आणि दुःख जिंकलं

© वर्षा पाचारणे



"खोली नंबर 13"... सगळं संपलं आता"...

इतका वेळ कोंडलेले अश्रू पूर बनून वाहू लागले... का वागलो इतकं निष्ठूर आपण?... नक्की कश्यासाठी?"...

मान अपमानाचं ओझं आता कळून काहीच उपयोग नव्हता...... बाकीचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी काही तासांचा अवधी होता.

 तो आता सरकारी हॉस्पिटल मधल्या कोपऱ्यातील बाकड्यावर बसून प्रेतासारखा थंड पडला होता... आजूबाजूला खूप गोंधळ असूनही तो मात्र बधिरल्या सारखा सुन्न झाला होता. 

आठवणींचे चटके आणखी दाहक होत होते... खोली नंबर १३ च्या बंद दाराकडे पाहून तो भूतकाळात हरवला...


जेमतेम २२-२३ वर्षांचा असेल रोहन... आई आणि आप्पांनी रोहनला उत्तम शिक्षण मिळावं, यासाठी खूप कष्ट सोसले होते...

 'आपण केलेल्या कष्टांची सतत बोलून उजळणी करायला', खरं तर त्यांना कधीच आवडलं नाही... आप्पा सेल्समनची नोकरी करून मिळेल त्या तुटपुंज्या पगारात घरखर्च, रोहन आणि धाकट्या आदितीचं शिक्षण, म्हाताऱ्या आईचं औषध पाणी, सारं काही कसंबसं भागवत होते. 

रोहन शिकून सवरून नोकरीला लागला... नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी त्रास आणि खर्च दोन्हीही जास्त होत असल्याने दोन तीन मित्रांनी मिळून एक खोली भाड्याने घेतली.

पण नोकरी लागताच त्याने स्वत:ची पैशांची बचत करायला सुरुवात केली. सुरवातीला दोन तीन महिने घरी थोडे पैसे पाठवून मग मात्र 'आपलाच खर्च शहरात भागत नाही', असे कारण त्याने पुढे केले. 

इकडे घरी वडिलांना थोडा हातभार लावावा, हा विचारही त्याच्या मनाला शिवत नव्हता. सणासुदीला फक्त त्याची गावी फेरी होत होती. 

'आई आप्पा आपण निवडलेल्या मुलीला नकारच देतील', असे स्वतः च गृहीत धरून त्याने आई आप्पांच्या परवानगी शिवायच रजिस्टर पद्धतीने लग्न उरकले.

लग्नाला महिना झाल्यानंतर एक दिवस फोनवर त्याने लग्न केल्याची बातमी देताच आईला मोठा धक्का बसला... 'पोटच्या मुलाने आपली पसंती सोडाच, पण एकदा विचारण्याचे कष्ट देखील घेतले नाहीत', या विचाराने ती खचली होती.. आप्पांनी फोनवर दोन चार कडक शब्द ऐकवताच रोहन मात्र त्यांना उलट उत्तरं देऊ लागला.

"अरे, किमान लग्न ठरवलंस तर सांगावसं नाही वाटलं तुला?"... "आई बाप आहोत तुझे... चार पैसे कमवायला लागला म्हणून शिंग फुटली का?.. इकडे आई बाप जिवंत आहेत का मेलेत याची पण तुला फिकीर नाही"....

"आप्पा, मला वाटलंच होतं तुम्ही असं बोलणार"... "मला वाटलं, तुम्ही मोठ्या मनाने आम्हा दोघांना भेटायला बोलवालं... आमची चूक पदरात घालाल... पण छे!"...

आता मात्र आप्पांचा देखील पारा चढला. आप्पांनी चांगल्याच दोन-चार शिव्या हासडल्या. आधीच आर्थिक चणचण, त्यात मुलगी लग्नाला आलेली असताना लेकाने असं लपून-छपून केलेलं लग्न, म्हातारी आई आणि आता आजारांनी ग्रासलेली बायको.

आप्पांचा जीव हे सगळं सहन करता करता मेटाकुटीला आला होता आणि तोच राग आज रोहनच्या अशा उर्मट पद्धतीने बोलण्यामुळे बाहेर पडला.

"अरे, आजवर आम्ही तुला पोसलं ते आमचं कर्तव्यच होतं... पण त्या कर्तव्याच्या बदल्यात आम्हाला असं उलटी उत्तरं ऐकायला मिळतील, हे वाटलं नव्हतं"...

फोनवरच्या या संभाषणात शब्दाने शब्द वाढत गेला.. शेवटी रोहनने रागारागाने फोन ठेवत आप्पांना सुनावलं, "यापुढेही मलाही तुमच्याशी बोलण्याची काडीमात्र इच्छा नाही"

आधी आठवड्याभरात येणारा एखादा फोनंही या संभाषणानंतर कायमचा बंद झाला... आई देखील मनात तीळतीळ तुटत असली तरीही आपल्या लेकाने वडिलांचा असा अपमान केलेला तिला सहन होत नव्हता...


आईच्या सांधेदुखीचं दुखणं बळावत होतं... उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांनीही तिची पाठ सोडली नव्हती. गावातील सरकारी दवाखान्याची दर आठ दिवसांनी फेरी ठरलेली.

त्यात आप्पांची आई जवळपास ऐंशीच्या घरात असल्याने तीही अंथरुणाला खिळलेली... कामाची सगळी जबाबदारी आता आदितीवर आणि खर्चाची आप्पांवर.

आजारांमुळे संपूर्ण घरालाच मरगळ आली होती. मुलाने झटकलेली जबाबदारी पाहून आईची चिडचिड होत होती..

आजही आई तापाने फणफणत होती... लेकाचा फक्त आठवड्यातून एकदा ऐकायला मिळणारा आवाज आजही ऐकण्यासाठी ती आतुर झाली होती.

आदिती तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती.. पण आईच्या मनातली चिडचिड उष्ण अश्रुंच्या रूपात बाहेर पडत होती... तापामध्ये सतत रोहनच्या नावाचा धोसरा लागला होता.

इकडे रोहन मात्र त्याच्या सुखी संसारात रमला होता जन्मभराचं वैर घेतल्यासारखा आई बापाकडे ढुंकूनही पाहत नव्हता.

अध्येमध्ये आदिती त्याला आई वडिलांच्या नकळत चोरून लपून फोन करायची, पण तिच्याबरोबरही तो जेवढ्यास तेवढंच बोलायचा.

या साऱ्या त्रासदायक परिस्थितीमुळे आता आईदेखील अंथरुणाला खिळली होती. नाही म्हटलं तरी आईचं मन होतं तिचं... लेकरासाठी काळीज तुटणारच... तिचं असं तळमळत जगणं आदितीला बघवत नव्हतं..

"दादा, अरे आईने सतत तुझ्या नावाचा धोसरा घेतला आहे".. "सोड हा अबोला आणि ये रे एकदा तिला भेटायला"... "हवं तर घरी नको येऊ".... "तिला आज सकाळी सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे, किमान तिथे तरी भेटून जा"...

या आणि अशा पद्धतीचे फोन अनेकदा करूनही रोहनने मात्र त्याचा आडमुठेपणा काही केल्या सोडला नाही.

 त्यानंतर आई जवळपास दर आठ दिवसांनी डिस्चार्ज मिळवून पुन्हा पुढच्या पंधरा दिवसात हॉस्पिटलमध्ये तब्येतीच्या तक्रारीने ऍडमिट झालेली असायची.

'आदिती देखील आपल्याला हॉस्पिटलची बिलं भरण्यासाठी फोन करत असावी', या विचाराने आज-काल रोहनने तिच्याशी देखील फोनवर बोलणे टाळले होते.

खरं पाहता त्याने कधीही घरी पैसे दिले नव्हते, की कुठल्याही प्रकारची बिलं भरली नव्हती.... अन् जबाबदारीही अगदी सोयीस्कररित्या नाकारली होती..

आज रात्री मस्त पैकी जेवणावर ताव मारून शतपावली करत असताना रोहनला आदितीचा फोन आला. फोन उचलू का नको?, या विचारात असताना त्याने अगदी जीवावर आल्यासारखा तो फोन घेतला...


"हा बोल काय झालं आता पुन्हा?"... "आणि पुन्हा, आईला भेटायला ये, राग सोडून दे, असले सल्ले देणार असशील, तर आत्ताच फोन ठेव", असं म्हणत जवळपास आदितीला दम दिला.. पलीकडून आदिती हमसून हमसून रडू लागली.


"दादा, आता डॉक्टरांनी जवळच्या नातेवाईकांना बोलावून घ्यायला सांगितले आहे.. आईची तब्येत खूप गंभीर आहे", असं म्हणून तिने रडत रडत फोन ठेवला...

आता मात्र रोहन मटकन खाली बसला.. सगळं बालपण एका क्षणात डोळ्यासमोरून झर्रकन गेलं.

 'आई शेवटचे क्षण जगते आहे', या विचारानेच त्याच्या काळजात धस्स झालं... त्याने रात्रीच गावी जायचं ठरवलं... रात्रीचा प्रवास करून रोहन पहाटे हॉस्पिटलमध्ये पोहोचला. 

लांबूनच हॉस्पिटलच्या गेट जवळ आप्पा दिसल्याने त्याला काहीच सुचेना. तो दबक्या पावलांनी आतमध्ये जाऊ लागला. 

आप्पांचे लक्ष दुसरीकडे असल्याने पटकन आईला जाऊन भेटावे, अशा विचारात असतानाच नर्सने त्याला विचारलं,
"कोणाला भेटायचं आहे तुम्हाला?"...

आईचं नाव गहिवरलेल्या स्वरात उच्चारताना रोहनचे डोळे गच्च पाणावले होते. तितक्यात आईचं नाव ऐकून आप्पा तिथे आले.

"तुम्हाला उशीर झाला यायला.... तुम्ही आता त्यांना शेवटचं पाहू शकता.. खोली नंबर १३ मध्ये जा"... असं म्हणत नर्सने १३ नंबरच्या खोलीकडे बोट दाखवलं.

शेवटचं? .... का सिस्टर?... असं विचारत रोहनच्या अंगाचा थरकाप होऊ लागला...

"अहो, शेवटी शरीर आहे ते... मृत्यूशी झुंज देऊन किती दिवस लढणार?"... "महिना भर ती माऊली आयसीयूमध्ये तळमळत पडली होती. सारखी रोहन, रोहन असे म्हणत होती. अगदी आज पहाटेपर्यंत जीव जायच्या क्षणी देखील रोहन हाच शेवटचा शब्द त्या माऊलीच्या मुखातून बाहेर पडला. पण आजकालची पोरं आई बापाला असं दुःख देऊन काय मिळवतात त्यांचं त्यांनाच माहीत?"... एवढं बोलून ती नर्स तिच्या कामाला निघून गेली. 

रोहन मागे फिरत आप्पांकडे वळला.

म्हणजे महिनाभर आई?.... असं म्हणत हमसून हमसून रडू लागला. 

आप्पांचे अश्रु मात्र आटले होते. जीवघेण्या आजारांशी अशी लढत देण्यापेक्षा किमान आई या वेदनांपासून सुटली हा भाव त्यांच्या सुन्न चेहऱ्यामागे स्पष्ट दिसत होता. 

तितक्यात शेजारचा सखाराम आप्पांकडे आला.

"आप्पा, हे घ्या... तुम्ही दिलेले काकूंचे दागिने सोनाराकडे जाऊन मोडून आलो. पण ते मंगळसूत्र मात्र मोडायची माझी हिम्मत झाली नाही. कारण आयुष्यभर मानाने जगलेल्या काकू त्यांच्या मंगळसूत्राच्या मानासाठी मात्र आयुष्यभर झगडल्या.

आपल्या मृत्यूनंतरही कोणाकडून एक कवडी घ्यायला लागू नये, यासाठी त्यांनी स्वतःच्या हाताने सगळे दागिने तुमच्याकडे सोपवताना मंगळसूत्र मात्र तुमच्याकडे जपून ठेवायला दिला होतं.

काका पैसे कमी पडत असतील, तर मी देतो... पण त्या माऊलीचं हे मंगळसूत्र तुमच्या जीवात जीव असेपर्यंत जपून ठेवा"... एवढं बोलून गहिवरलेला सखाराम सोनं मोडून आलेले पैसे आणि ते मंगळसूत्र आप्पांकडे सुपूर्त करून अश्रू पुसत हॉस्पिटलबाहेर पडला.

'इतकी वर्षं पैशासाठी आणि नसत्या मान अपमानाच्या अहंकारापोटी आपण काय गमावून बसलोय?', याची जाणीव रोहनला आज वेळ निघून गेल्यानंतर झाली होती... खोली नंबर १३ च्या बाहेर आदिती आणि आप्पा एकमेकांच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडत होते...

हॉस्पिटलच्या बाकड्यावर कोपऱ्यात बसून आज कितीही आठवणी दाटून आल्या तरी आईचा गेलेला जीव मात्र परत येणार नव्हता. 

अंत्यसंस्कारांसाठी स्मशानात पोहोचलेल्या आईच्या मृतदेहाकडे पाहताना आज तिला बिलगुन हंबरडा फोडण्याचाही अधिकार आज त्याने स्वतःच्या हाताने गमावला होता. '

आपण आयुष्यात किती मोठी चूक केली आहे', याची सल रोहनला आयुष्यभर टोचत राहिली.

माणूस हयात नसताना त्याच्या नावाने गळे काढण्यापेक्षा जीवात जीव असे पर्यंतच जीव लावणं किती गरजेचं असतं, हे आता समजून कितीही पश्चाताप झाला तरीही आईची हाक, आईचा स्पर्श आयुष्यात पुन्हा कधीही मिळणार नव्हता.

आयुष्यातल्या दुःखद आठवणीतली सगळ्यात दुःखदायक अशी त्या तेरा नंबरच्या खोलीबाहेरची आठवण त्याला आयुष्यभर छळत राहिली. 

अहंकार आणि प्रेमाच्या लढाईत जिंकलं मात्र दुःख.

© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने