ब्रेकिंग न्यूज ( भाग 1)

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)



"हे बघ, संजय.. गेल्या सहा महिन्यांत तू एकही ब्रेकिंग स्टोरी आणू शकला नाहीयेस.. माझं हे न्यूज चॅनल काही धर्मादाय नाही. आधीच आपल्या फील्डमध्ये कॉंपिटिशन खूप आहे. 

जर तुझं हे असंच सुरू राहिलं तर मला तुला फायर करावं लागेल!" 'ब-बातम्यांचा' मराठी न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा पीटर फर्नांडीस ह्यांनी रिपोर्टर संजय राणेला धमकी देऊन जवळजवळ त्यांच्या केबिनच्या बाहेर काढलं.

संजय राणे हताश होऊन त्याच्या जागेवर येऊन बसला. त्याला बघताच त्याचा सहकारी कॅमेरामन राहुल पाटील त्याच्या जवळ आला. 

टेबलवरच्या बाटलीतलं पाणी ग्लासमध्ये ओतून राहुलने ग्लास संजयसमोर धरला.

"कूल डाऊन यार.. पाणी पी!" राहुलनं संजयच्या खांद्यावर हात ठेवला.

"यार, आपले रायव्हल्स कुठून कुठून स्टोऱ्या आणतात कोण जाणे! आपण पोहोचेपर्यंत त्यांची मंडळी तिथून आपला कार्यभाग उरकून निघालेली देखील असतात!" संजयनं हताश होत म्हटलं.

"संज्या, तू ना अगदी भंकस आहेस!" राहुलनं आपलं मत व्यक्त केलं. "मागच्या आठवड्यात सीताबाई माणदेशकरांचं फ्यूनरल कव्हर करायला गेलेलो मी अन् शलाका मॅडम.

तर बयेने तिथल्या अग्निसंस्कार करणाऱ्या भटजीपासून तर त्यांच्या घरातल्या मोलकरणी, पेपरवाला, लॉंड्रीवाला, दूधवाला, ड्रायव्हर सगळ्यांचे बाईट्स मिळवलेत.. नाहीतर तू! 

तू असतास तर सीताबाई माणदेशकरांचा सांगीतिक प्रवास अन् अभ्यास अन् ध्यास अन् कसल्या कसल्या डोंबलाच्या विषयावर संशोधन करून वेळ गमावला असतास!" राहुलने संजयला खिजवून दाखवलं.

"अरे! सीताबाई हे संगीत विश्वातलं बडं नाव! मग त्यांच्या संगीतावर स्टोरी केली तर बिघडलं कुठं?" गेले सहा महिने टीव्ही न्यूज चॅनेलच्या विश्वात राहूनही संजय अजून तिथल्या वातावरणाला सरावला नव्हता.

"मग खा! अजून बॉसचे बोलणे खा!" संजयला टोमणा मारून राहुल ऑफिसच्या बाहेर निघून गेला.

खरं तर ही सीताबाई माणदेशकरांची न्यूज स्टोरी संजयच्या हक्काची होती. 

गेल्या महिन्यात त्या दवाखान्यात भरती झाल्या तेव्हाच बॉसनी त्याला बोलावून सांगितलेलं.. "सीताबाईंचं वय झालंय.. त्या केव्हाही जाऊ शकतात! आपल्याला उत्तम संधी आहे.. गमावू नका! सगळी तयारी ठेवा. त्यांच्या निधनाची बातमी आली रे आली की आपण लगेच आपल्याला टेलिकास्ट करायचं आहे!"

तशी संजयनं देखील तयारी सुरू केलेली होतीच.. पण सीताबाई दवाखान्यातून बऱ्या होऊन घरी गेल्या अन् 'ब-बातम्यांचा' चॅनलची हुकमी स्टोरी हुकली.

बरं, कशी कोण जाणे पण संजयनी महत्प्रयासांनी गोळा केलेली माहिती लिक झाली अन् कुठल्या तरी टुकार यू ट्यूब चॅनेलवर ती सीताबाईंच्या हार घातलेल्या फोटोंसह त्यांच्या जिवंतपणीच व्हायरल देखील झाली. संजयची सगळी मेहनत पाण्यात गेली.. अन् बेजबाबदारपणाचा शिक्का त्याच्यावर बसलाच.

रात्री घरी आल्यावरही संजयचा मूड खराबच होता. एकतर संध्या, त्याची बायको घरी आलेली नव्हती.. शिवाय लाईट गेलेले!! संजयनं घरात शिरल्या शिरल्या मेणबत्ती पेटवली अन् तो फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेला.

"संजू, अरे लाईटबिल भरलं नव्हतंस का‌‌ तू?" संध्यानं घरात पाऊल टाकताच संजयला फैलावर घेतलं.. "शेजारच्या काकूंचा फोन आला होता मला.. वीजमंडळवाले कनेक्शन कापून गेलेत!"

"अन् तू हे आत्ता सांगतेस मला!" वॉशरूमच्या बाहेर येता येता संजय उलट संध्यावरच ओरडला.

"मी कित्ती कॉल केलेले तुला! तू उचलला नाहीस माझा कॉल!" संध्यानं म्हटल्याक्षणीच संजयला आठवलं.. " हो, आले होते.. मी नाही उचलले! आधीच बॉसनं डोकं खराब केलेलं.. त्यात तुझी कटकट!! मग नाहीच उचलला फोन!" त्यानं बेफिकीरपणे उत्तर दिलं.. "तू मॅनेज करायला हवं होतंस! तुला माहितीये मला टेन्शन्स असतात!"

"कामं मलाही असतात, संजय!" संध्या आता खवळली. तसा संध्याचा स्वभाव शांत होता. ती सहसा चिडत नाही अन् चिडली की त्याला 'संजू' ऐवजी 'संजय' असं म्हणते असं आता अनुभवानं संजयला लक्षात आलं होतं. 

अर्थात संध्याला राग आला तरी तो फारसा टिकत नाही हा अनुभव देखील संजयला होताच.

संजय अन् संध्या ह्यांचं लव्ह मॅरेज. पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 'ब-बातम्यांचा' ह्या न्यूज चॅनेलनं त्याला पहिली संधी दिली अन् ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त एक कार्यक्रम कव्हर करायला तो 'जिव्हाळा' वृद्धाश्रमात गेला. ह्या वृद्धाश्रमाच्या संचालिका हेमलता प्रधान ह्यांची मुलगी संध्या प्रधान तिथं व्यवस्थापिका म्हणून काम करत होती.

कामानिमित्त जवळपास चारपाच दिवस दोघांचा संपर्क झाला. एकमेकांचे फोन नंबर एकमेकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाले अन् एकमेकांच्या व्हॉट्सअप स्टेटसला दाद देता देता दोघं पर्सनल चॅटिंग कधी करायला लागले ते दोघांनाही कळलं नाही. 

'चट् मंगनी पट् ब्याह' असं दोघांनी चार महिन्यांपूर्वी रजिस्टर लग्न केलं अन् मित्राच्या वन आरके फ्लॅट मध्ये रहायला आले.

"तुला उशीर झाला आज घरी यायला?" संजयनं विषय बदलायचा म्हणून संध्याकडे चौकशी केली.

"अरे, हो! आज पोलिसांनी एका वृद्ध महिलेला आश्रमात आणून सोडलं. काहीच आठवत नाही रे त्या आजींना! स्वतःचं नाव, गाव, पत्ता पण सांगता येत नाही. मराठी कळतंय त्यांना.. पण बोलत काहीच नाहीत त्या! 

पोलिस म्हणालेत तपास करतो म्हणून! तोवर आपल्या आश्रमात ठेवलंय." संध्यानं सांगून टाकलं.

"फोटोबिटो दिला असेलच ना पेपरला?" संजयनं करायची म्हणून चौकशी केली.

"नाही रे! उद्या देऊ.. म्हणजे परवाच्या पेपरला येईल." संध्या सांगू लागली.. "अगदी मी निघत असतानाच त्या आज्जी आल्या.. त्यांनी कित्येक दिवसांत आंघोळ केली नसावी. मग आधी त्यांना आंघोळ घातली.. 

आईची साडी नेसवली.. चहा बिस्कीटं दिलीत.. रात्रपाळीच्या मावशींना सगळं नीट समजावून सांगितलं अन् मग घरी आले!" संध्यानं इत्यंभूत माहिती पुरवली..

"ए, तुला फोटो दाखवू का रे त्या आजींचा?" संध्यानं‌ विचारलं अन् संजयच्या उत्तराची वाट न बघताच आपल्या मोबाईलमधला आजींचा फोटो संजयच्या डोळ्यांसमोर धरला.

"हं.. ठीक आहे!" मोबाईल मधल्या फोटोवर ओझरती नजर टाकत संजय म्हणाला अन् उठूनदेखील गेला.

रात्रभर गर्मी अन् गुणगुणणारे डास ह्यामुळे संजय जागाच होता. संध्या मात्र एव्हढ्या गरमीत देखील शांत झोपली होती. संजयला तिचा हेवा वाटला.

"दिवसभर वृद्धांची देखभाल करण्याचं पुण्याचं काम करते ही!" संजयच्या मनात आलं.. "म्हणूनच बिना पंख्याची इतकी गाढ झोपू शकते!"

विचार करता करता संजयच्या‌ डोळ्यांसमोरून आज आश्रमात दाखल झालेल्या त्या आजींचा चेहरा झळकून गेला. खरंतर त्याने तो फोटो नीट बघितला देखील नव्हता. पण अगदी आत्ता त्याला काहीतरी क्लिक झालं.

संजय ताडकन उठला अन् संध्याचा मोबाईल शोधू लागला. थोडंसं चाचपडल्यावर त्याला तिचा मोबाईल सापडला खरा.. पण त्याची बॅटरी संपलेली!!

संजय पुन्हा पुन्हा त्या आजींचा चेहरा आठवू लागला.. "हा चेहरा आपण कुठे पाहिलाय का? छे! काहीच आठवत नाहीये!" तो मनातल्या मनात चरफडला.

"कालच मी तो चेहरा नीट बघायला हवा होता! निदान संध्याला तो फोटो मला पाठव असं म्हणायला हवं होतं!"

पहाटेचे चार वाजून गेले अन् उघड्या खिडकीतून आलेल्या थंडगार हवेच्या झुळकीने संजयचा देखील डोळा लागला.

सकाळी संजयला जाग आली तेव्हा त्याने सहजच बिछान्यावर बाजूला चाचपडून बघितलं.. संध्या बाजूला नव्हती. त्याने डोळे किलकिले करून बघितलं तेव्हा दिसलं.

उन्हं बरीच वर आलीत.. त्याने घड्याळ बघितलं.. "आठ वाजून गेलेत. आठ पन्नास ची लोकल आहे.. घरून स्टेशनवर पोहोचायला पंधरा मिनिटं.. म्हणजे हातात फक्त पस्तीस मिनिटं आहेत तयारीला!" संजयने मनाशीच हिशेब केला अन् तो ताडकन उठून बसला.

संध्या तयार होऊन निघण्याच्या तयारीत होती. तिला पाहताच संजयला त्या कालच्या आजी आठवल्या.. "संध्या, त्या कालच्या आजींचा फोटो दाखव ना एकदा!" संजयनं संध्याला आठवण दिली.

"अरे, काल रात्रीच माझ्या मोबाईलची बॅटरी संपली. म्हणून सकाळी शेजारी काकूंकडे फोन चार्जिंगला लावलाय.. निघताना तो घेईन आणि आधी बिल भरेन. 

तुला बिल भरल्याची पावती व्हॉट्सअँप करेन. तू इलेक्ट्रिसिटी बोर्डात जाऊन एकदा फॉलोअप घे! लाईट नसणं फार भयंकर आहे रे!" बोलता बोलता संध्या निघाली सुद्धा.

पण जाताना "आजच्या दिवस बाहेरच काहीतरी खाऊन घे!" हे सांगायला विसरली नाही.

संजयने स्वतःचा मोबाईल चेक केला. रात्री त्याचा मोबाईल डाटा सुरूच राहिला असावा. कारण त्याच्या मोबाईलची बॅटरी आता पूर्णपणे डिस्चार्ज झाली होती. 

घरात अजूनही वीज नव्हती.. त्याने चटकन् निर्णय घेतला.. पटकन् अंघोळ करून कपडे अडकवून दाराला कुलूप लावून तो स्टेशनकडे निघाला..

क्रमशः

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)

सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने