© वर्षा पाचारणे.
गणप्या अतिशय उनाड, खोडकर मुलगा. सतत कोणाची तरी खिल्ली उडवत राहणं, कुणालातरी उगाचच डिवचत राहणं, त्याला खूप आवडायचं.
त्याच्या अशा सततच्या उच्छादाला कंटाळून आई आणि बा त्याला रोज बदडून काढायचे. 'नको नको केलं कारट्यानी', म्हणत आज बाने त्याला चपलेने चांगलाच हासडुन काढला.. त्याला कारणही तसंच होतं.
गणप्याने शाळेतील पाच सहा मुलांना खेळण्याच्या बहाण्याने अर्ध्या शाळेतूनच पळवून लावलं होतं. नेमके एका मुलाचे पालक शाळेत येऊन शिक्षकांना भेटले, तेव्हा कळालं गणप्या त्या मुलांना घेऊन खेळण्यासाठी पसार झाला आहे...
मग काय! गणप्याच्या बा ला शाळेत बोलावून घेण्यात आलं.. शिक्षकांनी बरीच कानउघडणी केल्यानंतर गणप्याला शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. कारण त्याचे उपद्व्याप हल्ली शाळेत देखील वाढू लागले होते..
मग आई आणि बा ने गणप्याला खरंच शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. गणप्याला तर मनातून आनंदच झाला. वाटलं ,'चला बरं झालं, आता अभ्यास करायची कटकट तरी नाही'.
मग आई आणि बा ने गणप्याला खरंच शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. गणप्याला तर मनातून आनंदच झाला. वाटलं ,'चला बरं झालं, आता अभ्यास करायची कटकट तरी नाही'.
पण मग त्याच्या जवळपासच्या परिसरात भाड्याच्या खोलीत राहणारे देशमुख मास्तर गणप्याच्या आईकडे आले आणि म्हणाले ,"ताई, गणप्या अभ्यासात तसा ठीकठाक आहे, फक्त त्याने थोडंसं लक्ष देणे गरजेचे आहे"...
"या वयातच त्याची शाळा सुटली, तर भविष्य मात्र अंधारात राहील, त्यापेक्षा कसेही करून तुम्ही त्याला शाळेत पाठवा".... "अगदीच शक्य नसेल, तर संध्याकाळी माझ्याकडे शिकण्यासाठी किमान अर्धा तास पाठवत जा. मी कुठल्याही प्रकारचे पैसे घेणार नाही, पण त्याचे भविष्य मात्र त्याने थोडेफार का होईना बदलेल"
आता मास्तरांनी एवढं चांगलं समजून सांगितल्यानंतर आईने मात्र त्याला चांगलाच दम दिला... "नसेल शाळेत जायचं, तर निदान मास्तरांच्या घरी जाऊन तरी शिकत जा", म्हणून तिने चांगलीच तंबी दिली.
आता मास्तरांनी एवढं चांगलं समजून सांगितल्यानंतर आईने मात्र त्याला चांगलाच दम दिला... "नसेल शाळेत जायचं, तर निदान मास्तरांच्या घरी जाऊन तरी शिकत जा", म्हणून तिने चांगलीच तंबी दिली.
गणप्या नाकडोळे मुरडत कसातरी गुरुजींच्या घरी संध्याकाळचा जाऊ लागला. रोज संध्याकाळी स्वतःच्या घरात पैश्यावरुन असलेली चणचण, त्याच्या वरुन आई आणि बा मध्ये होणारे भांडण ऐकण्याची सवय असलेला गणप्या मास्तरांच्या घरी मात्र सांज वेळेला शुभंकरोतीचे बोल ऐकताना नकळत भारावून जायचा. नकळत त्या शुभंकरोतीचे बोल तो आता गुणगुणू लागला होता.
देशमुख गुरुजींचे बोलणे त्याच्या मनाला भिडायचे. 'आपल्यासाठी कोणीतरी एवढ्या तळमळीने, स्वतःची कामं सोडून शिकवण्याची तयारी दाखवत आहे, तेही आपल्यासारख्या उनाड मुलाला', याचं त्याला हळूहळू कौतुक वाटू लागलं..
देशमुख गुरुजींचे बोलणे त्याच्या मनाला भिडायचे. 'आपल्यासाठी कोणीतरी एवढ्या तळमळीने, स्वतःची कामं सोडून शिकवण्याची तयारी दाखवत आहे, तेही आपल्यासारख्या उनाड मुलाला', याचं त्याला हळूहळू कौतुक वाटू लागलं..
पण अंगातली खोडकर वृत्ती कधी कधी अचानकच जागी व्हायची. गुरुजींनी फळ्यावर पाढे लिहिले आणि गुरुजी दुसऱ्या कामात व्यस्त आहेत असे दिसले की, तिकडे गणप्या त्या फळ्यावरच्या आकड्यांबरोबर विचित्र रंगरंगोटी करून ठेवायचा.
कधी आकड्यांना मिशा आणायचा, तर कधी झाडाच्या पानांचा आकार देत, 'गुरुजी आता पुढे काय लिहू?', असं न समजल्याचा आव आणत पुन्हा गुरुजींनाच विचारायचा.
पण गुरुजी 'हाडाचे शिक्षक'.... न चिडता त्या उनाड मुलाला त्यांनी वठणीवर आणायचे ठरवले होते.
गुरुजी कधीतरी त्याला वाण्याच्या दुकानात स्वतःसोबत घेऊन जायचे. खिशातल्या पैशातून खर्च झालेले पैसे किती शिल्लक आहेत, हे मोजायला लावून गणित शिकवायचे.
गुरुजी कधीतरी त्याला वाण्याच्या दुकानात स्वतःसोबत घेऊन जायचे. खिशातल्या पैशातून खर्च झालेले पैसे किती शिल्लक आहेत, हे मोजायला लावून गणित शिकवायचे.
कधी सुट्टीच्या दिवशी भाजीपाला आणण्याच्या निमित्ताने बाजारात घेऊन जात हवा, पाणी, दिशा यांची माहिती द्यायचे. या उनाडक्या विद्यार्थ्याला असं प्रात्यक्षिकातून शिकताना खूप मजा यायची.
'वर्गात बसून फक्त कागद काळे करण्यात काय अर्थ आहे?', असं समजणार्या गणप्याला त्याच्याच भाषेत देशमुख गुरुजी सारं काही समजावून सांगायचे. त्यामुळे आता विज्ञान, भूगोल, गणित यासारख्या न आवडणाऱ्या विषयात देखील गणप्याला भलतीच आवड निर्माण होऊ लागली होती.
एक दिवस संध्याकाळी असाच गणप्या देशमुख गुरुजींकडे अभ्यासासाठी गेलेला असताना देशमुख गुरुजी खिन्न अवस्थेत बसलेले होते. "गुरुजी तुमची तब्येत बरी नाही का?", असं म्हणत गणप्याने त्यांची चौकशी केली.
एक दिवस संध्याकाळी असाच गणप्या देशमुख गुरुजींकडे अभ्यासासाठी गेलेला असताना देशमुख गुरुजी खिन्न अवस्थेत बसलेले होते. "गुरुजी तुमची तब्येत बरी नाही का?", असं म्हणत गणप्याने त्यांची चौकशी केली.
गुरुजी म्हणाले ,"अरे, माझी आता बाजूच्याच गावात बदली होते आहे".... "पुढच्या महिन्यात मला तिकडे राहायला जावे लागेल".. "त्यामुळे आता सामानाची आवरा आवर करावीच लागेल".... "आता मनात असूनही मी मात्र तुला शिकवू शकणार नाही याची खंत वाटते"..
गुरुजींच्या अशा बोलण्याने गणप्या गहिवरला. डोळ्यातले अश्रू शर्टाच्या बाहीने पुसत गणप्या म्हणाला ,"मी पण येणार गुरुजी तुमच्या सोबत... मला खूप शिकून मोठं व्हायचंय अगदी तुमच्यासारखं"... "माझ्यासारख्या मस्तीखोर मुलाला तुम्ही झटक्यात वठणीवर आणलं, शिक्षणाची गोडी लावली आणि आता तुम्हीच मला असं सोडून जाणार म्हणता", असं म्हणत गणप्या हमसून हमसून रडू लागला...
गणप्याची आई गुरुजींच्या दाराबाहेरुन हे सगळं पाहून गहिवरली.. 'ज्या गणप्याला आपण सतत मारझोड करत, शिव्या देत, अभ्यासाला बस असं म्हणत होतो, त्याच गणप्याला या देशमुख गुरुजींनी मात्र प्रेमाने ज्ञानाच्या योग्य वाटेवर आणून सोडलं होतं', हे पाहून गणप्याची आईदेखील नि:शब्द झाली होती.
महिन्याभराने गुरुजींची बदली झाली. जाताना गुरुजींनी गणप्याला काही प्रेरणादायी पुस्तक भेट म्हणून दिली. 'मी सोबत नसलो, तरी ही पुस्तकं तुला कायम दिशा दाखवतील', असं म्हणत गुरुजी देखील गहिवरले होते.
गणप्याने गुरुजींकडून एक वचन घेतलं ,"गुरुजी, तुम्ही जिथे कुठे बदली होऊन जाताल, तिथून मला दर महिन्याला न चुकता एक पत्र लिहित जा आणि मी देखील त्या पत्राचं उत्तर न चुकता तुम्हाला पाठवत जाईल".... "पत्राच्या रूपाने आपण दोघंही असंच एकमेकांच्या संपर्कात राहू". गणप्याच्या या वाक्यावर गुरुजींनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
त्याचा हात हातात घेत गुरुजींनी गणप्याला वचन दिलं.
गुरुजींच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना गणप्याने मनाशी खूणगाठ बांधली की ,'आजपासून मी शिक्षणाचा मार्ग कधीही सोडणार नाही… गुरुजींनी माझ्यावर घेतलेली मेहनत, मी अशीच वाया जाऊ देणार नाही', असं म्हणत पूर्वी उनाडक्या करणारा हा तोच गणप्या आता शिक्षणाचे धडे गिरवू लागला.
प्रचंड मेहनत घेत त्याने उत्तम मार्कांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली.
पत्राद्वारे तो गुरुजींच्या संपर्कात राहत होता. दहावीचे शिक्षण पूर्ण करून गणप्याने महाविद्यालयीन शिक्षण देखील तितक्याच जिद्दीने पूर्ण केलं.
पत्राद्वारे तो गुरुजींच्या संपर्कात राहत होता. दहावीचे शिक्षण पूर्ण करून गणप्याने महाविद्यालयीन शिक्षण देखील तितक्याच जिद्दीने पूर्ण केलं.
परीक्षांमध्ये उत्तम यश प्राप्त करत गणप्या शिक्षक झाला.. आता देशमुख गुरुजी मात्र शहराच्या ठिकाणी बदली होऊन गेले असल्याने, दोघांमध्ये होणारा पत्रातला संवाद अनेक महिन्यांनी होऊ लागला होता.
चार दिवसांनी गुरुपौर्णिमा येणार होती. ज्या शाळेत गणप्या शिक्षक म्हणून नोकरी करत होता, ती शाळा गुरुपौर्णिमेनिमित्ताने छान सजवण्यात आली होती.
आज गणप्याला देशमुख गुरूजींची प्रकर्षाने आठवण येत होती. 'मागच्या पत्रात गुरुजींनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन आपण त्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याकडे चार दिवस राहायला घेऊन येऊ', या विचारात गणप्या शहरात पोचला.
दाराला बाहेरून टाळा लावलेला होता.. गणप्याने आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता, देशमुख गुरुजी हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजत असल्याचे समजले. 'इतके दिवस गुरुजींना फोन लावूनही, गुरुजी का फोन घेत नव्हते', याचं उत्तर आज गणप्याला मिळालं होतं.
गणप्याचे अश्रू काही केल्या थांबेनात.. विचारांच्या गर्दीतून बाहेर येत गणप्याने तडक हॉस्पिटल गाठलं.. आयसीयूमध्ये देशमुख गुरुजींना असं मरणासन्न अवस्थेत पाहताना त्याच्या जीवाची तगमग वाढत होती.
गणप्याचे अश्रू काही केल्या थांबेनात.. विचारांच्या गर्दीतून बाहेर येत गणप्याने तडक हॉस्पिटल गाठलं.. आयसीयूमध्ये देशमुख गुरुजींना असं मरणासन्न अवस्थेत पाहताना त्याच्या जीवाची तगमग वाढत होती.
त्याने डॉक्टरांना विचारले 'यांच्या या अवस्थेवर काहीच उपाय नाहीत का?'. डॉक्टरांनी ऑपरेशन आणि त्यावरचा खर्च सांगत, हा एकच उपाय आहे असे म्हणत सगळी परिस्थिती गणप्याला समजावली.
ऑपरेशनसाठी जवळपास चार लाखांची आवश्यकता होती. एवढी मोठी रक्कम गुरुजी उभी करू शकत नसल्याने, मरण हा एकमेव पर्याय सध्या तरी त्यांच्याकडे होता..
पुढे पाठी कोणीच नसल्याने, आजवर आहे त्या पगारावर भागवून, कायमच ते भाड्याच्या खोलीत राहत होते. जेमतेम मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात रोजचं जगणंसुद्धा अगदी हालाखीत होतं, तिथे चार लाख उभं करणं शक्यच नव्हतं..
गणप्याने डॉक्टरांना तात्काळ ऑपरेशन करायला सांगून त्याने गावच्या सावकाराकडून घराच्या डागडुजीसाठी कर्जाऊ घेतलेले लाखभर रुपये दोन दिवसात जमा करतो', असं सांगून तो तडक गावी आला.
सावकाराकडे जाऊन त्याने आणखी तीन लाख रुपये कर्ज घेऊन राहतं घर गहाण टाकलं. कर्जाचं व्याज परवडणारं नसलं तरीही 'आपल्या गुरूंनी जो आपल्यावर विश्वास दाखवून आपल्या मनगटात जे बळ दिलं, त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही', याची जाणीव गणप्याला चांगलीच होती...
'त्यावेळी जर गुरुजींनी गणप्याला योग्य वाटेवर आणलं नसतं, तर आज तो कुठेतरी वाईट मार्गाला नक्कीच लागला असता', हे कडवट सत्य तो नाकारु शकत नव्हता..
दोन दिवसांनी पैशाची सारी व्यवस्था करून गणप्या हॉस्पिटलमध्ये आला.
दोन दिवसांनी पैशाची सारी व्यवस्था करून गणप्या हॉस्पिटलमध्ये आला.
ऑपरेशन वेळेत झाल्याने गुरुजींचा जीव वाचला होता.. 'कुठल्यातरी इसमाने येऊन तुमच्या ऑपरेशनचा खर्च केला आहे', एवढेच गुरुजींना डॉक्टरांनी सांगितले होते...
'आपल्या आयुष्यात एकही जवळची व्यक्ती नसल्याने, असा कोण इसम आहे ज्याने आपल्यासाठी एवढी मोठी रक्कम भरली असावी', हा विचार सतत गुरुजींच्या मनात घोळत होता...
'वर्षानुवर्ष पत्रातून भेटणारा गणप्या आता कसा दिसतो?', हे देखील त्यांना माहीत नव्हतं.... अशातच गणप्या गुरुजींना भेटायला गेला..
गुरुजींना शुद्धीवर आलेले पाहताच त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले... "गुरुजी, आता बरं वाटतंय ना तुम्हांला?",
या त्याच्या आपुलकीच्या शब्दांनी गुरुजी गहिवरले... "गणप्या तू"... "तू इथे कसा?" .... असं म्हणत गुरुजींच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. तोंडातून शब्द फुटत नव्हते.
दोघंही नि:शब्दपणे एकमेकांकडे पहात प्रेम वर्षावात चिंब भिजले होते.
आपल्या गुरुबद्दलचे प्रेम गणप्याच्या नजरेतून ओसंडून वाहत होतं... आणि गुरुदक्षिणा देणाऱ्या या आपल्या शिष्याचे आपल्यावरील प्रेम पाहून गुरुजींचा कंठ दाटून आला होता....
"अरे माझ्यासाठी तू एवढी मोठी रक्कम कुठून जमा केलीस रे बाळा?", अशा म्हणत गुरुजींनी काळजीच्या सुरात गणप्याला विचारलं.
"गुरुजी, आज मी जे काही आहे, ते केवळ तुमच्यामुळे".... "तुम्ही एका शब्दाने मला हक्काने गुरुदक्षिणा मागितली असती, तरीही मी जिवाचं रान केलं असतं, पण तुमच्यावर ही वेळ येऊच दिली नसती"... "आई आणि बाबा तर कधीच वारले"... "या एकट्या आयुष्यात तुमच्या पत्रांनी मला सावरलं, जगण्याचं बळ दिलं"...
"गुरुजी, आज मी जे काही आहे, ते केवळ तुमच्यामुळे".... "तुम्ही एका शब्दाने मला हक्काने गुरुदक्षिणा मागितली असती, तरीही मी जिवाचं रान केलं असतं, पण तुमच्यावर ही वेळ येऊच दिली नसती"... "आई आणि बाबा तर कधीच वारले"... "या एकट्या आयुष्यात तुमच्या पत्रांनी मला सावरलं, जगण्याचं बळ दिलं"...
"त्या पत्रातल्या मायेच्या चार शब्दांनी, मी तुमच्यात फक्त माझा शिक्षकच नव्हे तर माझे गमावलेले आई आणि बा पण शोधत होतो"... "त्यांच्यासाठी मला कधीच काही करता आलं नाही, तेव्हा परिस्थितीच तशी होती"...
"पण आज माझ्या या गुरुजींसाठी काही करण्याची संधी मला मिळाली, तर मी ती गमावेल कशी?", असं म्हणत गणप्या हमसून हमसून रडला.
गुरु पौर्णिमेचा सोहळा आज नकळतपणे हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीने साजरा झाला होता.
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.