हिमनग

 © धनश्री दाबके




दुपारचे तीन ते चार साडेचार हा वेळ म्हणजे वंदनाचा स्वत:साठी राखून ठेवलेला असा खास वेळ. रोज ह्या वेळात ती फक्त तिला आवडणार्‍या गोष्टीच करायची. 

म्हणजे कधी वाचन तर कधी विणकाम तर कधी आवडती गाणी ऐकणे तर कधी कविता करणे. 

मुद्दाम सवड काढून वंदना स्वत:ची आवड जपायची. 

चांगली शिकली सवरलेली असूनही वंदनाने ऋषीच्या जन्मानंतर नोकरी सोडून फक्त घर सांभाळायचा निर्णय घेतला होता. 

मोठ्या आदित्यच्या वेळी सासूबाई असल्याने तिला ऑफिसला जातांना आदित्यची चिंता नसायची. त्या खूप प्रेमाने त्याला सांभाळायच्या. 

आदित्यही मुळात शांत आणि समंजस होता. आजीजवळ अगदी मजेत राहायचा. पण ऋषी मात्र वळवळ्या आणि भयंकर रडका. 

त्यात सासूबाईंचही वय वाढलेलं. वंदनाचं बाळंतपण करण्यातच त्यांची दमछाक झालेली. 

मग दोघा दोघांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून ऑफिसला जाणे काही वंदनाला पटेना.

मदतीसाठी बाई किंवा पाळणाघर शोधता आलं असतं पण त्यापेक्षा स्वत:च घरी राहाणं वंदनाने जास्त पसंत केलं. 

परागनेही तिचा हा निर्णय लगेच मान्य केला. 

‘आपली आर्थिक घडी थोडी बदलली तरी चालेल. मी जास्त मेहेनत घेईन पण तू मन मारून नोकरी कर असं मी कधीच म्हणणार नाही’ असं म्हणत त्याने वंदनाला पूर्ण पाठिंबा दिला.

मग वंदनाने नोकरी सोडून मुलांचं करण्यात आणि घर सांभाळण्यात स्वत:ला गुंतवून घेतलं.

पण तरीही फक्त घरकाम किंवा टीव्ही सिरिअल्स ह्यात तिचं मन कधीच रमलं नाही. ती स्वत:चे छंदही आवडीने जपू लागली. 

बघता बघता ऋषी पहिलीत जाऊ लागला आणि कोरोनाचे ऑनलाईन जग सुरू झाले. 

परागचे ऑफिस, आदित्य ऋषीच्या शाळा सगळं घरातूनच वेगवेगळ्या खोल्यांमधे भरू लागलं आणि वंदनाच्या रूटीनचं तंत्रच बदलून गेलं. 

संपूर्ण दिवस तिघांच्या वेळा सांभाळण्यात आणि घरकामात जाऊ लागला. पण तरी जेव्हा जमेल तेव्हा हा दुपारचा एक तास मात्र वंदना वाचनात घालवू लागली.

आजही ती अशीच मृणालताईने नुकतीच लिहिलेली अगदी ताजी ताजी कथा वाचत बसली होती. मृणाल म्हणजे वंदनाची मोठी बहिण. अगदी पट्टीची लेखिका. 

साध्या सोप्या भाषेत सहज पण इतकं अफलातून लिहायची की सगळं जसच्या तसं वाचणार्‍याच्या डोळ्यांसमोर उभं राहायचं. वाचक अगदी गुंतून जायचे तिच्या कथांमधे. 

वंदना लहानपणापासूनच मृणालाताईच्या लिखाणाची फॅन होती. 

मृणालही लिहेलेली प्रत्येक कथा सगळ्यात आधी वंदनाला पाठवायची आणि वंदना तिला अगदी मनापासून वाचून खरीखुरी प्रतिक्रिया द्यायची. 

मृणालताईची आजची कथा तर फारच भाऊक करणारी होती. वाचता वाचता सारखे वंदनाचे डोळे भरून येत होते. 

मृणालच्या कथेने वंदनाने मनात खोलवर गाडून टाकलेली एक जखम आज परत भळभळली होती. 

राहून राहून तिला स्वप्नाची खूप आठवण येत होती आणि ती परत परत डोळे पुसत होती. 

सून्नपणे वंदना सोफ्यावर बसून होती. तिच्या मनातल्या वादळात इतकी गुंतली होती की पराग कधी तिच्या बाजूला येऊन उभा राहिला तेही तिला समजले नाही.

हातात मोबाईल धरून डोळे पुसणार्या वंदनाला पाहून परागला एकदम धस्स झालं.

“काय झालं ग वंदना?” असं विचारत तो तिच्याजवळ येऊन बसला.

“अरे..काही नाही रे.. असंच. मृणालताईच्या कथेने रडवलं रे. ते जाऊ दे. तुझा कॉल आज लवकर संपला का? मी करते चहा” परागला चारच्या ठोक्याला चहा लागतो या विचाराने वंदना चहा करायला आत गेली.

“हो चहा हवा होता म्ह्णूनच आलो होतो मी. पण तुला रडतांना पाहिलं आणि घाबरलो. 

तू पण ना वेडीच आहेस अगदी. म्हणजे मान्य आहे की मृणालताईचे शब्द मनाचा तळ गाठतात पण तरी इतकं कुणी रडतं का ग?” पराग तिच्या मागे स्वैपाकघरात जात म्हणाला.

“ हो रे. ती लिहितेच तसं. पण आज तिच्या लिखाणापेक्षा माझ्या मनातला अपराधीपणा जास्त पॉवरफुल ठरला. स्वत:च्याच नजरेतून उतरल्यासारखं झालं मला.”

“ हो? एवढं काय आहे त्या कथेत ते सांग तरी मला.”

“ सांगेन रे नंतर. तुला कॉल असेल ना आता परत?”

“ हो कॉल आहेच पण आत्ता तुझ्याशी बोलणं मला जास्त महत्वाचं वाटतय. तुला इथे एकटीला सोडून जाण्यापेक्षा मी कॉल कॅन्सल करेन. थांब एक मिनिट. मी आलोच “ असं म्हणून वंदना चहा गाळेपर्यंत पराग जाऊन ऑफिसमधून टाईम प्लीज घेऊन आला सुद्धा.

“ हा. सांग आता. कसलं गिल्ट?”

“अरे काही नाही रे. आजच्या कथेत मृणालताईने एका लवकर वैधव्य आलेल्या व एकटीनेच नेटाने मुलांचं सगळं निभावलेल्या स्त्रीच्या एकटेपणाची कहाणी रेखाटली आहे. 

मुलं मोठी होऊन त्यांच्या संसारात रमतात, नातवंडही मोठी होतात आणि मग तिला तिचं एकटेपण खायला उठतं. 

लाफ्टर क्लब, महिलामंडळं, भिशी,मैत्रीणी, भजनाचा क्लास या सगळ्यांत ती दिवस घालवत असली तरी तिची संध्याकाळ मात्र सरता सरत नसते. 

कोणा तरी समवयस्काची सोबत हवीशी वाटायला लागते जी तिच्या सुदैवाने तिला मिळतेही. 

पण तिच्या नुसत्या मैत्रीलाही तिच्या घरचे विरोध करतात. आईने आपल्यासाठी किती खस्ता खाल्ल्या आहेत याची जाणीव असणारी तिची दोन्ही मुलंही तिला समजून घेत नाहीत तेव्हा ती खूप दुखावली जाते आणि नाराजीने ती सोबत नाकारून टाकते. 

पण तिची अर्धवट वयातली नात मात्र आजीला समजून घेते. आणि तिच्या समंजसपणाने घरातल्या मोठ्यांचे डोळे उघडतात. 

म्हणजे शेवटी नायिकेला तिची हक्काची सोबत मिळवून देऊन ताईने कथेचा सुखांत केलाय. 

पण प्रत्यक्षात मात्र असं घडत नाही रे. आपल्या आईवडलांसाठी अशी सोबत किती मुलं स्विकारू शकतात? अरे.. म्हणजे दुसर्‍यांबद्दल कशाला बोलू मी ? मी स्वत:सुद्धा तशीच तर आहे, तुला ती माझी डॉक्टर मैत्रीण स्वप्ना आठवतीये का रे?” वंदनाने विचारलं.

“डॉक्टर स्वप्ना म्हणजे तीच ना जी आधी तुझ्या बाबांची डॉक्टर होती? “ पराग विचार करत म्हणाला.

“हो तीच. खरंतर ती डॉक्टर नंतर झाली पण आधीपासून ती माझी जिवश्च कंठश्च मैत्रीण होती. एका वर्गात शिकलो आम्ही. एकाच बेंचवर बसायचो. दोघींचं पान हलायचं नाही एकेमेकींशिवाय. 

लहानपणापसूनच तिला डॉक्टर व्ह्यायचं होतं आणी तेवढी हुशारीही तिच्याकडे होती. खूप मेहेनतीने तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं. स्वत:चा दवाखाना सुरू केला. तोपर्यंत मीही डीग्री पूर्ण करून नोकरीला लागले पण आमची मैत्री मात्र तशीच राहिली. 

आईचं अचानक जाणं, बाबा आणि आम्हा बहिणींचं आधी कोलमडणं, मग हळूहळू सावरणं, मग आमची लग्न या सगळ्या सगळ्यात स्वप्ना माझ्या सोबत होती. 

आम्ही दोघी बहिणी सासरी लांब आलो. बाबा एकटेच राहिले अनेक वर्ष. 

पण स्वप्ना मात्र तिथेच स्थाईक असल्याने बाबांकडे येत जात राहिली. त्यांची विचारपूस करत राहिली, त्यांची कितीतरी आजारपणं तिनेच तर बरी केली. 

बाबांचं वर्षानुवर्षांचं एकटेपण पाहून तिने मला अशीच या कथेत ताईने लिहिलय तशी सोबत बाबांसाठी बघायला हवी असं सुचवलं आणि तिथेच सुरूवात झाली माझ्या चुकीच्या विचाराची. 

मला तिचा राग आला. ही काहीही काय सुचवते असं वाटलं. मी तिला तसं बोलूनही दाखवलं. त्यावर तुला कधीतरी माझं म्हंणणं पटेल म्हणत ती गप्प राहिली. तो विषय तिथेच संपला. 

वरवर पाहाता सगळं ऑलवेल असलं तरी मनातून मी तिच्यापासून दूर होत गेले आणि आमच्या मैत्रीत एक अव्यक्त दरी निर्माण झाली. 

अर्थात बाबांनी कधीच आम्हाला असं काही बोलून दाखवलं नाही. पण म्हणजे त्यांना एकटेपणाचा कधी त्रास झालाच नाही असं तर नाही ना. किंवा तो त्रास कळत असूनही मी आणि ताईने त्याकडे दुर्लक्षच करावं असंही नाही ना. 

आज या कथेतील स्त्रीला तिच्या मुलासुनांनी समजून घ्यावच असं खूप कळकळीने वाटणार्‍या मला तेव्हा मात्र स्वत:च्या वडलांसाठी तो विचारही सहन झाला नाही. 

त्यासाठी माझी माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान असलेली मैत्रीही मी गमावून बसले. किती हा कोतेपणा. मगाचपासून ह्याच विचाराने मी बेचैन आहे. 

मी माझ्याआधी दुसर्‍याचा विचार करते किंवा मी एक समजूतदार सून आहे वगैरे वगैरे जे मला स्वत:बद्द्ल वाटत असतं ते किती फोल आहे याची जाणीव झाली.”

वंदनाचं बोलणं ऐकून तिच्या मनाला लागलेली टोचणी परागला समजली. पण आता या टोचणीला काहीच अर्थ नव्हता. 

बाबा तर त्यांच्या प्रारब्धातला एकटेपणा संपवून पुढे निघून गेले होते. पण वंदनाला तिची जीवाभावाची मैत्री मात्र परत मिळवता येणे शक्य होतं.

“अगं वंदू, तुझ्या भावना समजू शकतो मी. पण अजूनही हा विचार पटला तरी आपल्यासाठी तो स्विकारणे इतकं सोपं नाही ग. 

कारण आपली विचार करायची पद्धत, आपले वागणे, समोर आलेली परिस्थिती स्विकारण्याची आणि तिला सामोरे जाण्याची मानसिकता हे सगळं आपल्यावर झालेले संस्कार, आपली बिलिफ सिस्टीम यावर अवलंबून असतं. हिमनगासारखं. 

हिमनगाचा कसा फक्त 10% भाग पाण्यावरती दिसतो बाकी 90 % पाण्याखाली असतो. तसंच आपलंही असतं ग. आपल्याला आपल्या वागण्यातून आपल्या व्यक्तीमत्वाचे फक्त वरचे दहा टक्के दिसत असतात पण खरंतर खालचे नव्वद टक्के जास्त महत्वाचे असतात.

दुर्दैवाने आपल्या हातात फक्त वरचे दहाच टक्के असतात स्वत:ला बदलायला. बाकीचे नव्वद टक्के तर आपल्या धर्माने, समाजाने, कुटुंबातील वडीलधार्‍यांनी मनात रूजवलेल्या विचारांनी आणि आपल्यावर होत गेलेल्या संस्कारांनी व्यापलेले असतात. जे आपले सगळे निर्णय नियंत्रित करत असतात. 

त्यामुळेच तेव्हा तू हा वेगळा विचार स्विकारू शकली नाहीस. आणि आता तर बाबाही राहिले नाहीत. त्यांच्या प्रारब्धानुसार जे घडणार होतं तेच घडून घेलंय. 

तेव्हा स्वत:ला दोष देत बसण्यापेक्षा तू आता काय करू शकतेस त्यावर फोकस कर. तुझ्या मैत्रीणीला फोन कर आणि तिच्याशी मनमोकळेपणाने बोल. मला खात्री आहे की तुमच्या दोघींमधला बंध तितकाच घट्ट होईल परत.”

मग वंदनाने स्वप्नाला फोन केला. 

अनेक दिवसांनी बोलत असल्या तरी दोन मैत्रीणी अगदी रोज बोलत असल्यासारख्या मोकळेपणाने एकेमेकींशी बोलल्या. जणू काही मधला गैरसमजाचा काळ अस्तित्वातच नव्हता.

मनातला सगळा दुरावा गप्पांच्या पूरात वाहून गेला आणि मैत्रीचे बंध परत टवटवीत झाले. 

वंदनाच्या मनातल्या टोचणीची धार थोडी कमी झाली पण तरीही आपण त्या वेळेला बाबांचा एकटेपणा दूर करू शकला असता असा विचार आमलात आणायचा लांबच पण साधा स्वीकारू सुद्धा शकलो नाही हा अपराधीपणा कायमस्वरूपी मनात कैद होऊन बसला.

पण वेळेला असे अपारंपरिक निर्णय घेण्याचे धाडस प्रत्येकाकडे असतेचअसे नाही आणि मग वेळ निघून गेल्यानंतर हळहळत बसण्याशिवाय हातात काहीच उरत नाही.

 © धनश्री दाबके

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..


अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने