आई आणि काटकसर

© वर्षा पाचारणे



आज मुग्धा आणि तिची आई खूप दिवसांनी निवांत बसल्या होत्या... "मुग्धा, आता बाबा आणि दादा सुद्धा घरात नाहीत".. "चल आपण पटकन त्या बाजूच्या दुकानात जाऊन जरा इनर गारमेंट घेऊन येऊ".. असं म्हणत आई आतमध्ये तयार व्हायला गेली.

"आई, अगं आता मी काही लहान आहे का तू माझ्याबरोबर यायला?...

"हो, पण मलाही घ्यायचेच आहेत आणि त्यात तुला भावामध्ये घासाघीस करता येत नाही, तो दुकानदार ज्या किंमतीला सांगेल, त्या किमतीला घेऊन मोकळी होशील"..

"बरं बाई, चल पटकन आता"... असं म्हणत मुग्धा आणि आई जवळच असलेल्या दुकानात शिरल्या..
दुकानात जेन्ट्स विक्रेता असलेला पाहून आई मात्र ओशाळली.

तिने दुकानात जाऊन "त्या नेहमीच्या ताई नाही का आज?" म्हणून विचारले..

"नाही ताई, त्या सुट्टीवर आहेत... बोला ना.. काय दाखवू तुम्हाला?.. ब्रा, पॅंटी, स्लिप?"..


"नाही, नाही, काही नकोय", असं म्हणत आई दुकानाबाहेर आली... मुग्धाला दोन मिनिटं काही कळेचना


"अगं आई, काय झालं?".... " तु अशी काहीच न घेता बाहेर काय निघून आलीस?"..


"अगं, मग काय"... "आता त्या माणसाला सांगायचं का, मला किती नंबरची ब्रा आणि पॅंट लागते?"


"मग काय झालं त्यात?".... "तो त्या दुकानात कामालाच आहे ना, त्याचं कामंच आहे ते... आपल्याला कसली लाज वाटायची त्यात?"..


"तुम्हाला आज कालच्या मुलींना नसेल काही वाटत, पण आम्हाला मात्र या गोष्टी जगासमोर उघड उघड बोलायला नाही आवडत"..


"का?"... "ते कपडे घालता ना तुम्ही, मग बोलायला काय प्रॉब्लेम आहे".. "आणि एखाद्या जेंट्स कपड्यांच्या दुकानात एखादी मुलगी जर अंडर पॅन्ट विकत असेल किंवा बनियन विकत असेल तर ते चालतं का?"...


"तू गप्प बस गं".... "चल आपण दुसरीकडे जाऊ"..


"आई, तू थांब त्यापेक्षा... आपण सरळ मॉलमध्ये जाऊयात.. तिथे कोणी काही दाखवायची गरज नसते, जी गोष्ट आपल्याला आवडेल, ती बघून घ्यायची आणि डायरेक्ट बिल करायचं"...


"अगं बाई, हो का?".. "पण जास्त महाग नसतात ना कपडे आणि साईज बसली नाही तर बदलून देतात ना?"..


आईच्या प्रश्नांची गाडी काही केल्या थांबेना. मुग्धाने पटकन एक रिक्षा बुक केली आणि दोघी मायलेकी मॉलमध्ये पोहोचल्या..


जास्तीतजास्त कायम बाजारात आणि जवळपासच्या दुकानात गेलेली आई, एवढा मोठा लखलखाट असलेला मॉल पाहून भांबावून गेली.. "काय गं, केवढी मोठी बिल्डिंग.. आणि सगळीकडे नुसता एसीचा गारवा आहे बघ"..


"म्हणून सांगत असते, कधीतरी चल आमच्याबरोबर बाहेर फिरायला... नुसती घरात घरात असतेस... जास्तीत जास्त कुठं तर त्या वाण्याच्या दुकानात नाहीतर घराजवळच्या मंदिरांमध्ये जातेस... आज-काल किती गोष्टी रोज नव्याने येत असतात... शिकावं गं आपण पण नवीन नवीन गोष्टी ऍडजस्ट करायला".. मुग्धाच्या या बोलण्यावर आईने चकार शब्दही काढला नाही.


"ए आई, आता या सरकत्या जिन्यावरून माझा हात पकडू नकोस हा.. मागच्या वेळेस माहिती आहे ना, ना स्वता चढत होतीस, ना मलाही जाऊ देत होतीस... आणि मग लगेच तू मॉलबाहेर निघून जातेस"...


"मुग्धा, तो जिना एवढा भरभर सरकताना पाहून माझ्या छातीत धस्स होतं... पोटात गोळा येतो, पाय जागच्या जागी डगमगायला लागतात"..


"ए आत्ताच सांग... इथूनच परत घरी जायचंय का?", म्हणत मुग्धा वैतागली..


"अगं, चिडतेस कशाला?"... "चल बाई चढते यावेळेस कशीतरी".. असं म्हणत आईने दोन तीन वेळा त्या जिन्यावर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला, पण पाय आणि जीन्याचा काही केल्या मेळ बसेना..


'आजूबाजूचे लोक आपल्याकडे बघत तर नाहीत ना?', याकडेही आईचं बारीक लक्ष होतं.. मुग्धा तिच्या या वागण्याकडे पहात डोक्याला हात लावून बसली होती.


"आई, चल आपण लिफ्टने जाऊ", असं म्हणत तिने आईला लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर नेलं...


"अगं, मग लिफ्ट असताना उगाच हा सरकत्या जिन्यांचा हा खेळ कशाला?" असं म्हणत आई मुग्धावर वैतागली..


ब्रँडेड इनर गारमेंटच्या दुकानात शिरताच सेल्सगर्लने त्यांना वेलकम केलं.. "बरं झालं बाई, इथे तरी दुकानात मुलगी आहे विकायला".. असं म्हणत आईच्या जीवात जीव आला.


"आई, आता इथेच सगळं बोलणार आहेस का, काही खरेदी पण करायची?".. असं म्हणत मुग्धाने तिला हव्या असलेल्या वस्तू सेल्सगर्लला इंग्लिशमध्ये सांगितल्या.. आपली मुलगी इतकं चांगलं इंग्लिश बोलते, हे पाहून आई गर्वाने फुलून गेली...


आईने हळूच मुग्धाच्या कानात कुजबुज केली.. "मुग्धा, मला वाटायचं, आम्ही तुझ्या इंग्लिश शाळेची फी उगाचच भरतोय, पण आज कळालं बरं का, चांगलं इंग्लिश बोलतेस कि बाहेर"...


आईच्या या वाक्यावर मुग्धा कसनुसं हसली. आणि म्हणाली ,"ती जे दाखवते आहे, ते बघशील का आता?"...
"अगोबाई, या मॉलमध्ये आपल्या तिकडच्या दुकाना पेक्षा चांगलं कापड असतं ग ब्रा आणि पॅंटचं".. असं म्हणत आईने दोन-तीन वेळा त्या ब्रा ची साईज आणि कपडा हात लावून व्यवस्थितपणे चेक केला.. "थोड्या फॅशनेबल ब्रा दाखवा", असं मुग्धाने म्हणताच , आईने पुन्हा तिच्या कानात कुजबुज केली..


"आता फॅशनेबल कशाला हव्यात ब्रा?.. अगं कपड्यांच्या आतच तर घालायच्या ना"..


तरीही मुग्धाने सांगितल्याप्रमाणे त्या सेल्सगर्लने सुंदर, नाजूक डिझाईनच्या, फिकट रंगाच्या, फॅन्सी ब्रा दाखवायला सुरुवात केली.. त्यातील नेटेड ब्रा बघून मुग्धा म्हणाली ,"आई ही छान आहे ना?"...


आईच्या मनात मात्र आलं ,'आपण देताना पूर्ण पैसे देणार, मग घेताना हे असलं जाळी जाळीचं कापड का घ्यावं.. त्यात धुताना एकदा दोनदा ब्रश फिरवला की फाटली समजायची मग ही फॅन्सी ब्रा'...


आईने मुग्धाला बाजूला नेत सांगितलं ,"मुग्धा, पैसा आहे म्हणून कसाही खर्च करू नको".. "अगं, त्याची किंमत आहे का सातशे रुपये".. "अगं ७०० रुपयात अख्खा ड्रेस येतो.. आणि एवढे पैसे देऊन काहीही विकत घ्यायचं का"...


आईच्या या बोलण्याने सेल्सगर्ल मात्र गालातल्या गालात हसत होती. तिच्याकडे लक्ष जाताच मुग्धाला आईच्या वागण्याचा प्रचंड राग आला.. "ठीक आहे, या बाजूला काढलेल्या वस्तू पॅक करा", असं म्हणत तिने सेल्सगर्लला बील करायला सांगितलं..


'धिस इज युअर बील मॅम' ... असं म्हणत, गोड हसत बिलाचा कागद सेल्सगर्लने मुग्धाच्या हातात सरकवला..


'आता आईने एवढं सगळं बिल बघितल्यावर, ती नक्कीच दुकानात पैसे कमी करण्याच्या मागे लागणार', या विचारांनी मुग्धा पटकन ते बिल पर्समध्ये टाकणार, तितक्यात आईने तिच्या हातातून ते बिल ओढून घेतलं


"एकवीसशे रुपये!".... "अगं मुग्धा, लग्नात एवढ्या महागड्या साड्याही घेत नाही अगं कोणी"..
असं म्हणत मुग्धाला आईने बाजूला नेलं... "आता असं कर, काहीच न घेण्यापेक्षा, त्यातली एकच पॅंट किंवा ब्रा घे", असं म्हणत आई तिला ते सगळं मटेरियल तिथल्या तिथे ठेवायला सांगू लागली...


'आता एवढ्या मोठ्या मॉलमध्ये आपला पुन्हा अपमान होतो की काय?', या विचाराने मुग्धाने बिल पे करून पटकन पिशवी हातात घेऊन आईला दुकानाबाहेर आणलं..


"आई, अगं काय हे?"... "काय बडबड करत होतीस त्या दुकानात".. "एवढ्या मोठ्या मॉल्समध्ये अशाच किमती असतात, पण क्वालिटी पण तशीच चांगली असते ना गं".. "आणि घासाघीस करायची होती, तर मग त्या जवळच्या दुकानात मगाशीच का नाही घेतले कपडे?"... "कशाला उगाच आलीस माझ्याबरोबर एवढ्या लांब?"..


दोन ब्रा आणि दोन पॅंटची एवढी भरमसाठ किंमत पाहून आधीच विचारात पडलेली आई मुलीच्या अशा वैतागण्याने मनातून दुखावली... 'आजकालच्या मुलांना पैशाची किंमतच नाही', म्हणून मनातल्या मनात तिची खूप खूप चिडचिड होत होती. रिक्षातून येताना दोघीही एकमेकींशी एकंही शब्द बोलल्या नाहीत...


दोघी घरी पोहोचल्यानंतर मुग्धा तिचा मोबाईल घेऊन टाईमपास करत बसली... तितक्यात दूधवाला रतिबाचे पैसे नेण्यासाठी आला.. मुग्धा त्याला म्हणाली ,"मी तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करते", असे सांगून तिने मोबाईलवर पटापट पासवर्ड टाकला.. पण बँक खात्यात कमी रक्कम आहे, असे दाखवल्याने, ती आईला आवाज देत म्हणाली "ए आई, माझ्या अकाउंटला आत्ता पैसे नाहीत, तुझ्याकडे आहेत का?"... "का याला उद्या यायला सांगू?"..


आईने हळूच मांडणीतला कोपऱ्यातला डबा उघडला. दिड हजार रुपये दूधवाल्याच्या हातावर टेकवत म्हणाली ,"बाळा, हे घे... दर महिन्याची तुझी तारीख ठरलेली असते.. मग आमच्यामुळे उगाच तुला परत हेलपाटा कशाला?"...


दूधवाला गेल्यावर आईचा राग घालवण्यासाठी मुग्धा म्हणाली ,"इतर वेळेला म्हणतेस माझ्याकडे पैसे नाहीत आणि अजून बाबांचा पगार व्हायच्या आधीच कुठुन आले पैसे तुझ्याकडे?".. असं म्हणत उगाच हसली.

आई तिला म्हणाली ,"कसं आहे ना बाळा, मला तुझ्यासारखं मॉडर्न वागता नसेल येत, पण काटकसरीने संसार चांगला जमतो".... "त्या मॉलमधल्या जिन्यावरून वर जाता नसेल येत, पण आयुष्यातले चढ-उतार मात्र अगदी सहजरीतीने हाताळता येतात"... "तुमच्याएवढा काय, पण त्यातली निम्मी मिळकतही नसते मला, कारण मी नोकरी करत नाही, पण बाबांनी भाजीसाठी, किराण्यासाठी दिलेल्या पैशातून बाजूला ठेवलेले पैसे असे अडीअडचणीला कसे उपयोगी पडतील, हे मात्र चांगलं जमतं मला"... एवढं बोलून आईच्या डोळ्यात पाणी आलं..


"आई, यार हळवं केलंस तू मला"... "तुझ्याकडून पुढच्या वेळेस काटकसर कशी करायची, हे मात्र मी नक्की शिकेल".. "अगं, माझं असंच होतं.. हातात पैसा असला ना की तो उडवला जातो आणि महिनाअखेरीला पन्नास रुपयेही नसतात पाकिटात".... "पण तुझं मात्र उलट आहे". "महिन्याच्या सुरुवातीला तुझ्याकडे काहीच नसतं, पण महिन्याच्या शेवटी घरखर्चातून थोडे थोडे करून बाजूला ठेवलेले पैसे हीच तर तुझी खरी मिळकत असते"...


"आई, थांब मी आपल्या दोघांसाठीही पटकन स्पेशल चहा करते", असं म्हणत मुग्धाने वातावरण थोडं हलकं करण्याचा प्रयत्न केला...


आईही मग तिच्या नेहमीच्या भूमिकेत येत हॉलमधून मोठ्याने ओरडली ,"मुग्धा स्पेशल चहा करण्याच्या नादात साखर भरमसाठ टाकू नकोस, आपल्याला चहा प्यायचा आहे बासुंदी नाही". 

तिचं बोलणं ऐकून मुग्धा पळत बाहेर आली आणि आईला टाळी देत म्हणाली ,"अगं तू मॉडर्न नसलीस, तरीही आहे अशीच इतकी गोड आहेस, की तुला ना बिन साखरेचा चहा जरी दिला ना, तरीही तू गोड मानून पिशील"... "माझी गोडुली आई".. असा म्हणत मुग्धा आईच्या गळ्यात पडली..


"पुरे झाली लाडीगोडी, आता ते एकवीसशे रुपयांचे बॅगेतले कपडे एकदा घालून बघ, नाहीतर उद्या पुन्हा जाऊन बदलून येईन मी", म्हणत आईदेखील खळखळून हसली...


वाचकहो ही मॉल संस्कृती आपल्याकडे अगदीच काही वर्षांपूर्वी सुरू झाली. पण तरुणाईला मात्र तिचं लगेच आकर्षण वाटू लागलं... पण सामान्य घरात लहानाचं मोठं झालेल्या आणि लग्नानंतरही काटकसरीत संसार करणाऱ्या गृहिणीला मात्र वायफळ खर्च केलेला कसा आवडेल बरं?... दर महिन्याच्या खर्चातून बाजूला काढलेल्या चिल्लर पैश्यांमधूनही छोट्या छोट्या गृहोपयोगी वस्तू खरेदी करणाऱ्या आईला ब्रा आणि पॅंटसाठी अचानक घालवलेले एकवीसशे रुपये काळजात धस्स करून गेले, तर नवल ते काय..

© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने