मैत्रिणींनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपल्या मागे कोण काय बोलत आहे, यापेक्षा आपल्याला स्वतःला काय वाटतं हे जास्त महत्वाचे आहे. 

मनासारखं वागणं म्हणजे अगदी स्वैराचार किंवा अगदीच जुन्या पिढीतील्या लोकांसारखं बोलायचं झालं तर,' उधळलेल्या घोड्यासारखा वागणं', नक्कीच अपेक्षित नाही... पण त्याचबरोबर केवळ लोक काय म्हणतील? या विचारापेक्षा आपल्याला काय योग्य वाटते हे एकदा तपासून पहावं कारण.... कारण तू कशीही वागली, तरीही ते नाक मुरडणारंच.

समाप्त

© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने