हिस्सा

 © धनश्री दाबके



"इतकी वर्ष माझ्या घरात राहते आहेस आणि तरी माहेरचा पुळका काही जात नाही तुझा. काय एवढी जादू केली तुझ्या दादाने कोण जाणे की हा निर्णय घेतलास तू?" आनंदने ओरडून विचारले.

"माझ्या घरात?" मीराने आनंदकडे रोखून बघत त्याहीपेक्षा  मोठ्याने धारदार आवाजात विचारलं. 

कधी आवाज न वाढवणाऱ्या आपल्या बायकोचं हे रूप पाहून आनंद सटपटला आणि राहुलला म्हणाला, "चल रे राहुल, आपण दुसरी काहीतरी सोय पाहू."

"पण बाबा आज सप्लायरला पैसे देण्याची शेवटची तारीख आहे" असं म्हणत म्हणत राहुल रागाने बाहेर पडलेल्या आनंदच्या मागे गेला.

ते दोघं गेल्यावर मीराने दार लावून घेतलं आणि इतका वेळ थोपवून धरलेल्या अश्रूंना वाट करून दिली.

हो घेतला मी हा निर्णय! किती वर्ष अण्णा आणि दादाच्या जीवावर ओढायचा हा संसार?? कुठे आई अण्णांचा कष्टांनी उभारलेला, समाधानाने काठोकाठ भरलेला  संसार आणि कुठे माझा हा ठिगळं लावत लावत कसाबसा ओढलेला फाटका संसार. मीरा भूतकाळात हरवली.

आई, अण्णा, दादा, मीरा आणि त्यांचे माटुंग्याच्या मध्यवर्ती वस्तीत असलेल्या चाळीतले घर, म्हणजे मीराचं संपूर्ण विश्व. 

चाळीत असलं तरी घर तसं प्रशस्त होतं. अण्णांचं  वडलोपार्जित घर होतं ते. तिथून अण्णा आणि मुलांचीही  शाळा जवळ होती.

अण्णा हाडाचे शिक्षक होते. जे सद्विचार ते विद्यार्थ्यांना शिकवायचे तेच त्यांच्या जगण्यातही दिसायचे. जेवढी जमेल तेवढी मदत इतरांना करण्याकडे त्यांचा कल असायचा. 

आईचीही त्यांच्या या मदत करण्याच्या वृत्तीला साथ असायची. गरजेला पाठीशी उभं राहून आई अण्णांनी कितीतरी विद्यार्थ्यांची आयुष्य सावरली होती. 

त्यातल्या काहींनी आवर्जून अण्णांनी केलेल्या उपकारांची जाणीवही ठेवली होती. 

मोहनने म्हणजे अण्णांच्या लाडक्या विद्यार्थ्याने तर अण्णांच्या  रिटायरमेंट नंतर आई अण्णांना सिंगापूरला त्याच्या घरी नेऊन फिरवून आणलं होतं. 

तर अशा प्रेमळ आणि माणुसकीची उब असलेल्या घरात मीरा आणि तिचा दादा दिलीप मोठे झाले होते. 

दिलीपला अभ्यासात फारसा रस नव्हता. जेमतेम बारावी पर्यंत शिकून दिलीप एका छोट्याशा कंपनीत कामाला लागला. 

पण मीराने मात्र चांगल्या मार्कांनी डीग्री मिळवली आणि मध्यस्थांकरवी आनंदचं स्थळ तिच्यासाठी सांगून आलं. 

आनंद मेकॅनिकल इंजिनिअर होता. चांगल्या नोकरीत होता. पण लवकरच नोकरी सोडून त्याला स्वत:चा बिझनेस सुरू करायचा होता. बघायला आला तेव्हाच आनंद त्याच्या भविष्यातल्या प्लॅन्सबद्दल भरभरून बोलला मीराशी. 

हुशार, होतकरू, मोठी स्वप्नं पाहणारा हा आनंद मीराला आवडला. अण्णांनाही तो मीराला सुखी ठेवेल आणि पुढे जाऊन एक यशस्वी उद्योजक होईल असा विश्वास वाटला.

सगळं छान जुळून आलं व लगेचच्या चांगल्या मुहूर्तावर मीरा आणि आनंदचं लग्न झालं. माटुंग्याच्या चाळीत राहाणारी मीरा आनंदच्या पार्ल्याच्या वन रूम किचनमधे आली. 

आनंदच्या बहीणीचं लग्न झालेलं आणि आईवडील गावाला राहायचे. त्यामुळे दोघांचा राजाराणीचा संसार सुरु झाला. 

लग्नानंतर सहा महिन्यातच ठरवल्याप्रमाणे आनंदने नोकरी सोडली आणि स्वत:चं कार बॅटरीज बनवायचं युनिट सुरू केलं. 

नोकरीतून थोडाफार साठवलेला पैसा, बॅंकेकडून घेतलेले लोन आणि आनंदच्या वडलांनी केलेली मदत या सगळ्यातून भांडवल उभारून युनिटची सुरवात तर जोरदार झाली. 

पण मेहनतीचा, लवचिकतेचा अभाव असेल तर फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर कुठलाही बिझनेस तारून नेता येत नाही. आनंदचही तसंच झालं. 

पहिली दोनेक वर्ष थोडी बरी गेली आणि आनंदच्या युनिटला ग्रहण लागलं. 

नव्या ऑर्डर्स मिळेनाशा झाल्या.  खर्चाचा बोजा मात्र वाढतच गेला. इतका की त्याला बॅंकेकडून घेतलेल्या लोनचे हफ्तेही भरता येईनासे झाले. 

शेवटी नाईलाजाने ते युनिट त्याला विकावं लागलं. त्यावेळी अण्णांकडून पैसे घेऊन आनंदने झालेले नुकसान कसेबसे निस्तरले. 

मी हे तुमच्याकडून उधार म्हणून घेत आहे आणि लवकरच ते परत करेन असा विश्वास आनंदने त्यांना दिला. 

धंदा आहे तर चढाउतार चालायचेच असा विचार करून आई अण्णा आणि मीरानेही त्याचे हे अपयश स्वाकारून टाकले. 

त्यानंतर त्याची अजून एक आवड व्यवसायात बदलायचा विचार करून आनंदने शेअर्स आणि म्युचल फंड्स एजंट म्हणून काम करायला सुरवात केली. त्यातही थोडे दिवस बरे गेल्यावर परत बॅड पॅच सुरु झाला. 

त्याच दरम्यान राहुलचाही जन्म झाला.  जबाबदाऱ्या वाढल्या. मग मीराने छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या,  शिकवण्या घेतल्या आणि जमेल तसा संसार रेटायला सुरवात केली. ज्यात वेळोवेळी तिला अण्णांनी आणि काही वेळा दादानेही मदत केली. 

मीराला माहेरचा आधार आहे  म्हंटल्यावर आनंदचं चांगलंच फावलं. तो एकामागोमाग एक वेगेवेगळे उद्योगधंदे करून पाहू लागला आणि प्रत्येकवेळी अपयशीच ठरत गेला. 

प्रत्येकवेळी आनंद स्वतःच्या प्रयत्नांतली खोट नशीबाच्या नावाखाली लपवत राहिला. मीरा त्याला काही सांगायला गेली की चिडून तिच्याशी भांडू लागला. 

आधीच पैशाची चणचण त्यात घरातली भांडणं या सगळ्यामुळे घरातलं वातावरण नकोसं व्हायला लागलं मीराला. 

बरेचदा हे सगळं सोडून स्वतंत्र व्हावं असा विचार मनात यायचा पण लहानग्या राहुलकडे पाहून ती आलेल्या परिस्थितीला सामोरी जायची. आनंदच्या सतत पैसे मागण्याच्या सवयीमुळे त्याचे सगळे मित्रही त्याला दुरावले.

शेवटी बुडीत निघालेल्या उद्योगांमुळे आनंदला त्याचं पार्ल्याचं घरही विकावं लागलं. आनंदचे वडील सुरवातीपासूनच आनंदची चांगलीच कान उघडणी करायचे पण तो कशालाच बधत नाही म्हंटल्यावर ते शांतपणे त्याच्या अपयशातून बाजूला झाले. 

पण अण्णा मात्र शेवटपर्यंत मीराच्या मागे उभे राहिले. आपलीच निवड चुकली असं वाटून लेकीचा संसार सावरायला आर्थिक मदत करत राहिले. 

तिच्या डोक्यावर भाड्याचं का होईना पण एक छप्पर असेल याची त्यांनी सोय केली. पण आनंदला त्याची जराही लाज वाटली नाही. अण्णा देत गेले आणि तो घेत राहिला. 

प्रसंगी अण्णांनी दिलीपपेक्षाही मीराला झुकतं माप दिलं. आपण कुठलीच डीग्रीही मिळवू शकलो नाही याचा राग अण्णांच्या  मनात कुठेतरी आहे आणि मुलापेक्षा जावयाचं कौतुक त्यांना जास्त आहे हे सत्य स्वीकारून टाकून दिलीपने अण्णांच्या वागण्याचं कधीच वाईट वाटून घेतलं नाही. 

त्याने आणि वहीनीने त्यांच्या परीने शेवटपर्यंत आई अण्णांचा छान सांभाळ केला. 

गेल्याच वर्षी ऐंशीचा आकडा गाठून अण्णा कायमसाठी निघून गेले. त्याच वर्षी त्यांची चाळ रिडेव्हलपमेंटला गेली. 

जागेच्या बदल्यात बिल्डरकडून पैसे घेऊन मुंबईबाहेर पडून शांत ठिकाणी मोठ्या जागेत राहाण्याचा निर्णय दिलीपने घेतला. 

दिलीपचा हा विचार समजला आणि आनंदला घबाड मिळायची स्वप्नं पडू लागली. तू दादाकडे तुझा जागेतला हिस्सा माग असा दबाव तो मीरावर आणू लागला. 

तसं तर दिलीपने मीराला मदत होईल म्हणून तिला अर्धे पैसे द्यायचे ठरवले होतेच. तो तिचा हक्कही होता. 

त्यानुसार सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी आज मीरा दिलीपबरोबर वकीलाकडे जाणार होती. 

पण सकाळी तिने आनंद आणि राहुलचं बोलणं ऐकलं. 

"अरे. आज आईच्या सह्या झाल्या की भरपूर पैसे जमा होतील तिच्या अकाऊंटला. मग देऊ सगळ्या सप्लायर्सचे पैसे" आनंद म्हणत होता.

"बाबा पण आईने नकार दिला तर?" राहुलच्या या प्रश्नावर आनंदने "ते शक्यच नाही रे.. मला नकार देऊन ती कुठे जाणार? तिला जायचंच असतं तर तिने या आधीच मला सोडलं असतं. आणि तू आहेस ना माझा हुकमाचा एक्का.. तू जरा डोळ्यांत पाणी आणून सांगितलंस तिला की ती पाघळेल लगेच. " हे उत्तर दिले होते आणि आनंदच्या या निर्लज्जपणात राहुलच्याही हसण्याचा सूर मिसळला होता. 

जो मुलगा एकीकडे आई मी भरपूर मेहनत घेऊन तुला सुखात ठेवेन अशी स्वप्न दखवत होता तोच मुलगा वडलांसोबत आईच्या असहायतेवर हसतही होता. म्हणजे तो आनंदचीच गादी पुढे चालवणार होता.

ते सगळं ऐकून आनंदपेक्षा आज मीरा राहुलमुळे जास्त दुखावली गेली आणि तिने ठरवलं की आता बास. ही बापलेकाची जोडी कधीच सुधारणार नाही. 

बायको म्हणून मी आनंदच्या चुकांची शिक्षा भोगली. पण राहुलच्या या चुका मात्र अजिबात पोटात घ्यायच्या नाहीत. राहुलने जर मेहेनतीचा मार्ग धरायला हवा असेल तर त्याला मिळणारा हा आधाराचा टेकू मला काढून घ्यायलाच हवा.

आज दिलीपबरोबर वकीलाकडे गेल्यावर तिने वकीलाकडून एक एफिडेविट बनवून घेतलं. 

ज्यात अण्णांच्या घरावर सगळा हक्क फक्त दिलीपचा असून मला त्यातल्या कुठलाही हिस्सा नको असं लिहून सही करून टाकली. 

दिलीपने तिला खूप समजावलं पण ते न ऐकता तिच्यामुळे घरात विनासायास फुलणारं पैशाचं झाड आज तिने मुळापासून तोडून टाकलं. 

तसंही तिचं आत्तापर्यंतचं आयुष्य स्थैर्याशिवायच गेलं होतं. सध्यातरी डोक्यावर छप्पर होतं. पुढे गरज पडली तर राहिलेलं आयुष्य अगदी एखाद्या महिलाश्रमातही काढायची तिची तयारी होती. 

पण आता परत परत मायेच्या आणि खोट्या स्टेटसच्या त्याच त्याच दुष्टचक्रात अडकायची ताकद तिच्यात उरली नव्हती. 

घरी आल्यावर जेव्हा मीराने हक्क सोडल्याचे सांगितले तेव्हा आनंद तिच्यावर खूप चिडला. दादालाही त्याने खूप बोल लावले. 

नेहमीप्रमाणे मीरा आधी शांत राहिली. पण तू माझ्या घरात राहतेस हे ऐकल्यावर मात्र मीराचा पारा चढला. 

या माणसाला कधीच कशाची जाणीव होणार नाही. याचासाठी कितीही केलं तरी ते कमीच आहे. आज आपण अगदी योग्य निर्णय घेतला या विचाराने मीराने डोळे कोरडे केले.

आज दादाला त्याच्या हक्काचा पूर्ण हिस्सा देऊन मीराने आनंद आणि राहुलच्या चुका सावरण्यातल्या तिचा हिस्सा संपवून टाकला होता. 

समाप्त

© धनश्री दाबके

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने