अनोखी वटपौर्णिमा

© अनुजा धारिया शेठ



"उद्या वटपौर्णिमा आहे ह ताई, मी कामाला येणार नाही" असे बोलून मंजू गेली.

तीच्या पाठमोर्‍या सावलीकडे सानिका बघतच बसली. काही दिवसांपूर्वी दारू पिऊन नवर्‍याने मारहाण केली म्हणून रडत रडत सानिकाच्या घरी मंजू रडत रडत आली होती आणि आज तोच नवरा सात जन्म मिळावा म्हणून हि मंजू वटपौर्णिमा करणार होती. 

सानिकाला काय बोलावं हे काही कळलंच नाही. तिने हसुन तिला विचारलं,"खरच हवाय का ग तूला हा असला नवरा?"

मंजू म्हणाली, "ताई पूर्वापार चालत आलंय ते करायच बघा.. आमच्या मायनी, सासूनी जे केले ते मी करते.
उद्या ह्या सोसायटीत बघा ह तुम्ही पूजेला म्हणून बायका जमतात अन् तेव्हा कशा बोलतात? काय बोलतात? 

त्या बर्व्यांच तर बाहेर आहे, घरात महिती आहे वहिनीला, पण चर्चा नको म्हणून करते ती पूजा. उपास-बिपास काय करत नाय.

ती तिकड राहते ना तिचा नवरा तर तिला कोंडुन ठेवतो, रुपाने देखणी म्हणून त्यापेक्षा माझा कईक बरा.. चला जाते मी."

सानिका नवीनच राहायला आली होती सोसायटी मध्ये त्यामुळे तिची फार काही ओळख नव्हती.

तेवढ्यात बेल वाजली शेजारच्या धारप वहिनी आल्या होत्या. 

सानिकांनी त्यांना आत बोलावले, आणि गप्पा सुरू झाल्या, बोलता बोलता वहिनींनी उद्याचा विषय काढला. 

अमोल तिथेच बसला होता, सानिकाला काय बोलाव काहीच कळत नव्हते, तरी चेहऱ्यावरचा भाव कायम ठेवून ती वहिनींच बोलणे ऐकत होती.

वहिनी म्हणाल्या, "आपल्या सोसायटीमध्ये आपण सर्व जण मिळून साजरी करतो वटपौर्णिमा. सर्व तयारी पूजा सांगायला भटजी येतात. ते पूजेचे सामान आणतात, त्यामुळे त्यांच्या दक्षिणेसहीत प्रत्येकी १०० रू जमा करायचे असतात, तुम्ही पण करता ना पूजा."

सानिकाला काय बोलावं काहीच कळत नव्हते, तीने त्यांना १००रू दिले. 

वहिनी लगेच म्हणाल्या, "छान वाटलं बघा मला वाटलं होते एवढ्या शिकलेल्या तुम्ही तुम्हाला पटत नसेल हे सर्व.. चला येते मी.. उद्यां ग्रीन कलरची थिम आहे, नक्की या साडी नेसून." असे म्हणत त्या निघून गेल्या.

सानिका मात्र गप्प झाली होती, काहीच न बोलता ती आतल्या खोलीत गेली. 

अमोलला ते जाणवले, खर तर त्यांच्या लग्नानंतरची हि पहिली वटपौर्णिमा होती. 

"सानिका, मला समजतय तुझे मन, आपण दोघेही ह्या अनुभवातून गेलोय, ह्यात किती खरं आणि किती खोटं मला कळत नाही. परंपरा म्हणून तू करावस असा हट्ट मी अजिबात करणार नाही. तुझ्या मनाला जे पटेल तेच तू कर, समाजाची भीती बाळगून काही करू नकोस."

सानिकाला अमोलच बोलणं ऐकून खूप हलक वाटलं, तिच्या मनाची घालमेल त्याला न बोलता समजली होती, खरच हेच तर प्रेम असत ना.. पण मनाने अजूनही ती परागची होती. 

सानिका- अमोल दोघांचेही हे दुसरे लग्न होते.

सानिका आणि पराग यांचा प्रेम विवाह. 

त्याच्या प्रेमात पडल्या पासून परागसाठी ती हा उपवास करायची, लग्न झाले तेव्हा महिन्यातच आलेली पहिली वटपौर्णिमा किती छान नटून-थटून पूजा केली तीने. 

परागच्या प्रेमाचा रंग चढल्यामुळे अजूनच खूलून दिसत होती. पराग तर तीचं तें सौंदर्य बघून खूपच मूड मध्ये आला होता. 

तो नको म्हणतं असताना तीने त्याला ऑफिसला पाठवले, आधीच खूप सुट्ट्या झाल्या होत्या त्यात भर नको एवढंच तीचं म्हणण होते. 

घाईघाईत जाताना हेल्मेट न्यायला विसरला. आणि त्याच दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे त्याची गाडी स्लीप झाली आणि तिथेच सर्व संपले.. एक महिन्याचा संसार आणि ५ वर्षांचे प्रेम सगळं काही तो क्षण उध्वस्त करून गेला.

सासरचे सर्व जुन्या विचारांचे, तिला पांढर्‍या पायाची म्हणून घराबाहेर काढले.

पूर्ण खचून गेली होती ती.. दुसऱ्या लग्नाला तयार नव्हती.. आई काळजी करायची, पोरी अवघं २६ वय तुझं अख्खं आयुष्य काढायच आहे, एकटी कशी काढशील? 

४ वर्ष एकटीने काढल्यावर अमोलचे स्थळ मामाने आणले, त्याचा पण प्रेम विवाह पण प्रेम आंधळं ठरलं होतं त्याचं.

बड्या बापाची पोर, नाकापेक्षा मोती जड. घरजावई व्हायला नकार दिल्यावर तीने त्याला घटस्फोट दिला.

सानिकाला आईनं गळ घातली, बाबा गेल्यावर तुझ्या साठी जगले, सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुझे आणि परागचे लग्न मान्य केले आता माझी हि शेवटची इच्छा समजून लग्नाला तयार हो.

सानिका तयार झाली, तीचं पूर्वायुष्य तीने अमोलला सांगितल त्यावर अमोलने सुद्धा तुला पाहिजे तितका वेळ घे, काही घाई नाही असं सांगितलं.. समजून घेणारा नवरा मिळाला.

लवकरच मुहूर्त काढला, रजिस्टर पद्धतीने लग्न झाले. 

अमोलचे आई- बाबा गावाला राहायचे, इकडे शहरात हे दोघे. 

हळू हळू त्याचं नातं आताच कुठ फुलायला लागले होते आणि त्यात वटपौर्णिमा आली. 

सानिकाला अमोल आवडत होता, त्याच्यावर प्रेम देखील करू लागली होती ती. पण हे पूजा वगैरे करणे आता तिला पटत नव्हते. आणि अमोलने तिच्या मनाची घालमेल बरोबर ओळखली होती, म्हणून तिला आनंद देखील झाला होता.

वटपौर्णीमेचा दिवस आला, सकाळी सकाळी तिला अमोलने सांगितलं आपल्याला बाहेर जायचय. 

मुद्दामच जेणेकरून ह्या बायकांसमोर तिला मनाविरूद्ध पूजा करायला लागू नये. तयार हो पटकन.. अमोल म्हणाला. 

सासूबाईंनी पाठवलेली साडी तिने नेसली, खूप सुंदर दिसत होती ती. 

बायकांनी तिला घोळका करून धरायच्या आत अमोलने सांगितलं, "ह्या वर्षी आम्ही वटपोर्णिमा बाहेर साजरी करणार आहोत."

सगळ्या बायकांना अमोलचे कौतुक वाटले.

अमोल तिला घेऊन त्याच्या मित्राच्या दवाखाना होता तिथे आला. 

दवाखान्याच्या बाहेर ते सर्व मिळून वडाचे झाडं लावायचे आणि वटपौर्णिमा साजरी करायचे. गरजू महिला ज्यांना नवरा नाही, घर नाही अशा महिलांना मदत करायचे.

दुसऱ्या दिवशी परत एकत्र येऊन लोकांनी पूजा झाल्यावर इकडे तिकडे टाकून दिलेल्या फांद्या गोळा करून आजू बाजूचा परिसर साफ़ करायचे. 

अशी आगळी-वेगळी अनोखी वटपौर्णिमा बघून सानिकाला तिच्या जुन्या कटू आठवणींचा विसर पडला.

अमोलच्या मित्रांच्या बायका गरीब वस्तीत जाऊन व्यसन मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन करायच्या. तर महीलांना सॅनिटरी पॅड वगैरेचं वाटप करायच्या. 

वटपौर्णिमेला वाण म्हणून या बायकांना उपयोगी वस्तू, सॅनिटरी पॅड, तर एखाद्या अनाथालयात, दवाखाना, वॄद्धाश्रम यांच्या आजू बाजूला वडाचे झाड लावून साजरी करायच्या.

सानिकाला वटपोर्णीमा साजरी करायची ही आगळी वेगळी पद्धत  खूप आवडली. तिने मनापासून त्या सगळ्यात भाग घेतला. अमोलच्या मित्रांच्या बायकांबरोबर वडाची पूजाही केली.


आजच्या पूजेने अगदी सात जन्मांसाठी सानिका आणि अमोल यांची गाठ बांधली गेली नसली तरी आहे हा जन्म सुंदर बनवण्यासाठी अमोलने उचललेले हे पाऊल मात्र त्यांच्या नात्याचा पाया भक्कम बनवून गेला हे मात्र नक्की...!!


© अनुजा धारिया शेठ

सदर कथा लेखिका अनुजा धारिया शेठ यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

1 टिप्पण्या

  1. एक वेगळ्याच संकल्पनेवर आधारित वटपौर्णिमा साजरी केलीत...खूप छान 👌👌👍👍🙏🙏😊😊❤️❤️

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने