कन्यादान

© सौ. प्राजक्ता पाटील



"कन्यादान" हा शब्द ऐकताच आपल्या मुलीच्या लग्नातील पाठवणीचा प्रसंग घरातल्या सर्वच सान थोरांच्या तसेच जिला लग्न करून सासरी जावे लागणार आहे त्या मुलीच्या मनाचा हळवा कोपरा असतो.

सदाशिवरावांना तब्बल सात वर्षांनी मुलगी झाली आणि एकदाचा घरी पाळणा हलला. पण इतके दिवस मुल होत नाही म्हणून काळजी करणारी सदाशिवरावांची आई आता मुलगी झाली म्हणून नाराज झाली. 

तेंव्हा सदाशिवराव आईजवळ जाऊन बसले आणि म्हणाले, "अगं देवाने गाऱ्हाणे ऐकले आणि काही का असेना मी बाप झालो यात आनंद मानायचा सोडून तू मुलगी झाली म्हणून उदास का झालीस ? 

मला मुलगा झाला असता तरी त्यो तुला आजीच म्हणला असता ना मग त्यात नाराज होण्यासारखं काय आहे.?"

मुलाच्या या वाक्याने आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, "मुलगी झाली म्हणून मला दुःख झालं नाही रे. मुलगी झाली म्हटल्यावर, तिला समाजाच्या नियमानुसार सासरी पाठवावं लागणार याचं दुःख वाटतयं रे. 

कारण आपल्या पोटच्या गोळ्याला लहानच मोठं करायचं आणि तिला परक्याचे धन म्हणून दुसऱ्यांच्या हवाली करायचं हे किती चुकीचं असतं. 

पण आई वडीलांना काळजावर दगड ठेवून कन्यादान करावंच लागतं. मुलीचं बालपण कसं भुर्रकन उडून जात. कळतही नाही. 

माझ्या दोन्ही मुलीच्या वेळेसही मला हाच विचार मनात आलेला. पण चल आपण बाळ आणि बाळंतिणीला भेटून येऊ. मला नात झालीय हे सत्य आता मला स्विकारावे लागणार." असे म्हणून सदाशिवराव आणि त्यांची आई डिलेव्हरी रूममध्ये गेले.

" बाळ अगदी आईसारखं गोड आहे हो." सदाशिवरावांच्या आई आपल्या सुनेला कौशल्येला म्हणाल्या .

" पण हे काय कौशल्या , तुझ्या डोळ्यात पाणी ? आता काही त्रास होतोय का तुला." सदाशिवराव आपल्या पत्नीला कौशल्याला म्हणाले.

मानेनेच कौशल्या नाही म्हणाल्या पण सदाशिवरावांनी खूपच आग्रह केल्यावर त्या म्हणाल्या , " आज आई होताना ज्या वेदना मी सहन केल्या त्या अनुभवताना डिलिव्हरी म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म असतो असे का म्हणत असतील हे मला कळालं . 

मुलगी झालीय हे जेव्हापासून समजलयं तेव्हापासून तिलाही आई बनताना एवढाच त्रास सहन करावा लागेल याचेच फार वाईट वाटतेय." कौशल्या पुन्हा भावनिक होऊन रडू लागल्या.

पण सदाशिवरावांनी आपल्या पत्नीची समजूत काढली आणि ते म्हणाले , "अगं इवलासा जीव आहे तो . त्याला बालपण तर जगू द्या. का लगेच तिची पाठवणी आणि डिलिव्हरी पर्यंत जाऊन पोहोचलात तुम्ही ? "

' प्रत्येक वडीलांना असचं वाटत असतं आपली मुलगी लहान आहे पण मुलगी लवकर मोठी होते आणि बापाला ते दुःख पाठवणीच्या वेळीच कळते.' सदाशिवरावांची आई मनात विचार करत होती.

आणि खरचं असतं ना , मुलगी हळूहळू मोठी होत असते पण आईवडिलांना मात्र ती लहानच वाटत असते आणि एक दिवस मुलगी वयात येते आणि निसर्गाचं देणं लाभलं म्हणून आई वडीलांच्या एका डोळ्यात सुखाचे अश्रु असतात , तर आता मुलगी मोठी झाली लवकरच तिला सासरी पाठवावे लागणार म्हणून एका डोळ्यात दुःखाचे अश्रु असतात . 

मुलीचे लग्न केंव्हा करणार ? अशी विचारणा सुरू झाल्यावर मुलीसाठी स्थळं पाहायला सुरुवात होते . 

मुलीचा बायोडाटा तयार करणे , तो आपल्या पाहुण्यांकडे देणे आणि माझ्या मुलीसाठी चांगली स्थळं शोधा म्हणून विनंती करणे सुरू होते . 

मग कोणीतरी एखादं स्थळ सुचवतं आणि पाहुण्यांच्या मानपानाची तयारी करून आई-वडील पाहुण्यांच्या आगमनाची तयारी करू लागतात.

असचं सदाशिवराव आणि कौशल्याबाई यांच्या राधाला एक छान स्थळ सांगून आलं. राधाचा भाऊ तर जाम खुश होता . 

" राधाताई , तू सासरी गेल्यावर मीच एकटा आईबाबांच्या लाडाचा लाडोबा असणार. तू गेल्यावर आम्ही खूप मज्जा करणार ." असा तिचा भाऊ राधाला चिडवू लागला.

राधा म्हणाली , " अरे मला फक्त पाहुणे बघायला येणार आहेत. त्यांचा होकार आल्यावर ठरणार आहे की मी सासरी जाणार आहे की नाही."

"अगं डोळे झाकून तो मुलगा होकार देणार बघ. इतक्या सुंदर पोरीला कोण कसा नकार देईल ? तुच सांग. " राधाचा भाऊ म्हणाला.

" का तिच्या मागे हात धुवून लागला आहेस ? तेवढी एनर्जी काम करण्यासाठी वापरलीस तर मला मदत होईल तेवढी." कौशल्याबाई आपल्या मुलाला म्हणाल्या.

" हो गं आई , सांग काय करायचंय ते. कामात पण माझा कोणी हात धरू शकत नाही." राधाचा भाऊ प्रसन्न म्हणाला.

" चला मग ." म्हणून आई प्रसन्नला घेऊन गेली.


राधाचे डोळे मात्र पाणावले होते. प्रसन्न बोलला म्हणून नव्हे तर खरंच होकार आला तर सासरी जावे लागेल या विचाराने डोळे डबडबले होते. 

सगळी तयारी झाली. काही वेळातच पाहुणे आले. आधीच सौंदर्याची खाण असलेली राधा आज साडी परिधान केल्यावर अजूनच सुंदर दिसत होती . 

पाहुण्यांनी होकार दिला. राधाचं लग्न ही जुळलं. आणि तारीखही पुढील महिन्यातील फिक्स झाली.

जेव्हा राधाचे लग्न जमले , तेव्हा सर्वजण खूप खुश होते. राधा जाणार म्हणून नव्हे , तर राधाला मिळालेले घर अतिशय सुंदर , समाधानी , प्रेमळ माणसांनी भरलेलं होत. 

 सर्वांना आनंद वाटत होता . मग काय लग्न म्हटल्यावर झाली की तयारी सुरू काय-काय आणायचं. कोणा कोणाला बोलवायचं ? जय्यत तयारी सुरू होती.

आता अगदी आठ दिवसावर लग्न आल. 

मंगल कार्यालय , वाढपी यांची बुकिंग आधीच झालेली होती. आताच्या स्टाईल प्रमाणे डीजे , मस्त सजवलेला घोडा हे सगळे ऑर्डर करून झाले होते . 

राधाची सुद्धा साड्यांची शॉपिंग , शूज -चप्पल , मेकअप साहित्य व मॅचिंग पर्स सर्व खरेदी झाले होते . 

 राधाचा भाऊ तर काम करून अक्षरशः दमला होता. दाखवत नव्हता. लहान असून सुद्धा त्याला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून दाखवायच्या होत्या. आणि त्याने पाडल्याही. 

नातेवाईकही सगळे आलेले घर अगदी गोकुळासारखे सजलेलं. सगळीकडे प्रसन्न आनंदी वातावरण .

आईवडील मात्र सारखे राधाकडे पाहायचे. त्यांना आत्ताच जणू राधाच बालपण झालं आणि लगेच ती कधी एवढी मोठी झाली ? आणि आपल्याला सोडून चालली , असं मनात वाटत असेल कदाचित . 

तिची आईला कामात मदत , बाबांची काळजी आणि छोट्या भावाला सतत उपदेश हे नेहमी चाललेलं असायचं आणि आता ती नसणार म्हटल्यावर तिची उणिव भासणारच ना ! 

आपलंच लेकरू ते. पण कन्यादान म्हणून द्यायचं ? दान करायचं ? ह्याच विचाराने आई-वडिलांच्या मनात थोडसं तर दुःख असेल.

पण दाखवावे कसे ? आनंदी प्रसंगात कोणी असं रडत का ? या विचाराने दोघेही शांत बसत असतील कदाचित.

राधासाठी मैत्रिणींनी आणलेल्या भेटवस्तू आणि त्यांची दंगामस्ती हे सगळं आई बाबा पाहत होते. 

माझं लेकरू एवढं मोठं झालं की ते आता तिचं घर सांभाळणार . इतके दिवस आपण सांभाळलेलं आपलं बाळ कोणाच तरी होणार. आणि होतचं असतं , प्रत्येक मुलीला तर सासरी जावच लागतं. 

लग्नाच्या चार दिवस आधी नवरीला बांगड्या भरल्या जातात तशा राधाही भरत होती. बांगड्या भरून राधा आत गेली पाहते तर काय ? चक्क बाबा रडत होते.

किती ठामपणे प्रत्येक सुखदुःखात उभे असलेले स्वतःला कधीही कोलमडून न देणारे बाबा , आज लेकीला पाठवताना मात्र ढसाढसा रडताना पाहून , राधाला पण रडू कोसळले . आणि तिने आईला आवाज दिला- "आई ये ना जरा, बाबांकडे बघ बाबांच्या डोळ्यात पावसाचे ढग . "

आई आली खरी , पण तिच्याही डोळ्यात गंगा- जमुना. राधाला आई-बाबांच्या अश्रुंनी फार हळवं केलं. क्षणातच बाबा हसले आणि म्हणाले, "अगं वेडे , हे तर आनंदाश्रू आहेत."

पण आज सदाशिवरावांना त्यांच्या आईचे वाक्य आठवले आणि ते त्यांना मनापासून पटले " जीवनात असे अनेक आनंद आणि दुःखाचे प्रसंग येतात ; पण कन्यादान एकमेव असा दुहेरी क्षण असतो . 

एका डोळ्यातून मुलगी आपल्याला सोडून जाणार म्हणून दुःख . तर दुसऱ्या डोळ्यात तिला मिळालेलं घर हे खूप छान आहे म्हणून आनंदाश्रू असतात .

आणि कितीही कठोर बाप असला तरी कन्यादानाच्या वेळी हळवा होतच असतो."


© सौ. प्राजक्ता पाटील

सदर कथा लेखिका सौ. प्राजक्ता पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने