जिद्द ( भाग- 2 )


© अपर्णा देशपांडे



दिव्या हात वर करून सैनिक चौकी जवळ आली .

" खांद्यावरची बॅग खाली फेक !"

तिने फेकली . ,लगेच एक जवान पुढे धावला ..तो हात लावणार इतक्यात मागून आवाज आला , " रुक ए खोते !!

बम होगा तो ? "

" ए लडकी , वो बॅग दूर फेक दे !!"

तिने शांतपणे ती बॅग उचलून दूर फेकली . ते फक्त चारच जण होते .

दिव्याला वाटले , मी एकटी भारी पडेल ह्यांना . पण तिने दोस्तीचे निशाण दाखवले होते आणि हा दोन देशाच्या सन्मानाचा विषय होता  म्हणून ती शांत होती .

खाली मोठाले बंकर होते . तिथे तिला बसवण्यात आले . काही मिनिटात तिथे मेजर परवेझ आझमी आले .

" तलाशी लो इसकी !"

तिच्या कपड्याची तपासणी झाली .

आतापर्यंत तरी तिच्याशी वागणूक चांगली होती .

" कुठून आलीस ?"

" जम्मू वरून उडताना कालच्या भीषण वादळात विमान सोडावे लागले . पॅराशूट चा कंट्रोल गेला . वादळात मी इकडे येऊन पडले . "

" तुम्ही किती जण आहात ?"

" इथे ? ..मी एकटीच . "

" आमच्या हद्दीत किती जण घुसलेत ? "

" घुसले ? प्लिज !! इथे मी एकटीच फेकल्या गेलेय . विश्वास ठेवा , हे अपघाताने झालंय ."

" मी विचारलं , तुम्ही किती जण आहात ? " आवाज तीव्र झाला होता .

" आम्ही चार जण श्रीनगर खाडीत जाणार होतो . खराब हवामान मुळे पॅराशूट मधून उड्या माराव्या लागल्या . मी एकटी इकडे पडले ."

" कशावरून ? कशावरून तू एकटीच इकडे आलीस ? तुझं बोलणं झालं त्यांच्याशी ? "

" नाही "

" मग ? बाकीचे साथीदार कुठे आहेत ?"

" ते श्रीनगर ला पोहोचले असतील "

" कशावरून ? तेही आमच्या हद्दीत आले नसतील कशावरून ? " त्याच्या आवाजातला संताप जाणवत होता .

" ....." ती गप्प .

तिथे एक जीप आली . तिला त्यात बसवून जीप निघाली .

गर्जनवाल हेड क्वार्टरवर तिला नेण्यात आले. तोपर्यंत तिच्या बद्दल ची सगळी माहिती तिथे पोहोचली होती .

तिथेही तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले . ती एकटीच त्यांच्या हद्दीत आली आणि बाकीचे भारतात राहिले ह्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता .

त्यांचेही एका दृष्टीने बरोबर होते असे तिला वाटले .

' दिव्या शेरगिल व्यतिरिक्त आणखी कुणी भारतीय व्यक्ती आमच्या हद्दीत धुसली नाहीये ना ह्याची जोपर्यंत खात्री पटत नाही , तोपर्यंत कॅप्टन दिव्या ह्या पाकिस्तानच्याच ताब्यात रहातील . आम्ही आपणास संपूर्ण सहकार्य करू. '
असा निरोप भारत सरकारला पाठवण्यात आला . 

भारतात सगळे निराश झाले . एकदा का हे प्रकरण लांबले की मग तिची लवकर सुटका होणे अवघड होणार ह्याची सगळ्यांनाच कल्पना होती .

दिव्याला देखील लक्षात आले होते की आता राजकीय रंग देऊन हे लोक आपली सुटका लांबवत रहाणार .

इथून दहा किलोमीटर वरील गर्जनवाल युद्धकैदी जेल मध्ये तिची रवानगी करण्यात येणार असे तिला एका ऑफिसरने सांगितले .

भारतात एक फोन करण्याची तिची विनंती फेटाळून लावण्यात आली .

आता आपण अनिश्चित काळा करता इथे अडकलो याची तिला कटू जाणीव झाली होती . ती विचार करत होती.

आपल्या सरकारच्या विनंती नंतरही ह्या लोकांनी दाद दिली नाही . म्हणजे यांची नियत साफ नाही ,किंवा त्यांना संशय आहे . आता इतर अनेक भारतीय कैद्यांप्रमाणे आपला छळ होणार . 

माहिती मिळवण्यासाठी कुठल्याही पातळीवर हे लोक जाणार . यांना आपण त्यांची लायकी दाखवून देऊ !!! कारण आता यांची गाठ माझ्याशी आहे !!!

दिव्याला एका बंद व्हॅन मध्ये अर्जनवाल च्या जेल मध्ये नेल्या जात होते . सोबत एक महिला अधिकारी पण होती . गाडीतून पळून जाणे अवघड नव्हते . 

पण नंतर तिथून पुढे ओळख लपवत बॉर्डर ओलांडणे देखील सोपे नव्हतेच ... शिवाय तिला आणखी काही काम करायचं होतं . ती एक कणखर आणि जिद्दी स्त्री होती . भारतीय सेना अधिकारी !

जेल मध्ये जाण्या आधी तिच्याकडची बॅग काढून घेतल्या गेली .

आत जाताना ती बारकाईने निरीक्षण करत होती . आत गेल्यावर तिला एक जेल चा ड्रेस दिल्या गेला .

" मला हे कपडे का देताय ? मी काही गुन्हेगार नाहीये , माझ्या देशाची मिलिटरी ऑफिसर आहे ! मी माझेच कपडे वापरीन . "

त्या महिला रक्षक ने जेलर सुलेमान ला कळवले . त्याने परवानगी दिली .

ती खुश झाली कारण तिच्या युनिफॉर्म ला चोर कप्पे होते .

तिला एका थाळीत जेवण मिळाले . जेवण घेऊन येणारा तिथलाच जुना कैदी होता . फ्री सेल वाला .

" मॅडम , जेवणात तुमची इच्छा असेल तर रोज दोन चिकन पीस मिळतील ...पण ...."

" ही दुसरी थाळी कोणाला ? "

" तुमचाच आहे , किशनसिंग !!"

तिच्या काळजात चर्रर्रर्र झाले . सहा वर्षे झाली होती किशनसिंग साठी भारत आणि त्याचे कुटुंब प्रयत्न करत होते .

"अजून ' आमचे ' किती आहेत ? "

तिला साधारण माहीत होते की आपले पाच लोक ज्यात एक व्यापारी पण आहे , इथे आहेत .

" अशी माहिती सांगायची म्हणजे.... " तो लोचट हसला .

तिने दोनशे रुपये काढून दिले .

" दोन मछवारे , एक व्यापारी , तंत्रज्ञ किशनसिंग आणि एक ...जवान आहे . पाच आहेत . यातील किशनसिंग उद्या आझाद होणार ."

" तिने खाली घुळीत पडलेला कागद घेतला . केसातील पिन काढली आणि कागदावर छिद्र पाडायला सुरुवात केली . तो कागद त्या माणसाजवळ दिला आणि सांगितले , " हे किशनसिंग ला द्यायचं . त्याने काही उत्तर दिलं तर मला आणून द्यायचं , अजून दोनशे रुपये देइन .

पंधरा मिनिटातच तो पुन्हा दोनशे घेऊन गेला .

तिने कपड्यात आत लपवलेला मोबाईल काढला . कोपऱ्यात गेली आणि फोन ऑन केल्याबरोबर एक तीव्र आवाज झाला . एक रक्षक धावत आला . पाठोपाठ जेलर सुलेमान आला . त्यांनी सेल उघडला , आत आले , सगळीकडे शोधले .... तिचे खिसे चाचपडले .. काहीच मिळाले नाही . तिने मोबाईल कोपऱ्यात टॉयलेट मध्ये टाकला होता .

" मोबाईल असेल तर आत्ताच काढून दे . मेजर साहेब आले तर चाबकाने फोडतील . "

" माझी एवढी हिम्मत ? बॅग तुम्हीच काढून घेतली , मग माझ्याकडे काय असणार ? " तिने नरमाईने म्हटले ,

पण आता मोबाईल तर हातून गेला होता .

पाठोपाठ मेजर वाझियान तिथे आले . त्यांच्या सोबत अजून एक जण होते .

" हॅलो कॅप्टन ! "

" हॅलो सर ! "

" everything ok ? "

" Not ok sir ! मी काही हेतू ठेऊन इकडे आलेली नाही , मी वादळाने चुकून येऊन पडलीये ."

" ते आम्ही खुपदा ऐकलं . खरं काय सांग ."

" सर ..मी ........

एक जोरात लाथ बसली तिच्या गुढग्यावर . ती धाडकन खाली आपटली .

" ओन्ली द truth मिस दिव्या !! "

" सर , तुम्ही माझा जीव जरी घेतला तरी मी हेच सांगेन ...कारण हेच ...

पुन्हा एक लाथ बसली .

ती खाली आडवी पडली होती . मेजर खाली वाकला , तिचे केस पकडले आणि दात ओठ खाउन म्हणाला ," तुझे इतके हाल करू की भीक मागशील आम्हाला ."

मागे वळून म्हणाला , " हिचा शर्ट उतरवा . नाही बोलली तर मग आणखी ......"

एक महिला समोर आली . तिने युनिफॉर्म चा शर्ट काढला . आता ती एक गंजी आणि पॅन्ट वर ठाम उभी होती .

.....पाकिस्तानात सापडलीस तर तुझ्यावर .... ......तिला सरांचे बोलणे आठवले ...........बेशक सर !!! ..तिने उत्तर दिले होते ............कशाही परिस्थितीला सामोरं जाण्याची तिची तयारी होती .


त्याने हातातला रॉड तिच्या गळ्याखाली धरला . त्याचे टोक रुतवत म्हणाला ,

" तुम्ही फक्त जगाला ओरडून सांगा की आम्ही कुरापती करतो .. आणि आता ही घुसखोरी ?? "

" जनाब , फोन आहे " कुणीतरी ओरडत आला .

तिच्याकडे तुच्छ कटाक्ष टाकून वाझियान गेला .

दुसऱ्या दिवशी तिला कर्नल हाश्मी समोर नेणार होते . रात्री चे जेवण घेऊन तो खुला कैदी आला . गुपचूप दोन चिकन पीस आले होते . सकाळी किशनसिंग ची सुटका झाली .

दिव्याचा छोटासा कागद आता भारतात पोहोचणार होता ... तो होता एक जबरदस्त निरोपाचा कागदी तुकडा .

एक अंधारी खोली ...वरती एक लाईट ....टेबलाच्या त्या बाजूला कर्नल हाश्मी ....समोर दिव्या .

पुन्हा सगळी चोकशी .... तेच प्रश्न. ....तिचे तेच ठाम उत्तर ... ति दाद देत नाही हे पाहून हाश्मी चिडला .

" हिचे हात बांधा मागे . झुबिना ला बोलावूनआण रे साबिन !! "

एक धिप्पाड स्त्री आत आली .

आल्या बरोबर तिने दिव्याच्या तोंडावर एक जबरदस्त ठोसा मारला . रक्त निघाले कारण एक दात तुटला होता .

" तू लवकर तोंड उघडलस तर वाचशील . स्त्री आहे , म्हणून सवलत मिळणार नाही !! "

" मी बोलेन , पण लेफ्टनंट जनरल हमीद नवाझी सर येत असतील तर मी फक्त त्यांच्याशीच बोलेन ."

" बकवास बंद ! काय ते आत्ताच बोल !! " कर्नल हाश्मी ने दात विचकले.

" नंतर ते तुमच्यावर चिडतील . मी सांगते त्यावर विश्वास ठेवा .... आतल्या गोटातल्या काही गोष्टी आहेत .."

मध्ये एक दिवस तसाच गेला .

दुसऱ्या दिवशी खास भेटायला लेफ्टनंट जनरल आले .

स्पेशल सेल मध्ये ती आणि नवाझी सर हे दोघेच होते . धिप्पाड अंगाच्या हमीद नवाझिंनी आल्याबरोबर म्हटलं ,

" हं बोल !! "

इकडे तिकडे बघत तिने हळूच म्हटले " सर , तुम्ही मला काही बोलण्यापूर्वी मी काही विचारू ? ..प्लिज ? "

" हं .."

" तुम्ही मला भारताची हेर असं सिद्ध जरी केलं तरी तुम्हाला काय मिळणार ?

" मग काय ? स्पष्ट बोल!"

" माझ्याकडे फार महत्त्वाची माहिती आहे ."

" What nonsense ."

" सर , तुम्ही चीफ होऊ शकता . माझ्याकडे तशीच माहिती आहे . "

" तुला काय हवंय ?"

" माझी आणि त्या चार जणांची सुटका . थेट भारतापर्यंत ."

" पुढे बोल ."

" आमच्या श्रीनगर जवळचा तुमचा विभाग आठवा . तिथे तुमच्या तीन चार चौकी होत्या . आसिफ इकबाल जेव्हा चीफ जनरल ऑफ आर्मी झाले , त्यांनी ताबडतोब तिथल्या चौकी उठवल्या . कारण ? कारण भारत सरकार ला त्या तिथे नको होत्या . त्यानंतर लगेच अमेरिकेने इंडियन ओशन मध्ये मलाबार एक्सरसाईझ राबवली . चीनवर वचक बसवायला ." ती त्यांचा अंदाज घेत बोलत होती .

" हं ... बोल .."

" नाही , . माझे बोलून झाले . तुम्ही विचारा काय ते . "

" पण त्याचा आर्मीचीफ शी काय संबंध ? '

" चीन ने आतापर्यंत तुम्हाला भरपूर मदत केली आहे आणि आता तर तुम्ही पाक चीन कॅरिडॉर बनवताय . आमच्या सरकारनी सुध्दा चीनशी करार केलाय .

मागे तुमचे चीफ जनरल आसिफ इकबाल भारतात आले होते तेव्हा आमच्या सरकारनी त्यांना ह्या प्लॅन मध्ये सामील करून घेतले . आम्ही पण इंडिया -नेपाळ- चायना कॅरिडॉर बनवतोय . 

चीनशी हातमिळवणी करून अमेरिकेला तुमच्या शमसी आणि शहाबाझ येथील ड्रोन बेस वरून बाहेर काढायचा प्लॅन आहे . आज तुमच्या शमसी आणि शहाबाग येथे अमेरिकेचे तळ आहे न ? सर , त्या बेस मुळे अमेरिकेला UAE , इराण ,इराक ,अफगाण ह्या सगळ्या पट्ट्यावर लक्ष ठेवता येते . 

 शिवाय हार्मोझ खाडीतून भारताला मिळणाऱ्या तेलावर लक्ष ठेवता येतं . आम्ही चीनच्या मदतीने अमेरिकेला दूर ठेवणार . त्यांचा वचक रहाणार नाही , आणि ह्या प्लॅनमध्ये तुमचे चीफ आम्हाला सामील आहेत . आता पहा काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने तुमचे फंड्स बंद केले आहेत . बरोबर ? "

" हे तू मला का सांगतेस ? "

" सर , चीफ ऑफ आर्मी तुम्ही बनू शकला असता . मी तुम्हाला भारतातून सगळी इन्फॉर्मेशन देते . तुम्ही सगळ्या मेंबर्स ना विश्वासात घेऊन आसिफ इकबाल यांना कैद करून मग चीफ होऊ शकता .तुमच्याकडे तर असंच होतं नेहेमी . "

" तू एक साधी मिलिटरी एजंट , तुला इतकं कसं माहीत ?"

" तुमच्या एजंट ची कुवत नाही का सर अश्या बातम्या मिळवायची ?"

" तोंड सांभाळून बोल !! . मला एक सांग , आमच्या कडे येऊन आमच्या मिलिटरी चिफला तुमच्या कडची इतकी सगळी इन्फॉर्मेशन कोण पुरवतय ? "

" ते बघावं लसगेल सर . तसंही मी एजंट नाहीये , मी तर चुकून इथे आलेय न जनाब !!! तुमच्या चीफ च्या मदतीने मात्र बरेच जण आलेत पाकिस्तानात . खूप काही अंतर्गत देवाण घेवाण होत असते , तुम्हाला तर कल्पना असेलच न सर?..."

ती बारकाईने त्याच्याकडे बघत होती ....तो विचार करत होता ... त्याला पटलं होतं तिचं म्हणणं .

" सर , एक सांगा ...चीनशी आमचं अचानकच कसं जमलं ? आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला , तो तुमच्यावर वचक बसवायला . चीन भारत कॅरिडॉर व्हायला तुमच्याच चीफ ने मध्यस्थी केली . 

परिणाम काय ? आम्ही आणि चीन मिळून तुम्हाला दाबून ठेवणार . आणि अमेरिकेला तुमच्यापासून दूर ठेवणार . म्हणजे दोन्ही बाजूने पाकिस्तान अडचणीत . भारत आणि चीन एक होऊन तुम्हाला शह देतील , शिवाय अमेरिकेकडून येणारी मदत बंद !! बदल्यात चीफ ला ....स्विसबँक ....आता ते मी काय सांगायचं . अशात ते स्वित्झर्लंड ला जाऊन आले न सर? "

तिचा बाण लागला होता . नवाझी विचारात पडले होते .

क्रमश:

© अपर्णा देशपांडे

सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने