भेटीलागी जीवा लागलिसे आस

© आर्या पाटील




सुधाआजीचा संगमरवरी देव्हारा आज समईच्या मंदप्रकाशाने उजळला होता.. धूपदीप आणि अगरबत्तीच्या सुवासाने गंधाळला होता.. जास्वंद, सदाफुली, गुलाब अन् तगरीची फुलेही आज भलतीच गोंडस दिसत होती देव्हाऱ्यात.. आणि देव्हार्‍यातील सावळ्या विठूरखुमाईची मूर्ती तर जिवंत होऊन समोर दर्शन देत होती जणू.

सुधाआजी तश्या खूपच थकलेल्या पण आषाढी एकादशी म्हणजे जणू दिवाळीचा सण वाटायचा त्यांना.

आजोबा हयात असतांना दोघांनी अनेकदा वारीचा उत्सव अनुभवला होता.. पण आता आजोबाही नव्हते आणि थकलेल्या शरीराची साथही.

त्यामुळे मागील काही वर्षांपासून आजी घरीच आषाढी एकादशीचा सोहळा साजरा करत पंढरपुरच्या विठ्ठलाला साकडं घालायच्या. 

ज्या मुलाने म्हातारवयात एकटं सोडलं त्या मुलाची भरभराट होऊ दे.. त्याच्या घरी आनंद, सुख,शांती सदैव नांदू दे.. एवढच एकमेव मागणं त्याचं विठुराया चरणी असायचं.

शेवटी आईच ती. आजोबा गेल्यानंतर एकुलता एक मुलगा निलेश त्यांना शहरात घेऊन गेला..नाही म्हणायला एक मुलगी होती पण ती ही लग्नानंतर परदेशात कायमची स्थायिक झाली होती.. त्यामुळे मुलीचा पाहिजे तो आधार कधीच मिळाला नाही.. 

मुलाकडे असतांना निदान दिवसाआड फोन तरी करायची पण गावाकडे आल्यानंतर तिने फोन करणेच बंद केले.. कधीतरी महिन्याकाठी एखादा फोन यायचा..

मुलाकडे असतांना सुधाआजी अधिक थकल्या.. मानसिक स्थैर्य काही मिळालच नाही..

मुलगा आणि सून त्यांच्या कामात व्यस्त..कॉलेजचा तरुणवीर असलेल्या नातवाला आजीविषयी जराही माया नव्हती.. रोज आजोबांच्या आठवणींनी मन व्याकूळ व्हायला उठायचे.. 

मग त्या निरवानिरवीच्या काळात विठ्ठल रखुमाईच त्यांचे मायबाप व्हायचे.. एका खोलीत एकांतवास सहन करत त्या विठ्ठलमय व्हायच्या..

पण एखाद्या आश्रितासारखं जगणं आता नको झालं होतं.. मनाची प्रेमाची भूक काही केल्या भागत नव्हती..

" निलेश बाळा, मला गावी सोडून ये.. इथलं वातावरण मानवत नाही मला.. तिकडे हयांच्या आठवणीत आणि निसर्गाच्या सानिध्यात जगणं सुकर होईल बघ.. अधून मधून भेटायला येत जा.." म्हणत त्यांनी त्यांचा वेगळा मार्ग निवडला..

त्या तिथे राहिल्या काय नि गावी राहिल्या काय निलेशला कोणताही फरक पडत नव्हता.. त्याने दुसऱ्याच दिवशी त्यांना गावी आणून सोडले.. 

वडिलोपार्जित चिरेबंदी वाड्यात जुन्या आठवणींना उजाळा देत आजी मुक्तपणे जगू लागल्या.. तिथे कसलीच कमतरता पडू नये याची सोय निलेशने करून दिली.. पण प्रेमाचं काय..? आपुलकीची, मायेची कमतरता भरून काढायला नाही जमलं त्यांच्या लेकाला..

या एकाकी जीवनात वाड्यावर काम करणारे गरिब सदू आणि रखमा त्यांच्या जीवाभावाचे बनले. दोघेही पक्के विठ्ठलभक्त, न चुकता पंढरपुरची वारी करणारी विठ्ठलाची लेकरं जणू.. 

सुधाआजींमध्ये आईला पाहायचे दोघेही.. त्याही आईसारखीच माया करायच्या त्यांच्यावर.. त्या दोघांच्या रुपात अप्रत्यक्षपणे त्या वारी जगायच्या..

त्यांची लेक जनी तर आजी आजी करत दिवसभर मागे असायची त्यांच्या...पण शेवटी पोटच्या पोराला आई कशी विसरणार..?
सुरवातीला महिन्याकाठी, त्यानंतर वर्षाकाठी तरी भेटायला यायचा निलेश गावी.. पण मागील काही वर्षांपासून त्याने ते ही बंद केले...

खूप वाईट वाटायचं त्यांना.. मग स्वत: ला विठ्ठलनामात गुंग करून घेत आपल्या दुखऱ्या जखमेवर भक्तीचा मलम लावायच्या.. आणि त्यात त्यांना साथ मिळायची सदू आणि रखमाची.. माळकरी असलेले ते दोघे आणि त्यांची लेक मिळून रोज संध्याकाळी आजीसोबत हरिपाठ गायचे.

हळूहळू आजींच वय होऊ लागलं.. निसर्गचक्राप्रमाणे कुडी थकली.. सांधेदुखीचा, कमरेचा त्रास उफाळून येऊ लागला.. पण शरिरापेक्षा थकलेल्या मनाचे दुखणे असहनीय झाले होते.

" विठ्ठला, थकला रे हा जीव.. आता तुझ्या भेटीची आस लागलीये बघ या जीवाला.. ही कुडी तुझ्या चरणी विलीन होण्यापूर्वी एकदा लेकाला शेवटची पाहण्याची इच्छा आहे बघ.." देव्हाऱ्यातल्या सावळ्या विठ्ठलाला डोळ्यांत साठवत सुधाआजी एकच मागणं मागायच्या.

अध्यात्माकडे झुकलेल्या उतारवयातही आईपणाचा मोह सोडवत नव्हता.आताश्या स्मृतीभ्रंशाचा त्रासही जाणवू लागला होता त्यांना.. पण निलेशला भेटण्याचा मोह स्मृतीपटलावर अजूनही तसाच होता..

सदू आणि रखमा मात्र त्यांना सांभाळून घेत होते.. अधेमधे भ्रमिष्टासारख्या वागणाऱ्या त्यांना मायेचा आधार देत होते.. निलेशला कळवलं होतं.. पण नेहमीप्रमाणे कारणं देत तो गावी येणं टाळत होता..

आज मात्र सुधा आजी नेहमीपेक्षा जरा टवटवीत दिवस होत्या..सकाळपासून एकही गोष्ट त्या विसरल्या नव्हत्या..
देव्हार्‍यात आपल्या लाडक्या विठुरखुमाईला सजवून त्या अधिकच प्रफुल्लित झाल्या होत्या.. 

त्यांना असं आनंदी पाहून सदू आणि रखमाही खुश होते.. कालपर्यंत कोरोनामुळे टळलेली विठ्ठलवारी आठवत दु:खी झालेले ते दोघे आज मात्र हात जोडून विठ्ठलाचे दर्शन सुधाआजींच्या देव्हार्‍यात घेत होते..

भक्त भावाचा भुकेला आणि आज हाच भक्तिभाव देव्हाऱ्यात पूजिला होता. दोघांनी जोडीने विठुरखुमाईचे दर्शन घेतले.

तोच वाड्याच्या आवारात चारचाकी गाडी येऊन थांबली.. तसा सदू धावतच गाडीपाशी गेला.. निलेशला गाडीतून उतरतांना पाहून जणू विठ्ठलभेटीचा आनंद झाला त्याला..

देहभान विसरून तो सुधाआजींकडे धावला..

" आई, आपले साहेब आले आहेत बाहेर.. आपले निलेश साहेब आले आहे.." धापा टाकत तो म्हणाला आणि आजीला पकडून घेऊन दारापाशी पोहचला..

निलेशचं नाव ऐकताच सुधाआजी गहिवरल्या. " विठ्ठला तुलाच काळजी रे या म्हातारीची.." हात जोडत त्या म्हणाल्या...

निलेशला आपल्याकडे चालत येतांना पाहून सुधाआजी वेगळ्याच प्रफुल्लित झाल्या.. एका वेगळ्याच प्रकाशाने त्या उजळल्या गेल्या.. दारात उभ्या असलेल्या आपल्याच लेकाला हात जोडत त्या खाली बसल्या.. डोळ्यांतून अश्रूधारा ओघळू लागल्या..
" रखमा, अगं ये रखमा.. देव्हार्‍यातलं आरतीचं ताट घेवून ये.." सारी शक्ती एकवटून त्या म्हणाल्या..

रखमा आणि सदू आश्चर्यचकित होऊन आजींकडे पाहू लागले...

" सकाळपासून बऱ्या होत्या.. आता पुन्हा भ्रमिष्टासारख्या करू लागल्या.. विठ्ठला सावर रे आईला." डोळ्यांना पदर लावत रखमाने आरतीचा ताट उचलला आणि बाहेर आली..

सदूने आधार देत आजींना उभं केलं.. थरथरत्या हातांनी त्यांनी निलेशचं औक्षण केलं.. अजूनही डोळ्यांतून भरून आलेलं आभाळ अश्रू बनून कोसळत होतं.. 

आरतीचा हात रखमाच्या हातात देत काठी बाजूला करत त्या कमरेत वाकल्या आणि निलेशच्या पाया पडण्यासाठी सरसावल्या..

" आई, काय करता..? आपले निलेश साहेब आहेत ते.. त्यांच्या कुठे पाया पडता..?" म्हणत सदूने त्यांना आधार देत उभे केले..

" साहेब, या आत.. अलिकडे खूप भ्रमिष्टासारख्या करतात आई.. तुम्हाला कोण समजल्या काय माहित..?" म्हणत त्याने सुधा आजींच्या हातात काठी दिली..

निलेशही आत आला..
" आई, बरी आहेस ना..? अगं मी निलेश.. तुझा मुलगा. मला ओळखलं नाहीस का..?" आजींना आधार देत तो म्हणाला..


निलेशला एवढं काळजीने वागतांना पाहून सदू आणि रखमाला आश्चर्य वाटले.. एरवी कधीही आलेला निलेश मुलगा कमी आणि उरलेल्या संपत्तीची वाटाघाटी करायला आलेला डिलर जास्त वाटायचा.. 

मागच्या वेळेस तर त्याने सुधाआजींचे सगळे दागिनेही मागून नेले होते..

"एवढा निदर्यी तो एकाएकी असा बदलणे शक्य नाही.. नक्कीच वाडा स्वत: च्या नावावर करून घ्यायला आला असेल.. की वाडा विकायला आला आहे..?" मनात शंका आशंकांचे वादळ घेऊन सदू बागेत कामासाठी निघून गेला..

" रखमा, आज स्वयंपाक मी करेन बघ.. तु मला मदत कर.." पुन्हा एकदा निलेशला हात जोडत आजी म्हणाल्या.

" नको आई.. तुम्हांला नाही जमणार. मी आहे ना.. तुम्ही साहेबांशी बोला.." ती म्हणाली.

" अगं हा सोहळा पुन्हा वाट्याला येणार नाही... आज साक्षात.." बोलता बोलता आजी कंठ दाटून आला. तसं निलेशने तांब्यातील पाणी आजींना पाजले..

आजींना पुन्हा अश्रू अनावर झाले.. त्या निलेशची गळाभेट घेऊन ओक्साबोक्सी रडू लागल्या..

रखमाला क्षणभर कळलेच नाही काय चाललं आहे..
जणू मायलेकाच्या मिलनाचा सोहळा होता तो..

अगदी भक्त आणि विठूमाऊलीच्या भेटीच्या नितांत सुंदर सोहळ्यासारखा.

नकळत तिचेही डोळे पाणावले.. निलेश आधी जसा वागला तसा. पण आता त्याने आईच्या मायेला दिलेल्या सादेने रखमा सुखावली आणि स्वयंपाकघरात निघून गेली..

निलेशच्या आवडीचा बेत आखला तिने. प्रत्येक वेळेस आजी आवडीने सगळं बनवायच्या पण निलेश न खाताच निघून जायचा.. खूप वाईट वाटायचं त्यांना.. मग विठ्ठलाला नैवेद्य दाखवून मनाचं समाधान करायच्या..

जेवणाची प्राथमिक तयारी झाल्यावर ती आजींना स्वयंपाकघरात घेऊन आली..आजींनीही थरथरत्या हाताने प्रत्येक पदार्थाला हात लावला. जणू मायेची महत्त्वाची सामग्री टाकली त्यांनी पदार्थात..

स्वयंपाक झाल्यावर पहिल्यांदा रखमाने नैवेद्याचे ताट काढत देव्हाऱ्यात नेऊन ठेवले..
मग आजी आणि निलेशसाठी ताट बनवले..
" आई, तु भरव ना गं.." निलेशने लडिवाळ हट्ट केला.. तश्या आजी गहिवरल्या.

" मी नंतर जेवते..." म्हणत आजींनी निलेशचे ताट हातात घेतले आणि त्याला भरवू लागल्या..

घासागणिक तृप्त मनाने त्या निलेशचं मुखकमल न्हाहाळत होता.. त्यांच्या थरथरणाऱ्या हाताला निलेश घासागणिक आधार देत होता.. डोळ्यातून पुन्हा आनंदाश्रू ओघळू लागले.. 

निलेशने आपल्या हातांनी ते थेंब टिपले.. ताटात हात घालत घास बनवला आणि आजींना भरवला.. त्या घासाने आजपर्यंत अतृप्त असलेलं आजींच मन ओतप्रोत भरलं जणू. चेहर्‍यावर ओसंडून वाहणारा आनंद तृप्ततेचा ढेकर बनला.. 

रखमा सारं भरल्या नजरेने न्हाहाळत होती..तिने स्वयंपाकघरातूनच विठ्ठलाला हात जोडले..

जेवणं झाल्यावर सुधाआजींना घेऊन निलेश रुममध्ये गेला. बिछान्यावर पडत त्यांनी पुन्हा हात जोडले..
निलेशने आग्रहाने गळ्यातील चैन काढून आजींच्या गळ्यात घातली.

" आता खूप झाला हा कोंडमारा.. आता सोडव मला.. मी तुझ्यासोबतच येणार.. आज सगळा मोह गळून पडला बघ... मला घेवून चल तुझ्यासोबत.." विनविण्या करत आजी बोलू लागल्या..

" आई, तु शांत झोप... आपण लवकरच निघू जाण्यासाठी.." आजींच्या डोक्यावरून हात फिरवित निलेश म्हणाला.

" अजिबात नाही आई.. मी कुठेही जाऊ द्यायची नाही तुम्हाला.. तिकडे शहरात जाल आणि आणखी आजारी पडाल.. साहेब इकडं आम्ही आहोत त्यांची काळजी घ्यायला.." चेहरा रडवेला करत रखमा म्हणाली.

" रखमे, अगं किती जीव लावशील पोरी..? एक ना एक दिवस जावंच लागेल मला.. नको अडवूस.." म्हणत आजींनी डोळे मिटले आणि निद्राधीन झाल्या..

" तुम्ही, नका काळजी करू.. आईला झोपू दे शांत.. मी निघतो.." आजी झोपल्याची खात्री पटल्यावर निलेश खोलीबाहेर पडत म्हणाला..

रखमाला हायसे वाटले.. इकडे निलेश निघून गेला..

संध्याकाळचे पाच वाजले.. तरी आजी कश्या उठल्या नाही म्हणून रखमा खोलीत पोहचली.. बऱ्याच साद घातल्या पण आजींचा प्रतिसाद आला नाही.. तशी रखमा घाबरली.. 

शरिराची हालचालही जाणवत नव्हती.. सदूने धावत जाऊन गावातील डॉक्टरांना बोलावले..

पण काहीच शिल्लक नव्हते.. आषाढी एकादशीच्या पावन दिवशी सुधाआजींनी स्वर्गात जाऊन विठ्ठलाची गळाभेट घेतली. 

रखमा आणि सदू ओक्साबोक्सी रडू लागले. गावकऱ्यांपैकी एकाने सदूला निलेशला कळवायला सांगितले..
त्यानेही अश्रू आवरून निलेशला फोन लावला..

" साहेब, मी सदू.. साहेब आपल्या आई गेल्या.." फोनवर हंबरठा फोडत तो म्हणाला..

" काय..? कधी..?" निलेशने प्रतिउत्तर दिले.

" साहेब, तुम्ही गेले तेव्हा झोपल्या त्या उठल्याच नाहीत.. तुम्ही तातडीने मागे या.." डोळे टिपत तो म्हणाला.

" तु ठिकाणावर आहेस ना सदू.. अरे मी कधी आलो होतो..? मी तर ऑफिसमध्ये होतो.. आता मिटिंगमधून बाहेर पडलोय.. तु पण भ्रमिष्टासारखा वागू लागला आहेस.." म्हणत त्याने खात्रीसाठी एका एम्प्लॉईकडे फोन दिला..

आता मात्र सदू पूर्णपणे शहारला..

"मग दिवसभर आपल्या सोबत कोण होता..?" तो स्वगत झाला.

" हॅलो, सदू.. ऐकतोस ना.. अरे मी दुसऱ्या शहरात निघतोय एका महत्वाच्या डिलसाठी जायचे आहे.. मी गेलो नाही तर खूप मोठं नुकसान होईल माझं.. तु घे सगळ्या विधी आवरून.. आईला तु मुलासारखाच होतास.." म्हणत निलेशने फोन ठेवला..

त्याचे शब्द ऐकून सदू जाग्यावर खिळला..
"निदर्यी निलेश कधीच सुधारणार नाही.. कुठे फेडेल तो हे पाप...?" स्वगत होत तो रखमाजवळ गेला...

त्याने रखमाला घडलेली सारी हकिगत सांगितली.
" मलाही आज साहेब वेगळेच वाटले... भारावल्यागत झाल्या होत्या आई.. सारख्या साहेबांना हात जोडत होत्या.." म्हणत ती आजीच्या मृतदेहाजवळ पोहचली.. आणि पाहते तर काय निलेशने गळ्यात घातलेली चैन गळ्यात नव्हतीच.. तिचे रूपांतर तुळसी माळेत झाले होते..

ते पाहून दोघेही देवघराकडे वळले..नैवेद्याचं ताटही रिकामं झालं होतं..

दोघांच्या डोळ्यांत अश्रूधारा लागल्या.. त्यांनी विठुमाऊलीच्या मूर्तीसमोर हात जोडले.

ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून साक्षात विठ्ठल होती.. या जाणिवेने ते शहारले..

आजींची आर्जव आज विठ्ठलाने ऐकली होती.. स्वत: तिच्या मुलाच्या रुपात येऊन त्यांच्या आईपणाची भूक भागवली होती..

आजींचा त्याला औक्षण करण्याचा, हाताने जेवण बनविण्याचा आणि भरविण्याचा,त्याच्यासोबत जाण्याचा हट्ट आता रखमाला कळला होता..

प्रत्यक्ष पाडुरंगाने दर्शन दिले होते त्यांना.. आज पंढरीचा पांडुरंग लेकुरवाळा होऊन आजींना घेऊन गेला होता..

देव आणि भक्ताच्या भेटीचा नयनरम्य, हृदयस्पर्शी आणि भावातित सोहळा त्यांनी आज याची देही याची डोळा अनुभवला होता...

विठुमाऊलीच्या मूर्तीसमोर उभे राहून अजूनही ते दोघं भरल्या डोळ्यांत ते रुप साठवत होते....
भरून आलेल्या आभाळागत डोळ्यांतील अश्रू भावना बनून ओसंडून वाहत होते...


© आर्या पाटील

सदर कथा लेखिका आर्या पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने