जिद्द ( भाग- 3 )

© अपर्णा देशपांडे



" हे तू मलाच का सांगतेय ? "

" एक तर तुम्ही चीफ ऑफ पाकिस्तान आर्मी होऊ शकता . आणि दुसरं ,तुम्ही आम्हाला सुखरूप बाहेर काढू शकता ."

" डोन्ट टॉक रबिश ! हे काय इतकं सोपं असतं का ? त्यांच्या वरचे आरोप मी कसे सिद्ध करणार ?"

" मी तुम्हाला त्यांच्या सह्याचे सगळे कागदपत्र आणून देते . स्वतःच्या फायद्यासाठी पाकिस्तान सरकार कडून कुठले कुठले करार मान्य करवलेत त्यांनी . चिनाब च्या पाण्यासंबंधी पण काहीतरी करार झालाय सर . मी तेव्हा आमच्या महिला राष्ट्रपती ची सुरक्षा अधिकारी होते . मी सतत तिथेच सोबत असायचे सर . माझे तसे संबंध आहेत .

आमचे लोक जाणे येणे करतच असतात . पुरावे तुमच्या पर्यंत पोचवेन मी ."

" मी तुझ्यावर का विश्वास ठेवू ?"

" नका ठेऊ सर . मला भारताचा एजंट घोषित करून इथेच सडवा . मला फाशी द्या . पण त्यातून तुम्हाला काय मिळणार ? शिवाय चीफ तर आपले खिसे भरतच राहील . पण जर तुम्ही आर्मी चीफ झालात तर ISI वर तुमचेच राज्य ! "

" हे बघ लडकी !! हे जर खोटं ठरलं तर बघ तुझे कसे हाल होतील ते . तिथून उचलून आणू आम्ही तुला ." नवाझी उठून गेला . दिव्या ने हलके स्मित केले .

*********

 नवाझी ने आपला एक गट तयार केला . पाकिस्तानात लष्करा चा चीफ हा वझीर ए आझम ला कंट्रोल करत असतो , त्यामुळे आर्मीचीफ ला खूप महत्त्व असते हे दिव्याच काय जगाला माहीत आहे .

नवाझिंनी सगळ्यांना हे पटवून दिलं की सध्याचे चीफ आसिफ इकबाल कसे भारताच्या बाजूने निर्णय घेत आहेत , आपल्याला कसा चीन आणि भारत दोन्ही बाजूने धोका आहे ......आता अमेरिका उलटेल..वगैरे .

त्यांनी आसिफ इकबाल वर खटला भरला , सगळं लष्कर उलटलं आणि त्यांना अटक केली . आठच दिवसात नवाझी हे चीफ झाले !!.

त्या काळात दिव्या ला खूप चांगली वागणूक दिल्या गेली . तिने फार मोठी खेळी खेळली होती .

एक दिवशी सकाळी कर्नल हाश्मी आला .

" ओहो! आफरीन ! तू काय जादू केली आमच्या चीफ वर ? जरा आम्हाला पण कळू दे तुझा जलवा ." लोचट हास्य तिच्या भोवती फिरवत हाश्मी म्हणाला .

"........" ती गप्प मन खाली घालून उभी होती . आता तिला कुठलीच गडबड परवडणारी नव्हती .

" तुला आणि तुमच्या चार काफरांना सोडायचा हुकूम आहे . ये बात कुछ हजम नही हुई . क्या जादू किया तुमने ? कूछ दिन मेरे साथ रहती तो s .." आणि तो भेसूर हसला .

​********* 

श्रीनगर येथे कॅम्प वर थोडे उत्साहाचे वातावरण होते . बातमी चांगली आली होती . अमृतसर च्या मिलिटरी तळा वरून वाघा बोर्डरला मेजर राजवर्धन जाणार होते , हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करायला . कैदेतून सुटून येणाऱ्यांचे नातेवाईक पण तिथे येणार होते . एक व्यापारी , दोन मासेमारी करायला गेलेले कोळी आणखी एक मेंढपाळ सुटणार होते दिव्या सोबत . दिव्याचे कुटुंबिय पण येणार होते .

​********* 

 दिव्या आणि बाकी चौघे सेल मधून बाहेर जेलच्या ऑफिस मध्ये उभे होते , त्यांच्या बॅग्स आणि सामान वापस मिळायची वाट बघत .

एक पोलीस व्हॅन येऊन थांबली होती . चौघांना आत बसवले . गाडीत सशस्त्र पोलीस होते . शिवाय मिलिटरी चे दोन जवानही होते . गाडी जेल बाहेर येऊन जंगलाच्या दिशेने निघाली .

" आपल्याला अमृतसर वरून वाघा बॉर्डर ला जायचंय न ? " तिने साशंक होऊन विचारले .

" ......."

" हा दुसरा रस्ता आहे . आम्हाला कुठे नेताय ? " तिने विचारले .

" दुसरे रास्तेसे ."

काही तास गाडी धावत होती . तिच्या लक्षात आले की आपली सुटका होत नाहीये , उलट आता ते आणखी अवघड होणार . आपला फायदा करून घेतलाय नवाझिने .

" उतरो यहा ! " एक जण ओरडला . गाडी थांबली होती . दरवाजा उघडला . सगळे उतरायला लागले तसा पुन्हा आवाज आला " बाकी लोग नही !! सिर्फ तुम !!" त्याने दिव्याकडे बोट दाखवले .

आतल्या चौघांना तिने खुण केली . त्यातल्या भारतीय जवानाला नजरेनेच खुणावले .

" अब बाकी चार लोग हिंदुस्थान जाएंगे . तुम अकेली उतरो नीचे ." एकजण म्हणाला .

दिव्याला बरे वाटले की किमान हे लोक तरी भारतात वापस चाललेत . ती गाडीतून खाली उतरली .

क्रूर हसत समोर हाश्मी उभा होता !!


आत मधल्या चार भारतीय कैद्यांना वाटले , आपणही उड्या माराव्यात पण सोबत सशस्त्र गार्डस होते आणि गाडी लगेच सुरू झाली होती .

दिव्या खाली उतरून बघत होती . समोर पुलावर दात विचकत हाश्मी उभा होता . त्याच्या शेजारी तीच महिला रक्षक उभी ..तिच्या कपड्याला हात घालणारी ...तिने अंदाज घेतला .....खाली तीस एक फुटावर नदी ......त्यांच्यातील अंतर ..दहा फूट .... त्याच्या कमरेला रिव्हॉल्व्हर .

" आजाओ मोहतरमा !! "

" मला अडवलंय हे चीफ हमीद नावाझिंना माहीत आहे ? "

" आमचे चीफ अजूनही आसिफ इकबालच आहेत . आम्ही नावाझीना मानत नाही . चल गाडीत बस !! "

" हाश्मी साब , तुम्ही चूक करताय . "

" ए s s ! गाडीत बस !!! " त्याने पिस्तुल तिच्यावर रोखली . ती थोडी पुढे आली .

" मी पुन्हा सांगते , तुम्ही चूक करताय ."

" राणी , हात वर !! हात वर !! "

एका क्षणात त्याची पिस्तुल हवेत उडाली . त्याला जमिनीवर आपटून तिने शेजारी उभ्या बाईच्या कमरेत लाथ घातली . त्याचीच गन घेऊन त्याच्या पायावर गोळी झाडली . आणि त्या बाईच्या कनपटी वर बंदूक रोखली .

" हात वर कर !!! नाहीतर हिला गोळी घालीन .

खी खी हसून तो म्हणाला , " घाल खुशाल ! " आणि तिच्यावर चाल करून आला . त्याचा वार तीने चुकवला आणि त्याच्या पोटात ठोसा लगावला . त्याला गोळी घालता आली असती , पण तसे तिला नको होते .

तिने एक जबरदस्त फटका त्या बाईच्या मानेवर घातला . ती कोलमडली . तिला हाताने फिरवलं आणि जोरात पुलाच्या काठावर आपटलं ,तर ती काठावरून तोल जाऊन खाली नदीत खडकांवर पडली . हाश्मी उठून चाल करणार की उलटं जाऊनपळत येऊन तिने त्याच्या छातीवर किक मारली . तो दूर जाऊन पडला . तिने शांत पणे त्याच्या दुसऱ्या पायावर पण गोळी मारली .त्याच्या खिशातील पैसे काढून घेतले , मोबाईल आणि ओळखपत्र घेतलं आणि त्याला उतारावर असतांना एक लाथ घातली .

तो गडगडत रस्ता सोडून खाली दूर जाऊन पडला .

" म्हटलं होतं न मी , की तुम्ही चूक करताय !!" तिने ओरडून सांगितले .

ती चढून रस्त्यावर आली , गाडीत बसली . गाडीत एक नवा कोरा पाक मिलिटरी युनिफॉर्म होता .

मैलाच्या दगडावरून समजले की ती लाहोर पासून फक्त आठ किलोमीटर वर होती . आणि लाहोर पासून ग्रँड ट्रंक रोड फक्त चोवीस किलोमीटर आहे . तिला माहीत होतंच की लाहोर आणि अमृतसर च्या मध्ये असलेल्या ग्रँड ट्रंक रोड वर वाघा बॉर्डर आहे , आणि अमृतसर ते वाघा बॉर्डर हे

साधारण 32 km आहे .

रस्त्यावरून तिला दिसले की पुढे मोठे पाक मिलिटरी तळ आहे . नशीब तिच्या अंगावर पाक युनिफॉर्म होता . तिथे एका टेकाडावर तिने गाडी लावली , कुठलाही ब्रेक न लावता सोडून देऊन ती पटकन उतरून गेली . इतका उतार होता की गाडी आपोआप घसरत खाली जाऊन झाडीमध्ये फसली . आता लवकर कोणाला दिसणं शक्य न्हवतं .

तिला वाटले , हाश्मी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये एकटा आला म्हणून...ठीक झालं होतं .

रस्त्याच्या खालच्या बाजूलाच उतारावर ती थांबली थोडावेळ . अंधार पडायची वाट बघू लागली . काही मिनिटात तिथे एक ट्रक आला . ड्रायव्हर खाली उतरून रस्त्याच्या कडेला गेला . झपाट्याने हालचाल करून ती वर चढली आणि ट्रकच्या मागच्या बाजूने चढून आत बसली .

ट्रक मध्ये पाच सहा पिंपं होते .

चांगले जड होते . डांबर होतं बहुतेक .

एक पिंप रिकामा होता . ....

ट्रक छावणी वर जाऊन थांबला .

मध्यरात्री ती पिंपातून बाहेर आली . बाहेर काळोख होता . मागच्या बाजूला प्रचंड मोठाले पर्वत होते . मध्ये खोल दरी होती . दरीच्या अलीकडच्या बाजूला अनेक तंबू होते . खरं तर तिला विश्रातीची गरज होती , पण थांबून चालणार नव्हते . आणखी पुढे गेल्यावर तिला दिसले की तिथे काही ऑफिसर आणि अनेक जवान होते . रात्रीच्या अंधारात दोरांच्या सहाय्याने खाडी उतरून जाण्याचे ट्रेनिंग चालू असणार . कारण मोठाल्या गाठी असलेले दोर पडले होते .

तिला अतिशय आनंद झाला . रॉक क्लाइंबिंग हा तिचा आवडता साहसी प्रकार होता .

अंधारात ती त्यांच्यात मिसळली . एका ने विचारले , अश्फाक , थोडी रोटी है खाएगा ?

तिने पट्कन संधी साधली .

स्पीकर वरून आवाज आला .

" सिपाहियो ! हेड गियर ठीक पहेन लो .

उसपे लाईट है , वो चेक करो ! "

आता आली का पंचाईत . तिने आजूबाजूला बघितले , चुलीवर काहीतरी धुगधुगत होते . तिथली राख तोंडाला फासली . आणि एक हेडगिअर

ताब्यात घेतले . घोळक्यात ती सगळ्यात मागे उभी राहिली . कारण समोर एक स्टँड लाईट होता .

इन्स्ट्रॅक्टर ने सांगितले की काल दाखवल्याप्रमाणे सगळं करायचं आहे .

चला , वर दोर बांधा . भिंतीवर प्रचंड मोठे भेंडोळे होते . एक भेंडोळ घेऊन ती सगळ्यात दूर गर्दी पाहून थोडं लांब उभी राहिली . खाली खोल दरी होती , आणि पलीकडे काहीच किलोमीटर वर..........



" स्टार्ट !!" आवाज आल्याबरोबर

सगळ्यांनी उतरायला सुरुवात केली .

दिव्या च्या अंगात बळ संचारलं .

भारत माता की जय असं मनात म्हणून ती सर सर उतरायला लागली . तिची कमांड होती ह्यावर . बाकी सैनिकांपेक्षा दिव्या पंधरा फूट खाली होती , आणि अचानक गोंधळ सुरू झाला .

तो सोळा चा ग्रुप होता . दोर जास्त होते , पण हेड गियर सोळाच होते . एका जवानाला हेडगीअर मिळाले नव्हते . असं कसं झालं ..म्हणून

वरून हजेरी सुरू झाली .

एक ...अस्लम ?...हाजीर

दो ...मुस्तबल... हाजीर

तीन ...फाहेंन... हाजीर सगळे हाजरी देत होते

....तिला कल्पना होती की तिचा दोर शेवटी होता . तिने हलक्या उजेडात बघितले , तिच्या शेजारी दोरावर चा जवान बऱ्यापैकी खाली आला होता . तीने आपला वेग वाढवला ....

आठ ...हिजबुल ...हाजीर ...

नौ .....

मोजणी चालू होती ........

पंद्रह ..वाजीद ....

.......वाजीद ? ....हाजीर ...

" सोळावी रस्सी कुठाय ? चेक कर रे !!

हे काय चालू आहे ? "

" जनाब , ही बघा रस्सी ! इथे बांधलीये ! "

" कोणी ??? ...कोणी बांधली ? ओढ पाहू वर !! "

" जनाब !! कुणीतरी उतरतय !! "

तोपर्यंत दिव्या खाली पोहोचली होती . तिचे हात ,पाय पार सोलवटून निघाले होते . ऊर धपापत होता .

" कोण हराम का जना गेलाय खाली ? "

जा मागे ....पकडा त्याला !

********

वाघा बॉर्डर वर फक्त चारच जण पोहोचले होते . दिव्या ला पुन्हा ताब्यात घेतलंय हे पाहून सगळ्यांचाच आनंद मावळला . काही दिवसांपूर्वी च किशनसिंग ने दिव्याची चिठ्ठी मेजर राजवर्धन ला दिली होती.

त्यावर तिने छिद्र पाडून सांकेतिक भाषेत लिहिलं होतं .....' चोरबत ' . कॅप्टन दिव्या वाघा बॉर्डर ला पोहोचली नाही याचा अर्थ ...

( चोरबत ही पाकव्याप्त गिलगिट भागातील काश्मीर घाटी आहे , जी कराची पासून जवळ आहे ) ताबडतोब मेजर राजवर्धन यांनी कॅप्टन अंगद ला फोन लावला .


********* 

दिव्या भान हरपून पळत होती ,पण ताज्या दमाचे चौदा जण तिच्या मागे लागले होते . तिच्या जवळ हाश्मीची पिस्तुल तेवढी होती .

ती एका झाडामागे लपली . गियर मधील लाईट एकदम मंद केला . पाचोळ्यात आवाज जवळ आल्याबरोबर गोळी झाडली . तो कोसळला . तिने त्याची रायफल काढून घेतली . त्याच्याच बाटलीतील पाणी संपवलं . आणि धावायला लागली .

थोड्या चढावावर गेल्यावर मागे फिरली , लाईट प्रखर केला आणि धाड धाड गोळ्या चालवल्या .....चार पाच तर नक्कीच टिपले .....सणकन एक गोळी तिकडून आली ...तिच्या डाव्या खांद्याला चाटून गेली ...तीव्र वेदना सहन करत ती पुन्हा धावू लागली ...मागून गोळीबार सुरू झाला म्हणून ती पूर्ण आडवी पडली .

आता पोटावर हाताच्या कोपऱ्या ने सरपटत ती पुढे जात होती ...तिला आपल्या सैन्याचा सर्जिकल स्ट्राईक आठवला ....तीन किलोमीटर ....सरपटत ...आता तीची ताकद संपत आली होती ...मागचा पाठलागही थंडावला होता ....म्हणून ती उठून बसली . मागे वळून बघते तर ....चार पाक जवान ...हातात रायफल ..तिच्या वर रोकून ...

" ये जिंदा चाहीये !! गोली मत मारना !! " एक जण म्हणाला . ...

तो पुढे येऊन तिला धरणार तोच ...धाड धाड मशीन गन चालल्या ..चारही जण खाली कोसळले .

मागे काही अनंतरावर मेजर राजवर्धन च्या निरोपामुळे मेजर रावत आणि कॅप्टन अंगद आपली कुमक घेऊन आले होते .

तिने समाधानाने पाहिले आणि तिची शुद्ध हरपली .


******** 

अमृतसर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये तिच्या समोर राजवर्धन , मेजर रावत , अंगद , किशनसिंग आणि 'तो' गाडीतील जवान उभा होता .

त्यांचे डोळे वहात होते .

" मॅडम , तुम्ही उतरलात तेव्हा मी पण उडी मारणार होतो , पण ते लोक म्हणाले , तू उतरशील तर बाकी तिघांना इथेच गोळ्या घालू . तुम्ही पण मला मनाई केलीत .

तुमची जिद्द आणि साहस तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलं आणि त्याच मुळे आम्ही पण त्या नरकातून सुटलो मॅडम ." जवान म्हणाला .

ती हसली ,आणि म्हणाली ,

" जिद्द तर आपल्या भारतीय सैन्याच्या रक्तातच आहे काय मेजर सर ? "

सगळे समाधानाने हसले .

( समाप्त )

© अपर्णा देशपांडे

सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने