अबब! साप

© सौ. प्राजक्ता पाटील



शुभम आणि साजिरी एकाच ऑफीसमध्ये कामाला होते. दोघेही इंजिनिअर होते. शुभम हा गावाकडून शहरात आलेला एकदम साधा आणि सुस्वभावी मुलगा होता. 

दिसायला देखणा आणि स्वभावानेही छान असल्यामुळेच प्रत्येक मुलगी शुभमच्या अवतीभोवती घुटमळत होती. पण शुभम मात्र मनापासून साजिरी वर प्रेम करत होता. 

साजिरी खूप श्रीमंत घरातली एकुलती एक कन्या होती. दिसायलाही देखणी आणि सगळ्यांना आपलसं करण्याचा तिचा स्वभाव जणू तिच्या सौंदर्यात भर घालत होता. सुरूवातीला शुभमला काम करताना येणाऱ्या अडचणी साजिरी मुळेच तर दूर झाल्या होत्या. 

अगदी नवीन पदार्थ शुभमसाठी  डब्यात घेऊन येणारी शुभमला आवडीने खाऊ घालणार साजिरी आज मात्र शुभमसाठी गाजराचा हलवा घेऊन आली पण खूपच उदास वाटत होती. 

न राहून शुभम साजिरीला म्हणाला , " एनी प्रॉब्लेम ? का अशी उदास आहेस तु ?"

साजिरी च्या डोळ्यात पाणी तरळलं ती म्हणाली , "काही नाही."

"तुला मी आज ओळखतो का ? काहीतरी झालय पण मला सांगायचं नाही हो ना. मी तुला मनातलं सगळं सांगतो कारण मी तुला माझी जवळची व्यक्ती समजतो पण आता समजलं की आपण एकट्याने जवळची व्यक्ती समजून ती व्यक्ती जवळची होत नाही तर त्या व्यक्तीनेही आपल्याला जवळच समजायला हवं.

नसेल सांगायचं तर मलाही नाही ऐकायच पण हा हलवा नकोय मला ." म्हणून शुभम उभा राहिला. साजिरीने शुभमचा हात पकडला. तसा शुभमचा राग कुठल्या कुठे पळून गेला. 

त्यालाही तिचा स्पर्श खूप आवडला त्याच्या अंगावर रोमांचकारी शहारा आला. त्यानेही साजिरीचा हात आपल्या हातात घेतला. दोघांमधील मैत्रीच प्रेमात रूपांतर झालयं हे दोघांच्या डोळ्यांतून भरभरुन व्यक्त होत होतं.

"काय झालंय ? आता तरी सांगशील का ? तुझ्या डोळ्यात आलेला एकही पाण्याचा थेंब मला नाही पाहवत." शुभम म्हणाला.

"का ?" साजिरी म्हणाली.

म्हणजे ? न सांगता नाही कळणार का तुला भाव माझ्या मनातला ?" शुभम म्हणाला.

"अ, हं." म्हणून साजीरीने लाजून नकारार्थी मान डोलावली.

शुभम म्हणाला, साजिरी मला माहीत आहे की, तुलाही मी आवडतो. पण मी एक खेड्यातून आलेला गरीब घरातला मुलगा आहे. 

तुझं कुटुंब आणि माझं कुटुंब यात खूप फरक आहे पण तुझी साथ असेल तर आपण दोघे मिळून ही दरी मिटवू शकतो. विल यु मॅरी मी ?" शुभम म्हणाला.

साजिरीने शुभमला मिठी मारली आणि आता मात्र ती मोठ्याने रडू लागली.

"काय झालंय साजिरी ?" शुभम तिचे डोळे पुसत म्हणाला.

"माझे बाबा काल माझं त्यांच्या मित्राच्या मुलाशी लग्न जमवून आले आहेत. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मग मी त्याच्याशी कशी लग्न करू ? रडू नको तर मी काय करू ?" साजिरी रडत- रडत म्हणाली.

"मी उद्याच तुझ्या बाबांशी बोलेन आणि त्यांना समजावून सांगेन. आणि तुझे बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतात त्यामुळे ते तुझ्यासाठी तरी मला जावई म्हणून स्वीकारतील अस मला वाटतं." शुभम म्हणाला.

साजिरी च्या बाबांनाही शुभम जावई म्हणून आवडत होता पण साजिरी आणि शुभमने एकमेकांवरील प्रेम मान्य करावे म्हणून त्यांनी साजिरीला खोटी थाप मारली होती. 

हे शुभम आणि साजिरीला कळाल्यावर त्यांच्या आनंदाला उधाण आले होते. कारण साजिरीचे बाबाही शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शुभम शेतकरी कुटुंबातील गरीब मुलगा आहे ही बाब गौण वाटली. 

आणि व्यक्ती प्रयत्नांच्या जोरावर हवे ते मिळवू शकते हा त्यांचा स्वानुभव होता. त्यामुळेच हुशार आणि प्रामाणिक असणाऱ्या शुभमवर त्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला होता. 

रीतसर भाकरी टेकायला आणि शुभम च्या आईवडिलांना भेटायला साजिरीचे बाबा त्याच्या गावी गेले. शुभमनेही घरी पूर्वकल्पना दिली होती. साजिरीच्या बाबांना शुभमच्या आईवडिलांचा स्वभाव खूप आवडला. 

त्यानंतर साजिरीला पाहायला शुभमचे आईवडील शहरात आले होते. आडाणी असूनही साजिरीच्या घरच्यांनी केलेला पाहुणचार बघून शुभम च्या आईवडिलांना सोयरीक आवडली होती. 

आणि साजिरी जेव्हा पाटावर येऊन बसली तेव्हा तिच्या सौंदर्यासोबत तिच्या वर्तनातील नम्रता , आदर  यामुळे तर मुलगी पसंत आहे हे शुभम च्या आईवडिलांनी लगेच सांगून टाकले. लग्नाची तारीख पक्की झाली.

पण परक्या घरची मुलगी घरी आली की , सासरच्या आणि आपली लेक नांदायला गेली की माहेरच्या सगळ्यांना तिची काळजी लागते . 

माहेरच्या मंडळींना सासरी आपली मुलगी सुखात असेल ना ! हा प्रश्न पडतो. जोपर्यंत मुलगी स्वतःहून मी अगदी सुखात आहे हे सांगत नाही तोपर्यंत माहेरच्या सर्वांच्या मनाला घोर लागलेला असतो . 

सासरची मंडळीची नवीन आलेल्या पोरीला आपल्या घरी तिच्या माहेरची उणीव भासू नये म्हणून सतत काळजी वाटत असते.

असच शुभमचं जामदार कुटुंब आणि त्या कुटुंबातील नवीन आलेली सून साजिरी . काहीच दिवसांपूर्वी साजरी आणि शुभम यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला तेव्हा नवी नवरी आणि नवरदेव एक महिना तरी गावी राहावेत अशी आई-बाबांची इच्छा होती . 

म्हणूनच हे जोडपं थोड्या दिवसांसाठी गावीच थांबल. शेतात असलेलं त्यांच घर , आई वडील सोडून जाणं , शुभमच्याही मनाला पटत नव्हतं. पण नोकरी करणं भाग होतं. त्यामुळे थोड्या दिवसानंतर शहरात जावं लागणार हे ठरलेलं होतं.

साजिरी च बालपण हे पूर्णपणे शहरात गेल्यामुळे तिला खेड्यात राहणं थोडंसं जड जात होतं. पण शुभमवर जिवापाड असलेलं प्रेम आणि सासू सासरेही इतकी काळजी घेतात म्हटल्यावर तिचही मन शेतातील घरात रमलं. 

लग्न होऊन पंधरा दिवस झाले . शुभम लग्ना आधीही सुट्टीवर आल्यावर वडिलांना मदत म्हणून शेतात काम करायचा. त्यामुळे आता ही वेळ होता तर तो दररोज वडिलांसोबत शेतात जायचा. 

वडिलांनी "नको येऊस" म्हणून सांगितले, तरीही "त्या काळ्याआईचे उपकार म्हणूनच आबा मी चांगल्या पदावर नोकरी करू शकतोय." हे शुभम आबांनाच ऐकवायचा. पण शेतात गेल्यावर साजिरी ला आवर्जून फोन करायचा.

एके दिवशी शुभमने दुपारी साजिरीला फोन केला आणि बोलत असताना अचानकच साजिरी मोठ्याने किंचाळली . 

तिच्या हातातून फोन खाली पडला. "हॅलो.."  "हॅलो.." म्हणून शुभम साजरी ला बोलू पाहत होता , परंतु समोरून कुठलाही रिप्लाय मिळत नव्हता. 

आता शुभम पुरता घाबरला होता. कारण घराच्या परिसरात नेहमी सापांचं दर्शन घडायचं . शेतकऱ्यांचा मित्र असलेला साप शुभम साठी नवीन नव्हता . साजरी मात्र सापाला बघुन घाबरून जाणार हे शुभमला पक्क ठाऊक होतं. 

शुभमने कुठलाही विचार न करता क्षणार्धात घर गाठलं . शुभमला लगबगीने जाताना पाहून त्यांच्या शेतात काम करणारे रायबा यांनी आबांना शुभम घाईत घरी गेल्याच सांगितलं . मग काय आबा , रायबा हेही घरा कडे धावले.

शुभम घामाघूम झाला होता. त्याने साजिरीला पाहताच मिठी मारली. "तु बरी आहेस ना ? तु का अचानक फोन ठेवलास ? मी किती घाबरलो होतो माहित आहे का तुला? मला वाटलं साप पाहिला की काय तु." शुभम एका दमात सर्व काही बोलून मोकळा झाला.

शुभमची आई मात्र मोठ्याने हसत होती. अरे शुभम ,घाबरू नकोस पोरा. साजिरी च्या अंगावर भिंतीवरील पाल पडली. म्हणून तिने घाबरून मोबाईल खाली फेकला. 

पालीला पाहताच खोलीचा दरवाजा बंद करून साजिरी सासूबाईंना जाऊन बिलगली. 

सासूबाईनाही क्षणभर साप आहे असं वाटलं ,पण साजिरीने सांगितल्यावर कळलं सुनबाई सापाला नाही ,तर पालीला घाबरल्या आहेत म्हणून. 

तिथे आबा आणि रायबा आले होते. पाहतात तर काय आश्चर्य ! शुभम आणि सासु- सुन मोठमोठ्याने हसत होते. हास्यकल्लोळ झाला होता. सासरे बुवा आणि रायबा यांना खरी परिस्थिती समजल्यावर त्या दोघांनाही हसू आवरेना .

दुसऱ्या दिवशी गावातील सासुबाई ची मैत्रीण तिच्या सुनेला घेऊन शेतात आली. ती आवर्जून साप केवढा होता ? अशी चौकशी करू लागली. तेव्हा मात्र सासूबाईंना हसू आवरेना. अगं, साप कुठला पाल होती.

पालीच गुपित माहेरी कळल्यावर आईबाबांनी साजिरीची चांगलीच गंमत केली.

© सौ. प्राजक्ता पाटील

सदर कथा लेखिका सौ. प्राजक्ता पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने