तू माझ्या पोटी जन्म घे

© वैशाली जोशी 




टीव्ही वरच्या हॉरर मालिकेचा आजचा एपिसोड संपला अन् कांचन ने टीव्ही बंद केला नि झोपायच्या तयारीला लागली.

"आपबीती' ही रात्री साडे दहा वाजता लागणारी तिची आवडती मालिका...त्यातल्या त्या राजसीच्या "भुतानं" तिला अगदी पछाडलं होतं म्हणा ना!

त्यात घरी तिचा मुलगा आणि ती असे दोघेच. सासूबाई यवतमाळला लेकीकडे गेलेल्या अन् नवरा आठवड्याभराच्या टूरवर. मग काय विचारता! घरात तिचंच राज्य. दिवसभर टीव्ही अन् लाडक्या "आपबीती" ची पारायणं!

सिरीयलच्या विचारातच तिला झोप लागली... बाजूलाच तिचा सहा वर्षांचा मुलगा अन्वय अगदी गाढ झोपलेला. सवयीप्रमाणे त्याच्या अंगावर हात टाकला अन् काहीतरी विचित्र जाणवलं कांचनला.

अन्वय नव्हताच तिथे! त्याच्या जागी फक्त एक आभास... त्याच्या असण्याचा.... पण त्याच्या असण्याच्या कोणत्याच खुणा नाहीत!!!

"अनू, माझ्या राजा! कुठेस तू???" ती जीवाच्या आकांतानं किंचाळली... सैरभैर होत घरभर त्याला शोधू लागली.

तो घरातही नाही म्हटल्यावर आधी अंगणात अन् मग थेट रस्त्यापर्यंत धावत गेली... वेड्यासारखी अन्वयला शोधू लागली....

घरापासून दूर अंधाऱ्या भागात एका पडक्या घरात मिणमिणता प्रकाश दिसला तिला... आणि त्याच दिशेने एक ओळखीचा आवाजही... अस्फुट, अस्पष्ट....

ती आता त्या अंधारात उजेडाच्या अन् आवाजाच्या दिशेने धावू लागली. त्या पडक्या घरात तिचा अन्वय बसला होता... अशक्त, असहाय्य....अन् त्याच्याजवळ बसलेली ती आकृती... पुसटशी... पण अगदीच ओळखीची....

तू... तू.. इथे... माझ्या मुलाला... माझा अनू... एव्हढंच बडबडली कांचन अन् झोपेतून खाड्कन जागी झाली. तिच्या शेजारीच तिचा अन्वय गाढ झोपलेला बघून तिनं सुटकेचा श्वास सोडला.

"मग आत्ता मला जाणवलं ते काय होतं? स्वप्न?? छे! छे! फक्त स्वप्न कसं असेल?" कांचननं स्वतःकडे एकवार बघितलं तर सगळं शरीर घामानं डबडबलेलं, खूप धाप लागलेली. 

तशीच ती बेडवर उठून बसली. बाजूलाच ठेवलेल्या बाटलीतून दोन घोट पाणी प्यायली....अन्वयच्या अंगावरचं पांघरूण नीट केलं.... त्याच्या कपाळाचा हळूवार पापा घेतला... अन् हलकेच थोपटत त्याला जवळ घेतलं.


आता मात्र तिची झोप पार उडाली होती. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे तीन वाजले होते. झोपेचा प्रयत्न करूनही झोप लागेना... अन् मघाचा तो आभास विसरू म्हणता विसरता येईना....


कांचन अंथरुणावर पडल्या-पडल्या विचार करू लागली... तिच्या डोळ्यासमोरून ती झोपडी हलेना.... तेच ते पडकं घर.... तिथे बसलेला तिचा अशक्त अन्वय आणि ती बाई.... ती तर आपली जुनी शेजारीण सगुणा !

ती का यावी माझ्या स्वप्नात ? तिचं काय काम आहे?" कांचनच्या विचारांची शृंखला संपेचना...


कांचनला आठवलं... ह्या सगुणेचा मुलगा तिच्या अन्वयपेक्षा अगदी वर्षभरानेच लहान....तिला लग्नानंतर बारा वर्षांनी झालेला... नवसाचा.


*************************


सगुणा अन् कांचन दोघी सख्ख्या शेजारणी! 

कबीरची बदली रत्नागिरीला झाली तिथे ह्या दोघी एकाच वाड्यात रहात ...नवीन लग्न झालेली लाजरीबुजरी कांचन आणि लग्नाला दहा वर्षं झालेली तिशीतली सगुणा.

सगुणाचा नवरा रत्नागिरीतच एका कंपनीत ड्रायव्हर होता. त्याची आठवड्यातून चार दिवस बाहेरगावी ड्युटी असे. आणि मग सगुणा घरात एकटीच...मातृत्वासाठी आसुसलेली..

कबीर आणि कांचन मूळचे विदर्भातले नागपूरचे... कबीरची बदली प्रमोशनवर रत्नागिरीला झाली अन् दोन वर्षांकरिता तो कांचनला घेऊन रत्नागिरीला आला.

तेव्हा त्यांच्या लग्नाला जेमतेम तीन महिने झालेले.

प्रमोशनमुळे कबीरवर ऑफिसची अतिरिक्त जबाबदारी आली अन् तो घरी जास्त वेळ देऊ शकत नसे. त्यामुळे कांचनला सगुणेची सोबत मिळाली अन् कबीर निश्चिन्त झाला.

नवरा ड्युटीवर असला की इकडे घरात सगुणा एकटीच.... एकटीची कामं ती किती असणार? मग कबीर ऑफिसला गेल्यावर कांचन आणि सगुणा दोघी एकत्रच असत... एकत्र बाजारात जात... फिरायला जात.... टीव्ही बघत.... दिवस मजेत चालले होते.


लग्नाला सहा महिने झाले अन् कांचनला मातृत्वाची चाहूल लागली. कांचननं ही गोड बातमी सगळ्यात आधी आपल्या ह्या जीवलग मैत्रिणीलाच दिली.

ओकाऱ्या आणि अशक्तपणाने हैराण झालेल्या कांचनच्या देखभालीसाठी कबीरने त्याच्या आईला बोलवून घेतले. त्या येईपर्यंत सगुणेनेच कांचनची सर्वतोपरी काळजी घेतली. तिचं जेवण-खाण, औषधपाणी, डॉक्टर सगळंच...

सगुणेच्या ओळखीचे एक महाराज होते... बाळ सुदृढ व्हावं आणि सुखरूप राहावं म्हणून तिनं त्यांच्याकडून मंतरलेले आंबे आणले अन् प्रसाद म्हणून रोज एक आंबा खायला घालत असे कांचनला.

निरोप मिळाल्यापासून आठ दिवसात कुसुमताई, कांचनच्या सासूबाई रत्नागिरीला हजर झाल्या. आईच्या येण्याने कबीर निश्चिन्त झाला... आणि पहिलटकरीण खूष ! 

कबीरचे वडील तीन वर्षांपूर्वी वारले. कबीरची बदली रत्नागिरीला झाल्यापासून कुसुमताई नागपूरला एकट्याच रहात.सुनेला दिवस गेलेत म्हटल्यावर त्यांनीदेखील आपला मुक्काम रत्नागिरीला हलवला.

कुसुमताई लाडक्या सुनेचे सगळे लाड पुरवीत. सगुणा मात्र जराशी नाराज वाटली. तिला मोठ्या बहिणीच्या मायेनं कांचनचं सगळं करायचं होतं!

कुसुमताई आल्यापासून सगुणेचं वागणं जरा बदलल्यासारखं वाटलं कांचनला... सगुणा जरा चिडचिड करायला लागलेली हल्ली... त्यात एकदा तिनं कांचनला आवडतात म्हणून बेसनाचे लाडू पाठवले. 

चव म्हणून कुसुमताईंनी एक खाऊन बघितला तर त्यात बिब्ब्याची चव लागली त्यांना.

एकदा सगुणा कांचनचे लांबसडक केस विंचरून देत होती... त्यानंतर तिच्या केसाचं गुंतवळ लपूनछपून स्वतःच्या घरात नेताना पाहिलं म्हणे त्यांनी.

नंतर कबीर आणि त्यांच्यामध्ये काहीतरी बोलणं झालं.... त्या कबीरला हळू आवाजात काही सांगत होत्या आणि कबीर "असं काही नसतं आई ... काहीही विचार करतेस " असं बडबडत होता आईला.

नंतर काय झालं माहित नाही पण त्या सगुणेवर बारीक नजर ठेवीत आणि सगुणा कांचनशी बोललेली देखील त्यांना आवडत नसे.

मात्र त्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थांचं अनुष्ठान केलं घरात... अन्वयचा जन्म होईपर्यंत....

कांचनला सातवा महिना लागला होता... सगुणा नेमकी कुठे बाहेर गेलेली...एक संन्यासी कांचनच्या दारावर आला अन् भविष्यवाणी सांगू लागला.

शेजारच्या सगुणेला मुलगा होईल अन् त्याचं आयुष्य पाच वर्षांचंच असेल...पाचव्या वर्षी त्याचं गंडांतर तुझा मुलगा स्वतःवर घेईल ... दोघापैकी एकच वाचणार.. तुझ्या मुलाचा जीव सगुणेच्या मुलात येणार असं काहीसं बरळत होता तो.

कांचननं जवळपास त्याला हाकलूनच लावलं अन् कबीरच्या च्या कानावर ही गोष्ट घातली. कबीरचा असल्या गोष्टींवर विश्वास नव्हताच कधी त्यामुळे त्यानं ही गोष्ट उडवून लावली पण सासूबाईंनी मात्र हे सगळं गांभीर्याने घेतलं अन् तिला बाळंतपणासाठी म्हणून तिच्या माहेरी धाडलं. 

बाळंतपण रत्नागिरीलाच करायचं असं ठरलं असताना हे माहेरी जाण्याचं मध्येच काय आलं... कांचनला काहीच कळेना. पण आई आणि सासूबाईंच्या संगनमतापुढे तिचं काहीच चाललं नाही.

निघतेवेळी कांचन गुपचूप भेटली सगुणेला.... तर तिचं वागणं जरा गूढ वाटलं... पण असेल काही कारण म्हणून कांचननं फार मनावर नाही घेतलं.

अन्वयचा जन्म झाला....कांचन जवळपास सहा महिने माहेरीच होती.रत्नागिरीत सगुणेला दिवस राहिल्याचं तिला कबीरकडून कळलं होतं.

कांचन खूप आनंदली. तिच्या जीवलग मैत्रिणीची कूसदेखील उजवली होती!

एव्हाना कबीरची बदली नागपूरला झाली... कुसुमताई आणि कबीरनं आपलं बस्तान नागपूरला हलवलं आणि मगच कांचन आणि अन्वयला घरी आणलं. कांचन तिच्या बाळात आणि संसारात गुंतून पडली आणि तेव्हापासून सगुणेचा आणि तिचा संपर्क तुटला तो तुटलाच....


*************************


मग आता ही सगुणा इथे?... अन् तिचा मुलगा?? ओह् माय गॉड!!! अन्वय सहाचा म्हणजे तो पाच वर्षांचा! 

तो रत्नागिरीला आलेला संन्यासी! त्याची भविष्यवाणी!! माझा अनू!!! ती भयचकित झाली... भीतीने थरथर कापू लागली...


पण आपल्या मुलाचा अंत जवळ आलाय हे तिला अगदी आतून जाणवलं अन् अक्षरशः हादरलीच ती!

""माझा मुलगा मरणार? छे! एक आई अशी कल्पनाही मनात आणू शकत नाही... मग मला वाटतंय ते काय आहे? मला वेड तर लागलं नाही ना!!" कांचनचं डोकं जड झालं...


"नाही... नाही... मी माझ्या मुलाला काहीही होऊ देणार नाही! एका आईची ताकद नियतीलाही माघार घ्यायला लावू शकते... आज माझं सर्वस्व पणाला लावून मी माझ्या मुलाचा जीव वाचवणार!" तिचा निर्धार पक्का झाला होता...


एव्हाना पहाटेचे चार वाजले होते.... कांचननं अंघोळ केली... देवाजवळ तेला-तुपाचा दिवा लावला अन् जप करायला बसली.

सलग अडीच तास ती ध्यान लावून बसली होती... एरव्ही देवाला जेमतेम हात जोडणाऱ्या एका "आईची" आज सत्वपरीक्षा होती. 

आता तिच्या डोळ्यांसमोर दोन मुलं होती... एक तिचा मुलगा -अन्वय आणि दुसरा सगुणेचा मुलगा...दोघंही निरागस.... दोघंही निष्पाप...दोघांपैकी एकच जगणार म्हणे! कोण जगणार? कोण मरणार??


तिनं एक निर्णय घेतला...मनोमन "त्या" अचाट शक्तीला हात जोडले... मनोभावे प्रार्थना केली.... अन्वयच्या दीर्घायुष्यासाठी....


आता सूर्योदय झाला होता... ती ध्यानातून बाहेर आली आणि रोजच्या कामाला लागली. अन्वयला शाळेत पाठवायला मात्र तिचा जीव धजेना. दुपारी कबीर घरी आल्यावर त्याला तिचं स्वप्न आणि इतर हकीकत सांगितली...


"तुझ्या "आपबीती" सीरिअलचा परिणाम!" त्यानं तिचं बोलणं उडवून लावलं.


सात दिवस उलटले...कांचनची प्रार्थना सुरूच होती... तिचं मनोबल आणि तपोबल सर्वोच्च कोटीला पोहोचलं होतं....


तिची लढाई एका अदृश्य संकटाशी होती जिचा मागमूसही व्यावहारिक जगात नव्हता... आज ती एका अनामिक संकटातून तिच्या मुलाची सुटका करणार होती...


तिचं बाळ... तिला तिच्या अन्वयला ह्या संकटातून सोडवायचं होतं ....आणि तो दुसरा जीव...तेही बाळच... सगुणेचं...तोही निष्पाप... तितकाच निरागस.... पण तो जाणार... तिला कळून चुकलं होतं! 

पण इलाज नव्हता... तिनं त्या अश्राप जीवाची क्षमा मागितली.त्याला सांगितलं... "माझा तुझ्यावर काहीही राग नाहीये बाळा... पण तुझं आयुष्य एव्हढंच आहे... आणि माझ्या मुलाचं आयुष्य मी तुला घेऊ देणार नाही... तेव्हा तू आता जा... मुक्त हो... आणि उरलेलं आयुष्य जगायला माझ्या पोटी जन्म घे... माझ्या अन्वयचा भाऊ म्हणून... मी तुम्हां दोघांवरही तितकंच प्रेम करेन."

*************************


एक दिवस सकाळची कामं आटपून कांचननं सवयीप्रमाणे टीव्ही लावला अन् न्यू्ज चॅनेलच्या ब्रेकिंग न्यूजनं तिचं लक्ष वेधलं -


"रत्नागिरी येथे स्कुटीला भरधाव कारची धडक! पाच वर्षीय बालकाचा मृत्यू!" बालकाची आई जखमी!" सोबत मृत बालकाच्या आईचा फोटो दाखवला होता...


कांचननं तो फोटो अचूक ओळखला... ती सगुणाच होती....आणि ते बाळ... ते सगुणाचं होतं!!!


एक वर्षाने :-


अन्वयच्या घरी धावपळ चाललीये.... त्याची आई कांचन दवाखान्यात आहे...अन्वय आजीचा हात धरून दवाखान्यात चाललाय...अन्वयला भाऊ झालाय ना... त्याला बघायला....


*************************


सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजन हा ह्या कथेचा एकमेव उद्देश आहे... अंधश्रद्धा पसरवण्याचा लेखिकेचा अजिबात हेतू नाही.

© वैशाली जोशी

सदर कथा लेखिका 
वैशाली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने