वेडी आशा

© उज्वला सबनवीस




"वेडी ,वेडी ".मुलं एका सुरात ओरडत होती. तशी म्हातारी चिडली, चवताळून ओरडली,
" म्या येडी न्हाय रे, नाह्यच म्या येडी."

मुलं अजुनच चेकाळली. पाठी वरचे दप्तर सावरत जोरात ओरडले." उठ, त्या जागे वरुन ". जोरात गलका करु लागली.

"उठ " हा शब्द ऐकल्यावर मात्र म्हातारीने मोठा दगड उचलला, अन डोळे गरगरा फिरवत बसल्या जागे वरुन दगडं फेकायला लागली. मग मात्र , सगळे मुलं हसत हसत लांब पळाली.

बस स्टँड वरचा, हा रोजचाच सीन असल्या मुळे जाणारे येणारे त्या कडे दुर्लक्ष करत होते.

बडबड करत म्हातारीने दगडं बाजुला टाकली .अन बसलेल्या जागे वरुन हात फिरवत राह्यली.

तिची अवस्था पार दयनीय झाली होती. कित्येक दिवसात पोटभर जेवण नव्हतं, अंगाला पाणी नव्हतं.

केसांच्या जटा झाल्या होत्या, अंगावरचे कपडे जागोजागी फाटले होते. ओरडुन, ओरडुन ती थकली होती. तिने अगतिक पणे आपली मान गुडघ्यात खुपसली. 

आता तर , तिच्या डोळ्यातले अश्रुही आटले होते. भुकेची जाणीव झाल्यावर , तिने मान वर करुन बघितलं. बाजुला जर्मनच्या ताटलीत कोणी तरी , वडापाव टाकला ब्रेड ,भात होता .

त्यावर माशा घोंगावत होत्या. तिला एकदम तिची नीट नेटकी ,स्वच्छ झोपडी आठवली. अन घरधन्या चा आवाज, कानात घुमायला लागला.

"काशे , ओ काशे ."

ती , काशी , हे स्वताःचं नावही विसरली होती. पुन्हा पुन्हा धन्याचा आवाज कानात गुंजायला लागला. तिने दचकुन इकडे तिकडे बघितले. पण घरधनी कुठे दिसला नाही. 

ती कावरी बावरी झाली. कुठे गेलात तुम्ही घरधनी. मी पार एकटी पडली आहे हो. मला का नाही नेलं तुमच्या संगती तुम्ही .

लयी चांगले व्हता तुमी धनी . तिच्या डोळ्या समोर, उंचपुरा, कष्टाने रापलेला आपला घरधनी, गोविंदा उभा राह्यला , अन ते दृष्यही उभं राह्यलं.

लग्ना नंतर काशीची हनुवटी धरुन तो म्हणाला होता .,

"काशे, मी लयी प्रेम करन तुह्या वर. कदीबी तुला अंतर देनार नाही .अन कुटं सोडुन बी जानार नाही. पैका नसन आपल्या जवळ पन , आपुन संसार फुलवु, लेकराईले साळा सिकवु. तुला बी कष्ट करा लागतीन. दे वचन .कोंच्या बी परिस्थितीत माही साथ सोडणार नाही तू ."

घरधन्याच्या हातात काशीने लाजत आपला गोरापान हात दिला होता . 

अन नंतर काशीने सतत घरधन्याची साथ दिली होती . पन असा अर्ध्यात हात सोडतं व्हय कुनी, अन आता कुटं गेलं व तुमचं वचन . तिच्या मनाने आक्रोश मांडला .

तिचं लक्ष पुन्हा त्या घोंघावणा-या माश्यां कडे गेलं . तिला शिसारी आली . तिचं काम अतिशय स्वच्छ होतं . तिची तशी कुडाचीच झोपडी होती. अन खाली मातीच होती . पण ती फार निगुतिने स्वच्छ ठेवायची आपली झोपडी . 

घरधन्याला फारच कौतुक होतं माझ्या स्वच्छतेचं. त्याचं बोलणं आठवलं , तसं त्याही परिस्थितीत तिच्या चेह-यावर हसु उमटलं. अन घरधन्याचं वाक्य कानात गुंजारव करायला लागलं , अन आपला पुर्ण जीवन पटच ती मोठ्या आवडीने आठवायला लागली.

काशीला चार बहिणी. घरी अत्यंत गरीबी. पण कुठे दुःखाला, वा असमाधानाला थारा नव्हता त्यांच्या घरात .

तिचे वडिल माळकरी होते.कायम विठ्ठलाचं नाव तोंडात. दरवर्षी वारी . अशा भक्तिमय वातावरणात काशी लहानाची मोठी झाली. 

आई कडुन कोंड्याचा मांडा करायला शिकली. घर कसं चालवायचं हे शिकली . वारीला जातानांच , गोविंदाच्या वडिलांशी ओळख झाली . अन सोयरिक जुळुन आली. 

काशी अन गोविंदाचं लग्न आनंदात पार पडलं. गोविंदाला आई नव्हती. काशीने सगळी जबाबदारी लगेच अंगावर घेतली. झोपडी तर एवढी स्वच्छ सारवायची की गोविंदा गमतीने म्हणायचा सुद्धा ,

" काशे , कितीक सारवते बाप्पा घर. त्या शेनाने सारवलेल्या जिमीनीत सोताचा चेहरा पायतं का ?."

"अवो शेनात कसा चेहरा दिसन काय तरीच बा तुमचं". काशी हसत म्हणाली.

"का माहित बा ,आता तू एवढं सोच्छ सारवतं.दिसन बी एकांद येळला ".घरधनी मिस्कील आवाजात बोलला.

आता मात्र काशी लाजली ,अन खुदकन हसत आत गेली . 

आपला घरधनी मनाने खरच खुपच चांगला आहे. वस्तीतले लोकं व्यसनी, बायका पोरांना मारहाण . 

पण गोविंदा एकदम सरळ मार्गी होता . देवभोळा होता . कधी चढ्या आवाजात बोलणे नाही. तिला फार अभिमान होता आपल्या संसाराचा .

तिने आपल्या झोपडी वर नजर फिरवली ,तिची झोपडी होतीच आरशावानी सोच्छ.कोनाची नजर न लागो माय माह्या संसाराले ,तिने चुलीतला कोळसा घेउन भाबडेपणाने कोप-यात एक ठिपका लावला. अन मुलां साठी सैपाकाला लागली.

तिचा संसार होताच तसा सुबक, निटनेटका. दोन गोजिरवाणी लेकरं होती .तिचा घरधनी , गोविंदा रिक्शा चालवुन संसाराचा गाडा हाकत होता .

दोन्ही लेक शाळा शिकत होती.ते दोघं जरी अशिक्षित होती , पण मुलांना खुप शिकवायचं मोठे हपिसर करायचं हे त्या दोघांनी पाह्यलेलं सुंदर स्वप्न होतं. 

ते पुर्ण करण्याचे त्यांचे मनापासुन प्रयत्न चालु होते. काशीची पतिला पुर्ण साथ होती ती पण मोल मजुरी करायची. पै ,पै साठवत होती . 

लेकरांची हौस मौज करत होते . जे आपल्याला नाही मिळालं ते आपल्या लेकरांना मिळायला पाहिजे .हा त्यांनी दोघांनी ध्यासच घेतला होता. अन आम्हाला यात यश दे .हे रोज पांडुरंगाला विनवतही होते .

माणुस ठरवतो एक अन होतं भलतच.नियतीच्या मनात काही वेगळच होतं. माणुस नियतीच्या हातातली कठपुतळी आहे, हे त्या सुरेख कुटुंबाच्या बाबतीत खरं ठरलं.

जीवनाच्या या सारीपाटावर फासे कधी सरळ पडतात , तर कधी उलटे पडतात .यालाच कोणी नशीब म्हणतं तर कोणी भाग्य .

काशी अन गोविंदा यांच्यावर भाग्य रुसलं . या सरळ मार्गी जोडप्याच्या संसारात दुर्दैवाने प्रवेश केला.

शाळेतुन येतांना , लहान्याला साप चावला , तो उपचारा अभावी मरण पावला . 

हा काशी आणि गोविंदा साठी फार मोठा धक्का होता . गोविंदा पार कोलमडुन गेला . 

आपण त्याला लवकर दवाखान्यात न्यायला पाहिजे होतं . ही त्याने रट लावली . सगळे समजुत घालुन थकले . जन्म मृत्यु आपल्या हातात नाही . हे ही त्याला सांगितलं . 

पण तो काही भानावर येत नव्हता . काशी थोरल्या कडे आणि घरधन्या कडे बघत दुखावर मात करण्याचा प्रयत्न करत होती . पण गोविंदा मात्र या दुःखातुन बाहेर यायला तयार नव्हता . 

अन त्याची हाय खाउन , गोविंदानेही अखेर इहलोकीची आपली यात्रा संपवली. 

काशीवर दुःखाचा डोंगर कोसळला. या दोन घटना वेगात घडल्या .अन स्वर्गासारख्या झोपडीची पार रया गेली . 

काशीचं न स्वताः कडे लक्ष होते , ना थोरल्या कडे. विठ्ठलाच्या मुर्तीवर धुळीचे पुटं चढले. जमीनीचे पोपडे उडाले. काशी दिवस रात्र नुसतीच बसुन राह्यची.

वस्तीतले कोणी, कोणी जेवण आणुन देत होते ,तेच मायलेक खायचे गोविंदाने माणसे खुप जमवले होते. 

काशी कामावरही जात नव्हती . एवढी गोरी गोमटी काशी पार काळवंडुन गेली लोकं आता या माय लेकांना टाळायला लागले .कोण किती दिवस जेवण आणणार. थोरल्याची आबाळ व्हायला लागली.

" माय व लय भुक लागली हाय मला ,खायला काय बी नाय घरात ". थोरल्याचे हे शब्द काशीचे काळीज चिरीत गेले .

तिने त्याच्या कडे पाह्यले, पोराची पार रया गेली होती. तिला, तिने अन घरधन्याने मिळुन पाह्यलेले स्वप्न आठवले. अन ती धैर्याने उभी राह्यली .

थोरल्याला मोप शिकवुन हपिसर बनवायचच , हा चंगच तिने बांधला. 

तिने पुन्हा आपल्या झोपडीला तर लख्खं केलच , पण आपलं मनही लख्खं घासुन पुसुन काढलं. ती पुन्हा कामावर जायला लागली. 

अजुन नवीन कामे धरली. कष्ट करत राह्यली . पोटाला खात नव्हती ,पण थोरल्याच्या शाळेची फी भरत होती .

थोरला पुन्हा शाळेत जायला लागला. तो फार हुषार होता ,भराभर पास होत गेला. ती कष्ट करत राह्यली ,तो शिकत गेला .

शहरात गेला ,तिकडेच नोकरी पण चांगली लागली त्याला , आता विठ्ठल तिला साथ देत होता .कष्टाचं चिज झालं. म्हणुन वस्तीतले काशीचं खुप कौतुक करायचे. 

 तिलाही अभिमान होता आपल्या लेकाचा . थोरला सुटीत घरी आला की , प्रेमाने मायला म्हणायचा ,

"माय आता तू कष्ट नको करु ,दे सोडून काम चल माझ्या बरोबर ".

" न्हाय रं लेकरा म्या हतच बरी हाय ,थकली की मंग नेजो मले ".काशी आपला सुरकुतलेला हात मायेने त्याच्या चेह-यावर फिरवत म्हणायची.

हळुहळु थोरल्याचं गावाला येणं कमी झालं. वर्षातुन कधीमधी यायचा , विचारपुस केली की चाल्ला ,सुट्टीच नाही म्हणायचा .

त्याला शहराची हवा लागली .असं आता वस्तीतले लोक म्हणायला लागले . पण काशी फार भोळी होती .ती म्हणायची , मोठा हापिसर हाय माहा लेवक , त्याले येळच नाय मिळत .

थोरला गावाला आला की , आपल्या शहरातल्या घराचं वर्णन करायचा .काशी हरखुन जायची . कधी घर पाहते असं तिला व्हायचं .

पण थोरला मायला शहरात न्यायचं नाव घेत नव्हता. काशीला आता त्याच्या लग्नाचे वेध लागले. पण थोरला मानत नव्हता, त्याला आता खेड्यातल्या मुलीशी लग्न करायचे नव्हते. 

काशीला आता घरधन्याची आठवण येत होती. लयी खुश झाला असता . थोरल्याच्या अंगाला हळद लागलेली पाहुन. तिच्या कानात सनईचे मंजुळ स्वर घुमत होते .

थोरला एकदा घाईघाईत आला ,अन म्हणाला ,

" माय मी लग्न केलं ".

"बाप्पा ,सुनेला तर आनायचं रे दाकवायला ".काशी दुखावल्या आवाजात बोलली. 'मले तुला हळद लागलेली पाह्यची व्हती रे लेकरा ."

मायच्या या वाक्यावर , थोरला थोडा गलबलला. पण आपली आधुनिक , श्रीमंत बायको त्याच्या डोळ्या समोर आली . एकलुती एक, मोठ्या इस्टेटीची भावी वारसदार .ती काय मायला , अन या झोपडीला स्विकारणार होती .

तो घाईघाईत म्हणाला , "अगं ती थोरा मोठ्याची लेक आहे,ती नाही राहणार ,आपल्या झोपडीत .पुढल्या वेळेस मी तुलाच नेईन ". मायला शहराचं स्वप्न दाखवुन तो निघुन गेला.

काशी आता रोज थोरल्याची वाट बघायला लागली.

"आता म्या सहरात जानार,लयी मोठा झालाय माहा थोरला लेक .बोलतो बी किती सुद्धं."

दिवस निघुन जात होते,थोरल्याचा पत्ता नव्हता.काशी आता खुप थकली होती ,काम पण होत नव्हतं ,खाणं पिणं कमी झालं होतं ,पण आशा सुटली नव्हती.

रोज वेशीवर, बस मधुन थोरला उतरतो का हे बघायला जायची.

थोरला ,धुमकेतु सारखा अवतरला एक दिवस ,आता मात्र काशी मागे लागली , मले ने तुह्या संगट,.असा हट्टच धरला. 

थोरल्याच्या अलिशान घरात फाटक्या माय साठी जागा नव्हती .तो न्यायला कचरत होता.पण आता वस्तीतले लोकही त्याच्या मागे लागले, मायला ने म्हणुन. 

सरपंचाने तर निर्वाणीचे सांगितले . तू नाही नेलं ,तर आम्ही आणुन घालु तिला .अरे आता पांग फेड तुझ्या माउलीचे . खुप कष्ट घेतले आहेत तिने तुझ्यासाठी लेकरा . 

 त्यांच्या दबावा पुढे त्याचं काही चाललं नाही. त्याला होकार द्यावाच लागला .पण त्याला बेचैनी आली होती. 

त्याच्या आधुनिक आणि अलिशान घरात माय विसंगत होती . त्याला आपल्या जन्मदात्रीसाठी , श्रीमंत जीवन संगिनीला ,आता गमवायचं नव्हतं . 

काय करावं , कसा सोडवावा हा पेच . शेवटी प्रेमावर , जिव्हाळ्यावर , पैशाने विजय मिळवला. त्याने कसेबसे मायला घेतले . अन गावक-यांचा निरोप घेतला. 

काशी अत्यंत खुशीत होती .तिचा कष्टाने रापलेला चेहरा खुशीने डवरला होता. आपल्या खोल गेलेल्या डोळ्याने ती टुकटुक सगळी कडे बघत होती .

लांबच्या शहरात थोरला राहत होता. स्टँडवर मायलेक उतरले. ती गर्दी बघुन काशी भांबावली,पटकन तिने लेकाचा हात धरला, तो खरबरीत हात ,त्याने झटकुन टाकला.

कोरड्या आवाजात म्हणाला , "तू इथे बस,याच जागी थांब, मी येतो आत्ता. काही खायला आणतो तुझ्यासाठी."

 काशीने निरागसतेने मान हलवली .अन निमूटपणे ती तिथे बसली .

काशी ,थोरला , गेला त्या दिशेला तोंड करुन बसली . थोरला लांब लांब चालला होता . 

अन त्या क्षणी अन तिथेच जागेवरच माणुसकीचा , आणि जिव्हाळ्याचा मृत्यु झाला .

काशी बिचारी एकटक त्याच दिशेला बघत राह्यली न जाणो , आपली नजर हटली, अन तो हरवला तर .

एक तास ,दोन तास झाले,पुर्ण दिवस गेला ,पण लेक काही आला नाही. 

लेकाने आपल्या मायला वा-यावर सोडुन दिले . तो परतुन पुन्हा आला नाही. त्याला यायचेच नव्हते .येण्यासाठी तो गेला नव्हता. 

अन मग ती तिची जागा झाली .ती तिथुन हलायची नाही. 

मग कोणी तरी तिला पांघरायला दिले,कोणी खायला टाकायचे.

हिचं आपलं वाट पाहणं अविरत सुरुच होतं . आशा चिवट होती.

माहा लेक येइन,अन मले नेइल.कोणी इथुन उठ म्हटलं, की मात्र ती चवताळायची. 

मग लोक तिला वेडी म्हणु लागले,अन तिचं,"वेडी" हे नामकरण झालं.

म्या शायनी हाय येडी न्हाय,असं ती कळवळुन म्हणायची.पण यावर कोणी विश्वास ठेवत नाही , मुलांचं , तिला चिडवणं थांबत नाही , थोरला गेला त्या दिशेला एकटक बघणं ,हे काशी थांबवत नाही .एका वेड्या आशेने तिला या जागेवर बांधुन ठेवलय. ती संपेल, तेंव्हाच ती आशा पण संपेल.

© उज्वला सबनवीस

सदर कथा लेखिका उज्वला सबनवीस यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने