वलय


धनश्री दाबके





वरुण तयार होऊन हॉलमध्ये आला तर नीता आरामात सोफ्यावर पेपर वाचत बसली होती. तिला निवांतपणे बसलेले पाहून वरुणला समजले म्हणजे आजही ही ऑफिसला जाणार नाही तर. 

आजचा सलग चौथा दिवस होता नीताने सुट्टी घेतली होती. 

पण आज वरुणने तिला काही विचारले नाही कारण काल त्याने विचारल्यावर नीता चिडली होती. 

'मला कंटाळा येऊ शकत नाही का ? मी ब्रेक घेतलेला चालत नाही का? मीही माणूसच आहे ना. नाही जाणार मी आज पण ऑफिसला.' असं तिने वैतागून वरुणला सांगितलं होतं आणि संध्याकाळी वरुण घरी आला तरी नीता  रागातच होती. त्याने तसं विचारल्यावर काहीतरी थातुरमातुर उत्तर देऊन तिने तो विषय बदलला होता. 

त्यामुळे आज काही न विचारताच नीताला 'येतो ग' म्हणत दार उघडून वरुण ऑफिसला जायला निघाला. 

पण आज नीताने स्वत:हूनच सांगितले " हा आठवडा जरा आराम करणारे मी. स्वतःसाठी वेळ देणारे. मुलांनाही तेवढच बरं वाटेल आणि मलाही थोडा चेंज हवाय."

बरं म्हणून वरुण बाहेर पडला पण नीताचा हा ब्रेक ती सांगतीये इतका सहज सोपा नाही हे नक्की. 

इतर वेळी मुलांच्या परीक्षांसाठी आणि आजारपणात रजा लागतात म्हणून कारणाशिवाय कधीही सुट्टी न घेणारी नीता आता पूर्ण आठवडा घरी आहे. 

सतत ऑफिसच्या कामांच्या विचारात बुडालेली, कधी कुठे बाहेर गेल्यावरही emails चेक करणारी, आपल्या जबाबदाऱ्यांमधे पूर्णपणे गुंतलेली नीता अशी निवांत बसणे शक्यच नाही. तिचे काहीतरी नक्कीच बिनसले आहे. आज तिच्या कलाने घेऊन तिला विचारलं पाहिजे. 

इतर वेळी ऑफिसमधली प्रत्येक गोष्ट मला सांगणारी नीता हल्ली मात्र उत्साहाने फारसं काही सांगत नाही. हे खरं माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं. 

पण हल्ली माझ्याच कामाचा ताण इतका वाढलाय की ती घरी बसली तेव्हा तिचं काहीतरी बिनसलं आहे ते मला जाणवलं. आता आज संध्याकाळी ती कितीही वैतागली तरी न भांडता तिच्याशी बोलून तिच्या मनातलं काढून घ्यायलाच हवं असं मनाशी ठरवूनच वरुण शांत झाला आणि कामाला लागला.

संध्याकाळी वरुण घरी आल्यावर नीताने त्याला दोन तीन दिवस आईकडे जाऊन येऊ का म्हणून विचारले.

"मुलांनाही चेंज मिळेल आणि आईही नेहमी बोलवत असते पण मला माझ्या व्यापांमुळे जायला जमतच नाही. आता वेळ आहे तर जरा जाऊन येते" नीता म्हणाली.

वरुणने विचार केला ठीक आहे तेवढेच तिला बरे वाटेल. त्यामुळे "चालेल ये जाऊन,  मी करेन मॅनेज" म्हणत त्याने हो म्हंटले.

नीताचे माहेर अडीच तीन तासांच्या अंतरावर होते. 

दुसऱ्या दिवशी दुपारी मुलांच्या शाळा आटोपून नीता निघाली आणि संध्याकाळी माहेरी पोचली सुद्धा. 

अचानक आलेल्या नीता आणि नातवंडाना पाहून आजी आजोबा एकदम खुश झाले. 

वरवर सगळं ठीक दिसत असलं तरी नीताच्या मनात काहीतरी खदखदतंय हे आईने लगेच ओळखलं. 

तसंही हा आठवडा नीताने सुट्टी काढलीये ते आईला तिच्या रोजच्या फोनवरच्या बोलण्यामुळे माहिती होतंच. काहीही कारण नसताना नीताने इतकी सुट्टी घेतलीये याचं आईलाही आश्चर्य वाटतच होतं.

त्यामुळे जेवणखाण झाल्यावर झोपायच्या आधी आईने विचारले " कसं चाललय तुझं ऑफिस? आज आल्यापासून एकदाही फोन , emails काही चेक नाही केलंस ते? 

सध्या काम थोडं कमी दिसतंय. बरं वाटतय तुला असं मोकळं बघून. नाहीतर सतत त्या ऑफिसच्या विचारांत अडकलेली असतेस. 

म्हणजे मला बरंच वाटणार पण तुला आवडतोय का तुझा हा निवांतपणा?"

आईने विचारल्यावर नीताला वाटले किती अचूक ओळखते आई मला. तिला काहीही न सांगताच समजतं सगळं मनातलं. 

नीता म्हणाली " करणाऱ्यासाठी काम कुठे ग कधी कमी होतं? ते चालूच असतं कायम. आणि आपणही सगळं आपलं आपलं करत झटत रहातो. पण त्याचा काही उपयोग होत नाही. 

गेली दहा वर्ष ह्या QC डिपार्टमेंटमधे आहे मी. सध्या इथली सगळ्यात जुनी आणि सगळ्या प्रोसेसेसची खडान खडा माहिती असणारी जाणती. 

माझ्या प्रत्येक कलीगला गाईड करणारी. डिपार्टमेंटच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी मॅनेज करणारी. मला आमच्या इथली प्रॉब्लेम सॉल्वर म्हणतात सगळे लोक आणि मीही इतकी वर्ष स्वतःला झोकून देउन कामं करत आले. 

मुलाला सांभाळावं तसं हे डिपार्टमेंट सांभाळलं, इंप्रुव्ह केलं. पण आता ती अनुजा आली आणि माझी गरज संपली. म्हणजे ती आहे हुशार पण अनुभवी नाही ना. 

पण आता माझे बॉसही म्हणायला लागले कि आता मला तुझ्यासाठी बॅकअप मिळाला. तू आता निवांत सुट्टी घेऊ शकशील. 

सगळे हाताखालचेही अनुजा अनुजा करतात. मी असले काय आणि नसले काय कोणाचेच आता काही अडत नाही. मग घेतली मी पण सुट्टी. 

वेळी अवेळी कॉल्स घेणं , emails ना रीप्लाय देणं हे सगळं बंद करुन टाकलंय मी ह्यावेळी. आता कळेल त्यांना माझी किंमत"

आता नीताच्या मनात काय चाललंय ते आईला कळले. तिच्यावाचून कोणाचे काही अडत नाहीये हे तिला खुपतय. आपल्या कर्तृत्वाचे वलय आता कमी होतंय ह्या विचाराने तिला त्रास होतोय. 

नवी सून घरात आल्यावर सासूला जशी एक प्रकारची असुरक्षितता वाटत असते तसाच काहीसा हा प्रकार होतोय. आणि सध्या ही असुरक्षितता इतकी प्रबळ आहे की तिचे मन तिला मिळणाऱ्या महत्वाकडे, कौतुकाकडे धावतंय. 

आई अगदी सहज म्हणाली " अगं इतकच ना. मग बरंय ना तुला चांगली capable टीम मेंबर मिळाली. तिच्यावर थोड्या जबाबदाऱ्या टाकून तू अजून पुढचा विचार कर. 

अजून पुढे घेऊन जा डिपार्टमेंटला आणि स्वतःलाही. अगं माणसाच्या मनाची हीच गम्मत असते बघ जी बहिणाबाईंनी किती सहजपणे अचूक शब्दांत मांडलीये.

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर ।

किती हांकला हांकला, फिरी येतं पिकांवर ।।

ज्याप्रमाणे कितीही हुसकावलं तरी त्या पीकातल्या ढोराला दाणेदार कणसं खुणावतात तसचं आपल्या मनाला कौतुकाचे वलय नेहमीच खुणावत असते. 

अग जिथे तो भगवंतही भक्तीचा भुकेला असतो तिथे तुझी माझी काय गत? लोकांनी दिलेला मान, आपण इथे कोणीतरी महत्त्वाचे आहोत ही भावना आपल्याला खुप काही देते. 

पण त्याच बरोबर आपण जिथे मोठे असतो तिथे आपल्यावर आपला सक्सेसर तयार करायची जबाबदारीही येते. 

तेव्हा आपल्या हातातून काहीतरी निसटून जातय ह्या विचाराला मनातून हुसकावून बाहेर काढ आणि अजुन पुढे जाण्यावर मन केंद्रीत कर. 

आपली हुशारी, मेहेनत आणि कामगिरी कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तेव्हा निश्चिंत आणि आनंदी रहा."

नीताला आईचे बोलणे ऐकून एकदम शांत आणि प्रसन्न वाटलं. 

"आई खरंच ग, माझ्या मनातल्या मोहाच्या विचारांना किती योग्य दिशा दिलीस तू. कधीच नोकरी न करताही तू इतक छान समजावलेस मला. जीवनाचे सार सहजपणे सांगणाऱ्या बहिणाबाईं सारखं. 

माझ्यासाठी तूच माझी बहिणाबाई आहेस ग आई.

मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर ।

आरे इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।

माझ्या मनातल्या असुरक्षिततेच्या विषाला तू खूप छान उतारा दिलास ग. मनातली सगळी नकारात्मकता पळवून लावलीस माते. तुला शतश: प्रणाम" असं म्हणत नीताने आईसमोर कमरेत वाकून हात जोडले.

आईच्या समजवण्यामुळे नीता आनंदात  दोन तीन दिवस माहेरी राहून घरी आली आणि सोमवार पासून परत रोजच्या सारखी उत्साहाने ऑफिसला जाऊन कामाला लागली.


© धनश्री दाबके

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने