तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?

© नीलिमा देशपांडे



पुण्याच्या एका मोठया IT कंपनीत नोकरी करणारा अतुल आतुरतेने वाट पाहत होता रेवा त्याच्या आयुष्यात येण्याची!

नाशिकच्या डिझायनर रेवा आणि अतुलचा विवाह थोरांच्या आणि त्यांच्या स्वत:च्याही एकमेकांना पसंत करण्याच्या सगळ्या फ़ेऱ्या पूर्ण होऊन ठरला होते. मित्रांच्या घोळक्यात वेढलेल्या अतुलला सगळे चिडवत होते. 

रमेश सर्वात जवळचा मित्र असल्यामूळे सुरुवात त्यानेच केली,
"ठरले बुवा एकदाचे तुझे लग्नं. आम्ही आपआपल्या पसंतीने मुली शोधून लग्नं करुन मोकळे होत असताना तू एकटाच ब्रह्मचारी राहून जातो की काय असे वाटत होते. सगळ्या मैत्रिणी तर आमच्याशी जोड्या लावून मोकळ्या झाल्या होत्या. तू जिथे मैत्रिणींनाही पटवले नाहीस, तिथे आणखी कुणाच्या प्रेमात पडून तुझे लग्नं वेळेवर होईल याची शंकाच होती आम्हांला! तरी बरे, काका काकूंनी पुढाकार घेतला आणि आमच्या साठी वहिनी आणि तुझ्यासाठी रेवा सारखी जोडीदार शोधली...म्हणून परवा लग्नं होणार तुझे!"

रमेशच्या जोडीला आणखी काही मित्रांनी त्याला वेगवेगळे सल्ले दिले आणि सगळे,
"उद्याच येतो आम्ही सगळे रहायला आणि मदतीला. परवा तुझ्या लग्नात धमाल करायची आहे ना!"
म्हणत त्याचा निरोप घेवून गेले. 

इकडे रेवाची आई नेहमी प्रमाणे लेकिला स्वत:चा आधार देत होती, जो तिने आजवर अनेकदा दिला होता. रेवा तिच्या आईच्या मनाच्या खुप जवळची होती. 

 लहानपणापासून आईच्या बोलण्याचा बराच प्रभाव रेवाच्या मनावर होताच, पण आज तिला खास आधार वाटला जेंव्हा आई म्हणाली,
"रेवा, एक गोष्ट लक्षात ठेव. तू तुझे करिअर, बुटिक आणि आम्हाला सोडून आता नाशिक हून पुण्याला जात आहेस तरी तुझी मम्मी नेहमी तुझ्या सोबत सावली सारखी आहे. कोणतीही तडजोड करायची किंवा नको त्या ठिकाणी नमते घेण्याची गरज नाही. समोरचे आपल्याला गृहीत धरायला लागतात नाहीतर !"


एकिकडे अतुल खुप उत्कंठेने रेवाची वाट पाहत असताना, रेवा मात्र आधीच लग्नं म्हणजे काहीतरी ओव्हर डिमांडिंग किंवा तिच्या रूटीनला बदलणारे होणार ह्या चिंतेत होती. 

एकमेकांशी बोलून, भेटून काही मन मोकळे करावे असे शक्य झालेले नव्हते. 

लग्नं होऊन रेवा अतुलच्या घरी आली ती नव्या नवरीचे बुजरेपण घेऊन. एक दोन दिवस पाहुणे आणि अनेक विधी करण्यात पूर्ण दिवस गेला त्यामुळे एका घरात असले तरी अतुल आणि रेवा एकमेकांशी मोकळं बोलू शकले नव्हते. 

अचानक पाचव्या दिवशी रेवाने बैग भरली आणि ती नाशिकला परतली ते परत न येण्याचा निर्णय घेवून! ही गोष्ट अतुल आणि घरातल्या सगळयांनाच खुप धक्कादायक होती. 

अचानक काय झाले असावे ? हे एक मोठे कोडे सर्वांसमोर ठेवून रेवा गेली होती.

अतुलने मन मोकळं करण्यासाठी मित्राला फोन केला,
" रमेश यार, हे काय होऊन बसलंय काहीच कळत नाही. रेवा माझा फोन उचलत नाही आणि तिची आई मला तिच्याशी बोलू आणि भेटूही देत नाही... काय अडचण आहे हे समजल्या शिवाय मी रेवाची समजूत तरी कशी काढू?"

मेश समजूतदार होता.वरवर पाहता सगळं नीट भासत असले तरी काहीतरी चांगलंच बिनसले आहे हे कळून चुकल्याने तो अतुलला मॅरेजकोच लीना परांजपे मॅडमकडे घेवून गेला. 

त्यांच्याशी बोलताना अतुल जरा वैतागून म्हणाला, " माझे नेमके काय चुकले हेच मला समजत नाही. मी आजवर कोणत्याही मुलीशी रिलेशनशीप मधे नसल्याने माझ्या सगळ्या अपेक्षा माझ्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी होत्या."

समजून घेण्यासाठी कोचने त्याला आणखी बोलतं केलं,
"अवघ्या पाच दिवसात रेवा नाराज होऊन गेली, तर जाण्याआधी काही बोलणे तरी झाले असेल ना?"

अतुलने उत्तर देताच खरी अडचण लक्षात येत आहे असे वाटले.

"आम्हाला बोलायला वेळच मिळाला नाही. लग्नाआधी आणि नंतरही! घरात पाहुणे होते आणि ती सतत फोनवर होती. तिची आई तिला दर तासाला फोन करुन विचारत बसायची. आम्हाला खरतर दोन,तीन दिवस रात्री एकमेकांसाठी द्यायला देखील कमी वेळ मिळाला इतके फोन सुरु असायचे"

एकेक कडी उलगडत गेली आणि शेवटी रेवा देखील एकटी, तिची बाजू मांडायला कोचला भेटायला तयार झाली, जेणेकरून पुढचे निर्णय घेणे सोपे झाले.

" आम्ही दोघेही एकमेकांसाठी अगदीच नवे होतो त्यामूळे आधी आमच्यात एक छान बॉण्ड तयार होईल आणि मग आम्ही पुढच्या पायरीवर जाऊ असे मला वाटले होते. पण अतुलची सगळ्याच बाबतीत घाई मला थोडी त्रासदायक झाली. माझी आई मला सतत ज्याप्रमाणे चौकशी करत होती त्यावरुन मला कुठेतरी माझ्या मनाचा विचार आत्ताच होत नाही तर भविष्यात काय होईल अशी भिती वाटली आणि मी माहेरी गेले."

अतुल आणि रेवा दोघेही लग्नं टिकवून ठेवण्यासाठी धडपड करायला तयार होते आणि मुळात त्यांच्यात फक्त गैरसमज झाला होता तो त्यांना एकत्रितपणे समजावून सोडवण्याचा प्रयत्न सफल झाला. 

रेवाच्या आईला देखील आता अतुल आणि रेवाला त्यांचा वेळ मिळू देण्याची गरज आहे हे पटले आणि एक संसार सुखाचा सुरु झाला.



* 'लग्नाच्या' गाठी ! हया संग्रहातील कथा हया क्षेत्रातल्या तज्ञ : 'Millennial' Marriage Coach लीना परांजपे ह्यांच्या अनुभवांवर आधारीत असून त्यांना मी शब्दबद्ध केले आहे. यातील मुद्दे, कथानक हे सत्यकथांवर आधारीत असल्याने त्यातील नमुद केलेल्या अडचणी किंवा उपाय हयात बदल न करता, स्थळ काळ, नावे असे गरजेचे बदल केवळ करुन कथा लिहिल्या आहेत. त्यामूळे हया कथां कडे 'आमची मते वैयक्तिक मते किंवा विचार देणाऱ्या' अशा दृष्टीकोनातून न पाहता जागरुकता म्हणून वाचल्यास त्या आपल्याला खूप काही सांगून जातील हे निश्चीत!

© नीलिमा देशपांडे

सदर कथा लेखिका नीलिमा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने