लेकीच्या जातीला मनाची बंधने

© सौ. प्राजक्ता पाटील



"अगं काय हे ? किती उशीर ? संध्याकाळी सात वाजता परत येतो म्हणालात म्हणून मी पार्टीला जायला परवानगी दिली आणि आता बघितलं का घड्याळात ? किती वाजलेत ? रात्रीचे पावणे बारा वाजलेत किती हा उशीर." आई दोन्ही मुलींना रागे भरत म्हणाली.


"अगं आई, शांत हो. किती चिडणार आहेस ? " नेहा म्हणाली.


"हो न आणि आम्ही मुद्दाम उशीर केला असं वाटतं का तुला?" नेत्रा म्हणाली.


"अगं , तू इतक्या उशिरा पार्टी आहे असं म्हटल्यावर पाठवणार नाहीस, म्हणून माझ्या मैत्रिणीने मुद्दाम पार्टी लवकर संपणार आहे हे सांगितल. आणि हे आम्हाला तिथे गेल्यावरच समजलं." आईचा राग शांत करत नेहा म्हणाली.


"दोन्ही वयात आलेल्या मुली सुरक्षित घरी येईपर्यंत जीव झुरणीला लागतो गं आईचा. म्हणून प्रश्न विचारते ती ? तुमच्या बाबाने तर देशसेवेत स्वतःला झोकून दिले म्हटल्यावर आईला तुमच्यावर लक्ष ठेवावं लागणार." आजी म्हणाली.

नेहा आणि नेत्रा अतिशय गुणी मुली होत्या. घरात चारही स्त्रियाच होत्या. 

नेहा आणि नेत्राचे वडील सैन्यदलात ऑफिसर होते. त्यामुळे त्यांना रजा काढून आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत वेळ घालवणे खूप दुर्मीळ गोष्ट होती. 

घरातील प्रत्येक व्यक्ती अगदी शिस्तीत वागत होती. नेहा आणि नेत्राची आई आणि आजी अगदी मायलेकीसारख्या राहत होत्या. बाबा नसले तरी आजी आणि आई यांच्या छत्रछायेखाली वाढलेल्या दोन्ही मुली सुसंस्कारी होत्या. 

पण मुली म्हटलं की रात्री उशीरा घरी आल्यावर आईच्या मनाला हुरहुर वाटणारच.

आज दोघी बहिणी मैत्रीणीच्या बर्थडे पार्टीला गेल्या होत्या. मुलींच्या काळजीने आई आणि आजीचा मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. त्या मुलींच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या. 

मनात विचारांचं काहूर माजलं होतं. एरवीही मुलींना शिस्त लावण्यात आई आणि आजी सतत अग्रेसर असायच्या.

"आजी , तु नेहमी आईच्याच बाजूने बोलते. कधीकधी मला प्रश्न पडतो की , तु माझ्या आईची सासु आहेस की आई ?" नेहा म्हणाली.

"हो न. सतत तुम्ही मुली आहात तर असं नका करू. तसं नका करू. आई आणि आजीचं ठरलेलं असतं." नेत्रा ही नेहा च्या सुरात सूर मिसळत म्हणाली.


"अगं नेहा ,आई आणि सासु वेगळया नसतात. फक्त दोन्ही घरच्या पद्धती वेगळ्या असतात. मग त्यात चुकल्यानंतर समजून सांगणे असो किंवा कौतुक करणे असो. 

दोन्ही घरातील सगळेच वेगळे असते, म्हणून होते प्रत्येक सुनेची तारेवरची कसरत. कधी कधी आई कडक शिस्तीची असली तरी सासु प्रेमळ भेटते. जशी तुझी आजी." नेहाची आई म्हणाली.


"अगं आई , मग आता तर तु मी सासरी गेल्यावर माझं कसं होणार? याची चिंता सोडूनच दे. मलाही नक्कीच आजीच्या कॅटेगरीतली एखादी प्रेमळ सासु मिळेल बघ. 

आई , तु काळजी आमची काळजी सोडूनच दे. " अस म्हणून आपल्या छोट्या बहिणीला नेत्राला नेहाने टाळी दिली आणि दोन्ही बहिणी मोठ्याने हसल्या.

आईच्या डोळ्यात मात्र पाणी आलं. आता वातावरण जरा गंभीर झालं. मुलींनी आईचे डोळे पुसत "सॉरी आई " म्हटलं पण आई इतकी का दुखावली ? हा प्रश्न अनुत्तरित राहिला.

"रात्र खूप झालीय. झोपा तुम्ही आता." म्हणून आई आपल्या खोलीत निघून गेली. 

मुलीच्या डोळ्यासमोरून आईचा रडवेला चेहरा जायचे नावच घेत नव्हता. पहाटे उठून सर्व कामे आटोपणारी आपली आई आज हॉलमध्ये दिसत नाही म्हणून मुलींनी घरात ,अंगणात शोधाशोध सुरू केली तेव्हा आजीकडून मुलींना समजले की आई  सगळी कामे आटोपून वरती आपल्या खोलीत जाऊन बसली आहे. 

क्षणाचाही विलंब न करता दोन्ही मुली आईच्या खोलीकडे गेल्या. मुलीनी काय झालंय आईला ? हे कारण विचारण्यासाठी आईच्या खोलीत प्रवेश केला.

 आई कोणाचा तरी फोटो घेऊन रडत होती. मुलींना पाहताच तिने तो फोटो लपवला. आई आम्हाला नाही का दाखवायचा तो फोटो ? नाही पहायचाय आम्हालाही. पण तु रात्री का रडलीस ? ते फक्त सांग.

आईच्या पाणावलेल्या डोळ्याच्या कडा अजूनही ओल्याच होत्या. " नेहा , नेत्रा तुमची आई तुमच्यावर खूप बंधन घालते अस या वयात तुम्हाला वाटणं सहाजिकच आहे , कदाचित ते तुम्हाला ओझं वाटत असेल. 

पण या फोटोत ही माझी सख्खी मोठी बहीण आहे. जिला माझ्या आईने अगदी मुलाप्रमाणेच वाढवलं . प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी आई आणून द्यायचीच. "नाही" हा शब्द ताईने कधी ऐकलाच नव्हता. 

आई म्हणायची, मुलांप्रमाणेच मुलीही बिनधास्त वावरू शकतात. सगळी बंधने मुलींसाठी का ? बाबा मात्र विरोध करायचे आईच्या काही गोष्टींना. पण त्यामुळे ताई बाबांपासून दुरावत गेली. 

पार्टीला जाण्यास त्याकाळी मुलींना परवानगी नसायचीच पण ताई आणि तिच्या श्रीमंत घरातील मैत्रिणीने मनाला वाटेल ते आणि तसेच वाचायच्या. हळूहळू त्यांच्या मुलांबरोबर च्या पार्ट्या वाढल्या होत्या. 

त्यातीलच एका परजातीत मुलावर ताईचे प्रेम जडले. माझ्या बाबांचा परजातीत विवाहाला कधीच विरोध नव्हता पण त्यांचा त्या मुलाच्या वाईट सवयींना मात्र कट्टर विरोध होता. 

तो कितीतरी मुलींबरोबर याआधी फिरताना , फ्लर्ट करताना बाबांना दिसला होता. हे ताईला बाबांनी प्रत्यक्ष दाखवले तरी बाबांपेक्षा तिला तो मुलगा बरोबर वाटला. 

आईचा तर पूर्ण विश्वास होता म्हणून तिने ताईचे त्याच मुलाशी लग्न होणार हे ठामपणे सांगितले. नाईलाजाने बाबा ही मग गप्प बसले. ताईच लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. 

पण ताई आणि तिचा नवरा यांच मात्र लग्नानंतर पटेनासं झालं कारण लग्न म्हणजे दोघांनाही ओझे वाटू लागले. लग्नानंतर ताईला पार्टीला नेणं म्हणजे तिच्या नवऱ्याला ही बंधन वाटू लागले. 

आणि घरच्यांच्या परवानगीशिवाय बाहेर न पडणं ताईला जाचक वाटू लागलं होतं. तिचंच म्हणणं खरं करणारी ताई सतत नवऱ्यासोबत वाद घालू लागली. 

सासरी घरातील इतर सदस्यांशी ताईची मक्तेदारी सुरूच राहिली. आई मात्र ताईचीच बाजू घेऊन ताईच्या सासरच्यांशी वाद घालायची. बाबा मात्र घरातील इतर सदस्यांची आणि तिच्या नवऱ्याची मोठ्या मनाने माफी मागत होते. 

पण एके दिवशी ताईने जी चूक केली ती माफी मागूनही भरून निघणारी नव्हती. इतर गोष्टीत दुर्लक्ष करणारी सासरची मंडळी मात्र त्या दिवशी ताईला माफ करू शकली नाहीत. ताईने अक्षम्य असा गुन्हा केला होता.

ताईला दिवस गेले हे ऐकून तिचा नवरा आणि सासरचे ताईला खूप जपत होते. त्यांना होणार बाळ हे सुदृढ व्हावे हीच इच्छा होती. अगदी ताईचे प्रत्येक डोहाळे पूर्ण करण्याचा घरच्यांचा प्रयत्न होता. 

हौसेने घरातील मंडळींनी डोहाळजेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले. सर्वांना निमंत्रणे पोहोच झाली. हॉलही बुक झाला. ताई त्यावेळेस पहिल्यांदाच दुसऱ्याच्या आनंदासाठी काहीतरी करणार होती. पण…."( आईला हुंदका आला. आणि आई रडू लागली.)


"पुढे काय झाले आई ?" मुलींचे ही डोळे पाणावले होते.


"कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच कोणालाही न सांगता ताई अबोर्शन करून मातृत्व सुख झिडकारून आली होती. ताईला कोणीच माफ करू शकले नाही. न सांगताच अबोर्शन केलेली ताई सगळ्यांच्या नजरेतून उतरली होती. ताईला माहेरी आणून सोडली. सोडली कसली ती स्वतः आली.


आई ही आता थकली होती. ताईच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट 'हो' म्हणून न करणारी आई ताईला बदलली अस वाटू लागलं. 

त्यातूनच ताईने आत्महत्या केली. आणि आईही तिच्या शोकात गेली. 

असा हा 'मुलगा- मुलगी समान' चा आईने केलेला अतिरेक ताईचा संसार टिकवू शकला नाही कि ताईलाही. 

अग स्त्री पुरुषापेक्षा खंबीर असते म्हणूनच दोन्ही घरी प्रकाश तेवत ठेवणारी ती पणती असते.


आणि तिला आई होण्याच वरदानही तिच्या सामर्थ्यामुळेच मिळाले असेल. पण त्यासाठी तिला काही बंधन पाळावी लागतात ओझं न मानता. बंधन स्वतः च्या मनानी अंगीकारली तर त्याचं ओझं वाटत नाही. 

कारण कितीही समाज प्रगत झाला तरी घराच घरपण स्त्रीलाच जपाव लागत." आई म्हणाली.


मुलीचं मन आईने प्रेमाने समजूत काढत जिंकलं. 

आईची माफी मागत वेळेत घरी येण्याच मुलींनी कबुल केलं.


© सौ. प्राजक्ता पाटील

सदर कथा लेखिका सौ. प्राजक्ता पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने