विधवा.. दुखर्‍या अस्तित्वाची घालमेल

© वर्षा पाचारणे





"वधू आणि वर पक्ष दोन्हीकडची पार्टी अगदी जोरदार आहे बरं. हे लग्न तर धूमधडाक्यातच होणार. सगळी सुखं लोणार घेतील मुलीपुढे.तुम्ही त्यांची साखरपुड्याची तयारी पहाल तर डोळे दिपतील तुमचे.

शिवाय घरात इन मीन तीन माणसं. मुलगा त्याचे आई-वडील आणि आता तुमची मुलगी सून म्हणून जाईल ती.आज कालच्या मुलींच्या ज्या काही अपेक्षा असतात त्या सगळ्या या स्थळामध्ये पूर्ण होत आहेत बरं का पाटील साहेब", असं म्हणत मध्यस्थांनी कौतुकाचा वर्षाव करताच मधुराच्या वडिलांनाही आपण भरून पावलो असं वाटलं.

मधुरा ही पाटलांची एकुलती एक कन्या आणि नीरज देखील देशमुखांचा एकुलता एक पुत्र. साखरपुड्याचा थाट इतका जंगी होता की त्यावरूनच लग्नाची कल्पना येत होती. सगळा नुसता राजेशाही थाट होता. 

साखरपुड्यानंतर मधुरा आणि नीरज दोघांचीही फोनाफोनी चालू झाली. एकमेकांशी तासन् तास गप्पा मारूनही मन मात्र भरत नव्हतं. भेटीगाठी होत नसल्या, तरी या गप्पांमधून मात्र ते रोज एकमेकांना नव्याने भेटत होते. 

नीरजच्या वडिलांचा मोठा व्यवसाय असल्याने तोच व्यवसाय पुढे आणखी भरभराटीस आणायचा, या उद्देशाने नीरजने व्यवसायात पाऊल टाकले. कमी वयातच त्याला नाव, प्रसिद्धी देखील मिळाली. 

अनेक बड्या आसामींच्या मुलींची स्थळंही त्याला सांगून आली, परंतु त्याला मात्र स्वभावाने साधी भोळी, त्याला समजून घेणारी, पैशापेक्षा जास्त नात्यांना किंमत देणारी अशी जोडीदार हवी होती. 

मधुरा अगदी या अपेक्षांना साजेशीच होती आणि त्यामुळेच दोघांनाही पहिल्या भेटीतच हाच आपला जोडीदार असावा असं वाटून गेलं.

लग्नाचा दिवस उजाडला. इतके वर्ष जपलेलं हे कन्यारत्न आज अखेर परकं होतंय, या विचाराने आई-बाबा गहिवरले. डोळे अविरत पाझरत होते, पण आनंदाश्रूच ते.

आपली मुलगी सुखात नांदणार, या विचाराने काळीज अगदी भरून आलं होतं. तिघांनीही लग्नमंडपात जाण्याआधी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

"चला नवरी बाई, जास्त रडाल तर डोळे सुजतील आणि मग जावई म्हणतील माझ्या बायकोला रडवलं तुम्ही", असं म्हणत बाबांनी वातावरण हलकं केलं.. तिघेही एकदा खळखळून हसले.. 

गाडीत बसताना लहानपणापासून ती ज्या अंगणात बागडली, त्या अंगणाला आणि त्या घराला मधुराने एकवार डोळे भरून पाहिलं.. पण मन घट्ट करत एका नव्या वाटेवर पाऊल ठेवायचे, या विचाराने तिने स्वतःला सावरले.

मंडपात पोहोचताच वर पक्षाची मंडळी येण्यासाठी अजून थोडा अवकाश होता. तोपर्यंत वधूकडच्या मंडळींची चहा नाष्ट्याची उत्तम सोय करून देण्यात आली होती.

साधारण तास-दीड तासाने वर पक्षाची मंडळी आली. इतरांचा डोळा चुकवुन मधुरा आणि नीरज इशाऱ्यांनी एकमेकांशी बोलत होते..

'अरे किती हा उशीर!', असं नजरेनेच मधुराने खुणावताच त्याने नेहमीप्रमाणे तिच्या रागावर औषध म्हणून एक फ्लाईंग किस देताच ती मात्र लाजून चूर झाली.. सगळ्यांच्या उपस्थितीत ही प्रेमाची लग्नगाठ बांधली गेली. माप ओलांडून मधुरा देशमुखांच्या घरची सून झाली.

नीरजने छान गोव्याला हनिमून ट्रिप प्लॅन केली होती. उधाणलेला समुद्र, मावळता सूर्य, सोबतीला जोडीदाराचा बाहुपाश, याशिवाय आणखी सुख ते काय! 

या सुखाच्या लहरी अनुभवताना मधुराचं अगदी फुलपाखरु झालं होतं रात्री त्याच्या घट्ट मिठीत विसावताना देहभान विसरली होती. 

एकमेकांशी पूर्ण एकरूप होताना तो नवा अनुभव तिच्या अंगावर शहारे आणत होता. त्याच्या जवळीकीने ती आणखी मोहरून जात होती.. एकमेकांच्या सोबतीने हनिमूनचे आठ दिवस कुठल्याकुठे भुरकन उडून गेले.

घरी आल्यावर नीरज पुन्हा एकदा त्याच्या व्यवसायात मग्न झाला. रोज संध्याकाळी त्याची वाट पाहणं, हा आता तिचा नित्यक्रम बनला होता. 

सकाळी नीरज कामाला निघाला, की तिला असं वाटायचं ,'कधी एकदा संध्याकाळ होते आणि तो पुन्हा घरी येतो'. लग्नाला कुठे तीन महिने पूर्ण होत नाहीत, तर तिला गोड बातमी समजली. 

सासरी, माहेरी आनंदाला उधाण आलं. लाडक्या सुनेचं किती कोड कौतुक करावं असं सासु-सासर्‍यांना झालं होतं. माहेरी देखील आई बाबांना आपल्या लेकीला असं सुखात नांदताना पाहून आभाळ ठेंगणं झालं होतं.

सातव्या महिन्यात आई बाबा मधुराला घेऊन घरी आले. नीरजचा दिवस कामात व्यस्त असल्याने त्याला फारसा फरक पडत नव्हता. परंतु मधुराला मात्र माहेरी अजिबातच करमत नव्हतं. पटकन दिवस सरावेत आणि बाळाला घेऊन पुन्हा लवकर सासरी परतावं, असं तिला वाटत होतं. 

रोज रात्री नीरजचा फोन येताच ती हळवी व्हायची.. दिवस आई बाबांसोबत गप्पा मारत, मजा मस्ती करत गेला, तरी या आठवणींच्या रात्री मात्र तिला खायला उठायच्या.. 

दिवसभराचा सारा ताण नीरजच्या मिठीत विसावताच कुठच्या कुठे पळायचा, हे आठवुन तिचे डोळे पाणावायचे.. त्याच्या एका आश्वासक आधाराने जगातली सारी टेन्शन्स दूर होतात, असं तिला क्षणाक्षणाला वाटायचं.

मधुराने नऊ महिने पूर्ण होताच गोंडस मुलाला जन्म दिला. गोरंपान, काळ्याभोर डोळ्यांचं, कुरळ्या केसांचं हे गुलाबी गोंडस गाठोडं अगदी दोन्ही घरचं एकुलतं एक नातवंडं. 

डिलिव्हरी नंतर तीन महिने व्यवस्थित आराम करून मग मधुरा सासरी आली. बोल बोल म्हणता बाळ आता वर्षाचं झालं होतं. उद्या त्याचा पहिला वाढदिवस होता.

पहिला वाढदिवस असला तरी तो अगदी घरगुती पद्धतीने केवळ दोन्हीकडच्या आजी-आजोबांच्या उपस्थितीत पार पडेल, असे ठरल्याने फार काही धामधूम नव्हती. 

दोन्ही आजी-आजोबांनी आणि आई-बाबांनी थीम नुसार कुठले कपडे घालायचे, हे ठरवून घेतले होते. मधुराने फिकट निळ्या रंगाचा वन पीस आणि नीरज आणि छोट्या अभिषेकला त्याच रंगाचा कुर्ता शिवून घेतला होता.

नीरज येईपर्यंत मधुराने बाळाला झोपवले होते. दिवसभर बाळामुळे होणाऱ्या दमणुकीमुळे रात्री कधी एकदा बिछान्यावर अंग टेकते, असं तिला वाटायचं. आजही ती असंच नीरज यायची वाट पाहत होती.

पण म्हणतात ना अति सुखाला कोणाची तरी दृष्ट लागते, तसंच काहीसं झालं. घरातील लँडलाईनवर एवढ्या रात्री फोन खणाणताच साऱ्यांच्याच मनात धस्स झालं.

नीरजचा भीषण अपघात झाला होता. गाडीचा चेंदामेंदा झाला होता आणि नीरज जागीच मरण पावला होता. अपघात इतका भीषण होता, की घरचे नीरजचे अंत्यदर्शनही घेऊ शकले नाही. 

आपला जोडीदार असा अचानक सोडून गेला, हा धक्का इतका जबरदस्त होता की मधुरा तीन-चार महिने अगदी सुन्न झाली होती.

ती एकटीच कुठेतरी तंद्री लावून बसलेली असायची. जणू जिवंत असूनही ती एखाद्या प्रेतासारखी झाली होती. सासू-सासरे स्वतःचं आभाळाएवढं दुःख बाजूला ठेवून बाळाकडे पाहून दिवस कंठत होते.

मधुराला त्यांनी या अवस्थेतून बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. चार-पाच महिन्यांनी मधुरा कुठे थोडीफार नॉर्मल वागू लागली. सतत नीरजच्या फोटोपुढे बसून ,'का रे तू मला सोडून गेलास', म्हणत त्याचा फोटो हातात घेऊन गदागदा हलवत होती.

 'मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही', असे म्हणून तिने एक-दोनदा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला.. आई वडील आणि सासू सासरे तिची ही अवस्था पाहून आतल्याआत जळत होते.. 

नुकतंच लग्नाला दीड वर्ष झालेल्या आपल्या मुलीची ही अवस्था पाहून आई-वडिलांना दुःख अनावर होत होतं.. सासू-सासर्‍यांनाही तिचं अंधारात गेलेले भविष्य पाहून अतोनात यातना होत होत्या.

मधुराचा मुलगा श्री आता तीन वर्षाचा झाला होता. 'सुनेने आपल्यात गुंतून न पडता स्वतःच्या भविष्याचा विचार करावा', या हेतूने आज सासू-सासर्‍यांनी तिला पुढ्यात बसवून शेवटी मनावर दगड ठेवून विषय काढलाच.

"मधुरा, बेटा नीरजला जाऊन तीन वर्ष झाली. ही भळभळती जखम घेऊन केवळ आम्हां म्हातारा म्हातारीसाठी तू तुझं आयुष्य असं एकाकी घालवू नये, एवढंच वाटतं आम्हांला. 

तुझ्या आई-बाबांबरोबर आमचं बोलणं झालंय. तू नव्याने आयुष्य जगण्याचा निर्णय घ्यावा असं आम्हांला सगळ्यांनाच वाटतंय.. इतक्‍या कमी वयात मिळालेलं हे दुःख असंच कुरवाळत बसशील तर आयुष्यात पुढे आलेला एकाकीपणा हा न संपणारा असेल.. त्यामुळे तू एकदा विचार कर".
असं म्हणत सासू-सासर्‍यांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवताच इतके वर्ष कोंडलेले अश्रू अगदी महापुरासारखे वाहू लागले.

"बाबा, मला जोडीदार नकोय.. माझ्या आयुष्यातलं सौभाग्याचं स्थान म्हणून मी केवळ आणि केवळ नीरजचाच विचार केला होता आणि तो आयुष्यात तसाच राहील. खंत फक्त याच गोष्टीची, की नियतीने आमची अशी ताटातूट केली.

 यापुढे माझ्या अश्रूंमुळे कधीही तुम्हाला यातना होणार नाहीत याची मी काळजी घेईल. तुम्ही आजवर मला लेकीप्रमाणे जीव लावला आणि आजही तुमचं काळीज माझ्यासाठी तीळतीळ तुटताना रोज पाहते आहे मी.. पण आता मी जीवात जीव असेपर्यंत फक्त तुमची लेक बनूनच राहील.. नीरज असता तर त्याने ज्या काही जबाबदाऱ्या पार पाडल्या असत्या त्या साऱ्या मी पार पाडेल".

मधुराने असे म्हणताच ज्या गोष्टीची सासू-सासर्‍यांना आधीच कल्पना होती, तीच गोष्ट घडल्याने दोघेही गहिवरले.. 'सुनेच्या रूपात खऱ्या अर्थाने आपल्याला देवाने एक लेक दिली आहे याचा आनंद मानावा, की या लेकीचं दुःख दिसत असूनही आपण काहीच करू शकत नाही याबद्दल खंत बाळगावी', अशी दोघांचीही अवस्था झाली होती.

वर्षांमागून वर्ष सरत होती. मधुराच्या मुलाचं नुकतंच शिक्षण पूर्ण झालं होतं. पैश्यापाण्याची कसलीच चिंता नसल्याने आर्थिक परिस्थितीची चणचण कधीच नव्हती. मधुराने अगदी नीरजप्रमाणेच व्यवसायात आता उत्तम नाव कमावलं होतं. 

सासू-सासर्‍यांची वृद्धापकाळात सेवा केली होती.. आज ते दोघेही हयात नव्हते, परंतु त्यांचे आशीर्वाद मात्र सतत तिच्या पाठीशी होते. आई-वडील देखील हयात नसल्याने आता तिला सासर माहेरचं असं कोणीच नव्हतं. 

मधुराच्या मुलाने आता आईबरोबर व्यवसायात पाऊल टाकले होतं. त्यामुळे हळूहळू सारा भार त्याच्यावर सोपवून आपण मोकळं व्हायचं, असा विचार आजकाल मधुराच्या मनात घोळू लागला होता.

मधुरा देशमुख हे व्यावसायिक क्षेत्रातील एक मोठं प्रस्थ असल्याने आज तिला एका महिला आधार आश्रमाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते.

तिथे जाताच मधुराच्या लक्षात आलं, की तिथल्या अनेक महिला या विधवा आहेत, तर कोणी घटस्फोटित आहेत.. मधुराने प्रमुख पाहुणे म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून त्यांची चौकशी करताच त्या साऱ्याजणी थोड्याफार मोकळेपणाने बोलू लागल्या.

त्यातील सुमन नावाची महिला मात्र अगदी कोपऱ्यात शांत बसून होती.

मधुराने तिच्याजवळ जाऊन तिचा हात हातात घेऊन विचारले, "ताई तुम्ही एवढ्या शांत का आहात?.. इतर महिलांप्रमाणे आपलं मन मोकळं का नाही करत?"

त्यावर सुमन म्हणाली ,"तुम्ही मोठी माणसं.. तुम्हाला नाही कळायचे आमचे दुःख.. विधवेला फक्त आर्थिक चणचण किंवा दोन वेळच्या खाण्याचा प्रश्न नसतो. तिला गरज असते आपल्या माणसाची.

 विधवा म्हणून हिणवताना किंवा कुठल्याही शुभ प्रसंगी त्या स्त्रीला डावलताना समाजाला मिळणारे सुख हे असुरी असते, असेच मला वाटते.. विधवापण कोणी मागून घेत नाही. नशिबात नसतं म्हणून जोडीदार दुरावला जातो.

त्या दुःखातून सावरताना ती महिला किती गोष्टींना सामोरी जात असते, हे फक्त तिचं तिलाच माहीत असतं. दिवस कसाही सरतो, पण रात्री आपला हक्काचा, जीवाभावाचा जोडीदार घरी येणार, आपण त्याच्यासोबत वेळ घालवणार आयुष्याची स्वप्नं पाहणार आणि त्याच्या बाहुपाशात विसावताना पुन्हा नव्या आशेने जगण्याकडे पाहणार, हे सगळं केवळ त्याच्या जाण्याने तिथल्या तिथे खुंटतं.

हे महिला आश्रम माझ्या सासू-सासर्‍यांचे असल्याने मी त्यांना इथे त्यांच्या कामात मदत करते. खरंतर माझे सासू-सासरे म्हणजे देव माणसं.. अगदी लेकीप्रमाणे जीव लावला दोघांनीही मला.

 पण सगळ्या सुखापेक्षा स्त्रीला हवाहवासा असतो तो तिचा हक्काचा जोडीदार.. जो प्रत्येक संकटात, सुखदुःखात तिच्या खांद्यावर हात ठेवून आश्वासक आधार देईल", असं म्हणून सुमन दुसरीकडे तोंड करून आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करू लागली.. मधुराला तर जणू आरशात स्वतःचाच जीवन प्रवास दिसावा, असं वाटून गेलं.

"मला का नाही समजणार तुझी घालमेल?..जे तू बोलते आहेस, ते मी गेले पंचवीस वर्ष जगते आहे. त्या दुखाची झळ मला कळणार नाही असं का वाटतं तुला? त्या आगीत मी स्वतः होरपळून निघाले आहे..

आज माझ्याकडे सगळी सुखं आहेत. पैश्यापाण्याची कमतरता कधीच नव्हती. पदरी एक समंजस, गुणी मुलगा देखील आहे, पण याsss.. या साऱ्यापेक्षा मला कायमच हवाहवासा होता, तो माझ्या निरजचा बाहुपाश.

काही गोष्टी बोलून दाखवता येत नाहीत, परंतु म्हणून त्यांची तीव्रता कमी होते असं मुळीच नाही. आजही मला असं वाटतं, कुठून तरी नीरजने धावत येऊन मला मिठी मारावी आणि त्याच्या बाहुपाशात विसावताच तो क्षण माझ्या आयुष्यातला शेवटचा क्षण ठरावा"

इतका वेळ मधुराच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि टिकलीला तिचे सौभाग्य मानणारी सुमन मधुराच्या या बोलण्याने गहिवरली. 

तिने मधुराला घट्ट मिठी मारली. इतके वर्ष मनात असलेलं आपलं दुःख कोणाला तरी कळतंय, या विचाराने दोघीही एकमेकींच्या मिठीत मायेनं विसावल्या होत्या.

जगासमोर न व्यक्त होणारी एक सल अलगदपणे कोणीतरी जाणावी, या एका भावनेनेच दोघीही अश्रु वर्षावात चिंब भिजल्या होत्या.. अन् त्या अश्रुधारांनी आयुष्यभरासाठी, एक मैत्रीचा बंध नकळतपणे विणला गेला होता.

'वाचकहो, समाजात वावरताना अनेकदा विधवांना डावललं जातं.. एखादी स्त्री विधवा आहे, म्हणजे जणू तिचीच काहीतरी चूक आहे, याप्रमाणे तिला दिलेली वागणूक ही लज्जास्पद आहे. 

हळदीकुंकू समारंभ, लग्न समारंभ, डोहाळेजेवण अशा शुभ प्रसंगी स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू असल्याप्रमाणे वागताना पाहून मनात प्रश्न येतो, या 'स्त्रियांनी जोडीदार गमावला, यात त्यांची काय चूक? जो तो आपल्या नशिबात असेल तेवढेच आयुष्य जगतो. 

पण काही कुटुंबांमध्ये त्या व्यक्तीच्या मृत्यूलाही त्याच्या पत्नीलाच जबाबदार ठरवतात, तेव्हा तिच्या मनावर होणारा दुःखाचा घाला समजून घेण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. 

आधीच खचलेली 'ती', समाजाच्या अशा वागण्याने जिवंतपणीच मरण यातना भोगत असते. अशा विधवा माता भगिनींची मनाची घालमेल व्यक्त करण्याचा हा थोडासा प्रयत्न.

© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने