तिढा (उत्तरार्ध)

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)




"बाबा, संगीताआत्या नाही.. ही तिची मुलगी.. जुई!" सौरभने परस्पर उत्तर दिलं अन् मामांच्या कपाळावर येऊ घातलेल्या आठ्या जरा सैलावल्या.
मामांच्या पाया पडून जुई मामांच्या मागे मागे वाड्यात शिरू लागली. वाड्याची भव्यता मात्र आता भग्नतेत बदललेली होती. खोल्यांमधून भरलेलं सगळं जुनं सामान.. उखडलेल्या फरशा.. अन् पाली अन् उंदरांचा मुक्त वावर!! जुईला कसंसंच झालं.


"मामी दिसत नाही?" जुईनं विचारायचं म्हणून विचारलं. खरं तर एव्हाना तिची आजोळला भेट देण्याची उत्सुकता मावळून त्याची जागा आता थोड्या काळजीने.. अन् थोड्या किळस वाटण्याने घेतली होती.


"आहे ना! आतल्या खोलीत झोपली आहे.. तिला दम्याचा त्रास आहे.. सतत कफ होतो.. खाकरावा लागतो.. येणाऱ्या जाणाऱ्यांना किळस वाटते.. म्हणून आतच झोपते ती! चहा घेतला की भेट तिला!" मामाने माहिती दिली.


"आता जेवूनच जा!" सौरभ आतून चहाचे तीन कप घेऊन आला. कप देखील वाड्यासारखेच जुने होते. त्यातला त्यात बरा कप जुईच्या वाट्याला आला तरी त्याचा उडालेला बारीक कपचा जुईच्या तीक्ष्ण नजरेतून सुटला नाही.


"मी पुण्याला असते.. माझे मिस्टर आय टी कंपनीत आहेत.. मला एकच मुलगा आहे.. यू.एस.ला पीजी करतोय!" जूईने बेसिक माहिती पुरवली.


"ठाऊक आहे आम्हाला!" मामा कुत्सितपणे म्हणाले. तुझ्या आईने जरी आमच्याशी संपर्क ठेवला नाही.. आमच्या एकुलत्या एका भाचीच्या लग्नाला सख्ख्या मामाला बोलावलं नाही तरी बातम्या पोहोचत होत्या आमच्यापर्यंत!"


"असं नाहीये, मामा! काहीतरी गैरसमज आहेत.. म्हणजे असावेत! आई आता पंच्याहत्तरची आहे.. प्रकृती जरा नाजूक असते म्हणून मी माझ्याकडेच घेऊन आले तिला!" जुईनं तिच्यातर्फे सांगितलं.


"पंच्याहत्तर कसली.. फक्त त्र्याहत्तरची झाली ती गेल्या श्रावणात! माझ्यापेक्षा सहा वर्षांनी लहान अन् छोटूमामा पेक्षा तीन वर्षांनी!" मामांनी आठवणीनं सांगितलं.


"आणि बाबा गेल्याचं कळलं का तुम्हाला?? ह्या जुलैत आठ वर्षं होतील!" जुईचे डोळे पाणावले.


"हो! कळलं होतं खरं!!" मामांनी अपराधबोधानं मान खाली घातली.. "पण तिथवर येण्याइतके संबंधच ठेवले नाहीत तुझ्या आईने!" मामांनी स्वतःची बाजू स्पष्ट केली.


"आम्हां तिघा भावंडात तुझी आई खूप हुशार! आम्ही दोघं भाऊ काठावर पास होणार अन् तुझी आई शाळेत पहिली येणार! साहजिकच आमच्या घरीदारी तिचं फार कौतुक! तिचं कौतुक व्हायचं अन् आम्हाला शिव्या अन् अपशब्द बोलायचे! खरं तर आमची चूक नव्हती! मास्तर काय सांगायचे ते समजतच नव्हतं आम्हाला!!" खूप दिवसांनी बोलायला मिळाल्यासारखं मामा अखंड बोलू लागले.


"रोज रात्री जीजीआणि आबांच्या चर्चा व्हायच्या. आपली मुलं तर नापास व्हायच्या लायकीची! कसंबसं मास्तरांच्या हातापाया पडून त्यांना पुढच्या वर्गात ढकलतोय! आपली मुलगी मात्र प्रामाणिक आणि अभ्यासू!! तिला मोठं करायचं! आपला पैसा तिला लावू या! ती मोठ्ठी बॅरिस्टर बनेल! घराण्याचं नाव काढेल! मुलांच्याने काही व्हायचं नाही! त्यांना शेतीच्या कामाला लावू! खरं तर ह्यात त्यांचं काहीच चुकत नव्हतं.. पण त्यांची वृत्ती मात्र आम्हाला दुखावून गेलीच." मामाच्या डोळ्यात पाणी आलं.


"आम्ही हुशार नव्हतो हे खरं! पण आम्हाला भावना आहेत हे त्यांनी समजूनच घेतलं नाही अन् असंतोषाची पहिली ठिणगी तेथेच पडली." मामा घडाघडा बोलत सुटले.


"कुणी येणारं जाणारं असलं की त्यांच्यासमोर सतत संगीताचं कौतुक चालायचं. मुलं असून नाकर्ते निपजले अन् मुलगीच आमच्या घराची शान.. तीच आमचं म्हातारपण करणार म्हणून जिजी बिनदिक्कत आमच्यासमोर सांगायची!" मामांनी आवंढा गिळला.


"संगीता.. तुझी आई खरंच हुशार होती. तालुक्याला जाऊन शिकली.. अन् जळगावच्या कॉलेजात जाऊन वकील झाली. तिच्या शिक्षणासाठी आबांनी संत्र्याच्या बागा गहाण ठेवून कर्ज काढलं. सतत दुष्काळ, नापिकी अन् मजुरांची कमतरता यामुळे शेतीचं उत्पन्न दरवर्षी कमी कमी होऊ लागलेलं! 

त्यातच सावकाराचा पैशांसाठी तगादा! आपली आर्थिक बाजू कमकुवत होऊ लागलेली!!" मामा पुढे सांगू लागले.. "पण ह्या गोष्टीची कल्पना तुझ्या आईला देऊ नये अशी जिजी अन् आबांची सक्तीची ताकीद होती. त्यातच आबांच्या आग्रहाने वर्षभराच्या अंतराने माझं अन् तुझ्या छोटूमामाचं लग्न झालं. 

घरात खाणारी तोंडं वाढली. दरम्यान तुझी आई बाहेरगावी राहत असल्याने तिलाही पैसा पुरवावा लागेच." मामा बोलत होते. सौरभ एका स्टीलच्या ट्रेमध्ये गरमागरम पोह्यांच्या बशा घेऊन आला. ट्रे जुईसमोर ठेऊन तो आतल्या खोलीत गेला अन् मामीला हाताला धरून घेऊन आला.


"अहो, ती इतक्या वर्षांनी घरी आलीये.. अन् तुम्ही तिला काय मागल्या गोष्टी सांगत बसलात? झालं गेलं गंगेला मिळालं!! आता वय झालं आपलं! आतातरी राग सोडा हो! बरं चाललंय आपलं.. पोटापाण्यापुरतं मिळतंय की! फक्त सौरभचं लग्न झालं नाही एवढीच काय ती खंत!!" एवढंच बोलून मामीला दमली अन् तिला खोकल्याची ढास लागली.


"असू दे.. बोलू दे मला! मी नेहमीच वाईट ठरत आलोय.. मला मरताना तरी माझी बाजू मांडू दे!" बोलताना मामांचा‌ उर धपापू लागला.


"काही हरकत नाही! तुम्ही बोला मामा!! नाण्याला दोन बाजू असणारच!! दुसरी बाजू देखील समजायला हवीच ना! आणि मी इथे आलेच आहे त्यासाठी!! तुम्ही दडपण घेऊ नका मामी!!" जुईने मामीला नमस्कार करत म्हटलं.


"आमची लग्नं झाली.. दोघी सूना घरात आल्या. दोघीही आबांच्या मित्रांच्याच मुली! जवळपास संगीताच्याच वयाच्या!! पण जीजीने ह्या तिघींत कधीच मैत्री होऊ दिली नाही. तुमची नणंद तुमच्यापेक्षा किती हुशार आणि सरस आहे हे सतत दोघींच्या मनावर बिंबवत राहायची.. अन् ते ही इतकं की दोघींमध्ये न्यूनगंड तयार झाला. संगीता घरी आली तरी ह्या तिच्याशी बोलायला भ्यायच्या..!" मामाचं बोलणं ऐकून जुईला मामींच्या मोजकंच बोलण्याचं कारण कळलं.


"पण आईने दोघी वहिनींशी संवाद साधण्याचा प्रयत्न नाही केला?" जुईने न राहवून विचारलंच.


"ते तुझी आईच उत्तम प्रकारे सांगू शकेल!" मामा उत्तरले अन् पुढे बोलू लागले.. "तुझ्या आईने स्वतःचं लग्न स्वतः ठरवलं. तुझे बाबा घरचे सधन होते अन् त्यांना सासुरवाडी कडून एका पै ची सुद्धा अपेक्षा नव्हती. आमची परिस्थितीसुद्धा तेव्हा खालावलेली होती.

 माझं अन् छोटूचं म्हणणं होतं की मुलाकडच्या मंडळीना काही अपेक्षा नाहीयेत तर रजिस्टर लग्न करूया. म्हणजे थोडक्यात खर्च होईल. पण जिजी आणि आबा दोघांनीही ऐकलं नाही. जमिनीचा तुकडा विकून त्यांनी लग्नात अफाट खर्च केला.. अन् तिच्या वर्षभराच्या सणावारात आमचं फक्त दिवाळं निघायचं बाकी ठेवलं!" मामाच्या डोळ्यात पाणी होतं.


"दरम्यान माझीही मूल होण्यासाठी महागडी ट्रीटमेंट सुरू होती. छोटूभाऊजींना एक मुलगी झाली होती.. ती सतत आजारी असायची. तिचाही खर्च होता. जिजी आणि आबांच्याही प्रकृतीच्या कुरबुरी होत्याच. शिवाय शेतीचं उत्पन्न घटलेलं!! जमाखर्चाची हातमिळवणी कठीण झालेली!" मामी बोलू लागल्या.


"पुढे पुढे मला सौरभ झाला अन् छोटू भाऊजींच्या बायकोला देखील मुलगा झाला. तू आणि आई देखील अधून मधून यायचात.. तेवढीच वाड्याला जाग असायची."


"जिजी आणि आबा दोघेही सहा महिन्याच्या अंतराने देवाघरी निघून गेले.. त्याला आता अठ्ठावीस वर्षं झालीत!" मामांनी हातावर आकडेमोड करत सांगितलं.


"हो! माझं लग्न व्हायचं होतं तेव्हा!" जुई म्हणाली.. "मी, आई आणि बाबा.. तिघंही आलेलो.. पंधरा दिवस राहिलो.. पण आम्हां मुलांना बाहेर पाठवून तुम्हां मोठ्यांच्या आपसात काही गोष्टी झाल्या.. तेव्हापासून आम्ही इकडे आलोच नाही!" जुईने आठवून आठवून सांगितलं.


"हो! आपली आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक झालेली तेव्हा! म्हणून मग दोघांचेही दिवसकार्य थोडक्यात आटपायचे असं मत होतं आम्हा भावांचं! तुझी आई मात्र सगळं नीट संगतवार व्हावं म्हणून हटून बसली होती. शेवटी माहेरवाशिणीचा हट्ट म्हणून आम्ही पुन्हा एकदा कर्ज काढलं!" 

मामा पुढे सांगू लागले.. "तेव्हाच गावात एक प्रोजेक्ट यायचं होतं.. आपली वाड्याची जागा मोक्याची म्हणून त्यांनी वीस लाखांना मागितली होती. तो सौदा जर झाला असता तर सगळं कर्ज फिटून वर काही रक्कम हाती आली असती.. त्यात थोडं दूर दोघा भावांसाठी शेजारी शेजारी दोन छोटे ब्लॉक्स बांधायचा प्लॅन होता.. शिवाय जोडीला एखादा लहानसा व्यवसाय देखील सुरू करता आला असता!"


"मग?" जुईनं काळजीनं विचारलं. खरं तर वाडा विकून अन् पाडून टाकण्याच्या कल्पनेनेच तिचं मन गलबललं.


"तुझ्या आईने मोडता घातला. नव्या कायद्याप्रमाणे मुलींचा पण आईबापाच्या इस्टेटीत बरोबरीचा हक्क आहे म्हणाली.. आधीच तिच्या शिक्षणासाठी.. लग्नासाठी खूप खर्च झाला होता.. त्यावेळी कर्ज आबांनी काढलं होतं.. पण परतफेड आम्ही केली होती!! आम्ही संगीताला खूप समजावलं.. कारण संगीताची आर्थिक सुस्थिती होती.. सासर सधन होतं.. त्यात नवरा एकुलता एक.. आईवडिलांचं सगळं त्यांनाच मिळालं.. 

शिवाय संगीताची वकिली उत्तम सुरू होती.. जावईबापूंचा व्यवसाय ऐन भरात होता.. आमची मात्र बडा घर अन् पोकळ वासा अशी परिस्थिती होती.. अन् संगीताला मात्र ते सांगून देखील समजत नव्हतं." मामा म्हणाले.


"शेवटी छोटूने वाडा विकून आलेल्या रकमेतील तिसरा हिस्सा तिला द्यायची तयारी दर्शवली.. पण संगीता त्यालाही तयार झाली नाही.. "वाडा विकायचा नाही.. माझं माहेरचं घर अन् त्यातील आठवणी मला आहे तश्श्याच जपायच्या आहेत!" ह्या तिच्या म्हणण्यावर ती इतकी ठाम होती की तो सौदाच रद्द करावा लागला." मामांनी बोलणं संपवलं.


"छोटू मामा आणि त्यांचा परिवार कुठे असतात सध्या??" जुईने चौकशी केली.


"छोटूकाका व्यवहारी आहे.. ह्या आडगावात आपल्याला आणि आपल्या मुलांना भवितव्य नाही हे त्याने वेळीच ओळखलं अन् तो शहरात निघून गेला.. तेथे काकीनी खानावळ सुरू केली. आता त्यांचा व्याप इतका वाढलाय की हाताखाली माणसं ठेवलीत त्यांनी!!" सौरभने सांगितलं.. "बाबांमध्ये मात्र सुरूवातीपासूनच हिंमत नव्हती.. आई दमेकरी.. त्यामुळे ते इथेच राहिले.. अन् त्यांच्यामुळे मी सुद्धा अडकून पडलो!!"


"वाडा अजूनही विकता येत नाही.. कारण आत्या सही करत नाही अन् वाड्याचं नूतनीकरण करण्याइतकी माझी कमाई नाही.." सौरभने प्रामाणिकपणे सांगितलं. "तुटपुंजी शेती अन् वाड्याच्या समोर लावलेलं हे छोटेखानी पेढ्यांचं दुकान ह्यावर आमचाच चरितार्थ कसाबसा चालतो. त्यात आणखी खाणारी तोंडं कशाला वाढवा? अन् तसंही हल्ली गावात राहायला मुली तयार नसतात.. त्यात माझा व्यवसाय.. खरं तर मुलगीच मिळाली नाही म्हणून मी लग्न केलं नाही!" सौरभनं हसत हसत सांगितलं खरं.. पण त्याच्या चेहऱ्यावरची निराशा तो लपवू शकला नाही.


जुई आता स्वतःच निराश झाली होती. "जिच्या कुशीत तिने जन्म घेतला ती आपली आई खरंच इतकी स्वार्थी असेल?? का कोणी तिला काही वेडंवाकडं सांगून तिच्या मनात गैरसमज निर्माण केले असतील?? तिने तिला समजलेल्या गोष्टींचा दुसऱ्या बाजूने कधी विचारच केला नसेल का?"


जिजी आणि आबांनी सख्ख्या भावंडात अशी स्पर्धा का निर्माण केली असेल? मुलीला मोठं करण्याच्या नादात आपण मुलांवर अन्याय करतोय हे त्यांना जाणवलंच नसेल का? विचारांच्या शृंखलेनी जुईच्या मेंदूला जणू जखडून ठेवलं.


"आपलं माहेरचा वाडा आणि आठवणी जपण्याच्या नादात तिने माहेर तर गमावलंच पण माहेरच्या जीवाभावाच्या मंडळींची अवस्था अशी दयनीय करून ठेवलीय!" जुई विचाराक्रांत झाली.


"मामा, तुम्ही सगळे काही दिवसांसाठी पुण्याला चलत आहात.. माझ्या घरी.. .. तिथे माझे मिस्टर आहेत.. ते मामींच्या उपचारांची सोय करतील. आपण छोटू मामालाही बोलावून घेऊ. तुम्ही आणि आई एकमेकांशी बोला.. कडकडा भांडा हवंतर पण आपापली बाजू मांडा. इतकी वर्ष न बोलण्याने गैरसमज वाढत गेलेत. पण हा अबोला अन् गैरसमज पुरे करा आता!!


आईची चूक झाली असेल तर तिच्या वतीने मी माफी मागते तुम्हा सर्वांची पण आता आयुष्याच्या ह्या टप्प्यावर तरी मनं मोकळी होऊ देत!" जुई म्हणाली..


"तसंही आता आपलं म्हणता येतील अशी माणसं कमी झालीत. कुटुंब लहान झालीत अन् नातलग देखील कमी झालेत. आणि जे आहेत तेच जर असे एकमेकांपासून दूर होत गेले तर आयुष्य कसं पार पडेल? 

आपलं जग जरी आता ग्लोबल व्हीलेज झालं असेल तरी रक्ताच्या नात्यांची ओढ अजूनही मनाला आहेच. आणि माझा मुलगा एकुलता एक असला तरी त्यालाही मामाचं प्रेम मिळायला हवंय.. जे मी बालपणी अनुभवलंय!" जुईने सहेतुक सौरभकडे बघितलं.


"पण वन्संच्या मनात काय आहे कोणी सांगावं? जर त्यांना आम्ही आलेलं आवडलं नाही तर? मामीने शंका बोलून दाखवली.

"असं होणार नाही. मी इकडे येत असल्याचं जरी आईला सांगितलं नसलं तरी माझ्या आईचं मन मी ओळखते.. आणि मी समजावेन तिला! 

वयाच्या ह्या टप्प्यावर तिलाही मनातून माहेरच्या माणसांची ओढ असेलच ना! 

आणि तसंही माहेरच्या घरातला हिस्सा वाटून घेण्यापेक्षा माहेरची सुखदुःख वाटून घेणं जास्त महत्त्वाचं हे बहुधा कळतंय आईला आता.. 

अन् माहेरचा वाडा जपण्यापेक्षा माहेरच जपणं उत्तम हे ही उमगेल तिला!" जुई म्हणाली.. अन् तिनं पुण्याला जाण्यासाठी टॅक्सी बुक करायला घेतली.


जुईने घेतलेल्या पुढाकाराने अन् सौरभच्या सहकार्याने नात्यांतील अढींचा तिढा सुटेल का? ह्या विचारांत असलेल्या मामा, मामी, जुई अन् सौरभ ह्यांची कॅब पुण्याच्या दिशेने धावू लागली.

क्रमश:


© कल्याणी पाठक (वृषाली काटे)

सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने