आईपणाचं महाभारत

© आर्या पाटील




वल्लरी आणि गौतम म्हणजे जणू राम सीतेची जोडी. वर्षभरापूर्वी लग्न झाले आणि सुखाचा संसार सुरु झाला.

वल्लरी खूपच समजूतदार होती त्यामुळे लग्नानंतर अनेक गोष्टींची तडजोड करत तिने हक्काची माणसे जोडली. नवीन सून म्हणजे घरातील सर्व कामे करण्यासाठी आणलेली हक्काची व्यक्ती अश्या विचारसरणीच्या सासूलाही तिने आज्ञाधारी सीता बनूनच जिंकून घेतले.

 स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची इच्छा बाजूला ठेवून तिने गौतमच्या व्यक्तिमत्वातच ते शोधले. घराची जबाबदारी हिच आपली नोकरी अन् नातीगोती सांभाळणे हेच आपले काम हिच जाणीव ठेवत ती गृहलक्ष्मी बनली.

सासूबाई जुन्या विचारणसरणीच्या त्यामुळे त्यांच्या सासूचा जसा त्यांना त्रास झाला तसा सासुरवास वल्लरीला करायचाही मानसशास्त्रीय प्रयत्न झाला त्यांच्याकडून. पण तेथेही वल्लरीने समजुतीने सासूबाईंना खजिल केले.

"शब्दाला शब्द दिला तर तो वाढतो.. ती एक जुन्या विचारसरणीची आहे पण आपण तर समजूतदार आहोत.. बोलेल बोलेल अन् शांत होईल.. तू तुझा संयम ढळू देऊ नकोस नाहीतर संसारात हेवेदाव्यांच महाभारत घडायला वेळ लागणार नाही.." नवर्‍याने सांगितलेल्या शिकवणुकीला आज्ञाधारी पत्नीप्रमाणे अंगिकारले आणि मौन धारण करत तिने सासूरवास सुसह्य केला. 

तिच्याकडून प्रतिउत्तर न आल्याने सासूबाईही शांत झाल्या.. आणि 'सून माझी लेकच आहे' या थांब्यावर येऊन पोहचल्या.

थोडक्यात सगळाच आनंदी आनंद होता...
आता फक्त घराचे गोकुळ व्हावे हिच काय ती इच्छा.

गौतम खूपच प्रॅक्टिकल होता.. करिअर, संसार आणि मुल याचं गणित त्याने आधीच आखलं होतं.

दोन वर्षे तरी मुलाचा विचार करायचा नाही हे त्याने घरच्यांसमोर आधीच स्पष्ट केले होते त्यामुळे "कधी पाळणार हलणार..?" असा प्रश्न वल्लरीला तरी दोन वर्षे कुणीच विचारला नाही.

आताश्या वल्लरीच्या मैत्रीणींनाही मातृत्वाची चाहूल लागली होती.. त्यांना त्या रुपात पाहून वल्लरीचं आईपणही उफाळून यायचं पण गौतमच्या हक्काच्या दोन वर्षांत ते विरुनही जायचे.

पाहता पाहता लग्नाचा दुसरा वाढदिवस जवळ आला होता.. या वाढदिवसाला गौतमकडे मातृत्वाचे गिफ्ट मागायचे या विचाराने तिच्या चेहर्‍यावर एक वेगळीच लकाकी आली होती.

दरम्यान चार दिवस कसलासा त्रास जाणवू लागल्याने पूर्ण बॉडी चेकअप करून घेतलं गौतमने स्वत:चं.. आणि त्याच चेकअप दरम्यान त्याला आयुष्याला कलाटणी देणारी, तो कधीही बाप न होऊ शकणारी बातमी कळली.

 त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. त्याला आणि तिला पूर्णत्व देणारं पालकत्व तो कधीही अनुभवू शकत नव्हता.. रिपोर्ट कन्फर्म करण्यासाठी त्याने पुन्हा चेकअप करून घेतला.. आणि हा रिपोर्टही पदरी निराशाच देऊन गेला.

घरी सांगितल्यावर आपल्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन बदलेल... वल्लरी काय रिअॅक्ट करेल...? जेव्हा नातेवाईकांना ही गोष्ट कळेल तेव्हा काय होईल..? अश्या एक ना अनेक विचारांची मांदियाळी त्याला छळत होती.

विचारांच्या गर्तेत तो एवढा बुडाला की आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे हे ही तो विसरला.


त्याच्या चेहर्‍यावरचा हरवलेला तेजस्वीपणा वल्लरीने बरोबर हेरला होता.. पण तुर्तास तिने संध्याकाळी वाढदिवसाचं सरप्राइज अरेन्ज केलं त्याच्यासाठी..


काही वेळापुरता का होईना त्यालाही विसर पडला साऱ्या वास्तवाचा.. आपली माणसं आपल्याला तुटू देणार नाहीत त्याला नव्याने खात्री पटली... सारा कार्यक्रम आटोपल्यावर वल्लरीला आपल्या रिपोर्टबद्दल सांगायचे असे पक्के ठरवून त्याने मनाला शांत केले.

" गौतम आणि वल्लरी मनावर घ्या आता.. दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला.. आता घराचं गोकुळ होऊ दे.." मुद्द्याला हात घालत सासूबाई म्हणाल्या..
तशी वल्लरी गोड लाजली..


" पाहिलं कशी लाजली ते..? गौतम आता पुरे झालं तुझं आर्थिक व्यवस्थापन.. आता पोरीला अनुभवू दे आईपण." वल्लरीच्या मनातलं सासूबाईंच्या मुखातून निघत होतं.

गौतमचा चेहरा एकाएकी पडला.. वल्लरीच्या नजरेतून त्याच्या डोळ्यातील वेदना सुटल्या नाहीत.. मागील काही दिवसांपासून त्याचं काय बिनसलं आहे हे विचारण्याचा निर्धार करून ती जेवण झाल्यावर रुममध्ये आली आणि विषयाला हात घातला.

गौतमने मात्र माती खाल्ली.. ठरवूनही त्याने आपल्या रिपोर्ट विषयी वल्लरीला सांगायचे टाळले.
" हो गं.. थोडं ऑफिसमधलं टेन्शन आहे बाकी काही नाही..." म्हणत त्याने विषय टाळला..

ऑफिसमधलं टेन्शन आणि त्यात आपलं गाऱ्हाणं नको म्हणून वल्लरीने मनातलं बोलणं मनातच ठेवलं.

हळूहळू दिवस सरत होते.. योग्य वेळ पाहून आपण गौतमशी बोलू हा विचार करत वल्लरी त्याला वेळ देत होती.. आणि गौतम मात्र सतत तिला टाळू लागला होता..

इकडे सासूबाईना मात्र आजीपणाचे वेध स्वस्थ बसू देत नव्हते.. सुरुवातीला त्यांनी वल्लरीला प्रेमाने समजावून सांगत आईपणाचे महत्त्व पटवून दिले.. वल्लरीला ही ते पटत होते पण गौतमविषयी त्यांना कसे सांगणार..?

ती मान हलवून प्रतिसाद द्यायची आणि निघून जायची..

खूप प्रयत्न करून तिने गौतमच्या तोंडावर विषय काढलाच.

"वल्लरी, एवढ्यात नको गं.. सध्या मी आर्थिक अडचणीत आहे.. आपल्या बाळाला उज्ज्वल भविष्य द्यायचं असेल तर थोडी कळ सोसावीच लागेल.." गौतम वल्लरीशी पहिल्यांदाच खोटं बोलत होता..

त्यामुळे नजर वर जात नव्हती..

त्याचा चेहरा ओंजळीत पकडत तिने त्याच्या नजरेला नजर दिली..
" आर्थिक तडजोडीपेक्षा भावनिक तडजोड जास्त त्रासदायक आहे. आईंनी खूप ध्यास घेतलाय.. आणि खरं सांगू मलाही ओढ लागली आहे मातृत्वाची.. आपण दोघं मिळून करू आर्थिक नियोजन.. पण सध्या पालकत्व महत्त्वाचे आहे.." म्हणत तिने त्याला समजावले..

तसं चिडत त्याने तिच्या ओंजळीतून आपला चेहरा बाजूला घेतला..

" तुला फक्त एवढच दिसतं का..? आई एक अडाणी आहे पण तू तर सुशिक्षित आहेस.. एवढ्यात नाही अनुभवायचं पालकत्व मला.. आणि यापुढे या विषयावर बोलायचं नाही माझ्याशी.." म्हणत तो तोंड फिरवून निघून गेला..

लग्नानंतर आज पहिल्यांदाच तो एवढा उर्मठपणे बोलला तिच्याशी.. खूप वाईट वाटले तिला.. आईपणाच्या सुखासाठी आज त्याचं नातच पणाला लागलं होतं जणू.. गौतमच्या वास्तवापासून दूर वल्लरी स्वत:लाच दोष देत होती.

" मी का त्रास देते त्याला..? खरच खूप मोठ्या आर्थिक विवंचनेत असेल तो म्हणूनच मला ओरडला. मी त्याच्या कलेने घ्यायला हवं.. त्याला समजून घेणं महत्त्वाचं.." म्हणत तिने दुसऱ्याच दिवशी त्याची माफी मागितली.

गौतमला मनातून खूप वाईट वाटत होते पण खरं सांगायची हिंमत नव्हती.. आपल्या उणीवेला आर्थिक मजबुरीच्या सोंगाने झाकत तो वल्लरीला अंधारात ठेवत होता..

इकडे सासूबाईंनी प्रेमाने सांगून बघितले पण दोघांचे कान हालेनात म्हणून आता त्या प्रचंड आग्रही बनल्या..

आता रोजच घरात बाळाविषयी बोलणं होऊ लागलं..

मान हालवून गौतम कामावर निघून जायचा पण दिवसभर सासूबाईंच आजीपुराण वल्लरीला ऐकावं लागायचं.

त्यांचही बरोबर होतं.. आता नाही तर मग कधी त्या आजी बनणार..? त्यात गौतम एकुलता एक त्यामुळे कधी एकदा छोटा बाळकृष्ण घरात येतो असे काहीसे झाले होते त्यांना..

आताश्या त्यांच्या बोलण्यातला रोष जरा जास्तच वाढला होता..

आणि त्या दिवशी त्या मंदिरातून आल्या आणि रोषाचा स्फोट करत एकदम वल्लरीवर बरसल्या.
" तुमचं काय चाललं आहे नक्की..? तुझ्यात काही दोष तर नाही ना..? मला तर असच वाटतय.. नाहीतर इतक्यात कुस उजवली असती तुझी.. माझा मुलगा भोळा सांब.. तुझ्या हो ला हो करत असेल.." तडकाफडकी बोलत त्या रुममध्ये निघून गेल्या.

आज त्यांनी तिच्यातील बाईपणावर प्रश्न निर्माण केला आणि वर्मी घाव घातला.. काहीही चूक नसतांना ती 'वांझपणाचा' शिक्का माथी मारून घेत होती.

एवढ्या दिवस मौन पाळत चाललेलं रामायण पतीव्रता पत्नी बनून सहन केले पण हा शाब्दिक महाभारताचा खेळ तिला छळत होता.. तिचा अंत पाहत होता.

तिने स्वत:ला रुममध्ये बंद करून घेतले.. घरातील वातावरण एकदम गढूळ झाले. संध्याकाळी घरी आल्यावर जेव्हा गौतमला हे सारे कळले तेव्हा त्याने मनाशी पक्का निश्चय केला.

वल्लरीला रुममधून बाहेर काढत कपाटात ठेवलेले आपले रिपोर्ट घेवून तो आईकडे गेला..

" आई, दोष तुझ्या मुलात आहे.. सुनेत नाही.. मी कधीच बाप होऊ शकत नाही.. मातृत्वाचं सुख नाही देऊ शकत वल्लरीला.. ती खूप समजुतदार सारं सहन करत होती. पण आज तू नको ते बोलून तिच्या बाईपणावर आक्षेप घेतलास.. आई ती परिपूर्ण.. मी अपूर्ण आहे गं.." म्हणत त्याने ते रिपोर्ट त्यांच्यासमोर ठेवले आणि रुममध्ये निघून गेला.

सासूबाई जागेवरच कोसळल्या.. तसा वल्लरीने त्यांना आसरा दिला.. त्यांना खुर्चीत बसवत पाणी दिले..
" वल्लरी मला माफ कर गं.. मी खूप बोलले तुला.. तुझ्यावर वांझपणा लादत तुला दुखावले.. खरच मला माफ कर.." म्हणत त्या ओक्साबोक्सी रडू लागल्या..

एका बाजूला सासूबाईंच्या रडण्याचा आवाज आणि दुसऱ्या बाजूला तिच्यातील आईपणाचा झालेला करुण अंत कोणाचं सांत्वन करेल ती....?

पण तिने मात्र सासूबाईंना शांत करून रुममध्ये धाव घेतली..

सगळ्यात जास्त सांत्वनाची गरज असलेल्या गौतमकडे जात तिने त्याला कुशीत घेतले..
तिच्या कुशीत विसावत त्यानेही स्वत:ला मोकळं केलं..

घुटमळत होता तो ही हे वास्तव घेऊन पण जेव्हा याची झळ वल्लरीला पोहोचली तेव्हा तिच्या बाईपणाचं रचलेलं महाभारत त्याने कृष्णसखा बनत संपवलं आणि तिला तिचा मान मिळवून दिला..

खूप रडला तो तिच्या उबदार छायेत..
" वल्लरी मी अपूर्ण आहे गं... तुझ्या मातृत्वाचा मार्ग माझ्या दोषाने बंद करून ठेवला होता.. पण माझ्या दोषाची शिक्षा तुला का..? अपूर्ण नात्याच्या या बंधनातून मी तुला कायमचं मुक्त करतो.. जरी दोष माझ्यात असला तरी हा समाज तुझं जगणं मुश्कील करेल.. नाही.. मी हे अजिबात होऊ देणार नाही.. मी या लग्नबेडीतून तुला कायमचं मुक्त करू इच्छितो गं.." हात जोडत तो रडू लागला..

वल्लरीने त्याच्या तोंडावर हात ठेवला..
" लग्नानंतर तू मी वेगळे नाहीत.. आपण एकच आहोत..

आणि जर माझ्यात दोष असता तर तू मला सोडून दिले असतेस का..?" त्याचा चेहरा ओंजळीत पकडत ती म्हणाली..

आता त्याने तिला शांत केले आणि नकारार्थी मान हलवली..

" मग मी तुला का सोडू..? आपण एकमेंकासोबत परिपूर्ण बनुया.. पालकत्व हे स्वर्गसुख आहे नात्यातील बेडी नाही.. आपण मुल दत्तक घेऊन पालकत्व अनुभवू.. उदरी वाढवलं नाही म्हणून आईपण लाभत नाही असे मुळीच नाही.. 'आईपणा' हा देवाने दिलेला सुंदर दागिना आहे.. बाईपणाचं सौंदर्य उजळवणारा.... तो अनुभवणं महत्त्वाचे.." म्हणत तिने आपल्या कृष्णसख्याची समज काढली.

त्याक्षणी तिच त्याला जीवलग कृष्णसखी वाटली.. आयुष्यातील वास्तवरूपी महाभारताच्या लढ्यात त्याला विजयाची वाट दाखवणारी.

© आर्या पाटील

सदर कथा लेखिका आर्या पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने