'निर्लज्ज' नव्हे... ती तर मिणमिणता काजवा

© वर्षा पाचारणे



सुशीला, महादू आणि त्यांची दोन लेकरं, सुमन आणि गणेश असं छोटंसं कुटुंब. सुशीला आणि महादूचं लग्न झालं. भाडेतत्त्वावर असलेल्या दहा बाय दहाच्या खोलीत त्यांचा संसार सुरू झाला. 

सुरुवातीला कंत्राटी कामगार असलेल्या महादूची वर्षभरातच नोकरी गेली आणि अचानक आलेल्या या संकटामुळे हे नवविवाहित दांपत्य गांगरून गेलं. 

भावी आयुष्याची सुखाची स्वप्नं बघणाऱ्या दाम्पत्याचं आर्थिक परिस्थिती डगमगल्याने गणितंच कोलमडलं..

एकमेकांना सावरत या जोडप्याने कष्टाचा मार्ग स्वीकारला... सुशीलाने ओळखी करून दोन घरच्या पोळ्या लाटण्याचे काम मिळवले.. आणि महादूने सोन्यावर कर्ज घेऊन रिक्षा विकत घेतली.

आता रोज भल्या पहाटे महादू रिक्षा चालवायला बाहेर पडायचा, ते दुपारी जेवायलाच घरी यायचा.. पुन्हा तासाभरात निघून जायचा, ते रात्री दहा वाजता घर गाठायचा.

थोड्याच दिवसात पुन्हा थोडे स्थिरस्थावर झाल्यावर गोड बातमी समजली.

त्यांना जुळी मुलं झाली.. एक मुलगा आणि एक मुलगी ... आनंदसोहळा साजरा करताना पुन्हा दिवसरात्र आर्थिक ओढाताण होऊ लागली..

दिवसागणिक लेकरं मोठी होऊ लागली.. आई बापाच्या कष्टाची कामं बघतच लहानाची मोठी झालेली ही भावंडं अगदी सामंजस्य घेऊनच जन्माला आली असावी, असं वाटायचं.

कधी कसला हट्ट नाही की कधी कसली हौसमौज नाही.. मोठ्या शाळांचा खर्च परवडणार नाही, म्हणून महादूने त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत भरती केले.. पण 'चिखलात कमळ उगवते', म्हणतात ना अगदी तसंच दोघांचीही शैक्षणिक प्रगती अगदी वाखाणण्याजोगी होती..

गावात सातवीपर्यंतचे शिक्षण घेऊन सुमन आणि गणेश आता तालुक्याच्या शाळेत जाऊन शिकू लागले.

सुमन आणि गणेश यंदा दहावीला असल्याने पुस्तकांचा खर्च अधिक येईल, या विचाराने महादू आणि सुशीलाचे कष्ट देखील वाढले होते..

पहाटे पाच वाजता या कुटुंबाचा दिवस सुरू व्हायचा. घरचा सगळा स्वयंपाक, मुलांची शाळेची आवराआवर करून सुशीला आता पोळ्या लाटण्याबरोबरच इतरांकडे जाऊन घरकामही करत होती.

हातात पैसे मिळत असल्याने आर्थिक चणचण भासत नव्हती.. त्यामुळे कामाने येणारा शरीराचा थकवा जास्त जाणवत नव्हता.

महादूने देखील इतर मुलांना शाळेत सोडण्याचे काम सुरू केले होते. मुलं शिकून मोठी होतील, नोकरीधंद्याला लागतील, या एकाच सोनेरी स्वप्नासाठी दिवस-रात्र आई बाबा झटत होते.

लक्ष्मीचा नसला तरी सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या लेकरांना आई बाबांच्या कष्टाची जाण होती.. 'कितीही संकटे आली तरीही, आयुष्यात शिक्षण सोडायचं नाही', हा एकच ध्यास सुमन आणि गणेशने घेतला होता..

भाड्याच्या खोलीत राहत असल्याने दर महिन्याला ठराविक भाड्याची रक्कम देणे गरजेचे होते. परंतु यंदा शिक्षणाला तालुक्याला जाण्यासाठी, वह्या पुस्तकांसाठी आणि इतर शालेय सामानासाठी दोघांचाही जास्त खर्च असल्याने चार महिन्यांचे घरभाडे थकले होते.

घर मालकाला घर भाडे वाढवून हवे होते आणि त्यामुळेच वाढलेल्या वादाने भडकलेल्या मालकाने या कुटुंबाला घराबाहेर काढले.

गाव भागात अनेक वर्ष रहात असलेल्या महादूला कधीही घर भाड्याने घेण्यासाठी कागदपत्रांची गरज भासली नव्हती. ओळखीनेच त्याची कामं होऊन जायची.

 त्यामुळे अचानक मालकाने घराबाहेर हुसकल्यावर कुठल्याही प्रकारचे कागदपत्र सोबत नसल्याने त्याला निमूटपणे घराबाहेर पडणे भागच होते..

आता प्रश्न होता, पुढे काय?... 'संसार उघड्यावर पडला तरी बेहत्तर, पण लेकरांचं शिक्षण थांबता कामा नये', या विचाराने महादूने रात्रीत एका आड माळरानावर सारं सामान हलवलं.

झोपडीवजा घरकुल साकारलं. ती रात्र मात्र सगळ्यांनी उपाशीतापाशी आणि अश्रु वर्षावात भिजून, एकमेकाला बिलगुन काढली.

या गोष्टीचा आई बाबांना धक्का बसला असला, तरीही मुलांच्या समोर हसत मुखाने ते परिस्थितीला सामोरे जात होते..

दहावीची परीक्षा आता तोंडावर येऊन ठेपली होती.. दिवस-रात्र अंधाराकोंधारात जागून मुलं अभ्यास करत होती.. कधी कंदीलातलं रॉकेल संपायचं.. तर कधी मच्छरांचा उपद्रव.

रात्री आई-बाबा आणि गणेश गाढ झोपी गेल्यानंतरही सुमन मात्र उशिरापर्यंत कधी मेणबत्तीच्या प्रकाशात तर कधी रस्त्याच्या कडेला बसून अभ्यास करायची..

आज दहावीचा पहिला पेपर होता. उघड्यावर पडलेल्या सामानातही गणपती बाप्पा मात्र फोटोचा रूपाने सोबत होता. 

सकाळी लवकर उठून दोन्ही मुलांनी गणपती बाप्पाला नमस्कार करुन आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. बाबांनी दोन्ही मुलांना एसटी स्टँड पर्यंत रिक्षाने सोडले..

"चांगला लिहा पोरांनो पेपर... ती एकच काय ती आशा, आपल्यासारख्या गरिबाला".. असं म्हणून बाबा पुन्हा निघून गेले. मुलं पेपर संपवून घरी आली ती अगदी आनंदातच.. दोघांनाही आजची परीक्षा अगदी सोपी गेली होती.. 'पण गरीबांच्या नशिबात सुखंच नसतं की काय कोण जाणे?'..

दुसऱ्या दिवशी महादू सकाळी नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन बाहेर पडला, तो परत आलाच नाही... आली ती त्याच्या अपघाताची वार्ता. 

महादू टँकरच्या धडकेत जागीच मृत्युमुखी पडला होता.. बातमी समजल्यापासून आई धाय मोकलून रडत होती.. गणेश तर बधीर झाल्यासारखा झाला होता.

रात्री उशिरा गावकऱ्यांच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात आले... पण मध्यरात्रीपर्यंत ही मायलेकरं एकमेकाला कवटाळून टाहो फोडत होती.

त्या स्मशानातली भयाण शांतता अन् प्रेताच्या धुरामुळे झाकोळलेलं वातावरण आणखी भीतीदायक वाटत होतं.. शेवटी पहाटे तिघेही आपल्या माळरानावरच्या झोपड्यात परतले..

सुमन मात्र मनाचा संयम बाळगत, आजचा पेपर द्यायचा असल्याने पुन्हा थोडा वेळ पुस्तक समोर घेऊन बसली.

 पुस्तकातली अक्षरं पाणावलेल्या डोळ्यांमुळे समोर थैमान घालत होती.. दुःख अनावर होत होतं.. 'जाऊदे ते शिक्षण', म्हणत एक मन निराशेने ग्रासलं होतं, तर एक मन आपल्या बाबांची इतके वर्ष पाहिलेली स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी डोकं वर काढत होतं.

अन् शेवटी जिद्दीने दुःखावर मात केली.. गणेश काही केल्या घराबाहेर पडणार नव्हता... 'पुढच्या वर्षी परीक्षा देईन', म्हणून सतत बाबांच्या आठवणीत रडत होता...

सुमन मात्र आज, आहे त्या अवतारात परीक्षेसाठी बाहेर पडली.

रात्रीच वडिलांच्या चीतेला अग्नी दिलेली ही धगधगती मशाल आज त्याच दुःखाच्या डोंगराला हिमतीने पेटवायला सज्ज झाली होती.

 परीक्षा केंद्रात पोहोचताच तिचा अवतार बघून सगळे विद्यार्थी नाक मुरडत होते.. अंगाला रात्रीच्या स्मशानातील राखेचा वास येत होता.. एक मोठ्ठा आवंढा गिळत तिने धीर एकवटून परीक्षा दिली..

इकडे घरी बायका आईचे सांत्वन करण्यासाठी येत होत्या.. पण बाहेर पडताना सुमन परीक्षेला गेली कळताच कुजबुजत बाहेर पडत होत्या...

'काय निर्लज्ज पोरगी आहे ही! बाप गेल्याचं दुःख म्हणून नाही.. तो पोरासारखा पोरगा आईजवळ घरात बसलाय आणि ही मोठे दिवे लावणार शिकून'... या आणि अश्या कितीतरी कुजबुजण्याने आईचे सांत्वन होण्याऐवजी दुःखात भरच पडत होती..

येता जाता रस्त्याने देखील लोकांच्या नजरा आणि त्यामागची अव्यक्त टोचणी सुमनला कळत होती... जीवघेणी वाटत होती... पण पर्याय नव्हता.

भविष्य बदलायचं असेल तर लोकांची पर्वा करून चालणार नाही', हे तिने जाणले होते..

दोन महिन्यांनी रिझल्ट लागला... सुमन जिल्ह्यात सर्वप्रथम आली होती.अभिनंदनाचा वर्षाव होत होता.

तिची आर्थिक परिस्थिती बघून श्रीमंत लोक शिक्षणाचा पुढचा खर्च करण्याची तयारी दाखवत होते.

 पत्रकार मुलाखत घेत होते... आधी कुजबुजणारे लोक स्वतः पेढे घेऊन येत होते.. पण या साऱ्या सोहळ्याने देखील सुमन मात्र अजिबात हुरळून जात नव्हती.

कारण या कौतुक सोहळ्यासाठी जिवाचं रान केलेला बाबा आज तिच्यासोबत नव्हता... आई शरीराने सोबत असली तरी कोमात गेलेल्या व्यक्ती प्रमाणे तिची सुन्न अवस्था झाली होती.

त्या सोहळ्यात उत्सवमूर्ती असलेली सुमन मात्र अकाली आलेल्या भावी जबाबदारीच्या ओझ्याने वाकली असली तरी डगमगली नव्हती.

उलट पुन्हा एकदा नव्या जोमाने ती आता पुढच्या प्रवासाची तयारी करण्यासाठी कंबर कसून सज्ज झाली होती. तिच्या लाडक्या भावाच्या शिक्षणासाठी आणि आईला आयुष्यात पुन्हा खंबीरपणे उभे करण्यासाठी.


वाचकहो, दहावीचे वर्ष म्हटले की सामान्य ते श्रीमंत कुटुंबात अभ्यासाचे दडपण, मुलांना धाक, ढीगभर पैसे खर्च करून लावलेल्या शिकवण्या, आणि मुलांवर अपेक्षांचे ओझे लादले जाते.

 साऱ्या गोष्टी आयत्या मिळूनही मुलं अनेकदा संधीचं सोनं करत नाहीत.. पण त्याचवेळी गरीबाची लेकरं मात्र कुठल्याही आधाराशिवाय, अतिशय खडतर परिस्थितीचा सामना करत, सुख दुःखाच्या नव्हे तर केवळ खाचखळग्यांच्या हिंदोळ्यावर झुलत अशक्य असे यश मेहनतीच्या जोरावर खेचून आणतात.

परिस्थितीला न जुमानता सोबतचा काळोखा परिसर आपल्या कर्तुत्वाने उजळून टाकणाऱ्या अश्या चिमुरड्या मिणमिणत्या काजव्यांना ही कथा समर्पित.


© वर्षा पाचारणे

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने