युद्धविराम

© अपर्णा देशपांडे




हेन एकटाच खिन्न होऊन बसला होता . बल्गेरियातील सुरनेना पर्वतश्रेणीच्या पायथ्याशी दाट जंगल होते . तिथे एका गेस्ट हाऊस मध्ये तो एकटाच बसला होता.

कंदिलाच्या अत्यंत अंधुक प्रकाशात एकटक दूर जंगलाकडे बघत . चार टेंट हाऊस मिळून फक्त एक शिपाई येल्स आणि हेन ..हेच काय तेवढे मनुष्यप्राणी . बाकी सारे जंगल .....काळे भिन्न जंगल .

रातकिड्यांचा आवाज तेव्हढा होता , शुकशुकाट भेदणारा .
 
समोरच्या कंदीलांकडे तो एकटक बघत होता . काचेवर काजळी धरली होती . कुठेतरी काजळी भेदून फटीतून
येत होता प्रकाश . आपली ताकद काय आहे हे त्या प्रकाशाला माहीत असावे बहुतेक . जरा म्हणून बोटाच्या स्पर्शातून काजळी पुसल्या काय गेली , मुसंडी मारून आला की बाहेर !!
 
हेन ला अचानक उभारी आल्यासारखे वाटले . आपल्या उध्वस्त आयुष्यात असे काहीतरी कलाटणी देणारे आशादायक घडेल का ? आता ...इतके सगळे घडल्यावर ?

" कसला विचार चालू आहे हेन ? ....येल्स ने विचारले 

  "त्या काजळी आणि प्रकाशाकडे बघत होतो. मला ह्या प्रकाशातून ताकद मिळाल्यासारखी वाटतेय. जगण्याची ताकद . नवीन ऊर्जा . " कुठेतरी हरवल्या सारखा बोलत होता तो .

" युद्ध थांबलंय आता . मी थोडे सामान मिळतेय का बघण्यासाठी गेलो होतो न गावात .....नुसता संहार रे !! भयानक आहे सगळं . "
 
" चल न येल्स , जाऊ आपण . "
 
" अरे आत्ता काही महिन्यात सगळ्या जगाकडून मदत मिळणार आपल्याला , मग पुन्हा घरे उभी रहातील , हळू हळू पूर्ववत होईल सगळं . लोक इथे येतील न पर्यटनाला.  आता हेच माझं जग रे ! "
एकदम काहीतरी गवसल्यासारखे वाटून हेन आत गेला भराभर कपडे बॅग मध्ये कोंबले .

" इतक्या रात्रीचा निघालास हेंन ? "
" मला जायचंय !! मी असा किती दिवस लपून रहाणार येल्स ? . "

" पण आत्ता ? तुझी गाडी देखील झोपलीय थकून ! " तो हसून म्हणाला . " मी तुला आत्ता नाही जाऊ देणार बाबा . "
 
" तुला तर हे जंगलच जगवेल येल्स . काळजी नको करुस . मला आसरा दिल्याबद्दल धन्यवाद दोस्ता ! "
पहाटे पर्यंत कसा बसा वेळ काढून हेन निघाला.

 येल्सच्या हातात काही बल्गेरियन नोटा कोंबून गडबडीत कोरा चहा पिऊन . " येतो रे पुन्हा , असाच कधी . हे युद्ध तर शमले , पण आता आपल्या स्वतःशी युद्ध असेल आयुष्यभर ' म्हणत त्याने गाडी सुरू केली .
 
जंगलातून सावकाश गाडी चालवत तो मुख्य रस्त्याला लागला . 

रस्ता असा उरलाच कुठे होता ,सगळीकडे नुसता विध्वंस !! मातीचे ढिगारे आणि जमीनदोस्त झालेल्या इमारती ..... कुठे तरी तुरळक लोक ढिगाऱ्यातून आपल्या जुन्या घराचे अवशेष पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करत होते . 

रस्त्याच्या कडेला पडलेले दोन सडलेले मृतदेह दिसले आणि तो शहारला .

त्याला हे काही नवीन नव्हते . याहून किती भयानक वास्तवाशी आपण सामना केलाय , एमिली आणि आईच्या मदतीने ...........एमिलीची आठवण येताच डोळे पाझरायला लागले ...

कुठे असतील त्या ?....जिवंत असतील की ..........नाही नाही !!! त्या कंदीलाला आठव हेन !! ....मुसंडी मारणारा प्रकाश !!! .... मला माझ्या आशा जिवंत ठेवायच्यात !!
 
स्वतःला धीर देत तो निर्मनुष्य धुळीच्या रस्त्यावर गाडी हाकत होता . तीही किती साथ देईल सांगता येणार नव्हतं , कारण डिझेल संपत आलं होतं . 

धुमश्चक्रीत कुणाचीतरी हाती लागलेली ही गाडी !
पळून जायला कामी आली ......पळून ? होय , पळूनच !!
कुणाचीही पर्वा न करता पळून गेला होता तो !

*********

बल्गेरिया वर जर्मनी हल्ला करणार ही कुणकुण लागल्या बरोबर तेथील सरकार ने वस्तूंचा तुटवडा जाहीर केला होताच , लोकांना जरुरी खाद्यपदार्थ मिळणे अवघड झाले होते . 

काळ्या बाजाराला उधाण आले असतांनाच तरुणांना सैन्यात इतर कामांसाठी सक्तीची भरती सुरू होती .

हेंन हा मूळचा रुमानियाचा . पण बल्गेरियाच्या लोह आणि स्टील फॅक्टरीत काम मिळाल्याने तीन वर्षांपासून तो आईसोबत इथेच रहात होता . 

 युद्धजन्य परिस्थितीत आपल्या देशातही इतकाच धोका आहे हे त्याने ओळखले होते . खूप मोठ्या संख्येने श्रीमंत लोक इतर देशात स्थलांतरित होत असतांना त्याने मात्र इथेच राहून व्यावसायिक असण्याचे प्रमाणपत्र मिळवण्याचे ठरवले होते .
 
हेन एका बूट बनवायच्या कारखान्यात सुपरवायझर होता . कंपनीचे मालक दिमितीर त्याच्या कामावर खुश होते . त्यांची मुलगी एमिली नियमित कंपनीत येत असे .
 
अनेक वेळा हेन आणि एमिली कामानिमित्त भेटत असत . दोघांमध्ये मैत्रिपलीकडील नाते आकार घेऊ बघत होते . त्याच वेळेला शहरात सैनिकी कारवाया , कवायती आणि धरपकड यांनी वेग घेतला होता .
 
" हेन , ही एमिली फार गोड छोकरी आहे रे . युद्ध सुरू व्हायच्या आत निर्णय घेऊन टाक . " आईने विषय छेडला .
 " आपल्या घरावर कधीही जप्ती येऊ शकते , इथे सैनिकी तळ होणार आहे , म्हणत होता निकोलाय . "

तिच्या चेहेऱ्यावर अपार काळजी बघू हेन म्हणाला , " मग निकोलाय आणि आना आंटी काय करणार आहेत ? "

" ते दोघेच असते तर इतकी चिंता नव्हती आना ला , पण पांगळ्या मार्टिन मुळे तिचा पाय अडकलाय . "

सकाळी हेन आना आंटी ला भेटायला गेला . एका पायाने अपंग मार्टिन मुळे निकोलाय अजून ह्याच शहरात टिकून होता .
 
" हेन , काल मिलिटरीचे लोक येऊन गेले . तिकडे गावाबाहेर तंबूत जा , आणि ही जागा , कपाटं , सगळं इथेच सोडून जा म्हणत होते . ....हे युद्ध कधी थांबेल रे ? आपल्याला आपली घरं पुन्हा वापस मिळतील ? "
 
" आंटी , मार्टिनला जर अपंग असण्याची सवलत देणारा पास मिळाला , तर तुम्ही दोघे इथेच एक खोली स्वतःकडे ठेवून राहू शकता . निकोलायला मात्र सैन्यात जावे लागेल . ती सक्ती आहेच !! "
 
हेन स्वतःदेखील खूप अस्वस्थ होता . त्याची वैद्यकीय तपासणी झाली होती . त्यालाही सैन्यात भरती व्हावे तर लागणार होते . 

त्याची सैन्यात जाण्याची मुळीच इच्छा नव्हती .

काही मिनिटातच कारखान्यातील अथेन धापा टाकत तिथे आला .

" फार वाईट झालं हेन ! लवकर चल !! "

हेन लगेचच तिकडे धावला .

हेन ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा दिमितीर सर पूर्णपणे अवसान गळालेल्या अवस्थेत होते . समोर दोन मिलिटरी ट्रक्स उभे होते . हेन ला अंदाज आलाच.

एमिली धावत आली " हेन कुठे होतास इतका वेळ ? इथली फॅक्टरी बंद करून गावाबाहेर हलवायचा आदेश आलाय ....म...मला ..काहीच सुचत नाहीये ..." तिला धाप लागली होती .

तिला घेऊन हेन सरांकडे गेला .

" सर , हिम्मत राखा . मी आहे तुमच्या सोबत . आपण पुन्हा उभा करूया कारखाना . "

" इतकं सोपं नाहीये ते . माझ्यात आता इतकी ताकद नाही राहिली . चार वर्षांपूर्वीच तरुण मुलगा घरातून पळून गेलाय . हिची आजारी आई , ही तरुण पोरगी , आता ह्यांना घेऊन कुठे जाऊ ? " त्यांचा बांध फुटला होता . 

" सर , एमिलीची जबाबदारी मी घेतो ....तुमची परवानगी असेल तर .." त्याने डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्याकडे बघितलं . ती गालातल्या गालात हसत होती . 

पुढे चारच दिवसात त्यांचे लग्न झाले . बुटांच्या कारखान्याची जागा सोडून ते सगळे छावणीत रहायला गेले होते .

आता हेन आणि एमिली जवळ व्यवसायिकाला मिळणारा ' पास ' होता त्यावर त्यांना थोडे फार जास्त राशन मिळत होते . 

युद्धाने भयानक रूप धारण केले होते . 

नवीन जागेत कारखाना उभा करण्या आधीच त्यांना बल्गेरिया च्या पूर्वेकडे सरकण्याचा आदेश आला होता . त्या दगदगित एमिलीची आई तग धरू शकली  नाही . आई गेल्यानंतर दोन आठवड्यातच दिमितीर सरही गेले . थोडे फार पैसे होते , पण बाजारात सगळं तुटवादाच होता . खाद्यपदार्थ प्रचंड किंमत मोजून आणावे लागत .

हेनच्या शेजारचे मार्टिन आणि आना आंटी अजूनही त्याच्या जुन्या घरात एका अडगळीच्या खोलीतच रहात होते . मार्टिन तर ओळखायला न येण्याइतका खंगला होता . नुसता सांगाडा . पोलंड मध्ये असला असता तर जर्मनांनी कधीच गोळ्या घालून त्याला ठार केले असते .
 
एमिली त्याही अवस्थेत सगळ्यांची काळजी घेत होती . हे असे आपण फार दिवस टिकू शकणार नाही याची कल्पना आली होती तिला . 

छावणी मध्ये त्यांना रोज प्रत्येकी चार पाव आणि मचूळ पाण्यासारखे सूप मिळे जेवण म्हणून .
तेही अशाच लोकांना , ज्यांच्या जवळ ' पास ' आहे .

जर्मनीने पोलंड काबीज केले होते . इटलीवर देखील पूर्ण त्यांचा ताबा झाला होता .
 
" जर्मन सैन्य सर्बियात पोहोचण्याआधी आपण देशाबाहेर जाऊ हेन ! इंग्लंड ला माझी मावशी असते , तिच्याकडे जाऊ . " एमिली खूप घाबरलेली होती . 

 ते रहात होते ती जागा म्हणजे नरक होती . दुर्गंघ , घाण , रोगराई आणि हाल . आपल्याच देशात ' रेफ्युजी ' झाले होते लोक .
 
" नाही एमिली , आता माझ्याकडे व्यावसायिक असण्याचा खास पास आहे न , आपण काही दिवस भूमिगत होऊया. नाहीतर हे लोक मला पकडून नेतील युद्धावर पाठवायला . "
 
" पण मग जायचे कुठे ? "

" तू आईला घेऊन अग्नेय दिशेने पुढे जा . आज दोन ट्रक भरून लोक तिकडे जाणार आहेत . तिथे स्टील चे कारखाने आहेत , तिथे येऊन मी आपल्या साठी काम मिळवेन . "

" आणि तू ? "

" आना आंटी आणि मार्टिन ला घेऊन येतो मागोमाग . अनेक वर्षे आम्ही जिवाभावाचे शेजारी होतो . निकोलाय माझा बालमित्र .....तू माझी काळजी नको करुस ग !! आता ट्रक्स तरी आहेत , नंतर तर हेही मिळणार नाहीत . पायी जावे लागेल , सामान डोक्यावर घेऊन . " तिच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवून तो काळजीने म्हणाला

" काय अवस्था झालीये आपली . का युद्ध करतात ही लोकं ? " तिचे डोळे भरून आले होते . 

" ह्यातूनही बाहेर पडू आपण लवकर , चिंता नको करुस . "

" मला तुझा अभिमान वाटतो हेन . " ती प्रेमाने त्याला बिलगत म्हणाली .
 
ठरल्याप्रमाणे जुजबी सामान घेऊन हेन ची आई आणि एमिली गेल्या . माणसे एकावर एक बसून अत्यंत वाईट अवस्थेत देखील जगण्याच्या आशेवर निघाले . आणखी एका अज्ञाताकडे .

********* 

एमिली आणि आई प्रचंड थकल्या होत्या . ह्या अनिश्चित आयुष्याशी आणखी किती झुंज द्यायची होती , ईश्वर जाणे . रात्री ट्रक थांबला ती फक्त एक उघड्या माळावरची जागा होती . 

ना तिथे काही तंबू होते , ना कुठे आसरा घ्यायला छत . ही पूर्णपणे शुद्ध फसवणूक झाली होती . स्टील फॅक्टरी तर पुढे पंधरा किलोमीटर दूर होती . एमिली ला मोठा धक्का बसला होता . 

हेनला ह्या गोष्टीची कल्पना होती की नव्हती तिला माहीत नव्हते , पण त्या फार वाईट परिस्थितीत अडकल्या होत्या नक्कीच ! सगळ्यांनी ट्रक ड्राव्हरचे पाय पकडून पुढे गावात फॅक्टरी जवळ सोडायची वीनंती केली . 

पण तो हुकुमाचा ताबेदार . ट्रक मधून उतरलेल्या लोकांत म्हातारे , थकलेले लोकच जास्त होते . त्यातल्या त्यात तरुण मंडळींनी आधी आसरा बनवायची तयारी सुरू केली . 

लहान मुले आक्रोश करत होती ......भुकेनी जीव तडफडत होते.

" मम्मी , इथे ह्या माळरानावर आपण भूक आणि थंडीनेच मरून जाऊ . मला वाटतं आपण पुढे काही अंतर चालत जाऊया . ह्यातलं अत्यावश्यक सामान फक्त जवळ ठेवू . बाकी इथेच सोडून जाऊ . काय म्हणता ? "
 
" हेन येईपर्यंत इथे सगळ्यांसोबत थांबावे , निदान आपल्या गावातील लोक सोबत तर असतील . "
 
" फक्त आजची रात्र . उद्या पहाटे आपण चालायला सुरुवात करू . 
फक्त दोन बॅग सोबत असतील . कारखान्याचे कागद , थोडे पैसे ,आणि लुटल्या नाही गेलो तर दोन दागिने . "
हेनच्या आईने नाईलाजाने मान हलवली .


********* 

( हेन गाडी घेऊन जंगलातून गावात वापस येत असतो , तो दिवस )
 
हेन ला आपलेच गाव पूर्णपणे अनोळखी वाटत होते . गावात प्रवेश करत असतांनाच गाडीतील डिझेल संपले . अशी गाडी घेऊन कोण आले असे आश्चर्य करत लोक बघत होते .

सैनिक दल राडारोडा उचलायचे काम करत होते .
 
" दिमितीर च्या फॅक्टरीतला हेन ना रे तू ? "
 
" हो , त्यांचा जावाई . "
 
" मग एमिली , तुझी मम्मी कुठाय ? "

"..............ते ....आहेत ...." कसे बसे उत्तर देऊन तो आना आंटी आणि मार्टिन चे घर शोधू लागला .
 
" हे s , हेन !! कसा आहेस ? " जोव्हाक , त्याचा मित्र विचारत होता .

तो खूपच वाईट अवस्थेत होता .

" मार्टिन आणि निकोलाय कुठे असतील जोव्हाक ?
 
" निकोलाय मारल्या गेला युद्धात . मार्टिन ...माहीत नाही ....तो एका पायाने अधू होता न रे ? माझा पण एक पाय निकामी झाला म्हणून मला वापस पाठवला . "
 
हेनला आता काही सुचेनासे झाले .

जोव्हाक ने त्याला एक बंद डबा दिला .. खारवलेले मासे असावेत ....अमेरिकन मदत पोहोचली होती बहुतेक . इतक्या वाईट अवस्थेत देखील जोव्हाक ने आपला हिस्सा दिला ..आणि आपण ? आपण मार्टिन सोबत काय केले ? .

तो आठवू लागला.

एमिली आणि मम्मी ला ट्रक मध्ये पाठवल्या नंतर हेन मार्टिन कडे गेला .

" आंटी , तुम्ही पण जाता का ? एमिली गेलीये , तिकडे स्टील फॅक्टरीत काम मिळवायला . तुमची पण सोय
करतो . "
 
" नाही बेटा , मी मार्टिन ला सोडून कुठेही नाही जाणार . पण तू का नाही गेलास ? "
 
" मी ... मला.... सैन्यात भरती व्हायचंय . एक काम करू . मला मार्टिन चा 'पास ' द्या . मी त्याच्या वर मिळणारे राशन वाढवून घेतो . मग तुम्हला रोज सरकारी खानावळीतून जास्त शिधा मिळेल ..."
 
त्या माउलीने मोठ्या विश्वासाने दिलेला पास घेऊन हेन ने त्याच्या वर भरपूर शिधा घेतला . आणि लपत छपत जंगलाच्या दिशेने पुढे जात राहिला.


हे सगळे आठवत असतांना त्याने जोव्हाक ने दिलेला डब्बा संपवला होता .

आता पुढे जगायचे तर एमिलीला शोधणे भाग होते . रोज गावाकडे वापस येणाऱ्या लोकांच्या झुंडी कडे तो आशेने डोळे लावून असे . कुणाकडून तरी त्याला एमिलीची खबर लागली .

अतीव आनंदाने तो तिकडे जाण्यास निघाला .


***********

 " एमिली , बघ कोण आलंय . " मम्मी म्हणाली .
 
आपल्या छोट्याश्या पत्र्याच्या खोपटातून एमिलीने बाहेर बघितले .
निर्विकार चेहेऱ्याने तिने हेन कडे बघितले .

" एमिली , मी , मी आलोय !! " हेन उसने अवसान आणून म्हणाला .
 
तिने आत डोकावून हाक मारली .

" आना आंटी !!! "
 
आंटी बाहेर आली . हेन नुसता डोळे फाडून बघतच राहिला . ....आपण ज्यांना फसवून पळून गेलो , ....ते सगळे एमिली सोबत ?
 
" मी पुन्हा कारखाना उभा करतेय . पपांच्या ऍग्रिमेंट नुसार तू माझा पती असे पर्यंतच भागीदार होतास . आता तुझा माझा काही संबंध नाही . "
 
" एमिली , डिअर , मी देखील आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी काम शोधत होतो , मला एके ठिकाणी काम मिळाले ....." 

 त्याचे वाक्य तोडत ती म्हणाली , " जंगलात ? "

".....जंगलात का डिअर ..मी ..."

" तुला जंगलात पोसणारा एल्मी माझा सख्खा भाऊ आहे , काही वर्षांपूर्वी पळून गेलेला . त्याने मला सगळं सांगितलंय . .....नंतर मार्टिन आणि आना आंटी ला मी इकडे बोलावून घेतले . "

" एमिली , आपण सगळे एकत्र राहू ... "

" बास s !! बास हेन ! तुझ्यासारख्या पांगळ्या मनाच्या माणसापेक्षा ही खंबीर मनाची माणसं माझा आधार आहेत . मार्टिन इतका लहान असून ह्या बहिणीचा आधार बनला ......मनाची दुर्बलता जास्त घातक रे !! शारीरिक दुर्बलतेपेक्षा !!!
 
युद्धविराम जाहीर झालाय . तू तुझ्या जुन्या घरात जाऊ शकतोस रहायला .

हेन ने आशेने आपल्या आईकडे बघितले . त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती मान खाली घालून शांतपणे फाटलेल्या गाऊन ला ठिगळ लावत होती .

( समाप्त)

© अपर्णा देशपांडे

सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने