अतूट बंधन


©️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे



" हॅलो, "

समोरून क्षीण आवाज ऐकून विभा अस्वस्थ झाली !

"हॅलो ! आप्पा कसे आहात तुम्ही ? इतके का थकल्या सारखे वाटत आहात ?"

" विभा ! विभा, अग काही नाही. दोन दिवस थोडे जागरण झाले , बस !"

"आप्पा कशाला उगाच जागत बसता ? आधी तब्येतीची काळजी घेत चला !"

"अग हो ! किती काळजी करशील?"

"काळजीच वाटते हो आप्पा ! आप्पा, अहो तुम्ही म्हणाला होतात, मी ज्ञानेश्वरी माझ्या हस्तलिखित स्वरूपात जशीच्या तशी लिहून काढणार आहे. तोवर कुणी फोन करू नका . आम्ही पण आपापल्या व्यापात. फार विचार नाही केला.

आप्पा ! आज तुमची खूपच आठवण आलेली. म्हंटल चला ऑनलाईन असलात तर तेवढाच एखादा मेसेज करू !

आप्पा ज्या दिवशी तुम्ही मला फोन केला , नंतर good night चां मेसेज केला तेव्हा पासून ऑनलाईन पण नाही. आज अचानक पाहिले तर लास्ट सीन मध्ये १०वाजून १२ मिनिट. तारीख तीन महिन्या आधीची."

"अग हो, मी लिखाणात इतका तल्लीन झालो की कुणाला फोन नाही की मेसेज नाही. मोबाईल हातात धरलाच नाही.

आज दुपारी बरोबर बारा वाजता लिहून झाली ज्ञानेश्वरी. जरा वेळ झोपलो, आज तुला फोन करणारच होतो.

पण तुझाच आला."

"आप्पा खूप थकल्या सारखा आवाज येतो. आधी डॉक्टर कडे जाऊन या बघू. "

"अग हो बाई, किती काळजी करशील? "

"जेवलात का आप्पा ?"

"नाही अजून ! पण जेवतो थोड्या वेळाने. अग आज मऊ खिचडी खाणार आहे. पोट जरा जडावल्या सारखे वाटते आहे.

आणि हो काळजी करू नको . मी ठणठणीत बरा आहे. "

"बर आप्पा काळजी घ्या. ठेवते फोन. आणि हो आता फोन करत जा ! तुमच्या साधनेच्या वेळा आम्हाला माहीत नाही. त्यामुळे जमेल तसे करा.

निदान एखादा मेसेज तरी! "

"हो विभा, नक्की करतो. तुम्ही पण काळजी घ्या. कोरोना फार वाढत आहे, त्यामुळे जपा."

"हो आप्पा !"

"बाय आप्पा!"

"बाय विभा !"

विभा बाय बोलली खरे. पण का कोण जाणे तिला खूप अस्वस्थ वाटत होते.

आप्पांशी बोलल्यानंतर तिला नीलाताईची खूप आठवण आली.

वर्षापूर्वी नीलाताईचे हृदय विकाराचा झटका येऊन अकस्मात निधन झाले.

त्यांच्या निधनाने आप्पा पार खचून गेले होते.

दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम. रोज संध्याकाळ झाली की आप्पा आणि निलाताई बाहेर एक फेरफटका मारून येणारच. काही झाले तरी त्यात खंड नाही

आप्पाचे वडील वारले, आप्पा दोन दिवस घरात बसले. तिसऱ्या दिवशी म्हणाले, "निला चल बाहेर फिरून येऊ."

नीला ताई म्हणाल्या, "अहो पण लोक काय म्हणतील ? तुम्हाला नाही , मलाच नावे ठेवतील.

म्हणतील तीन दिवस पण यांना दुखवटा पाळता येत नाही? निघाले फिरायला !"

"अग पण त्यांना कुणी सांगितले मला दुःख झाले नाही म्हणून. या दुःखातून बाहेर पडायला बाहेर जाऊ, एक फेरफटका मारू.

आई, मी लहान असतांना हे जग सोडून गेली. मग बाबाच आमची आई झाले. खूप केलंय त्यांनी आमच. त्यांच्या जाण्याचे खूप दुःख झाले. त्यांचा मायेचा हात होता. 

वाटायचे बाबा आहेत घरात मोठे. आता मलाच मोठ व्हावं लागेल . बऱ्याच गोष्टी मी त्यांच्यावर सोपवून मोकळा व्हायचो.

आता त्या आठवणीने खूप त्रास होतोय मला.

तुझी सोबत आहे म्हणून बरे, नाहीतर एकटे एकटे वाटले असते."

आज निलाताई नाहीत, आप्पा खूप एकटे पडले. दोन मुलं , दोन सूना पण एकही धड नाही.

विभाला आप्पांची खूप काळजी वाटायची. सात आठ महिने कसे बसे काढले आणि मग पंढरपूरला जायचा निर्णय घेतला.

इथे आपले कुणीच करणार नाही. त्या परमेश्वराच्या सानिध्यात उर्वरित आयुष्य काढायचे असे मनाशी ठरवून , मुलांना त्यांचा वाटा देऊन आप्पा पंढरपूरला राहायला गेले.

तिथे आप्पांची एक खोली आहे. कित्तेक वेळा आप्पा तिथे जाऊन येऊन राहायचे.

तिकडे राहायला गेल्यावर शेवटचा फोन त्यांनी विभाला केला.

विभा म्हणजे आप्पांची बायको नीला, तिचा भाऊ, विजय ,त्याची बायको.

स्वतःच्या बहिणी प्रमाणे त्यांनी विभावर प्रेम केले.

आप्पा ऐकटे पडले हे त्या नवराबायको दोघांना जाणवत होते. इकडे येऊन राहा म्हणाले ,तर म्हणाले, "दोन मुलं, दोन सूना आहेत मला ,तेव्हा अस बायकोच्या भावाकडे राहिलेलं बरं दिसत का?"

विभा म्हणाली, "आप्पा बहिण मानता न तुम्ही मला?"

"अग हो, म्हणूनच असे बहिणीच्या सासरी येऊन राहायचे नसते. पण हो !

मी अधून मधून येत जाईन. राहणार मात्र नाही!"

विभा म्हणाली, "आप्पा अहो स्वतःच्या बहिणी प्रमाणे माया केली तुम्ही दोघांनी.

सासू सासरे दोन्ही नाही त्यामुळे नीलाताईच सगळ करत होत्या. एक एक गोष्ट शिकवत होत्या.

आप्पा! माझे लग्न झाले तेव्हा मला कंटाळा येऊ नये म्हणून तुम्ही रोज माझ्याघरी येऊन मला तुमच्या सोबत फिरायला घेऊन जायचे.

वाटेत काय काय खावेसे वाटले ते खाऊ घालायचे. सगळे डोहाळे तुम्ही आणि नीला ताईंनी पुरवले."

" विभा आता पुरे ग !

नको मोहपाशात अडकवू. मला लवकरात लवकर नीला कडे जायचे आहे.

त्या आधी हा ज्ञानेश्वरीचा संकल्प पूर्ण करायचा आहे."

आठवणीतून विभा बाहेर आली.

रात्री विभाने आप्पा सोबत झालेले बोलणे विजयला सांगितले.

म्हणाली, "अहो ! का कोण जाणे, मला आप्पा खूप आजारी, थकल्यासारखे वाटत होते."

"अग सतत तीन महिने झाले त्यांचे लिखाण चालू आहे. त्यात व्हॉट्सॲप , कॉल सगळेच बंद. फक्त एकच ध्यास होता त्यामुळे असेल. बोलले ना तुला काळजी करू नको, ठीक आहे म्हणून. इतकी मोठी ज्ञानेश्वरी हस्तलिखित लिहायची काय खायची गोष्ट आहे का?"

"ते ही खरे !

हे आप्पाच करू शकतात.

बर एकदा तुम्ही रात्री फोन करा." आता रोज मेसेज किंवा कॉल करतो बोलले.

रात्री पुन्हा विजयने आप्पांना फोन लावला. आप्पा मी ठीक आहे. फक्त थोडे थकल्या सारखे वाटते इतकंच बोलले.

सकाळी उठल्यावर विभा ने good morning चां मेसेज केला .उत्तर आले नाही .मनाची समजूत घातली, कदाचित साधनेत असेल. आप्पा तासनतास साधना करतात.

रात्री फोन केला, रिंग वाजत होती उचलला नाही. पुन्हा मनाची समजूत घातली सायलेंट मोड वर ठेवला असेल.

पण मनातून खूप अस्वस्थ वाटत होते. विभा देवाला मनोमन म्हणत होती. देवा आप्पांना सांभाळा. तुमचीच सोबत आता.

तो दिवस, एक रात्र तशीच गेली. सकाळी आप्पा खोलीच्या बाहेर का आले नाही म्हणून एकजण बघायला गेला. दाराला आतून कडी होती.

खूप आवाज दिले म्हणाले, मोबाईल वर कॉल केले. आप्पा दरवाजा उघडत नाही पाहून सगळे गोळा झाले. शेवटी दरवाजा तोडायचा निर्णय घेतला.

दरवाजा तोडून आत गेल्यावर सगळेच आ वासून उभे होते.

समोर ज्ञानेश्वरी, त्याच्या पुढे आप्पांनी लिहिलेले हस्तलिखित. मंद समई तेवत होती. आप्पा ध्यान मुद्रेत बसले होते.

आप्पा असा आवाज दिला. उत्तर नाही. मग एकाने त्यांच्या हाताला स्पर्श केला. थंडगार पडले होते. जरा हलवताच आप्पा एका बाजूने कलंडले.

आप्पा या जगात नाही. समजून चुकले. ताबडतोब त्यांचा फोन घेतला. विभाला केलेला कॉल आणि तिलाच केलेले चॅट होते. त्यामुळे तिलाच फोन केला.

आप्पांच्या मोबाईल वरून फोन बघून विभा ने पटकन मोबाईल कानाला लावला. "हॅलो आप्पा !"

समोरून अपरिचित आवाज ऐकून विभा थोडी घाबरली.

समोरचा व्यक्ती म्हणाला, "आप्पा तुमचे कोण ?"

"माझे भाऊ, मग स्वतःला सावरून म्हणाली, माझ्या नंदेचे मिस्टर."

"विभाताई आप्पा या जगात नाही. त्यांना साधना करतांना च अटॅक आलेला . ते ध्यानमुद्रेतच आपल्याला सोडून गेले." .

"काय ?"

"होय विभा ताई!"

"अरे देवा! तरीच कालपासून फोन उचलत नाही ! मेसेज पण पाहिलेला दिसत नाही !

खूप अस्वस्थ वाटते होते."

"विभाताई सावरा स्वतःला. आप्पा गेले याचे दुःख आम्हाला सुध्दा आहे. पण अश्या प्रकारे मरण यावे, ही खूप मोठी गोष्ट आहे.

विठोबाची कृपा म्हणावी !

विभाताई तुम्हाला तर माहित आहे कोरोना खूप वाढला आहे. तेव्हा त्यांचा मुलगा किंवा कोणी येणार असेल तर तसे सांगा !

नाहीतर आम्ही सर्व विधी एकडेच करतो. तुम्ही घरच्यांशी बोलून सांगा."

ताबडतोब विभा ने विजय ला फोन केला. लगोलग आप्पांच्या मुलांना केला.

मुलं म्हणाली, मामी कोरोना खूपच आहे. मामा आणि तू सुध्दा तसे वयस्कर आहात त्यामुळे आम्ही दोघे भाऊ आणि तुझा मुलगा तिघेच जातो. आमची मुलं पण लहान आहेत, त्यामुळे बायकांना घेऊन जात नाही . मामी आम्ही गाडी करतो तू ताबडतोब घरी ये.

आप्पाची मुलं गेली, मंदिरातील विश्वस्त, तसेच सर्वानुमते असे ठरले की आप्पाचां अंतिम संस्कार इथेच करायचा.

तिकडेच सर्व कार्य करून मुले परत आली.

या तीन दिवसात असा एकही दिवस गेला नाही की रात्री वीभाला आप्पा स्वप्नात दिसले नाही.

खूप गप्पा मारत होते. विभा बघ मी बोललो होतो ना !

मला लवकरच नीलाला भेटायला जायचे आहे. बघ मी माझा शब्द खरा केला.

विभा ! आमची मुलं धड नव्हती. पण आम्ही आईवडील म्हणून त्यांचं सगळ नीट करून दिलं.

नीलाला याचेच खूप दुःख व्हायचे. म्हणायची आपले दोन्ही मुलं धड नाही. आपणच सगळ करतो. दोघांना दोन घर घेऊन दिले. त्यांची घरासाठी वणवण नको म्हणून.

पण यांना काहीच वाटत नाही. वरून म्हणतात त्यात काय ?

सगळेच आईवडील करतात .

अहो पण मुलं सुध्दा आईवडील यांच्या साठी काही करतात की नाही ?

मी तिला म्हणायचो जाऊ दे नीला, आपल्या नशिबात पुत्र सुख नाही.

नीला म्हणायची, मला न कधी कधी वाटायचे आपण निपुत्रिक असतो तर किती बरे झाले असते?

मी म्हणायचो, नीला! हे सुध्दा आपल्या नशिबाचे भोग आहेत.

भोगायलाच हवे !

कधीच कुणाचे वाईट केले नाही हो आपण !

मग हे भोग !

तेही आपल्या मुलांकडून!

अग काही हिशोब मागच्या जन्माचे असतात !

खूप समजूत घालत होतो नीलाची. पण ती आतल्या आत कुढत होती. एक दिवस दुपारी चहा ठेवला. दोघांनी चहा घेतला. म्हणाली आज आपण वॉकला नको जाऊ या ! मला जरा थकल्या सारखे वाटते.

पडते मी जरा! छातीला हात लावून चोळत होती.

डाव्या बाजूने ! नीला काय होते? मी सुध्दा चोळत होतो . तोंडातून शब्द निघत नव्हता.

डॉक्टरांना फोन केला, म्हणाले लगेच घेऊन या. नीला ला तसेच सोडून रिक्षा शोधला. नीलाचा हात माझ्या खांद्यावर ठेवला, थंड पडला होता.

डॉक्टर कडे जायची संधी सुध्दा तिने दिली नाही.

जोरात हंबरडा फोडला नीला ! सर्व संपले होते. आता नीला शिवाय जगायचे कसे ? मी तेव्हाच तिला शब्द दिला, नीला एक वर्षाच्या आत मी तुला भेटायला येणार ! खरतर त्याने तेव्हाच तिच्या सोबत बोलावले तरी मी हसत गेलो असतो. पण इतके पुण्य नक्कीच केले नसणार !

नाहीतर इतके भोग भोगावे लागले असते का ?

आप्पा ! खरच असे काही बोलू नका हो!

विभा स्वप्नात आप्पा, आप्पा हाक मारत उठून बसली !

बाजूला झोपलेला विजय तिच्या आवाजाने जागा झाला.

"काय झाले विभा?"

विजयला तिने आपले स्वप्न सांगितले ! स्वप्नातला आप्पांचा संवाद सांगितला.

विजय म्हणाला, "बोलल्या प्रमाणे आप्पा खरच एक वर्षाच्या आत नीला ताईला भेटायला गेले.

खूप प्रेम होते दोघांचे एकमेकांवर. या वयात सुध्दा त्यांना त्यांच्या ओळखीत सगळे love birds म्हणायचे ."

"हो हे अगदी खर !"

" विभा ! तसेच तुझे आणि आप्पांचे नाते सुध्दा अतूट होते.

नीला माझी बहिण होती, रक्ताचे नाते होते आमच्यात. पण तुझे आणि आप्पाचे नाते, आमच्या नात्या पेक्षाही घट्ट, होते. अतूट बंधनात बाधून ठेवले होते तुम्ही एकमेकांना.

म्हणूनच तुझ्या स्वप्नात येऊन तुझ्याशी बोलतात. संवाद साधतात. !"

" खरय हो ! आपले आप्पा होतेच तसे!

खरतर आपली नीलाताई आणि आप्पा खूप प्रेमळ होते. माणसांना अतूट बंधनात बांधून ठेवायची कला अवगत होती त्यांना. पण त्यांचे हे गुण त्यांच्या मुला सुंनांना दिसले नाही या पेक्षा मोठे दुर्दैव नाही. झोप आता.

आप्पा आज पण येतील स्वप्नात. काही तरी सांगायचे राहून गेले असेल तर!!!!"

दुःखाचा विसर पडून आप्पा ,नीलाताईच्या गोड आठवणीत दोघे रमून गेले.

©️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे
    कल्याण


सदर कथा लेखिका सौ. प्रभा कृष्णा निपाणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने