टू बी ऑर नॉट टू बी?


© वर्षा पाचारणे




'टू बी ऑर नॉट टू बी?' दॅट इज द क्वेश्चन.... 'जगावं की मरावं?' हा एकच सवाल आहे.. कटिंग सलूनच्या त्या छोट्याशा टपरीत एका भिंतीवर लावलेल्या छोट्याशा टीव्हीवर नटसम्राट सिनेमामधले वाक्य ऐकताना आधीच खचलेला नरेश आणखी निराशावस्थेत गेला. डोळे मिटून सलून बाहेरच्या बाकड्यावर बसल्या बसल्या त्याच्या डोळ्यासमोर सगळा भूतकाळ तरळू लागला.

आबा आणि माई म्हणजे नरेशचे आई वडील. गावाच्या वेशीवर कच्च्या घरात आई वडील, नरेश आणि नरेशचा मोठा भाऊ सुधीर एवढं कुटुंब राहत होतं. सरकारी शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण घेत नरेशने पुढे शिकण्याचा हट्ट धरला. 

आधीच घरात खायची मारामार असताना पुढे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शिकणं शक्य नव्हतं. त्यातच सुधीरने गावातील एका मुलीची छेड काढल्याने त्याला गावकऱ्यांनी तुडव तुडव तुडवला होता. 'परत कुठल्याही गोष्टीसाठी गावात पाऊल ठेवशील तर जीवाला मुकशील अशी धमकी देऊनही सुधीरचं गावात लपुन छपुन जाणं-येणं होतं.. 

शेवटी एक दिवस त्या मुलीच्या भावाने मित्रांच्या मदतीने सुधीरला बेदम मारहाण केली. सुधीर कसाबसा मरता मरता वाचला. आता मात्र या कुटुंबाला गावकऱ्यांनी वाळीत टाकल्यासारखं वागायला सुरुवात केली होती. 

पोटाला दोन घास मिळण्यासाठी कष्ट करणं गरजेचं असलं, तरीही जवळपासच्या परिसरात कुठेही त्यांना रोजंदारीचे काम देखील मिळेनासं झालं होतं.. आणि अशातच नरेश मात्र शिक्षण घेण्याच्या हट्टासाठी पेटून उठला होता. 'मी शिकून मोठा माणूस होईल आणि आपली परिस्थिती बदलेल', असं त्याचं मत होतं. 

पण आधीच परिस्थितीने होरपळलेल्या आबांनी मात्र त्यादिवशी त्याला झाडू आणि चपलेने बेदम मारहाण केली... "इथं जगायचं कसं?, हा रोजचा प्रश्न झालाय आणि ह्या पोराचं शिक्षणाचं खूळ डोक्यातून जाईना झालंय"... "पोटाला दोन घास खायचं म्हणलं तर मैल मैल चालत जावं तव्हा कुठं एखादं काम कसंबसं मिळतंया".. "त्यात ह्या मोठ्या कार्ट्यानी ह्यो नसता घोळ घालून ठेवलाया.. आता तर जगणंच नकोसं झालंय... गावातली लोकं गावात सामान आणण्यासाठी बी येऊ देत न्हाईत".. असं म्हणत मनातला सारा राग नरेशवर काढत आबांनी पुन्हा त्याला मारहाण केली..

आबांबद्दलचा राग मनात ठेवून नरेश रागाने रुसून घराबाहेर निघून गेला. इकडं आबादेखील हा मनस्ताप सहन न झाल्याने घराजवळच असलेल्या वडाच्या झाडाजवळ बसून हमसून हमसून रडत होते. 

माईला काय करावं, सुचत नव्हतं हे असं जगणं आता रोजचं झालं होतं. पोराची बाजू घ्यावी, का बापाची? यात मधल्या मध्ये तिचं मरण होत होतं.. त्यामुळे आज ती दोघांच्या भांडणात अजिबात पडली नाही. 

इकडे आबांनी झाडाला लटकून गळफास घेतला. रागावलेल्या नरेशचे झाडाकडे लक्ष जाताच त्याने जोरदार किंकाळी फोडली, "आबाssss".... त्याचा आवाज ऐकून माई आणि सुधीर घरातून बाहेर आले. आबांना असं गळफास घेऊन आत्महत्या केलेलं पाहाताच माई मात्र मटकन खाली बसली.

आबांवरती अंत्यसंस्कार करण्यासाठीही गावातील कुठलीही मंडळी आली नाहीत. 'वाळीत टाकणं', म्हणजे काय? हे त्यादिवशी नरेशला प्रकर्षाने जाणवलं..

त्या दिवसापासून माई मात्र वाचा गेल्याप्रमाणे सुन्न झाली होती.. तिची अवस्था एखाद्या प्रेतासारखी झाली होती. पडेल ते काम करायचं एवढंच तिचं जगणं राहिलं होतं. आता लेकांनी कुठलाही निर्णय घेतला, तरीही तिचं त्याच्यावर काहीच मत नसायचं. 

नरेशचं एक वर्ष या दुःखातच सरलं.. पण एक दिवस नरेशने आईला सांगून शहराकडे धाव घेतली. 'मी शहरात पडेल ते काम करेल, पण शिकून मोठा माणूस होईल, आणि मग तुझे सगळे हाल-अपेष्टा दूर होतील', असं म्हणत आईचा आशीर्वाद घेऊन नरेश एका एसटीच्या टपावर बसून शहरात पोहोचला. 

सकाळी डोळे उघडताच तो मुंबईसारख्या मोठ्या शहरात पोचलेला होता. एवढं सगळं अनोळखी वातावरण पाहून तो दचकला होता. पोटाला खायला चार घास मिळतील, ही अपेक्षा लगेच करणं चुकीचं होतं.. त्याने एका छोट्याशा चहाच्या टपरीवर काम मागून पाहिलं.. टपरीवाल्याने त्याला चहाचे कप गिऱ्हाइकांना देऊन, नंतर भांडी विसळण्याचे काम दिलं.. आता पोटाची खळगी भरण्याची चिंता नव्हती. दिवसभरातून एखादा वडापाव खाऊन नरेश रात्रीचा उपाशीच झोपत होता.. एक दिवस टपरीवर आलेल्या गृहस्थाने त्याला ,'तू शाळेत जात नाहीस का?' म्हणून विचारलं..

"साहेब, मी गाव सोडून शिक्षणासाठी शहरात आलो होतो... पण रोजच्या खर्चातून कसाबसा वडापाव मिळतोय.. शिक्षण कसं घेऊ हा मोठा प्रश्न आहे माझ्या पुढे".…. "मी माझ्या आईला वचन देऊन आलोय... तिचं दुःख मला दूर करायचंय"... असं म्हणत नरेशने पाणावलेले डोळे शर्टाच्या बाहीने पुसले. त्या टपरीवर आलेल्या सदगृहस्थाला नरेशची कीव आली.

"तू माझ्या घरी पडेल ते काम कर... मी तुझ्या शिक्षणाची व्यवस्था करतो", असं म्हणत त्या मनुष्याने नरेशला स्वतः सोबत घरी नेले.

चाळिशीतील त्या गृहस्थाच्या घरी फक्त तो आणि त्याची आईच राहायचे. त्या माऊलीला आता वयोमानानुसार काम जमत नसल्याने कामासाठी कोणीतरी हवंच होतं.. शिक्षक असलेल्या त्या 'मोहन काकांनी' त्याला स्वतःच्या घरी ठेवलं. 

नरेशदेखील घरातील सगळी कामं करून त्या आजीबाईंची काळजी घ्यायचा. मोहन काकांनी त्याला जवळच्याच शाळेत प्रवेश घेऊन दिला. नरेशचा अभ्यासातील उत्साह पाहून त्यांनी स्वतः देखील त्याचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली. बोल बोल म्हणता नरेशची दिवसागणिक प्रगती होऊ लागली. नरेश ने शालेय शिक्षण पूर्ण केलं.

मोहन काकांनी त्याला कॉमर्स शाखेत पदवीधर होण्यासाठी जमेल ती सारी मदत केली. 'आता लवकरच आपल्याला नोकरी लागेल आणि मग आपल्या गावी जाऊन आपण इतक्या वर्षात न पाहिलेल्या, न भेटलेल्या आपल्या माउलीला सुखद धक्का देऊ', असा विचार करून नरेश अगदी आईला भेटण्यासाठी आतुर झाला होता.

अशातच मोहन काकांची आई वृद्धापकाळाने वारली. मोहन काकांची एकमेव आधार असलेली आई गेल्याने त्यांना दु:ख अनावर झालं.. त्यांनी इथलं घर विकून गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने नरेशचं देखील संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. कारण आता त्याला स्वतःला रहाण्याची व्यवस्था करण्याची गरज होती. 

अचानक आलेल्या या संकटाने तो देखील भांबावून गेला होता. 'पूर्वीचे दिवस पुन्हा येणार', या भीतीने कासावीस झाला होता.. मोहन काकांनी गावी जायच्या आधीच दोन महिने ही बातमी दिल्याने नरेशकडे तसं पहायला गेलं तर पुरेसा वेळ होता. 

आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असल्याने त्याची नोकरीसाठी धावाधाव सुरू झाली. पण कधी डिग्रीचे सर्टीफिकेट अजून मिळाले नाही म्हणून, तर कधी नोकरीचे ठिकाण अतिशय लांब असल्याने त्याला नोकरी मिळत नव्हती. शेवटी एकदाचे त्याचे पदवीचे सर्टीफिकीट हातात मिळाले.

आता सर्टीफिकीट हातात असून देखील कंप्यूटरचे ज्ञान असणे बंधन कारक होते. अनेक ठिकाणी इंग्लिश शिवाय पान हलत नव्हते. कधी नरेशचे राहणीमान, तर कधी हे इंग्लिश कम्प्युटरचे ज्ञान आडवे आल्याने नोकरी मिळण्यात अडथळे येत होते. 

या सार्‍या प्रकारात त्याने एका वाचनालयात पार्ट टाईम नोकरी मिळवली होती. परंतु महिन्याला जेमतेम पाचशे रुपये मिळत होते. त्याने पूर्वीच्या चहाच्या टपरीवरील काकांकडे त्यातील दोनशे रुपये देऊन आंघोळीची व्यवस्था केली होती. आणि वाचनालयातील काम संपवून मग दिवसभर कुठेतरी एखाद्या झाडाखाली तो बसून रहायचा.. बोल बोल म्हणता दोन-तीन वर्ष सरली तरीही नोकरी काही मिळेना. आता नरेश ना अनुभवी होता ना फ्रेशर्स होता..

नरेशचे नैराश्य दिवसेंदिवस वाढत होते. वाचनालयातील कामातंही त्याचे लक्ष लागत नव्हते. त्याच्या अशा वागण्यामुळे वाचनालयातील ताईंनी त्याला आज चांगलीच तंबी दिली होती.. 

"या महिन्यात तू व्यवस्थितपणे काम न केल्यास तुला नोकरीवरून काढून टाकीन", असं सांगताच नरेशने सगळा राग, सगळे नैराश्य त्या ताईंवर काढलं..

"नकोय मला पण तुमची असली ही फुटकळ नोकरी"... या जेमतेम मिळणाऱ्या पाचशे रुपयात ना जगता येतंय ना मरता येतंय अशी अवस्था. शिक्षण घेऊनही बेरोजगार म्हणून मिरवताना किती त्रास होतो, याची तुम्हाला काय कल्पना... यापेक्षा मीच तुमची ही नोकरी सोडून जातो"... असं म्हणत नरेशने फाडफाड बोलून हातात असलेली तुटपुंज्या पगाराची नोकरीदेखील गमावली होती..

वाचनालयाच्या बाहेर पडताच त्याला स्वतःची चूक उमगली, परंतु खूप उशीर झाला होता. 

सातवीत असताना घर सोडताना पाहिलेली आईची अवस्था त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागली... झाडाला लटकून गळफास लावून आत्महत्या केलेले आबा त्याला आठवू लागले... सुधीरला गावकऱ्यांनी केलेली मारहाण आठवून जणू त्या जखमा तो स्वतः भोगत आहे, असे त्याला वाटून गेले.

रस्त्याने जाताना मनात काहूर माजलं होतं.. 'गरिबाला जगण्याचा हक्कच नाही का?' असं मन ओरडून ओरडून विचारत होतं.. शिक्षण घेण्यासाठी केलेला आटापिटा आठवून आज त्याला वेड लागायची पाळी आली होती.. शिक्षण असलं तरच नोकरी मिळते, या विश्वासाने गाव, आई बाप, सारंच तो गमावून बसला होता.. 

चालता चालता पायात गोळे आले होते.. अंगात त्राण शिल्लक राहिला नव्हता.. भुकेने जीव कासावीस होत होता.. 'हे असलं जगणं असण्यापेक्षा, मेलेलं बरं', हे विचार वारंवार डोक्यात घोळत होते.

विचारातच तो रेल्वे स्टेशनला येऊन पोहोचला. रेल्वे रुळावर थांबून जीव द्यावा, असं त्यांच्या मनात आलं. तितक्यात त्याचे लक्ष प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या उघड्यावाघड्या चिमुरड्यांकडे गेलं.

प्लॅटफॉर्मवरच्या तुडुंब गर्दीतही त्यांनी मात्र त्यांचं जगणं स्वीकारलं होतं.. 'जगावं की मरावं?' या विचारात नरेशची पावलं पुन्हा रेल्वे स्टेशनबाहेर वळली. जवळच असलेल्या कटिंग सलून बाहेरच्या बाकड्यावर तो डोळे मिटून शांत बसून राहिला... टू बी आॅर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन?... 'जगावं की मरावं? हा एकच सवाल'.. या टीव्हीवर सुरू असलेल्या नटसम्राट चित्रपटातील वाक्याने डोळे उघडून तो भानावर आला..

पदवीच्या कागदाच्या गुंडाळ्या अनेकदा आयुष्य जगण्यासाठी अपुऱ्याच पडतात, याची त्याला चांगलीच जाणीव झाली होती. 'किमान गावी आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या त्या माऊलीसाठी तरी आपल्याला जगावंच लागेल', या निर्धाराने त्याने आत्महत्येचा विचार डोक्यातून काढत नोकरी मिळेपर्यंत पुन्हा पडेल ते काम करण्याची तयारी ठेवली.

'कदाचित यशस्वी होईपर्यंत गावी असलेली ती माऊली जिवंत असेल की नाही याची शाश्वती नव्हती, पण मोठ्या हिरीरीने जिद्दीने गावाला रामराम ठोकून गेलेला आपला लेक आयुष्यात हरलेला पाहायला मात्र तिला कधीच आवडणार नाही', या एका विचाराने का होईना नरेशने सकारात्मक दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं होतं..

वाचकहो, समाजात वावरताना शिक्षण महत्त्वाचं असतं परंतु अनेकदा शिक्षण असूनही जेव्हा बेरोजगारी येते त्यासारखे दुःख नाही... त्या दुःखाच्या गर्तेत वहात जाऊन अनेक तरुणांचे जीव जाताना पाहताना एकंच प्रश्न उपस्थित राहतो, की 'हा बेरोजगारीचा वाढत जाणारा पण सहजासहजी न सुटणारा अजगराचा विळखा आणखी किती दिवस?'... 'कदाचित अनेकांचे बळी घेऊनच हा विळखा सुटेल'... 'शिक्षणाएवढंच माणसाच्या कर्तुत्वाला आणि जिद्दीला देखील खऱ्या अर्थाने न्याय मिळेल का?'.. प्रश्न खूप आहेत पण सारेच अनुत्तरित..

© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने