वटपौर्णिमा, वड आणि मी

© सौ. अनला बापट





वटपौर्णिमेनिमित्त, मी पूजा करायला आमच्या सोसायटीतल्या खूप जुन्या वडाच्या झाडाजवळ गेले. सकाळ-सकाळी, लवकर गेल्यामुळे, अगदी एक-दोन बायकाच होत्या पूजेला. 

त्यापण माझी पूजा होईस्तोवर (किंवा, होईपर्यंत)निघून गेल्या. माझी पूजा संपली आणि अचानक कोणीतरी मला हाक मारली असे वाटले.

आजूबाजूला पाहिले तर कोणीच नव्हते पण तेवढ्यात,"मी बोलतोय, तुझ्या समोर असलेलं वडाचे झाड. मला काही सांगायचे आहे, जर तुला ऐकायला वेळ असेल तर..."

मला वाटले की ह्या वटवृक्षाच्या मनात खूप काही आहे सांगायला... मी ऐकून घेतले तर कदाचित त्याला बरे वाटेल...म्हणून मी तिथेच थांबले, त्या वटवृक्षाचे मनोगत ऐकायला.

आता त्याच्या मनातले मी लिहीत आहे. पण मला वाटते त्याच्या मनातले माझ्या शब्दात लिहिण्यापेक्षा त्याच्याच शब्दात वाचायला तुम्हाला आवडेल.

तर ऐका आमच्या ह्या वटवृक्षाच्या मनातील वेदना, संवेदना आणि आठवणी.

तो बोलायला लागला, "ते एक गाणे आहे ना...अपना टाईम आयेगा.....तसे, तुला सांगतो, आज माझा टाईम आला आहे, आजच्या दिवशी माझे खूप महत्व आहे बरं का.

वटपौर्णिमा आहेना आज. त्या सावित्रीदेवीने, देव सत्यवानाचे प्राण वाचवायला केलेले तप, माझ्याच एका पूर्वाजाच्या पायथ्याशी केले असल्यामुळे आम्हाला हा मान आहे हो!

त्यांचे देवत्व आणि पूर्वजांची कर्म...नाहीतर आम्ही काय अन्य सर्व झाडांसारखेच एक साधे झाड हो!

तुला एक गंमत सांगू का? आज, ह्या सोसायटीतला माझा एकसष्ठावा वाढदिवस पण आहे.
हो मला अजून आठवते, बरोबर एकसष्ठ वर्षांपूर्वी, काळे आजींनी त्यांच्या सूनेकरता, म्हणजे काळे काकुंकरता मला इथे आणले होते आणि मग हळू हळू मी इथल्या सगळ्यांचाच झालो.

काळे आजी गेल्यावर्षी, महामारीत वारल्या तेव्हा खूप वाईट वाटले. विशेष वाईट वाटण्याचे कारण म्हणजे आजींना प्राणवायू न मिळाल्याने त्या गेल्या.

माझ्याकडे भरपूर प्राणवायू असतानापण मी त्यांना काहीच मदत करू शकत नव्हतो कारण मी इथे ह्या सोसायटीत आणि त्या हॉस्पिटल मधे. 

खरं सांगू का..त्यादिवशी पहिल्यांदाच आपण झाड असल्याचे फार दुःख झाले मला .

असो,त्यांना सद्गती मिळेलच ह्यात शंका नाही, कारण माझ्यासारख्या अनेक झाडांना त्यांनी जगवले आहे, अनेक लोकांची वेळोवेळी मदत केली आहे .

नेहमीसारख्या आज काळे आजी नाही येणारं सकाळी सकाळी...मला वाढदिवसानिमित्त भेटायला!पण काळे काकू नक्की येतील, सूनेबरोबर. 

पण आताशी त्यांना उशिर होतो यायला...कारण सूनेबरोबर येतात ना!!

दामले आजोबातर आजी गेल्यापासून, आजकाल संध्याकाळी यायला लागले आहेत माझ्याजवळ. अगोदर जोडीने दोघेही येऊन बसायचे सकाळी...आणि आजी रोजच दिवा लावायचा माझ्याजवळ.त्यांचा खूप जीव होता माझ्यावर. 

आधी ते दोघे खूप वेळ बोलत बसायचे माझ्या शेजारी...त्यांच्या मुलाने कसा यांना दगा देऊन अमेरिकेत जाऊन राहिला वगैरे वगैरे सगळे त्यांच्या घरातले मला माहित आहे हो, कारण इथेच बसून तर ते चर्चा करायचे.

अजूनही आजोबा संध्याकाळी येऊन, इथे बसतात, आणि दामले आजींशी गप्पा मारतात... अहो, आजींशी म्हणजे आजी माझ्यावर आहेच हे समजून माझ्याशी! 

मला त्यांची फार दया येते...मग मी त्यांना गार वारा देतो...बरे वाटावे त्यांना म्हणून!

तसे अनेक लोकं येतील बरं का आज मला भेटायला...कारण आजची उत्सवमूर्ती मीच ना, वटपौर्णिमा असल्यामुळे!

तशी पूर्वीसारखी आता सकाळपासून गर्दी नसते माझ्याजवळ, तेही बरच म्हणायचे, कारण म्हणूनतर बोलता येतय मला तुझ्यासोबत.

पूर्वी कसे 'आधी पूजा मग काम दुजा' असे होते बरं..आणि आता 'आधी काम दुजा, मग पेटपुजा, आणि मग वेळ मिळाला तर देवपूजा' असे झाल्यामुळे, अहो, काही बायका मला चक्क बारा वाजेपर्यंत उपाशी ठेवतात बर का.

नाही नाही मी तक्रार करत नाहीये, गंमत सांगतोय फक्त..आणि माझे सोडा हो..आता त्यांच्या सत्यवानाची ही तीच गत असते.

काही काही सत्यवान तर सावित्रीलाच आधी सकाळचा चहा देतात मग सावित्री उठून कामाला लागते...तसे मला त्या सत्यवानांचे कौतुकही वाटते, कारण युगानुयुगे चालत आलेल्या काही अयोग्य परंपरा बदलण्याचे साहस ते करतात. 

कारण दिवसभर, ही सावित्रीमाऊलीपण राबतच असते की त्यांच्या घराकराता, मग एक सकाळचा चहा दिला तर काय मोठी गोष्ट आहे..!

हं , तर काय सांगत होतो तुला, आजकाल माझ्या ह्या सावित्र्या उशिरा येतात, कारण घराचे आवरून, मुलांना शाळेत पाठवून, नवऱ्याला ऑफिसमधे पाठवून, सासू सासऱ्यांचे औषधपाणी करून, मग स्वतः ची पूर्ण तयारी करून की जेणे करून पूजा होताबरोबर तिलाही ऑफिसलाजाता यावे, असे सर्व आवरून येतात. आणि त्यांची तयारी म्हणजे 'थोडी' थोडीच आहे? 

अहो मैत्रिणींनी ठरवलेला रंग, पोत प्रमाणे साडी नेसायची, दागदागिने घालायचे, मेकअप करायचा.. आणि हो न विसरता ते छान सजवलेले पूजेचे ताट आणि वाण द्यायचे सामान बरोबर घ्यायचे. बघा आहे की नाही किती कामं....त्यामुळे होतो त्यांना थोडा उशिर....तरी बरं त्या मेहंदी एकदिवस आधीच लावून घेतात, फेशियल तीनचार दिवस आधी आणि केसांना डाय पण अगोदर येणाऱ्या रविवारीच करून घेतात म्हणून बाराला तरी पोहचतात बरं..

असूद्या , पण मला मात्र त्या कधीही आल्या तरी आनंदच होतो, कारण माझ्याकरता त्या सगळ्याच माहेरी आलेल्या मुलींसारख्या आहेत. म्हणून उशिरा आल्या तरी, आठवणीने आल्या ना, असे समजून, एका वडिलांना मुलगी माहेरी आली की जसा आनंद होतो अगदी तसाच मलाही होतो.

आणि आत्ताची नवीन पिढी आली *म्हणजे तर*, हा आनंद द्विगुणित होतो. कारण त्यांच्यात इतकी एनर्जी आहेकी मलापण थोडे तरुण झाल्यासारखे वाटते...आणि म्हणूनच मला भारी आवडत बाबा त्या सगळ्या आल्या म्हणजे.

माझी पूजा करतात म्हणून नाही हो, अहो पूजा काय नावालाच, पण मस्त मस्त फोटो काढतात ना राव माझ्या सोबत. मी पण पाऊट करतों त्यांच्याचसारखे, वेगवेगळे पोझ देतो. तुम्हाला वाटेल झाडाला कसले आले आहेत पोझ, पण आता घरी जाऊन काढलेले फोटो बघा नीट म्हणजे तुम्हाला लक्षात येईल.

आज्यांबरोबर अगदी एखाद्या संतासारखा उभा असतो मी, तर त्या लेले वहिनीचा ग्रुप आहेना त्या सगळ्या कश्या थोड्या वाकड्याहून फोटो काढतात तसे मीपण माझ्या फांद्यांना थोडे तिरके लूक देतो बरेका

आणि हो, ती आपल्या सोसायटी मधली छम्मकछल्लो आहे ना रेवती, तिच्या सोबत तर (बरोबर तर) मी अगदी विशितल्या मुलीसारखा उडत असतो म्हणजे माझी पाने उडवत असतो. तुम्हाला अंदाज येईलच व्हॉटसअपमधे सोसायटीच्या समूहातील आजचे फोटो बघितल्यावर.


आजच्या दिवशी मी खूप आनंद करणार, कारण एकच दिवस सगळे वेळ काढतात माझ्या करता...चला पण काढतातना तेवढेच बस..!

खंत एकच गोष्टीची वाटते,ती ही की माझ्याकडे द्यायला खूप काही आहे पण ही नवीन पिढी त्याला घ्यायला तयारच नाहीये. ....काय म्हणाला तुमचेही तसेच होते आहे.... मग तसे म्हटले तर निदान वर्षातून एकदा तरी आठवण काढतात हो ह्या बायका माझी.

आणि हो, आता तर नवीन पिढीमधले बरेच पुरुष पण यायला लागले आहेत पूजेला, मला माणसातला हा बदल खूप आवडला बरं. 

अगदी खरंय ना, जेवढी सावित्रीला सत्यवानाची गरज आहे तेवढीच गरज सत्यवानाला पण आहे सावित्रीची! आजकालची सावित्री सत्यवानाच्या खांद्याला खांदा लावून साथ देते सगळ्याच बाबतींमधे.आणि विशेष म्हणजे काही अपवादात्मक पुरुष सोडून, बाकी सगळे आपआपल्या सावित्रीला थोडी फार मदत करत असतात बरं का.

अरे पण गंमत सांगू का जेव्हा पुरुष पण पूजा करायला येतातना तेव्हा त्यांची खरी परीक्षा असते बरं . ते स्वतःच्या बायकोच्या सगळ्या सूचनांचे पालन करतात. 

मला आश्चर्य वाटते की, त्यांना एवढ्या गर्दीत पण स्वतःच्या बायकोचा आवाज मात्र अचूक ओळखता येतो बरं....पण त्यांचे लक्ष मात्र आजूबाजूला असलेल्या रंगीत फुलपाखरांकडे सारखे सारखे वेधले जात असते, त्यात त्यांची चूक नाही म्हणा, आजूबाजूला आकर्षणच एवढी असतात की विश्वामित्राचा संयम पण तुटेल......पण तरीही ते पूजा मात्र बायको बरोबरच करत असतात, पूर्णपणे तिच्या इशाऱ्यावरच.

आणि हो,एक अजून गंमत म्हणजे कधीकधी बायकापण सूत बांधत असताना मला मनातल्या मनात सांगत असतात की "देवा! हा सातवाच जन्म असू दे आमच्या नात्याचा, पुढल्याजन्मी मला *****ची बायको कर देवा."

अरे एक अजून गंमत सांगायची राहिली..ती म्हणजे गुरुजींची...बायका वाढल्या की पूजा छोटी होते ..आणि कमी बायका असल्यास सविस्तार ....त्यात एखादी जास्त दान-धर्म करणारी असेल, मग तर विचारूच नका"

चला भरपूर गप्पा मारल्या, तुला उशीर होत असेल ना...त्या बघा सोसायटीच्या बायका येत आहेत पूजेला. आता इथे मज्जाच मज्जा येणार आहे. अरे पण ह्या बायकांना सांगा हो कोणीतरी, दोन उदबत्या लावल्या तरी चालते, सगळ्यांनीच चार-पांच लावल्यातर मला पण प्राणवायूची कमतरता होणार.

कोणीतरी माझी ही विनंती पोहचवा रे माझ्या मुलींपर्यंत.

वटवृक्षाच्या ह्या सगळ्या आठवणी आणि मनोगत ऐकून मला वाटले की आपण आत्ता पर्यंत ह्याला फक्त एक झाड म्हणून बघत होतो पण ह्याच्या मनात तर कितीतरी भरलेले होते ....आणि मला आनंद ह्या गोष्टीचा वाटला की त्याने मला त्याच्या मनातले सांगायला निवडले...किती नशीबवान आहे मी!


© सौ. अनला बापट

सदर कथा लेखिका सौ. अनला बापट यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.




















टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने