गुंतता मन हे

© डॉ मुक्ता बोरकर - आगाशे




घाईघाईत आवरून तो बस स्टॉप वर पोचला. तिथे उभ्या असलेल्या एका सुंदर तरुणीने त्याचे लक्ष वेधून घेतले.

गोरापान रंग, नजरेत भरण्याईतकी उंची, तिची नाजुक सुंदर काया, अगदी रेखीव सुंदर चेहरा. तिचे अगदीच साधे मागे बांधलेले अन् कुरळे पणाकडे झुकणारे सुंदर केस. 

अगदी अनुपम सुंदर असलेली ती. त्यातही तिच्या सौंदर्यात असलेला साधेपणा अन् सात्विक पणा तिच्या सौंदर्यात अजूनच भर घालत होता.

का कोण जाणे अगदी पहिल्याच पाहण्यात त्याला तिचं सौंदर्य मोहवून गेलं होतं. संस्कार आणि मन दोन्हीं बाबींनी अगदी सभ्य असला तरी तिचं साैंदर्य त्याच्या मनात रुंजी घालू लागलं होतं.

इतक्यात एक स्कूल बस त्या स्टॉप वर आली. तिने इकडे तिकडे पाहिले पाठीवर स्कूल बॅग चढवून खेळत असलेली ती दोघं भावंडं तिच्याकडे आली. 

त्यांना तिने जवळ घेतले दोघांच्याही केसांवर मायेने हात फिरवला आणि त्यांना त्यांच्या बस मधे बसवून ती परत फिरली.

तिच्याबद्दल च्या त्याच्या विचारांची मालिका सुरू असतांनाच त्याची बस आली. बस मध्ये बसला तरी ती काही डोक्यातून जात नव्हती.

कितीतरी सुंदर मुली त्याच्या ऑफिस मध्ये त्याच्या अवतीभवती असायच्या. 

त्याच्याच कित्येक सुंदर मैत्रिणी त्याच्यावर जीव ओवाळायला एका पायावर तयार असलेल्या.... त्याचं सुंदर , रुबाबदार व्यक्तिमत्व, त्याची हुशारी , त्याच्या कामाची पद्धत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात असलेली सभ्यता ,त्याच्या विचारांची खोली त्यामुळे कित्येक जणी त्याच्यावर भाळलेल्या !!!


पण या साऱ्यांमध्ये कधीही न अडकलेला तो..... अन् ती आज अगदी बघताक्षणी च त्याला वेड लावून गेली होती.

पण शेवटी तिच्याजवळ आलेली ती दोन मुलं??????

नकळतच प्रश्न चिन्हाचा लगाम त्याच्या विचारांना लागला. तिक्यात बस सुध्दा त्याच्या स्टॉप वर येऊन पोचली. तो ऑफिस च्या कामाला लागला अन् मग कुठे त्याच्या विचारांची मालिका तुटली.

दुसऱ्या दिवशी सुद्धा तेच चित्र!ती आणि तिची मुले. 

एकंदरीत अनुमानावरून ती त्यांची आई असावी अशी जुजबी कल्पना त्याला आली. तिचं ते वयाच्या मानानी अगदीच तरुण दिसणं त्याला मग अजूनच खुणावून गेलं.

ती ज्या मायेने मुलांना जवळ घ्यायची, त्यांच्या केसांवरून हात फिरवत त्यांचा तिने घेतलेला पापा, तिचं ते मुलांचं काळजी घेणं आणि तिच्या चेहऱ्यावरील प्रसन्न सात्विक भाव त्याला अगदीच मोहात पाडायचे.

उपवर असलेला तो! 

त्याच्या मनात त्याच्या जोडीदारा विषयी च्या ज्या कल्पना होत्या त्यात ती अगदी फिट्ट बसत होती. 

आपली होणारी बायको असावी तर अगदी अशीच असे त्याला मनोमन वाटून जायचे. आणि तिची ती दोन लेकरं पाहिली की नकळत त्यांच्या बाबांचाही त्याला हेवा वाटून जायचा.

ती परस्त्री आहे, परस्त्री च्या मोहात पडणे पाप आहे हे त्यालासुद्धा कळत होते. 

रोज मात्र तिला पाहिले की त्याचा संयम गळायचा आणि पुन्हा त्याच्या स्वप्नातील तिला तिच्याच रुपात बघायचा !

त्याच्या त्या बघण्यात मात्र ,वासनेचा लवलेश अजिबातच नव्हता. ती त्याला अगदी निखळ आवडली होती अन् डोळ्यांवर असलेल्या काळ्या चाष्म्याच्या आडून दिसणारे तिचे सात्विक साैंदर्य. त्याच्याही नकळत त्याच्या मनाला मोहवणारे.

तो कितीदा बजावायचा स्वतःला, स्वत:च्या मनाला. पण मनच ते त्याच्या कह्यात नसलेले., परंतु निर्मळ पणे आवडण्या खेरिज इतर भावनांचा लवलेशही नसलेले.

आजही तो नेहमीप्रमाणे स्टॉप वर पोहोचला पण नित्यनियमाने दिसणारी ती मात्र आज नव्हती. 

तिची ती गोंडस मुलं तिथे खेळत होती आणि आज एक दुसरीच स्त्री तिथे दूरवर उभी होती. 

मुलं खेळत खेळत त्याच्या बाजूला आली, त्यांना ओळखीची स्माईल देऊन त्याने" अरे आज तुमची मम्मा कुठे गेली?" असे सहजच विचारले. 

" मुलांनी अगदी सहजच तिकडे उभ्या असलेल्या दुसऱ्या स्त्री कडे बोट दाखवले. ती स्त्री आता त्यांच्या जवळ आली. परत मुलांनी सांगितले "ही आमची मम्मा.!"

त्याच्या मनातील प्रश्न ओळखून मग तिनेच सांगितले हो मीच यांची मम्मा.

" मग रोज असतात त्या कोण?" त्यानी अगदी अधिरतेने विचारले.

" ती ना माझी धाकटी बहीण, तिच्या लग्नाचे सुरू आहे ना! बघायला येणार आहेत तिला, त्यामुळे गावाला गेलीय बाबांकडे." त्या स्त्रीने कसलेही आढेवेढे न घेता सांगून टाकले.

हे सगळं ऐकताच मात्र त्याचं मन एखाद्या स्वैर वारुसारखे उधळायला लागले. अरे! हे असंसुद्धा असू शकते अशी पुसटशीही शंका मला आली का नाही.

त्याला आता ही संधी अजिबात गमवायची इच्छा नव्हती. त्यामुळे तिने अगदी न विचारता सुद्धा स्वतःबद्दल आणि एलिजिबल बॅचलर असल्याबद्दल त्याने तिला आवर्जून सांगितले.

मनोमन तिचे लग्न न जुळण्याबद्दल देवाला प्रार्थना सुद्धा केली.एका वेगळ्याच आनंदात तो आज कामाला लागला.

काही वेळातच गावाहून त्याच्या बाबांचा फोन आला. "तुला उद्या मुलगी पाहायला यायचं आहे. माझ्या एका जुन्या मित्राची मुलगी आहे, सुंदर ,संस्कारी आहे. जर आवडली तर बघूयात."

आता ही दुसरी मुलगी बघायची त्याची अजिबात इच्छा नव्हती . 

त्याने बाबांना आडून आडून नाही येऊ शकत म्हणून सांगायचा खूप प्रयत्न केला पण बाबा कसलेच कारण ऐकायला तयार होईनात. 

शेवटी नाईलाजाने हो म्हणून तो ऑफिस मधील काम आटोपून गावाच्या मार्गाला लागला.


हे सगळं इतकं नाईलाजास्तव होतं की बाबांनी पाठवलेला मुलीचा बायो डेटा आणि फोटो बघायचं साधं सौजन्य सुद्धा त्याने दाखवलं नाही.

त्याच्या नजरेसमोर फक्त तरळत होता तिचा चेहरा अन् ती अविवाहित असल्याची नवी आशा...!!


दुसऱ्या दिवशी आई बाबां सोबत नाईलाजाने तो मुलगी बघायला गेला. मुलीच्या बाबांचे आणि त्याच्या बाबांचे मित्रत्वाचे नाते ,त्यामुळे गप्पांना अगदी रंग चढलेला , अन् चेहऱ्याचा पार बेरंग करून बसलेला तो!

आई बाबांना थोडं खटकलं होतं पण तिथे बोलायची सोय नव्हती.

काही वेळातच मुलगी पोहे घेऊन समोर आली. ह्याची खालची नजर खालीच!

"अय्या काका तुम्ही इथे?" म्हणणारा लहान मुलाचा आवाज ऐकून त्याने मान वर केली. 

तेच बस स्टॉप वरील ओळखीचे चेहरे आणि पोह्यांचा ट्रे घेऊन समोर आलेली ती !

त्याचा स्वतः च्या डोळ्यावर विश्वास च बसत नव्हता. जी स्वप्न तो कल्पनेत रंगवत होता ती त्याच्या आयुष्याचं दार ठोठावत होती.

पण तिच्या मनाचं काय? तिला दुसरं कुणी आवडत असेल तर.....!

आई बाबांना मुलगी खूप आवडली होती. त्याच्या चेहऱयावरील उडालेले अन् मुलीला बघून परत आलेले रंग आई बाबांनी अनुभवावरून हेरले होते.

तरीही त्याला बाजूला घेऊन बाबांनी विचारले. त्याचा होकार मिळताच आता चेंडू पुढच्या कोर्टात होता. सारं भवितव्य तिच्या होकरात होतं.

अन् ती ........!!!

तिला तर तो कधीपासून च आवडायला लागला होता. अगदी प्रथम क्षणी त्याला पाहताच त्याच्या नजरेतले भाव तिने हेरले होते. 

पण दुसऱ्या दिवसापासून त्याचं तिच्याकडे बघणं अन् ती दुरस्थता मात्र तिला उलगडली नव्हती.......

आज जेव्हा नेमकं त्यामागचं कारण उलगडलं होतं तीचा होकारच होता....

आज त्याला कळलं होतं कळत नकळत त्याच्या मनाचं गुंतणं, मनाला समजवून सुद्धा त्याचं तिच्याकडे ओढ घेणं..

त्याचं हातातून निसटू पाहणारं स्वप्न आज मात्र सत्यात उतरलं होतं कायमचं त्याचं होण्यासाठी.....!


© डॉ मुक्ता बोरकर - आगाशे
मुक्तमैफल

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने