साथ ( भाग 7 )

© अपर्णा देशपांडे



सकाळी सानिया येऊन सांगून गेली की आज प्रशांत उर्फ प्रणव काही कामाने शहराबाहेर आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे माधवी तयार झाली आणि निघाली . 

ती प्रशांतच्या म्हणजे नीता पोरवाल च्या घरी गेली . त्याचं कुठलं घर ! ते तर सासरे अजित पोरवाल ह्यांचं घर !

नीता घरीच होती .

" हॅलो , मी माधवी .xxx मोटर्स ची एम्प्लॉयी . "

" ओहह या ना ."

" घरात आणखी कुणी आहे का ? "

" न..नाही ..,का ?"

" स्पष्टच बोलते . मी प्रशांत ची पहिली पत्नी ...कदाचित ! ..म्हणजे माझ्या आधी कुणाशी लग्न झालं असेल तर माहीत नाही ."

निता च्या चेहेऱ्यावर खूप आश्चर्य दिसलं . " आर यु ज्योकिंग ? आय मिन तुम्ही ..प्रशांत ची ..." ती मटकन सोफ्यात बसली .

" तुम्हाला धक्का बसणं स्वाभाविक आहे . मी समजू शकते ."

" अहो ह्या माणसाने मला फसवलंय . मोठी फॅक्टरी , बंगला ,गाड्या असे खोटे ऐश्वर्य दाखवले ...

" मला सगळं माहीत आहे . मी पण ह्यातून गेलीये . फक्त एक सांगा , हा तुमच्याशी कसा वागतो ? काय काम करतो ? ह्याची दारू सुटली का ? "

" दारू तर नाही सुटली , कंपनीत तो नावालाच जातो , बाकी सगळी दलाली करतो . आणि माझ्याशी म्हणाल तर ह्या माणसाला प्रेम माहितीच नाही . फक्त स्वार्थ कळतो . आमच्यात 'तसे 'संबंध पण नाहीत . ...पण तुम्ही आता माझ्याकडे यायचं कारण ? "

" प्रशांत ला माझ्या मुलाची , अर्णव ची कस्टडी हवीय . तो लहान आहे , कायद्याने कस्टडी मिळणार नाही , म्हणून आम्हाला त्रास देतोय . 

त्याने माझ्यावर आरोप लावलाय की मी थोर्ब कडून म्हणजे तुमच्या बत्रा कडून भारी कमिशन घेऊन अकरा मशिन्स ची ऑर्डर दिलीये . ...मला टर्मिनेट केलंय ."

" इतकं सगळं झालं आणि तुम्ही ते सहन करताय , हे भयानक आहे हो . मला जस कळालं की त्याची काहीही प्रॉपर्टी नाही , आम्हाला खोटं सांगितलंय तेव्हाच मी डीव्होर्स घेणार होते , पण त्याला एक संधी द्यावी असं ....

" हीच चूक मी पण केली . ..."

माधवी ने नीताला सगळं सांगितलं .

" मला मूल होणार नाही , आणि बाबा म्हणाले होते की ते नातवाच्या नावाने प्रॉपर्टी करतील ...म्हणून !!! म्हणून हा तुमच्या मुलाच्या मागे लागलाय !!! ओ गॉड !!! आत्ता लक्षात आलं माझ्या हे !!! नाही माधवी .ह्या माणसाला अद्दल घडवायचीच !! "

" आणखी सांगू ? प्रशांत सध्या माझ्या एका मैत्रिणीशी डेट करतोय. प्रणव नाव सांगितलं आहे ."

" आता मला कशाचाच आश्चर्य वाटणार नाही .हा माणूस काहीही करून पैसे लुटायच्या मागे असतो ."

" जर तुम्हालाही असेच वाटत असेल तर आमची साथ द्याल ? "

" मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे . मला ह्या माणसापासून सुटकारा हवा आहे ,पण त्याच्या कृत्याची त्याला शिक्षा झालीच पाहिजे ." नीता म्हणाली .

माधवी तिथून निघाली . नीता बद्दल तिला वाईट वाटत होते . ती थोड्याच अंतरावर होती , इतक्यात फोन आला .

" माधवी , फोन ठेवू नकोस प्लिज , मी प्रशांत बोलतोय . ऐक ! अर्णव तुझ्या सोबत आहे ?"

" नाही , का? हे तू का विचारतोएस ?"

" अर्णव गायब आहे माधवी !! आपला अर्णव . त्या मंदार ने काहीतरी डाव केलाय माधवी , अर्णव गायब आहे ग !"

" काय बोलतोस प्रशांत ? झोपेत आहेस का ? माझा तुझ्यावर विश्वास नाहीये . तू जर अर्णव ला हात जरी लावलास न , तर अतिशय वाईट होईल लक्षात ठेव ."

" विश्वास ठेव माधवी , मी त्याला फोन केला होता , तुमच्या मावशीबाई होत्या .त्या म्हणाल्या , सकाळ पासून मंदार अर्णवला घेउन गेलाय तो अजून आलाच नाही . उलट त्याचाच फोन येऊन गेला , आणि तो रडत होता . तू कुठे आहेस माधवी ? ..हॅलो माधवी ? .."

" मी येतेय , तुझा पत्ता सांग ."

थोड्या वेळातच ती प्रशांत कडे गेली .त्याचे वडील दोन खोल्याच्या घरात वेगळे रहात होते , तिथे गेली .

" आलीस माधवी ? बघ !! नाहीये ना अर्णव !! तुझा हा नवरा अजिबात प्रेम नाही करत त्याच्यावर . बस तुझ्याकडून पैसे उकळायचेत त्याला . 

त्याचा मला फोन आला होता .तुझ्या वडिलांनी बरीच प्रॉपर्टी अर्णव च्या नावाने केलीये , मला माहितेय . म्हणून असा प्लॅन केला त्याने . मला माहितेय त्याची आई गावी असते , तिथे त्याने अर्णव ला ठेवलं असेल . "

" शांत हो प्रशांत . माझं डोकं बधिर झालंय . कुणावर विश्वास ठेवू , कुणावर नाही ? ....मंदार असे करेल असं वाटलं नाही कधीच . पण मला एक सांग , तुला अर्णव नेमका कशासाठी

हवाय ? "

" मी खरं खरं सांगितलं तर तू अर्णव ला देशील माझ्याकडे ? प्लिज माधवी ..."

" त्यात अर्णव चे भले आहे हे पटले तर ...कदाचित ...हो ."

" ऐक !! तुझ्या नंतर तीन चार वर्षातच मी दुसरे लग्न केले ...कुणाशी ? गेस !!

अजित पोरवाल च्या लेकीशी !!! आमचे पितामह ,द ग्रेट , त्यांनी जमवले सगळे .

ते आपली सगळी प्रॉपर्टी नातवाच्या नावे करणार म्हणाले . पण ती नीता !! कुलक्षणी !! ती वांझ निघाली . 

विचार कर .जर त्यांना अर्णव चा लळा लागला तर ? केवढी प्रॉपर्टी माझी ...म्हणजे ...आय मिन ...आपली होऊ शकते . आपण पुन्हा एकत्र येऊ ...माधवी मी एक चांगला नवरा आणि पिता होऊन दाखवीन ..."

प्रशांत अगदी उतावीळ होऊन असे सगळे बोलला . "

" तुझ्या कुठल्याही बोलण्यावर माझा लवकर विश्वास बसणे अवघड आहे , पण सध्या प्रश्न 'माझ्या ' मुलाचा आहे .ह्यात तुझी काही चलाखी निघाली ना ..

" नाही नाही माधवी , मी खरं बोलतोय ."

"ठीक आहे , मी बोलते मंदारशी .त्याला काय हवंय विचारते . 

त्याने पैसे मागितले तर ? माझीतर नोकरी पण गेलीये . तूच काही करू शकतोस का बघ न . पोरवाल सरांची प्रॉपर्टी अर्णव ला मिळाली तर काय बहार येईल . तूच मदत कर प्रशांत आता. "


" तुझे लग्नातले काही दागिने आहेत अजून ,ते मी देऊ शकतो काही मी विकले . आणि माझा बत्राकडे काही हिस्सा आहे ,तो देतो . नीताच्या वडिलांकडून मला मिळालेला हिस्सा आहे , त्यातलीही काही रक्कम देतो . पण अर्णवला परत मिळव . "

"ठीक आहे , ते सगळं मला लवकरात लवकर आणून दे . मी निघते ."

तिने गाडी सुरु केली आणि प्रसन्न हसली .मासा गळाला लागला होता .आता हुक ओढणे बाकी होते .

माधवीने गाडी सरळ समीरच्या घरी नेली . तिथे सानिया अर्णव ला घेऊन आली होती . मुद्दाम अर्णव कडून घरी फोन करवला होता . एक फोन प्रशांत ला पण केला , ज्यात तो म्हणाला "अंकल , माझ्या मम्मीला फोन करा , हेल्प मी अंकल " !

माधवीला पाहून अर्णव धावत आला .

" मम्मा !!"

" ओ माय बेबी !"

" मम्मा , समीर काकांनी मला आईस्क्रीम घेऊन दिलं .."

" थँक्स समीर , सानिया . तुमच्या शिवाय हे ..

" ए मॅड !! डोन्ट बी फॉर्मल !! चल , अजून बरंच काम करायचंय . बाकी सानियाचे आभार मान .पहिल्यांदा माझ्या घरी आलीये ."

" समीर !! सुधर रे बाबा !! " माधवी हसून म्हणाली .

माधवी ने बत्रा ला समीरच्या फोन वरून कॉल केला .

" हॅलो मिस्टर बत्रा , काही लाख कमवायचे असतील तर आज संध्याकाळी पाच वाजता रॉयल कॅफे मध्यें या . "

" कोण बोलतंय ?"

" ते महत्त्वाचे नाही ." तिने फोन कट केला . इकडे मंदार पोलीस स्टेशन मधून बाहेर पडला होता . 'प्रशांत सारखा दारुड्या माणूस , ज्याने दोन दोन लग्न फसवणूकीने केलेत , तो माझ्या मुलाला पळवून न्यायची धमकी देत असतो . ' अशी पोलिसात तक्रार देऊन आला होता तो.

क्रमश:

© अपर्णा देशपांडे


सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने