यु टर्न

© धनश्री दाबके


एक महत्वाची प्रोजेक्ट मीटिंग संपवून अनघा लंचसाठी केबीनमधून निघतच होती की मनिषाच्या मेसेजचा टोन वाजला. ' गुड आफ्टरनून मॅम. मला तुम्हाला भेटायचं होतं. आज तुमचा थोडा वेळ मिळेल का please?'' 

'Ok. Come at 5:30 pm today'  असा मेसेज मनिषाला पाठवून अनघा जेवायला गेली.

अनघा एका नामांकित कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून काम पहात होती आणि मनिषा सहा महिन्यांपूर्वीच ग्रॅज्युएट अप्रेंटिस म्हणून जॉईन झाली होती. 

मनीषाच्या एक वर्षाच्या ट्रेनिंग कालावधीसाठी अनघा मनिषाची मेंटॉर होती आणि त्यामुळे दोघींच्यात चांगला कनेक्ट होता. मनिषा अनघाच्या हुशारीने, कर्तृत्वाने भारावून गेली होती आणि अनघाही तिला खूप सपोर्ट करत होती. 

इंजिनियर झाल्यानंतर आपल्या आईवडलांना सोडून इथे लांब शहरात येउन रहाणाऱ्या मनिषाला अनघाचा खूप आधार वाटायचा. अनघा मुळातच तिच्या सगळ्या एंप्लॉयीजसाठी एक अप्रोचेबल व केअरिंग बॉस होती. तिचा सगळ्यांशी चांगला कनेक्ट होता. 

त्यामुळे सगळे जण तिच्याशी आपले कामाबद्दलचे व्ह्यूज आणि प्रॉब्लेम्सही  अगदी बिंधास्तपणे शेअर करत असत. तीही सगळ्यांना समजून घेत योग्य मार्गदर्शन करत असे.

मनिषा आली तेव्हाच ती कशामुळे तरी अस्वस्थ आहे हे अनघाला जाणवले.

" ये ग. कशी आहेस? एकदम अचानक अपॉइंटमेंट मागितलीस आज? बोल " अनघाने सुरुवात केली.

" हॅलो मॅम. हो जरा अस्वस्थ होते म्हणून तुमचा वेळ मागितला आज. गेल्या दोन तीन आठवड्यांपासून वाटत होते की तुम्हाला सांगावं. 

मॅम  मी ज्या प्रोजेक्टवर आहे तिथले लोकं , culture  सगळं ठीक आहे पण मला जे काम दिलय ते एवढे चॅलेंजिंग नाहीये म्हणजे माझ्यात व इतर ट्रेनीज मधे फरक केला जातोय. म्हणजे.."

" हे बघ मनिषा. जे काही आहे ते स्पष्ट बोल. कसला त्रास होतोय का तुला?"

" नाही मॅम. त्रास नाही. पण आमच्या अप्रेंटिसच्या बॅच मधली मी एकटीच मुलगी ह्या प्रोजेक्टवर आहे. बाकी दोन्ही मुलं आहेत. ते दोघ एकदम मस्त सेट झालेत. त्यांना outdoor sites वरचे काम मिळते. त्यामुळे खूप शिकायलाही मिळते. आणि मला  मात्र ऑफिसमधलेच काम देतात. 

पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवणे, सप्लायर्सशी follow up, co- ordination करणे , लेबर्सचा ॲटेंडंस, ओव्हरटाईम रेकॉर्ड ठेवणे वगैरे. म्हणजे ही  कामही महत्त्वाची असतातच प्रोजेक्टसाठी आणि ती करायलाच हवीत हे मला मान्य आहे पण ती काही चॅलेंजिंग कामं नाहीत. त्यात मला काय शिकायला मिळणार?"

" ह्म्मम .. मग तू ह्याबद्दल तुझ्या बॉसशी बोलली आहेस का? त्यांना सांगितलस तर ते तुलाही फिल्डवर पाठवतील"

" सांगितले मॅम. पण त्यांचे म्हणणे आहे की एकदा साईट वर गेलीस की काम पूर्ण होइपर्यंत वेळेचं काही सांगता येत नाही. जास्त उशीर झाला तर लेडीज एंप्लॉयीज साठी कंपनी नॉर्म्स नुसार आम्हाला गाडी ठेवा मग तुला सुखरुप कंपनी हॉस्टेलवर सोडा हे सगळे बघावे लागते. 

तसेच हे लेबर हॅंडलिंगही वाटतं तेवढे सोपं नसतं. कोण कसं वागेल काही सांगता येत नाही. आणि प्रोजेक्ट साईट रिपोर्ट तर तूच बनवतेस तेव्हा तुला डिटेल्स तर मिळतातच. त्यातूनही शिकता येतचं की. 

मला हे सगळे मान्य आहे मॅम. पण मी मुलगी आहे म्हणून फक्त ऑफिसचे काम बघायचे का? ह्यासाठी इंजिनिअरिंग नाही केलय मी. मलाही साईटवर नेटवर्क इंस्टॉलेशन, टेस्टींग सगळे शिकायचयं आणि करायचही आहे"

" तू म्हणतेस ते बरोबर आहे मनिषा. मी समजू शकते तुला काय वाटतय ते. कारण मीही हे सगळे फेस केले आहे. पण तुझ्या प्रोजेक्ट मॅनेजरसाठी बाकी इतरही चॅलेंजेस असतातच ना त्यामुळे त्यांनी हा ॲप्रोच घेतला असेल. तेव्हा ह्यासाठी तुला थोडा वेळ द्यावा लागेल. 

तू एकदा सांगितले आणि लगेच तुला साईटवर पाठवले असे होणार नाही. तुझ्या डिपार्टमेंटच्या, प्रोजेक्टच्या लोकांना तुझी सवय होइपर्यंत जरा त्यांच्या कलाने घेत तुझ्या मॅनेजरशी परत परत बोलून तुला ते मिळवावे लागेल. 

एकदा का तू साईटचे काम सांभाळू शकतेस असा कॉंफिडंस त्यांना आला की मगच ते  तुला ॲक्सेप्ट करतील साईटवर. म्हणून तू लगेच निराश होऊ नकोस. थोडा पाठपुरावा कर अजून. 

जर तरीही त्याने नाही ऐकले तर मी बघते. मग बोलेन मी ह्याबाबत त्याच्याशी. आपले फिल्डच आपण असं निवडलय ना मनिषा जिथे फक्त आपले इंजिनिअरिंगचे ज्ञान कामी येत नाही तर आपल्याला बाकीही इतर अनेक बाबी कुशलतेने सांभाळाव्या लागतात. 

So be patient and work hard with giving your best in whatever you do. All the best. काही लागलं तर मी आहेच. 

मी आत्ताही तुझ्या मॅनेजरला सांगू शकते. पण मला वाटत तू स्वतःच ह्यातून मार्ग काढावास. त्यामुळे तू खऱ्या अर्थाने तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तयार होशील. "

" Ok मॅम. Thank you so much for your time and advice. I will try my level best" असं म्हणून मनिषा गेली.

अनघाही घरी जाण्यासाठी गाडीत बसली आणि मनिषाच्या बोलण्यावर विचार करायला लागली. तिला मनिषामधे आज २५ वर्षांपूर्वीची अनघाच दिसत होती.

२५ वर्षांपूर्वी अतिशय चांगल्या गुणांनी इंजिनियरींग पूर्ण करुन खूप सारी स्वप्न बघत अनघाने आपले करीअर सुरु केले होते. तेव्हाची इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलींची संख्या आजच्या इतकी जास्त नव्हती. त्यात इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल ह्या ब्रॅंचेस म्हणजे तर अगदीच मुलींसाठी नसणारे  पूर्णपणे पुरुषप्रधान क्षेत्र. 

दहा मुलांमागे एखादी मुलगी असायची वर्गात. अनघाचा लहानपणापासूनच टेक्निकल गोष्टींकडे कल होता. तिच्या वडलांसारखाच. बाप लेक दोघं मिळून घरच्या घरी पंखे, फ्रीज, वॉशिंग मशिन अश्या बऱ्याच गोष्टींची दुरूस्तीच्या निमित्ताने उघडझाप करत असत. 

त्यामुळे अनघाने अगदी आनंदाने इंजिनियरींगला प्रवेश घेतला. उत्तम गुण मिळवून ती पास झाली आणि एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी एंट्रन्स एक्झॅम देण्यासाठी गेली. लेखी परीक्षा पास झाली आणि interview ही. 

गुणवत्तेच्या निकषांवर ती कुठेच कमी नव्हती पण तरीही interview पॅनेल मधल्या सगळ्या मेंबर्सनी तिला तुला हे इथले काम जमणार नाही सांगत परावृत्त करायचा बराच प्रयत्न केला. इथे वेळ काळ नसते. कामगार त्रास देतात. फिल्डवर खूप कामाचा ताण असतो वगैरे. 

गव्हर्नमेंटच्या नव्या  पॉलिसीनुसार आम्हाला ३० टक्के महिलांना एंप्लॉयमेंट द्यावी लागते म्हणून आम्ही तुला रिजेक्ट नाही करणार पण तुझ्या माहितीसाठी आम्ही तुला आधीच सगळी कल्पना देतो आहोत जेणेकरून तुला नंतर पश्चाताप व्हायला नको. तेव्हा तू पूर्ण विचारांती जॉईन व्हायचे की नाही हा निर्णय घे हेही बजावले.

पण अनघाने न डगमगता ती कंपनी जॉईन केलीच आणि तिथून मग तिचा खडतर प्रवास सुरू झाला. ३०% लेडी एंप्लॉयीज ह्या नियमानुसार कंपनीत लेडी इंजिनिअर्स आल्या. पण आधीचा एखाद दुसरा अपवाद वगळता कंपनीतल्या पुरूष इंजिनिअर्स आणि कामगारांवर ह्या मुलींशी डील करायची वेळ पहिल्यांदाच आली होती. ज्यासाठी त्याची मानसिकता अजिबात तयार नव्हती. 

त्यामुळे मुलींच्या बाईपणालाच त्यांनी अतिमहत्व दिले. ह्या मुली दिसतात कशा, कपडे कसे आणि कुठले घालतात. कोणाशी हसून मोकळेपणाने बोलतात ह्या आणि फक्त अशाच गोष्टींचा उहापोह होत राहिला. 

कामापेक्षा ह्यांच्या इतर गोष्टीतच सगळ्यांना रस असायचा. साईटवरचे काम जमणार नाही त्यामुळे ऑफिसमधलेच काम दिले जायचे आणि ह्या मुली काही कामाच्या नाहीत म्हणून हिणवले जायचे. आजूबाजूला सगळे पुरुषी culture. दिवसातले आठ तास  काम करायचे तेही अशा लोकांबरोबर जे अतिशय वेगळ्या नजरेने आपल्याकडे बघतायत ही अनघासाठी नक्किच सोपी गोष्ट नव्हती. 

कॉलेजमध्ये मुलांबरोबर असायची सवय असली तरी तेव्हाची चॅलेंजेस वेगळी होती. चांगले प्रोफेसर्स , जीवाभावाच्या मैत्रीणी ह्याच्यामुळे मुलींची संख्या कमी असल्याची जास्त झळ तिला जाणवली नाही. 

त्यात अनघा दिसायला सुरेख होती आणि कधीही घराबाहेर एकटी रहिली नव्हती. सतत आईवडलांच्या छत्राखालच्या सुरक्षित वातावरणातच मोठी झाली होती. त्यामुळे बाहेरच्या जगात लागणारा कणखरपणा तिच्यात नव्हता. 

तिच्या सौंदर्याच्या पुढे जाण्याची तिच्या बरोबर काम करणाऱ्या पुरुषांची पात्रताच नव्हती. त्यामुळे तिला खूप विचित्र अनुभव यायचे आणि ती घरी येउन बऱ्याचदा आईपाशी रडायची. खूप मनस्ताप झाला की सुट्टी घेऊन घरी बसायची. 

एकदा अशाच एका त्रासाने ती इतकी upset झाली होती कि ही नोकरी सोडून क्लेरीकल फिल्ड निवडायला निघाली होती. तेव्हा मात्र नेहमी शांतपणे समजवणाऱ्या तिच्या आईने एकदम कडक शब्दात तिची कान उघडणी केली होती. 

तुला हेच करायचं होतं तर इंजिनिअरिंग का केलस? फक्त अभ्यासातली हुशारी काय कामाची? कोणीतरी चुकीचे वागतय म्हणून तू तुझे करीअर सोडणार का? तू तुझे काम योग्य तऱ्हेने करतेस. मेहेनत घेतयस मग झालं तर. कुठे विरोध करायचा तसेच कुठे दुर्लक्ष करायचे हे तर तुला जमलेच पाहिजे. घाबरतेस कशाला? आता ह्या स्टेजला आल्यावर मागे फिरायचे नाहीच. मेहेनत घेत आपल्या  कामावर निष्ठा ठेवत पुढे जायचे. 

तू अजून पुढे शिकण्यासाठी पार्ट टाईम कोर्सेस बघ म्हणजे तुझ्या मनात हे असे विचार येणार नाहीत. इतर कुठल्या नकारात्मक गोष्टींसाठी वेळच मिळणार नाही. मग अनघाने फक्त कामावर लक्ष केंद्रित केले आणि पार्ट टाईम MBA पूर्ण केले. अनुभवाने स्वतःला कणखरही बनवले. आजूबाजूच्या नजरांना, विचारांना तिचे मन आणि बुद्धी दोन्हीही सरावले. आणि ती करीअरमधे फक्त पुढे जात राहिली.

बघता बघता तिचे करीअर आता इतके छान नावारुपाला आले होते की एका मोठ्या मल्टी नॅशनल कंपनीची जनरल मॅनेजर आणि खूप लोकांसाठी एक आदर्श व्यक्तीमत्व बनली होती अनघा.

आजच्या मनिषा बरोबरच्या डिस्कशनमुळे अनघाला पुरुषी फिल्डमधे पाय रोवतांना केलेल्या तिच्या संघर्षाची आणि त्यासाठी तिला पाठबळ देत कणखर बनवणाऱ्या तिच्या आईची खूप आठवण येत होती. आईचा आता यु टर्न न घेता फक्त पुढेच जात रहायचा सल्ला कष्टांनी , मेहेनतीने आमलात आणल्याने आज एक कर्तृत्ववान स्त्री खंबीरपणे एका पुरुषप्रधान क्षेत्रात यशस्वीरित्या पाय रोवून उभी होती.

समाप्त

©  धनश्री दाबके

📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने