तुझ्यामुळे अन तुझ्याचसाठी

© वर्षा पाचारणे.



स्वाती... आईविना वाढलेली लेक... पण बाबांनी कधीच आईची उणीव भासू दिली नव्हती... तिचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाले अन् तिने बँकेची परीक्षा दिली.

पहिल्या प्रयत्नातच तिला यश मिळालं अन् बँकेत चांगल्या पदावर तिची नियुक्ती झाली.. बाबांना देखील मुलीचा अभिमान वाटू लागला... तशी ती पहिल्यापासूनच समजूतदार, हुशार आणि आलेल्या प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेणारी मुलगी होती.

बँकेतील नोकरी आणि दिसायला सुंदर, नाजूक बांधा अशी स्वाती... आता कुणाही नातेवाईकांच्या लग्नकार्यात गेली की उठून दिसायची... अशातच पुण्यातील एका शाळेत ग्रंथपाल पदावर कार्यरत असलेल्या मुलाचे स्थळ तिच्याकरता आले.

बघण्याचा कार्यक्रम झाला.. मुलगाही अगदी तिला साजेसा होता.. अगदी जेमतेम उंची, गोरापान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा स्वभाव... अतिशय निर्मळ मनाचा 'अखिल' सगळ्यांची मन सांभाळणारा मुलगा होता..

सप्तपदीच्या साथीने स्वाती आता अखिलच्या आयुष्याची जोडीदार झाली होती.. त्याच्या सहवासात प्रत्येक क्षण तिला सप्तरंगी वाटत होता... एखाद्या फुलपाखराप्रमाणे तिचं मन सोनेरी क्षणांवर बागडत होतं.

बँकेत रजा घेतली असल्याने लग्नानंतर त्यांनी हनिमुनसाठी शिमला मनालीला जायचे ठरवले.

शिमल्याची थंडी, भूरभूरणारा बर्फ आणि सोबतीला आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा जोडीदार... यापेक्षा स्वर्गसुख ते काय! 

हनिमूनवरून परत आल्यावर स्वातीची नोकरी पुन्हा सुरू झाली... अखिलही पुन्हा कामावर रुजू झाला... अवघ्या तीन महिन्यातच स्वातीला गोड बातमी समजली.. 

अखिल स्वातीची खूप काळजी घ्यायचा... स्वातीला आठवा महिना सुरू झाला. एक दिवस रात्री झोपेत अचानक छातीत दुखू लागलं.

त्याला ते असह्य झालं... त्याने स्वातीला झोपेतून उठवलं... अशा परिस्थितीत स्वाती एकटी असल्याने खूप घाबरली..

तिने तशीच गाडीची चावी घेतली आणि स्वतः त्याला आधार देत हळूहळू गाडीपर्यंत नेलं... अखिल गाडीत बसल्यावर स्वाती ड्रायव्हिंग सीटवर बसली.

गाडीत समोर ठेवलेल्या गणपती बाप्पा समोर हात जोडले आणि गाडी सुरू केली.. आज पहिल्यांदाच स्वाती एवढ्या वेगाने गाडी चालवत होती.. मनात धडधड वाढत होती.. गाडी चालवताना एक नजर सतत अखिलकडे होती... 

मघाशी खूप दुखत असल्याने कळवळत असलेला अखिल निपचित पडून होता.. कशीबशी ती सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचली.

अखिल हालचाल करत नाही हे बघून तिने धावत जाऊन रिसेप्शनिस्टला सांगितले... अखिलला स्ट्रेचरवरून आत नेलं. स्वाती हतबल होऊन सारं बघत होती. 

डॉक्टरांनी अखिलला तपासले आणि थोड्याच वेळात ते बाहेर आले.. स्वाती आशेने त्यांच्याकडे पाहत होती.. 

ती डॉक्टरांजवळ गेली आणि विचारले,"डॉक्टर, कसा आहे अखिल?" डॉक्टरांनी आजूबाजूला पाहिले आणि म्हणाले मॅडम तुमच्यासोबत आणखी कुणी आलं आहे का? 

स्वातीने 'नाही' अशी मान डोलावली... त्यांनी स्वातीला पाणी दिलं आणि एका बाकड्यावर बसवलं.. आणि म्हणाले,"हे बघा तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाला बोलावून घ्या".. स्वाती प्रेग्नंट असल्याने डॉक्टर तिच्यापासून काही लपवत आहेत असे तिला जाणवले.. 

तिने खूप विनवणी करूनही डॉक्टरांचे उत्तर ठाम होते की ,"तुम्ही कुणालातरी बोलावून घ्या".. शेवटी अखिलच्या अगदी जवळच्या मित्राला स्वातीने फोन केला.

रात्रीचे अडीच वाजलेले... स्वाती हॉस्पिटलमध्ये अखिलला घेऊन गेल्याचे कळताच ओम् (अखिलचा मित्र) आणि नीता हॉस्पिटलला पोहोचले. 

डॉक्टरांनी ओमला सांगितले, "जेव्हा पेशंट दवाखान्यात दाखल झाला त्याआधीच त्याचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.. पण त्यांच्या पत्नी एकट्याच असल्याने मी त्यांना हे लगेच सांगितलं नाही.. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना समजवा.. 

ओम् आणि नीताने कसंबसं स्वातीला ही बातमी सांगितली.. पण स्वातीला तो धक्का इतका जबरदस्त होता की तिने तोंडातून एकही शब्द म्हणून काढला नाही. ती एकटक बघत राहिली. 

नीता आणि ओम् तिला सावरण्याचा प्रयत्न करत होते, पण शेवटी कितीही समजावले तरी अखिल कायमचं जग सोडून गेलाय हे तिच्या मनाला खरं वाटत नव्हतं..

लग्नाला एक वर्षही पूर्ण झालं नव्हतं... अख्खं आयुष्य आ वासून उभं होतं. आयुष्य जणू ३६० अंशात पूर्ण फिरलं होतं. नववा महिना सुरू झाला आणि त्याच दिवशी स्वातीला कळा सुरू झाल्या.

 डोळ्यातून पाणी थांबता थांबत नव्हते... किती स्वप्न बघितली होती तिने आणि अखिलने बाळाची.

अखिल कायम म्हणायचा तिला,"तुला आई नसली म्हणून काय झालं, मी तुझ्या आईपेक्षाही जास्त काळजी घेईल तुझी डिलिव्हरीच्या वेळी"... बाळाचे रात्री लंगोट मीच बदलणार, तू निवांत झोपत जा... बाळासाठी सगळं त्याचा बाबाच करणार".... त्याची एक एक वाक्य आठवून तिला हुंदके अनावर होत होते.. 

पण नीता एखाद्या सख्ख्या बहिणीसारखी तिच्या सोबत होती... पहाटे पाचच्या सुमारास स्वातीने एका गोंडस मुलाला जन्म दिला...

अखिलने ठरवल्याप्रमाणे स्वातीने बाळाचे नाव 'ध्रुव 'असे ठेवले.. आज एवढ्या मोठ्या बंगल्यात फक्त बाळ आणि स्वातीच होती.

आजकाल फ्लॅट संस्कृती असल्याने मुलांना खेळायला अंगण असा प्रकार राहिलेल नाही... त्यामुळे भविष्याचा विचार करून अखिलने एका कॉलनी परिसरात शांत ठिकाणी जागा घेऊन बंगला बांधला होता... पण सगळं अनुभवण्यासाठी आता अखिलच राहिला नव्हता... 

सगळ्या गोष्टी फक्त गोष्टीचं राहिल्या होत्या... स्वाती बँकेत असल्याने तिला भविष्यात आर्थिक अडचण येणार नव्हती, पण आता बाळाची जबाबदारी होती. 

तिने ध्रुव तीन महिन्याचा झाल्यावर पुन्हा बँकेत रुजू होण्याचा निर्णय घेतला... तिला सासू सासरे नव्हते.. त्यात स्वातीला देखील आई नसल्याने बाळाला सांभाळण्यासाठी बाई माणूस कुणीच नव्हतं.. 

बरं आधीच पदरी एवढं दुःख आणि त्यात बाळाला देखील पाळणाघरात ठेवणं स्वातीला शक्य होत नव्हतं..

एक दिवस स्वातीला आणि बाळाला भेटायला अखिलची लांबच्या नात्यातील आत्या आली.... आत्या स्वातीला भेटून दुसऱ्याच दिवशी निघणार होती.

स्वातीच्याही रजेतील दोन चार दिवस शिल्लक राहिले होते.. स्वाती आणि आत्याने एकमेकींना खरं तर पहिल्यांदाच पाहिलं होतं.. तरीही एकमेकींशी बोलताना जणू खूप वर्षांची ओळख असल्यासारखं वाटलं त्यांना.. 

ध्रुव फक्त २ महिन्यांचा होता पण त्याला देखील आपल्या या आत्या आज्जीच्या मांडीवर अगदी उबदार, छान वाटत असावं... कारण रोज सतत रडणारा ध्रुव आज फक्त दूध पिण्यापूरता स्वातीकडे आला होता..

 दिवसभर तो आत्त्या आज्जी कडेच रमला होता.. स्वातीला पण आज पहिल्यांदाच अखिलच्या आठवणी कुणाबरोबर तरी शेअर करता आल्या.. मनात साठलेला दुःखाचा कुठेतरी निचरा होत होता.. आत्या पण तिच्या डोक्यावर मायेनं हात फिरवत होती..

दोन दिवस राहून शेवटी आत्या तिच्या घरी परत जायला निघाली... ध्रुव झोपलेला होता.. आत्या निघणार इतक्यात तो दचकून जागा झाला आणि रडू लागला.. आत्या म्हणाल्या, "पोरी जा घे तू त्याला, मी निघते."... असं म्हणून आत्यांनी पदराने डोळे पुसले आणि निघाल्या... 

स्वातीने आत येऊन ध्रुवला दूध पाजले, खुळखुळा वाजवून पाहिला, गाणी म्हणून बघितली पण छे..... ध्रुव रडायचे थांबेना... शेवटी स्वातीच्या मनात आले, ध्रुवला सांभाळायला आत्या थांबल्या असत्या तर... 

तितक्यात दारावरची बेल वाजली... समोर आत्या उभ्या होत्या... त्यांनी स्वातीला सांगितले," स्वाती स्टेशनवर गेले तर गाडी निघून गेली होती, म्हणून परत आले.. उद्या पहाटेच्या गाडीने जाईन"... 

त्यांना पाहताच कसा कोण जाणे पण मघापासून तास दीड तास रडणारा ध्रुव शांत झाला... आत्या आज्जीने नुसते मांडीवर काय घेतले, हा लबाड खुदकन हसला..

कदाचित माणसाला न बोलताही कसा जीव लावावा हे कसब त्यानंतर स्वातीने त्याच्याकडूनच शिकले असावे.. त्या आज्जी नातवाकडे कौतुकाने बघत स्वाती म्हणाली, तुझी आत्या आज्जी आता कुठेच जाणार नाही हाssss... आपल्याकडेच राहणार कायमची... 

आत्या देखील दापोलीला एकटीच राहत असल्याने तिला स्वातीच्या बोलण्याने भरून आलं.. आता त्या दोघीच एकमेकींचा सहारा बनू पाहत होत्या... आणि त्या दोघींच्याही जगण्यातला एकमेव आनंद म्हणजे ध्रुव....

स्वाती आज जवळपास सहा महिन्यांनी कामावर रुजू होणार होती.. मनात खूप प्रश्न होते.. विचारांच काहूर माजलं होतं... ध्रुव आपल्याशिवाय इतका वेळ राहिल का? तो आत्यांना त्रास देईल का? दिवसभर रडत राहिल का? अंगावरच्या दुधाची सवय असलेलं आपलं बाळ वरचं दूध सहज पचवेल का?...एक ना अनेक प्रश्न होते..

मन सैरभैर झालं होतं.. सकाळी लवकर उठून तिने सारी काम आवरली.. स्वयंपाक, झाडलोट, कपडे सारं सारं काही तिने झटपट आवरलं.. रोज कामं करताना दहावेळा रडारड करणारा ध्रुव आज आज्जीच्या मांडीवर गाढ झोपला होता.. आत्या आज्जी पण स्वातीचे चपळपणे सुरू असलेलं काम पाहून तिचं मनोमन कौतुक करत होती..

स्वातीने झोपलेल्या ध्रुवला लांबूनच पाहिलं.. आणि अखिलच्या फोटोला नमस्कार करून, डोळे पुसत ती घराबाहेर पडली.. 

बँकेत कामात दिवस जात होता, पण म्हणतात ना 'घार हिंडते आकाशी तिचे लक्ष पिलापाशी'.. तशी तिची अवस्था होती.. ती दर तासाला फोन करून आत्याला विचारायची ," आत्या, ध्रुव रडत नाही ना, झोपतो ना, खेळतो ना?... वगैरे वगैरे.. पण कदाचित अखिल आणि स्वातीच्या रक्तातला समजूतदारपणाचा गुण ध्रुवने जन्मतःच घेतला असावा.. तो निवांत असायचा आत्या आज्जीबरोबर.

स्वाती आता थोडी सावरली होती.. बँकेत पण आता पुन्हा पहिल्यासारखी स्थिरावली होती.. ती आत्यामुळे निर्धास्त होती.

ध्रुव आता शाळेत जाऊ लागला.. पालक सभेला जाताना तिला थोडी भिती असायची की ,'इतरांचे बाबा बघून कदाचित ध्रुव विचारेल, की आई मला का बाबा नाहीत? म्हणून ती त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करायची.. आणि एक दिवस हीच भिती तिने आत्यांकडे बोलून दाखवली.

तितक्यात तिथे ध्रुव आला आणि त्याच्या इवल्या इवल्याशा हातांनी त्याने स्वातीचे डोळे पुसले आणि म्हणाला," आई रडू नकोस, आपले बाबा खूप चांगले होते आणि देव बाप्पाला चांगली माणसं आवडतात म्हणून तो बाबांना घेऊन गेला ना," मला आज्जीने सांगितलं... त्याचं बोलणं ऐकून स्वातीला त्याच्यात अगदी अखिलचा भास झाला... एखाद्या मोठ्या माणसाप्रमाणे त्याने आईचे डोळे पुसले..

त्यानंतरही आयुष्यात जेव्हा जेव्हा स्वाती दुःखी असायची तेव्हा तेव्हा तिच्या लेकाने तिला प्रत्येक वेळी आधार दिला.... 'आपल्याकडे जे नाही त्याचं सतत दुःख करण्यापेक्षा, जे आहे त्यात आनंद शोधणं' स्वाती ध्रुव कडून शिकली.. 

आज ध्रुवने M.Tech. पूर्ण केले आणि एका नामांकित कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे.. बंगला, गाडी, पैसा सगळं काही आहे... स्वातीने बँकेची नोकरी करून त्याला उत्तम शिक्षण दिले... त्याच बरोबर उत्तम संस्कार केले.. काही महिन्यांपूर्वी स्वाती रिटायर झाली..

ध्रुवने तिच्यासाठी सरप्राइज पार्टी ठेवली... लहान वयातच त्याला जबाबदारीची जाणीव होती. 

स्वातीने एका सुसंस्कृत कुटुंबातील मुलगी पाहून ध्रुवचे लग्न केले. आज म्हातारपणात ध्रुव आणि त्याची बायको आई आणि आत्या आजीची मनापासून सेवा करतात...

मागे वळून पाहताना स्वातीला एक जाणवले की, आपण अखिलला गमावलं, पण अखिलचा अंश आज ध्रुवच्या रूपाने आपल्या सोबत आहे... ज्याच्यामुळे ती आज एक आनंदी आयुष्य जगते आहे.

तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले... "बाळा जगणं शिकले ते तुझ्यामुळेच आणि आज जगतीये तेही तुझ्यासाठीच"....


ही एक सत्य कथा आहे.. केवळ पात्रांच्या नावात बदल केले आहेत... स्वाती आणि ध्रुवच्या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात घ्यावी की कधी कधी मुलं आपल्याला इतकं काही शिकवून जातात, जे आपल्याला आयुष्यभर पुरेल इतकं असतं.. समजूतदारपणाच बीज मुळात पेरल गेल्यानं आज ध्रुवच्या रूपाने घरात आनंद होता.

© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने