ब्रेकिंग न्यूज ( भाग 4 )

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)



संजय अन् राहुल मुंबईला परतले. "सुंदराबाईंबद्दल काही कळलं का रे?" संध्यानं चौकशी केली.. "ते चौगुले भेटले का?"

"नाही, अजून! त्यांचा नंबर मिळालाय.. पण ते आऊट ऑफ इंडिया आहेत.. पुढील आठवड्यात परत येतील.. मग बोलतो!" संजयनं वेळ मारून नेली.

"डॉक्टर येऊन त्यांचा चेक अप करून गेलेत! वयाच्या मानाने प्रकृती बरी आहे म्हणालेत! पण त्या अजूनही बोलत नाहीत रे! 

तू कुठे बोलू नको म्हणालास.. पण मी सहज म्हणून जुन्या मराठी चित्रपटांचा विषय काढला त्यांच्याजवळ.. अगदी निर्विकार होत्या त्या! 

ओळखीची पुसटशी खूण देखील नव्हती त्यांच्या चेहऱ्यावर! नक्की सुंदराबाईच आहेत ना त्या?" संध्यानं काळजीनं विचारलं.

एक क्षणभर संजय गडबडला. त्याने चेहऱ्याशी चेहरा जुळवून बघितला होता खरा.. पण 'चेहऱ्यासारखे चेहरे असतातच की!' संजयनं मनात आलेला विचार झटकून टाकला अन् तो पुढच्या मोहिमेचा विचार करू लागला.

ज्या मॅनेजरसोबत सुंदराबाई पळून गेल्या तो हैद्राबादचा होता.. म्हणजे आता हैद्राबादला जायला हवं.. तिथे काही धागेदोरे मिळू शकतील.. पण शोधायचं कसं?? 

त्या एका पोस्टकार्ड शिवाय संजयच्या हाती त्या मॅनेजरची काहीच माहिती नव्हती.. अन् अबझारी हुसैन ह्यांच्या पत्रात शिफारस केलेला मुलगा हाच सुंदराबाईंचा मॅनेजर आहे ह्याबाबत स्पष्टता देखील नव्हती.

हातात काहीही माहिती नसताना हैद्राबाद गाठणं धाडसाचं होतं.. बरं संजय ऑफिसातल्या कुणाची मदतदेखील घेऊ शकत नव्हता.

मागे सीताबाई माणदेशकरांच्या वेळेची त्याची सारी मेहनत कुणाच्या तरी हलगर्जीपणामुळे माहिती लीक होऊन वाया गेली होती.

त्यामुळे ह्यावेळी त्याने फक्त कॅमेरामन राहुल पाटील वर विश्वास ठेवला होता..

संजय अन् राहुलनं हैद्राबाद गाठलं खरं.. पण सुरूवात कुठून करावी काहीच कळेना!

संजयने हैद्राबादमधील टेलिफोन नंबर्सची जुनी डिरेक्टरी मिळवली. त्यात अबझारी हुसैन ह्या नावाची जवळपास अकरा नावं होती.

आजच्या जमान्यात लॅंडलाईन फोन कुणी वापरत नाही.. शिवाय साठ वर्षांपूर्वीचा फोन नंबर जसाच्या तसा कायम राहणं कठीण. 

पण संजयने टेलिफोन ऑफिसात देखील तिथल्या शिपायाला शंभरची नोट देऊन आताचे फोन नंबर्स मिळवले अन् त्यातून तीन अबझारी हुसैन ह्यांचे टेलिफोन अजूनही चालू होते.

संजयने एका मागोमाग एक तीनही नंबर डायल केले.. दुसऱ्या वेळेला त्यांना हव्या असलेल्या अबझारी ‌हुसैन ह्यांचा नंबर मिळाला.. अन् दोघे लागलीच दिलेल्या पत्त्यावर पोहोचले.

अबझारी हुसैन बावीस वर्षांपूर्वीच अल्लाला प्यारे झाले होते अन् आता कारभार त्यांच्या मुलाच्या म्हणजे अब्दाली हुसैन ह्यांच्या हातात होता.

अब्दाली हुसैन सत्तरी उलटलेले एक नेक मुसलमान होते. त्यांचा हैदराबादेत पिढीजात हॉटेल व्यवसाय होता.. जो अब्दालींनी त्यांच्या कारकिर्दीत चांगलाच भरभराटीस आणला होता.

त्यांचे अब्बूजान अबझारी हुसैन ह्यांच्या हॉटेलात सुंदराबाईंचा नवरा देशमुख नेहमीच राहायला अन् जेवायला येत असे. त्यातूनच दोघांची ओळख झाली.

सुरूवातीला संजय रिपोर्टर आहे म्हटल्यावर त्यांनी माहिती देण्यास कां कू केलं.. पण सुंदराबाईंच्या आजच्या अवस्थेबद्दल कळताच त्यांनी माहिती द्यायला सहमती दिली.

पण चित्रीकरण होणार नाही.. अन् त्यांचं नाव कुठेही येणार नाही ह्या अटींवर!! अर्थात होकार देण्याशिवाय संजयजवळ काहीच पर्याय नव्हता.

"वह लडका सदाशिव हमारे अब्बूजान के पास काम करता था!" अब्दालींनी सांगायला सुरूवात केली.

"लडका बहुत हूनरबाज था! नकल अच्छी कर लेता था! एक्टिंग का बहुत शौक था उसे! हमारे अब्बूजान की देशमुख से पहचान थी! सो उसके लिये देशमुख को खत लिखा था!"

"फिर?" संजयने विचारलं.

"अब्बूजानने उसे खुद टिकट कराकर कोल्हापूर भेजा! लेकीन शायद बात बनी नहीं! सो उसे अपनी बेगम का मॅनेजर बना दिया था!"

संजयनं सुटकेचा निःश्वास टाकला.. त्याला हवा असणारा मॅनेजर अन् अबझारी हुसैन ह्यांनी शिफारस केलेली व्यक्ती एकच होती!!

"लेकीन वह बदमाश उसकी बेगम को लेकर भागा! देशमुख ने बेगम को तलाक भी नहीं दिया था!" अब्दालींचा गुस्सा सातवे आसमानला पोहोचला होता..

"अब्बूजानने उसे धक्के मारकर घर से बाहर निकाल दिया! फिर वह सुंदरा को लेकर झोपडपट्टीमे रहने लगा! वही उन्होंने निकाह भी किया!"

"उसके बाद क्या हुआ?" संजयची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

"सुंदरा ऐशोआराम की आदी थी! वह बंगले मे रहना चाहती थी! सदाशिव उसे बहलाफुसलाकर यहां लाया था! सो मियांबीबीमें काफी झगडे होते थे!"

"सदाशिव अब शराब भी पिने लगा था और सुंदरा को पीटता भी बहुत था! उसपर शक भी करता था! 

सुंदरा बहुत परेशान थी! उसे छोडकर जाना चाहती थी! लेकीन जाती तो कहॉं जाती? फिर एक दिन सदाशिव शराब पीकर सायकल चला‌ रहा था की गिर पडा! सिर मे गहरी चोट आयी और वह मर गया!"

"यह सब कब हुआ?"

"दोनोके हैद्राबाद आनेके दो साल के अंदर सब कुछ हो गया!"

"फिर सुंदराबाई का क्या हुआ?"

"सदाशिव के जाने का उसे कोई दुख नही था! उसे और एक हमदर्द मिल गया! वह सुंदरा को उस झोपडपट्टीसे निकालकर ले गया!"

"कहॉं?"

अब्दाली मियांनी दोन्ही हातांची ओंजळ करून अल्लाचं स्मरण केलं.

तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटलं.. अन् हताश स्वरात म्हणाले.. "आखरी बार उसे रंडी बाजार मे जिस्म फरोशी करते हुए पाया गया. तब उसका नाम बदल चुका था! वह मायाबाई के नाम से जानी जाने लगी थी!"

संजयला पुढे ऐकवेना. अब्दाली मियांचे आभार मानून ते दोघे लॉजवर परत आले.. दोघेही शॉक मध्येच होते.

मात्र 'सुंदराबाईंची मायाबाई का आणि कशी झाली ही खरी स्टोरी असणार आहे!' हे त्या शॉक मध्ये देखील संजय विसरला नव्हता.

"संजू, अरे.. त्या आज्जी म्हणजे सुंदराबाई नाहीत!" संध्याचा फोन आला.. "माया नगरकर त्यांचं नाव!! आत्ताच मला इन्स्पेक्टर नाईकांचा फोन आला होता.

त्यांनी हातांच्या ठशावरून अन् डोळ्यांच्या बाहुल्यांवरून त्यांचा आधार नंबर मिळवलाय.. आणि त्यांचा पत्ता करीमनगरचा आहे.

एका महिलाश्रमात देखरेखीचं काम पहायच्या त्या! पोलिस बाकी माहिती घेत आहेत.. त्या कशा आणि कुठून निघून गेल्या ह्याचा तपास सुरू आहे!"

हे ऐकून संजय गांगरलाच. सुंदराबाई म्हणजेच मायाबाई हे आत्तापर्यंत नक्की झालं होतं. 

पण अब्दाली मियांनी सांगितल्याप्रमाणे त्या हैद्राबादला वेश्या व्यवसायात होत्या.. मग त्या करीमनगरला महिलाश्रमात केव्हा पोहोचल्या?? 

पोलिस त्यांच्या वर्तमानापर्यंत जाऊन पोहोचले होते. संजय मात्र भूतकाळातच अडकून पडला होता.

खरं तर सुंदराबाईंचं एकूण चारित्र्य अन् भूतकाळ पाहता त्या वेश्यावस्तीत जाऊन राहिल्या ह्यात संजयला काहीच नवल वाटलं नाही. 

त्यांचा जो कुणी 'हमदर्द' होता त्याने नक्कीच त्यांच्या परिस्थितीचा अन् शानशौकीने राहण्याच्या आवडीचा गैरफायदा घेतला असणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नव्हती पण तरीही त्यांची तिथून महिला आश्रमात रवानगी कशी झाली हे एक कोडंच होतं.

जे सोडवायला आता संजयकडे मुळीच वेळ उरला नव्हता.

जर पोलिसांनी मायाबाई नगरकर समजून त्यांची रवानगी पुन्हा महिलाश्रमात केली तर संजयची सगळी मेहनत पुन्हा एकदा पाण्यात गेली असती. 

त्यामुळे "आता घाई करायला हवी!" संजयनं मनाशीच म्हटलं अन् मुंबई गाठली.

संजय अन् राहुल हल्ली कसल्यातरी गुप्त मोहिमेवर असतात हे 'ब-बातम्यांचा' चॅनेलच्या ऑफिसातलं एक उघड गुपित होतं.

आजकाल संध्याला आपला संशय येऊ लागलाय असंही संजयला अधून मधून जाणवत होतं. खरं तर तो संध्याला‌ सुरूवातीपासूनच घाबरत होता. 

ती एक करारी अन् बाणेदार मुलगी होती. खऱ्याला खरं अन् खोट्याला खोटं करणारी! 

त्या मानाने संजयचा स्वभाव गुळमुळीत होता. तो कुणाच्याही दबावाखाली पटकन यायचा.. त्यामुळेच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा तो त्या दोघांच्याही मित्रपरिवारात चर्चेचा विषय ठरला होता.

सुंदराबाईंवर अशी 'ब्रेकिंग न्यूज' करणं संध्याच्या‌ तत्त्वात बसत नव्हतं.. पण संजयचा देखील नाईलाज होता.. त्याला स्पर्धेत टिकायचं होतं.. अन् त्या साठी तो योग्य संधीच्या शोधात होता.


क्रमशः

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)

सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने