तिढा (विशेष भाग)

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)






टॅक्सीत बसल्या बसल्या जुईनं नवऱ्याला फोन लावला.. "मी मामा, मामी अन् सौरभ ह्यांना घेऊन पुण्याला येतेय!" 

जुईनं इतकं नि:संकोचपणे सांगितलं की मामीला तिचं भारी कौतुक वाटलं.

"जावईबापूंना आवडेल ना गं आम्ही तिथे आलेलं?" मामांनी देखील शंका विचारून घेतली.


"असं काय म्हणताय मामा!" जुई लटकं रागे भरत म्हणाली.. "अहो, घर माझंही आहेच की! अन् त्याला जावईबापू वगैरे नका म्हणू! सारंग नाव आहे त्याचं! सारंगच म्हणा!" जुईनं आपुलकीनं सांगितलं.


"नाही.. नाही.. हवं तर सारंगराव म्हणू!" मामीनं सुचवलं अन् चौघेही हास्यात बुडून गेले.


"आज किती तरी वर्षांनी मी आईबाबांना इतकं मनमोकळं हसताना बघतोय!" सौरभच्या‌ मनात आलं.. "जुई हिंमत करून इतक्या दूरवर आली.. म्हणून हा दिवस दिसला. आपल्या किंवा छोटू काकाच्या मुलांच्या मनात असं जुईला भेटायचं कधीच का आलं नाही??" तो मनातून खजील देखील झाला.


"जुई, तू आत्याला कळवलं आहेस ना आम्ही येतोय म्हणून! नाहीतर ती त्रागा करेल अन् आम्हाला कानकोंडं होईल." सौरभनं पुन्हा एकदा शंका काढलीच.


"तू काळजी नको करूस रे! मी आहे ना! मी बघून घेईन! अन् तुम्ही आईशी बोलायचं वगैरे टेन्शन नका घेऊ.. जे आपोआप घडेल ते घडू द्या!" जुईनं सूचना केली.


**********


"मावशी, आज सहा जणांचा स्वयंपाक करायचाय.. पाहुणे येणार आहेत!" सारंगनं..‌ जुईच्या नवऱ्यानं स्वयंपाक करणाऱ्या मावशींना सांगितलं.. अन् जुईच्या आईचे कान टवकारले गेले.


"कोण पाहुणे यायचेत?" तिनं जावयाला विचारलं.


"जुई माझ्या आत्तेबहिणीकडे गेलीय ना वास्तुशांतीला.. तिथले काही पाहुणे यायचेत पुण्याला!" सारंगनं मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली. एकतर जुई आडगावला गेली हे आईला माहीत नव्हतं अन् मामा मामी इतक्या वर्षांनी येताहेत म्हटल्यावर आई कशी रिऍक्ट करेल ह्याचीही त्याला खात्री नव्हती. अर्थात जुईनं एकदा निर्णय घेतला आहे म्हटल्यावर ती सगळी परिस्थिती व्यवस्थित हाताळणार ह्याची त्याला खात्री होतीच.


पुण्याला जुई रहात असलेल्या सोसायटीच्या प्रवेशद्वाराशी टॅक्सी थांबली अन् चौघेही खाली उतरले. ती भव्य सोसायटी.. उंच इमारती.. स्वच्छ प्रांगण.. अन् मुद्दाम तयार केलेला बगीचा बघून मामा अन् मामीचे डोळे दिपून गेले.


"केवढं मोठं घर आहे गं तुझं, जुई!" मामी हरखून म्हणाली.


"अगं, ही सोसायटी आहे.. 'आपलं' घर लहानसं आहे.. चला.. जाऊ या!" म्हणत तिनं सिक्युरिटी गार्डच्या मदतीने सामान लिफ्टमध्ये ठेवलं अन् मामीला हात धरून लिफ्ट मध्ये चढवलं.


घरात शिरताच सारंगनं त्यांचं मनमोकळ्या हास्यानं स्वागत केलं तसा मामा आणि मामीचा संकोच थोडा दूर झाला.


कॉल बेलच्या आवाजाने जागी होऊन 'कोण पाहुणे आलेत' म्हणून बघायला बाहेर आलेली जुईची‌ आई मामाला बघताच थबकली. तिच्या चेहऱ्यावर एकाच वेळी आश्चर्य, तिरस्कार, वेदना अन् प्रतारणा हे भाव उमटले अन् तिनं आपल्या खोलीत जाऊन खोलीचं दार धाडकन बंद करून घेतलं.


जुईच्या आईचं.. संगीताचं वागणं जरी मामांना अपेक्षित होतं तरीदेखील ते मनातून दुखावले गेले. "आपल्यासाठी नाही पण निदान सौरभ समोर असताना तरी तिनं संयम बाळगायला हवा होता." मामांच्या मनात येऊन गेलं.


जुईनं हातानंच मामांना 'रिलॅक्स राहण्याची' खूण केली.. अन् तिघांना हातपाय धुवायला पाठवलं.. अन् जेवणाची तयारी करायला गेली अन् सारंगनं सगळ्यांना घर फिरून दाखवलं. मामी घराचं सूक्ष्म निरीक्षण करू लागली.


जुईनं‌ तिचा फ्लॅट चांगला सजवला होता. तिची अभिरूची तिच्या आईसारखीच उच्च दर्जाची होती. घर पाहून झाल्यावर मामा सोफ्यावर बसून सकाळचा पेपर चाळू लागले.


सारंग अन् सौरभच्या गप्पा रंगल्या. आडगाव सारख्या लहान गावात राहत असूनही सौरभला‌ बाहेरच्या जगाची बरीच माहिती होती. बोलता बोलता सारंगनं सौरभच्या मनातील भविष्याच्या योजना जाणून घेतल्या.


पानं मांडल्यावर जुईनं सगळ्यांना जेवायला बोलावलं.. आईला सुद्धा! पण आईचा आडमुठेपणा कायम होता. जुई आईच्या खोलीत तिचं जेवणाचं ताट देऊन आली अन् पाच जण हसत खेळत जेवू लागले.


आईनं जरी दरवाजाला आतून कडी लावून घेतलेली असली तरी तिचे कान बाहेरच्या बाजूला स्वयंपाकघराकडे लागले होते. जुईनं नवऱ्याला आडगावला पोहोचल्यापासूनची सगळी हकीकत सविस्तर कथन केली.. बदललेलं आडगाव.. भैरोबा मंदीर.. सौरभला‌ न ओळखणं.. अन् मामा मामींनी केलेला आदर सत्कार!!


खरं तर जुई आपल्याबद्दल मुद्दाम वाढवून सांगतेय असं मामांच्या लक्षात येत होतं अन् ते अधिकाधिक संकोचत होते.


खोलीत स्वतःला कोंडून घेतलेल्या पण कान बाहेरच्या बाजूला जुईच्या आईला मात्र आपल्या वागण्याबद्दल थोडं वाईट वाटत होतं. "आपल्या लेकीला दादानं एवढ्या कौतुकानं पाहुणचार केला.. आपण मात्र सौरभची साधी चौकशी सुद्धा केली नाही!" ती मनातून खंतावली..‌ "सौरभ खूपच वयस्कर दिसतोय.. टक्कल पण पडलंय.. त्याची बायको आलेली दिसत नाही.. त्याचं लग्न झालंय की नाही कोण जाणे!" जुईच्या आईनं स्वगत म्हटलं.


"खरं म्हणजे वहिनीची पण विचारपूस करायला हवी होती! जे काही घडलं त्यात वहिनीचा बिचारीचा काहीच दोष नव्हता! किती बारीक झाली आहे ती.. आणि बोलताना सतत धाप लागली होती तिला! आजारी असल्यासारखी‌ दिसते. दादाची प्रकृती देखील रोडावलीय.. तरुणपणी कसा हट्टाकट्टा‌ गडी होता. आता अगदीच रया गेलीय दादाची!" स्वतःच्याही नकळत तिच्या मनात कणव दाटून येऊ लागली.


रात्री जुईनं मुद्दाम मामा आणि मामीची झोपण्याची सोय आपल्या बेडरूम मध्ये केली. सारंग अन् सौरभ हॉलमध्ये झोपले अन् जुई मात्र आपला बाडबिस्तरा घेऊन आईच्या खोलीत झोपायला गेली.


"आडगावला कशासाठी गेली होतीस गं?" आईनं रागानं विचारलं.. पण त्या रागात काही दम उरला नाही हे जुईला देखील जाणवलं..


"अगं, वाडा बघायला.." अन् आलेल्या संधीचा फायदा घेऊन जुईनं सगळं सांगून टाकलं.. अगदी गाव बदललंय इथपासून तर वाड्याची दुर्दशा.. मामीचं आजारपण.. सौरभचं खुंटलेलं करियर.. छोटूमामाचं गाव सोडून जाणं.. आर्थिक तंगी.. पैशांची चणचण .. अगदी वाडा विकण्याच्या कारणापर्यंत!


"दादा खोटं बोलतोय.. असं असणंच शक्य नाही!" आई तिच्या मतावर ठाम होती.


"ठीक आहे.. तुझा विश्वास नाही.. पण आता मी त्यांना घेऊन आलेय तर एकदा त्यांची परिस्थिती पाहा ना! आपण रात्री झोपायला वापरतो ते गाऊन मामीच्या बाहेर नेसायच्या साडीपेक्षा महागडे असतात. अन् सौरभ.. माझ्या अन् सारंगच्या वयाचा असेल.. पण किती ओढगस्त दिसतो..आणि तुझ्या दादाची प्रकृती.. अगं त्याचा अशक्तपणा केवळ वयामुळे आलेला नाही.. त्यानं खरंच खूप सोसलंय गं!" बोलता बोलता जुईनं आईच्या मांडीवर डोकं ठेवलं.


"म्हणजे ह्या सगळ्याला मी जबाबदार आहे असं म्हणायचं आहे का तुला?" आईनं रागानं विचारलं.. "मला अगदी खलनायिका बनवून टाकलंत तुम्ही लोकांनी म्हणून विचारतेय!


"छे ‌गं! माझी आई कधी चुकीची असूच शकत नाही.." जुई लाडवत म्हणाली.. "फक्त तुला दिसत असलेल्या गोष्टी चूक होत्या.. अन् म्हणून तू तुला योग्य वाटतील असे निर्णय घेत गेलीस!"


आईनं एक मोठा सुस्कारा सोडला.. "कदाचित मी मला जे दाखवलं गेलं तेवढंच बघितलं! स्वतः पेक्षा इतरांवर जास्त विश्वास ठेवला अन् म्हणून माझे निर्णय परिस्थितीच्या विसंगत ठरले." आई आता थोडी नरमली‌ होती.


"पण दोन कुटुंबांचं आयुष्य बदलून गेलं त्यामुळे!" आईला आता पश्चात्ताप झाल्यासारखा वाटू लागला होता.. "बिचारा सौरभ! त्याचं वय निघून चाललंय.. आता कितीही पश्चात्ताप केला तरीही झालेल्या गोष्टी अन् त्याचं नुकसान भरून येण्यासारखं नाही!"


"भूतकाळ नाही बदलता येणार.. पण भविष्यकाळ आपल्या हातात आहे आणि आपली माणसं देखील आपल्या जवळ आहेत ही फार मोठी गोष्ट आहे, आई!" बोलता बोलता दोघींना झोप लागली.


************


सकाळी चहा घ्यायला सगळ्यांसोबत आई देखील डायनिंग टेबलशी आली.. "मी काय म्हणते सारंग.." तिनं जावयाला उद्देशून म्हटलं.. "माझ्या काही एफ डी आहेत आणि काही इन्व्हेस्टमेंट्स! शिवाय बाबांचे पण काही पैसे आहेत बँकेत! आपल्याला आडगावच्या वाड्याची डागडूजी करता येईल का?"


"असला चौसोपी वाडा हल्ली बघायला पण मिळत नाही नव्या पिढीला! आपण तिथे काही भागात छान रिसॉर्ट करूया.. हल्ली पैसे भरून माहेरपण करतात‌‌ ना काही जणी.. त्या धर्तीवर! हल्ली शहरातल्या मुलांना गावाकडचं आकर्षण असतं.. छान चालेल व्यवसाय!"


"छोटूचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे म्हणतात.. त्याची बायको, मुलंसुना ह्यांनाही बोलावून घेऊ. ही चुलत भावंडं मिळून तिथलं व्यवस्थापन बघतील.." आईची योजना ऐकून सारेच थक्क झाले.


"हे बरोबर आहे, सौरभ! तू गाडीसाठी कर्ज घे. आलेल्या पाहुण्यांना जवळपासची पर्यटन स्थळं बघायला नेता येईल!" सारंगनं पुढचं सुचवलं.


"हो.. हो.. गावाजवळ बघण्यासारखी अन् अजून प्रदूषित न झालेली अनेक स्थळं आहेत.. त्या निमित्ताने त्यांचाही विकास होईल." सौरभला योजना आवडलेली दिसली.


"खरंच, आज पर्यटन व्यवसायाला खूप स्कोप आहे.. अन् कित्येक जणींचं माहेर संपलंय ह्या ना त्या कारणाने! त्यांना माहेर मिळेल.. अन् माझ्या भावंडाना रोजगार.. ते ही गावातल्या गावात.. वाडा न विकता!!" जुई खूष झाली.


"रिसॉर्टचं नाव 'माहेर' ठेवू या! माहेरवाशिणी येत राहिल्या तर मलाही करमेल.. अन् प्रकृती पण सुधारेल!" मामीनं स्वतःहून नणंदेच्या कल्पनेचं स्वागत केलं.. अन् नणंदभावजय आयुष्यात पहिल्यांदाच एकमेकींच्या गळ्यात पडल्या.


कुणीही काहीही न बोलता.. आरोप प्रत्यारोप न करता एक तिढा आपसूक सुटला.. अन् एका माहेरवाशीणीला पारखा झालेला वाडा आता नव्या रूपात अनेक माहेरवाशिणींच्या‌ स्वागतासाठी सज्ज झाला!!


**********


खरं तर ही गोष्ट मी दोन भागात संपवली होती. पण वाचकांच्या आग्रहामुळे हा तिसरा विशेष भाग सुफळ संपूर्ण करत आहे. पहिल्या दोन भागांप्रमाणे ह्या भागाला देखील आपले प्रेम लाभू दे!

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)

सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने