ब्रेकिंग न्यूज ( भाग 2 )

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)



ऑफिसात पोहोचून मोबाईल चार्जिंगला लावेपर्यंत दहा वाजून गेले होते. संजय त्याच्या कामात गर्क झाला.. एवढ्यात 'टिंग टिंग' मोबाईलचा नोटिफिकेशन टोन वाजला. संध्याचे चार मेसेजेस होते. 

पहिल्या मेसेजमध्ये लाईट बिल भरल्याची पावती.. दुसऱ्यात इलेक्ट्रिक बोर्डाचा पत्ता.. तिसऱ्यात त्या कालच्या आजींचा फोटो अन् चौथ्या मेसेजमध्ये 'त्या' आजींचं वर्णन अन् त्यांचा ठावठिकाणा समजावा म्हणून 'ब-बातम्यांचा' चॅनेलवर प्रसृत करण्याचं निवेदन होतं.

संजयनं मोबाईलवरचा आजींचा फोटो अनेकदा झूम करून बघितला.. त्यांचं नाक.. डोळे.. जिवणी.. ओठांची ठेवण सगळं पुन्हा पुन्हा निरखून पाहिलं.. 

"आज जरी हा चेहरा अगदी निस्तेज दिसत असला तरी तरुणपणी ह्या आजी नक्कीच 'सुंदर' असल्या पाहिजेत!" संजयच्या मनात आलं.

'सुंदर' हा शब्द मनात येताच संजयला 'सुंदराबाई' आठवल्या.. जुन्या मराठी चित्रपटातील गाजलेली पण आज लोकांच्या विस्मृतीत गेलेली नटी!!

त्यानं लगेच मोबाईल मधला फोटो अन् डिटेल्स न्यूज रीडिंग सेक्शनला‌ ईमेल करायला घेतले. ईमेलचं सेंडचं बटण क्लिक करणार.. इतक्यात त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच क्लिक झालं.

"येस्स्.. गॉट इट!" संजय अगदी 'यूरेका' स्टाईलने ओरडला.. अन् सगळं ऑफिस त्याच्याकडे माना वळवून बघू लागलं. त्याकडे दुर्लक्ष करत त्याने लगेच संध्याला फोन लावला. 

"हॅलो, संध्या.. अगं कालच्या त्या आजींचा फोटो आणि डिटेल्स कुठे पाठवले नाहीत ना अजून??" संजयनं घाईघाईनं विचारलं.

"अरे, तेच काम सुरू आहे.. तुला व्हॉट्सअप केलंय ते आज संध्याकाळी टेलिकास्ट होईल असं बघ! बाकीच्यांना पण पंधरा मिनिटांत जातील डिटेल्स!" संध्यानं माहिती पुरवली.

"थांब जरा! घाई करू नकोस!" संजय म्हणाला तशी संध्या बुचकळ्यात पडली.. "मला वाटतंय की मी ओळखतोय त्यांना!" संजयच्या पुढच्या बोलण्याने ती जास्तच बावचळली.

"तू ओळखतोस?? काय ?? कुठे ?? कसं??" संध्याची अखंड प्रश्नमालिका सुरू झाली.

"मी सगळं सांगतो! तू फक्त जरा धीर धर!! आणि आधी त्या सगळ्या प्रेस नोट्स थांबव!! त्या आजींच्या असहाय्य परिस्थितीचा कुणीही गैरफायदा घेऊ शकतं!" संजयनं तिला समजावण्याचा प्रयत्न केला.


"अरे, पण इन्स्पेक्टर नाईकांना काय सांगू मी?" संध्याने अगतिकपणे विचारलं.


"मी बोलतो इन्स्पेक्टर नाईकांशी! तू फक्त उद्यापर्यंत थांब!" असं म्हणत संजयने घाईघाईने फोन ठेवला सुध्दा!


"मी आज अर्जंट कामासाठी कोल्हापूरला जात आहे.. उद्या रात्री परत येईन!" असा संध्याला एक जुजबी व्हॉट्सअँप मेसेज टाकून संजय त्याच्या कॅमेरामन राहुल पाटीलसह कोल्हापूरला रवाना झाला.

संजय राणे आता एका महत्त्वाच्या स्टोरीवर काम करणार अशी गुप्त बातमी मात्र आज ब-बातम्यांचा' चॅनेलच्या ऑफिसची ब्रेकिंग न्यूज होती.

कोल्हापूरला पोहोचेपर्यंत दिवस मावळलेला होता. "आता सध्या लॉजवर जाऊन आराम करू अन् उद्या कामाला लागू!" पोहोचता पोहोचता कॅमेरामन राहुल पाटीलनं घोषणा केली.

"तू लॉजवर जा! मी येतोच!" असं सांगून संजयनं तडक मराठी चित्रपट संघाचं जुनं संग्रहालय गाठलं. रात्रीचे आठ वाजत आल्याने तिथल्या सुरक्षारक्षकाने त्याला प्रवेश नाकारला खरा.

पण आपलं 'ब-बातम्यांचा' चॅनेलचं ओळखपत्र अन् शंभरची नोट ह्या दोहोंच्या साहाय्याने त्याने संग्रहालयाच्या जुन्या मासिक विभागात प्रवेश मिळवलाच.

मराठी चित्रपट विषयाला वाहिलेली असंख्य जुनी नियतकालिके आतल्या दालनात वर्गवारी करून नीट रचून ठेवलेली होती. एवढ्या उशीरा संजयला बघून तिथल्या व्यवस्थापकाच्या कपाळावर आठ्या पडल्या.

 "आमची घरी जायची वेळ झाली साहेब! आज आधीच उशीर झालाय!" त्याने संजयला बोलूनदेखील दाखवलं.

एक पाचशेची नोट बघितल्यावर व्यवस्थापकाचा चेहरा जरा निवळला अन् त्याने निमूटपणे 1950च्या दशकातील नियतकालिकांचा गठ्ठा संजयसमोर आणून ठेवला.

काही नियतकालिकं चाळल्यानंतर संजयला जे हवं होतं ते गवसलंच. एका मासिकात त्या काळच्या गाजलेल्या अभिनेत्रीचा फोटो होता.

त्याने तो कृष्णधवल फोटो आपल्या मोबाईल मधल्या फोटोशी पुन्हा पुन्हा ताडून पाहिला.. आणि ओळख पटली.. काल वृद्धाश्रमात दाखल झालेल्या आजी म्हणजे जुनी चित्रपट नटी 'सुंदरा'च होती!

सगळ्यात महत्त्वाची बातमी हाती आली म्हटल्यावर संजयला आता घाई करावी लागणार होती. एक तर त्याला संध्याचा भरवसा नव्हता. त्यानं तिला न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रांना बातमी देण्यापासून तात्पुरतं रोखलं खरं.. पण तिचा धडाडीचा स्वभाव तो जाणून होता.

तशीही संध्या आपल्या कामाप्रती अतिशय जागरुक होती. तिचं कर्तव्य अन् जबाबदारी यापुढे बाकी सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत हे ही त्याला माहीत होतं. 

त्यामुळे आता जरी संध्यानं होकार दिला असला तरी कोणत्याही क्षणी ती त्याची सूचना धुडकावून लावू शकेल ह्याचीही त्याला कल्पना होती. 

शिवाय इन्स्पेक्टर नाईक हा माणूस काही हजार-दोन हजार घेऊन शांत बसणारा नाही हे ही त्याला चांगलंच माहित होतं.

"इतक्या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं गेलं तरच पीटर फर्नांडीस म्हणतो तशी ब्रेकिंग स्टोरी मिळू शकते!" संजय स्वतःशीच बोलला अन् कामाला लागला.

त्याने गुगलवर 'सुंदराबाई' हे नाव टाकून सर्च करण्याचा प्रयत्न केला खरा.. पण एक जुनी मराठी नटी ह्या शिवाय त्याच्या हाती काहीच माहिती लागली नाही. 

मग त्याने सुंदराबाईंच्या समकालीन चित्रपट सृष्टीतील मान्यवरांचं साहित्य चाळायला‌ सुरूवात केली.. अन् हळूहळू सुंदराबाई त्याला उलगडू लागल्या.

रात्री उशीरा लॉजवर झोपायला गेल्यावर पीटर फर्नांडीसला उद्या एक ब्रेकिंग स्टोरी घेऊन येतोय असा मेसेज टाकायला संजय विसरला नाही. 

हातोहात त्याने संध्याच्या 'पोचलास का?' 'जेवलास का?' 'कुठे थांबलास?' अशा प्रश्नांना देखील एकत्रित उत्तर देऊन टाकलं अन् तो झोपेच्या आधीन झाला.. इतका की घरी वीज आली असेल का आणि नसेल आली तर संध्या घरी एकटी काय करेल हा विचार देखील त्याच्या मनाला शिवला नाही.

"17 जून 1933 रोजी जन्मलेल्या सुंदराबाईंची आई एक नाचगाणं करणारी नायकीण होती. मातृसत्ताक पद्धती असलेल्या त्यांच्या घरात पुरूष मन रिझवायला येत अन् कधी कधी स्वतःचं शरीरदेखील रिझवून निघून जात. 

अशा संततींचं पालनपोषण करण्यासाठी त्यांच्या आई आणि मावशी नाचगाणी करत अन् पुन्हा संतती तयार होई.. हे दुष्टचक्र पिढ्यन्पिढ्या सुरूच राहिलं!" संजयनं स्क्रिप्ट तयार करायला सुरूवात केली.

हिंदीसोबतच मराठी चित्रपटसृष्टीनं पाय रोवल्यावर लोकांना मनोरंजनाचं नवं साधन मिळालं अन् त्यांचा नाचगाण्याचा परंपरागत व्यवसाय डबघाईस येऊ लागला. 

आता लोकांना सुंदराबाईंच्या घरच्या महिलांकडून मनोरंजनाची नव्हे, तर केवळ शरीराची चटक होती!

सुंदराबाईंचं घराणं जरी नायकीणीचं असलं तरी त्यांच्या घरातील स्त्रिया काही वेश्या नव्हत्या. 

त्यांची अपत्यं जरी अनौरस संबंधातून जन्मली तरी त्या आयुष्यभर एकाच पुरूषाशी‌ एकनिष्ठ रहात. 

त्यामुळे सुंदराबाईंच्या आईला शरीरविक्री मान्य नव्हतीच!

त्यांच्याकडे एक चित्रपट दिग्दर्शक त्यांचं गाणं ऐकायला येत..

 त्यांच्या नजरेत चौदा वर्षांची सुंदरा भरली अन् त्यांनी सुंदराच्या आईला सांगितलं.. "बाई, तुमच्या सुंदराला सिनेमात काम करायला नेतो. महिन्याला दहा रुपये देतो. तुमची ददात मिटेल अन् पोरीला प्रसिद्धी मिळेल. तिचं आयुष्य बनून जाईल."

आपल्या पोरीच्या भविष्याचा विचार करून सुंदराच्या आईनं परवानगी दिली अन् सुंदरा चित्रपट सृष्टीत पदार्पण करती‌ झाली. 

आरस्पानी सौंदर्य, गोड गळा अन् मोहक अदा ह्यामुळे तिचे चित्रपट लोकांना आवडू लागले अन् तिला एका पाठोपाठ एक चित्रपट मिळू लागले.

संजयनं त्याच्या नव्या स्टोरी करिता आवश्यक असलेली प्राथमिक माहिती तर गोळा केली. पण खरी मेख अन् स्टोरी अजून शिल्लक होती. 

सुंदराबाई प्रसिद्धीच्या शिखरावरून विस्मृतीत कशा आणि का गेल्या हे शोधणं संजय साठी जास्त महत्त्वाचं होतं.. अन् हा शोध त्याला टीव्ही चॅनेल जगतात एक मानाचं पान मिळवून देणार होता.

त्यानं संध्याला‌ मागितलेला चोवीस तासांचा वेळ संपत आला होता अन् त्याला मुंबईला परतणं देखील अत्यावश्यक होतं. 

म्हणून कोल्हापूरला आल्यापासून त्याने पहिल्यांदाच संध्याला फोन लावला अन् तो लगेच मुंबईला निघत असल्याचं कळवलं.. शिवाय संध्यानं दोन दिवसांत काही घोळ तर घातला नाहीये ना ह्याचाही कानोसा घेतला.

वृद्धाश्रमात असलेल्या आजींची ओळख पटविण्यासाठी कोणत्याही प्रसिद्धी माध्यमावर काहीही बातमी नाही हे बघून त्याला जरा हायसं वाटलं अन् तो मुंबईला जाणाऱ्या बसमध्ये बसला.


क्रमशः

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)

सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने