जीव जाळणारं पाणी

© वर्षा पाचारणे



"आयेssss, लय घसा सुकलाय गं... घश्याला कोरड पडलीया पार... पन आये, तू अशी मला एकटीला सोडून जावू नको ना गं".. असं म्हणताना सतत धाप लागल्यानं रखमाचं कृश शरीर आणखीनच थकलेलं आणि मलूल वाटत होतं.

रखमीच्या चेहऱ्यावरुन मायेनं हात फिरवताना रखमीच्या डोळ्यातलं पाणी टपकन मंजीच्या हातावर ओघळलं... तापाने फणफणलेल्या लेकीच्या अश्रूंचा चटका मंजीच्या कातर मनाला जाळून गेला.

"पोरी, ही शेजार पाजारची लोकं थुकतात गं आपल्यावर, तुझा बा सोडून गेल्यापासून.. कुणी घोटभर पाणी द्याया मागत नाय... आता मैलाची फरफट केल्या बगर पाणी मिळणं लय अवघड. तू पडून रहा, म्या आनती मडकं भरून". असं म्हणून मंजीने लेकीच्या डोक्यावर मायेने हात फिरवला. 

घरात अन्नाचा कण नव्हता.. अंथरूणावर आजारानं पडून राहिलेल्या लेकीला साधं पाणी मिळेना झालं होतं.. अतिशय दुर्गम भागात राहणारी मंजी नशिबामुळे मिळालेल्या चटक्यांबरोबरच निसर्गाचेही चटके सहन करत होती.

पाण्यासाठी वणवण करताना या आईची अवस्था अतिशय दयनीय होती. मंजी तिसऱ्यांदा पोटुशी राहिली , तेव्हापासून तिचा दारुडा नवरा कुठं फरार झाला, कळलंच नाही. 

त्यामुळे सारा भार मंजीवर येऊन पडला होता. एक पोटचं लेकरू झोपडीत आजाराने तळमळतंय, नुकतंच चालू लागलेलं दीड वर्षाचं लेकरू सतत भूकेमुळं रडारड करतंय, आणि त्यात आपल्या डोळ्यासमोर लेकरं उपाशीतापाशी भुकेने व्याकुळ झालेली बघून सुद्धा आपण काहीच करू शकत नाही, म्हणून मंजीचा जीव तीळ तीळ तुटत होता. 

मंजी कशीबशी त्या रणरणत्या उन्हात पाणी आणावं म्हणून बाहेर पडणार, तितक्यात दीड वर्षाच्या तान्ह्याने खेळता खेळता चुकून मडक्यावर लाथ मारल्याने मडकं धक्का लागून पडलं आणि फुटलं. 

 आधीच दरिद्री दशा, त्यात पाणी भरायचं एक साधन संपलं म्हणून मंजीनी सगळा राग लेकरावर काढला आणि त्याला बदाबदा बदडलं. 

लेकराला मनसोक्त धोपटून झाल्यावर मंजीने कोपऱ्यातला दहा ठिकाणी चेंबलेला हंडा उचलला. डोक्यावर चुंबळ ठेवली आणि ताडकन घराबाहेर पडली. आता मैल अन् मैल वणवण ठरलेलीच असल्याने स्वतःच्या तब्येतीची पर्वा करणं तिच्या विचारतंही नव्हतं..

दोन अडीच तासानंतर मंजी धापा टाकत कसाबसा तो हंडा घेऊन घराजवळ पोहोचली. खूप लांबची पायपीट अन त्यात तिच्या अशा पोटुशी अवस्थेत पाणी आणायला खूप कष्ट पडत असल्यामुळे तिला अंगातील अवसानच गळून गेल्यासारखं वाटत होतं. 

पण निदान आपल्या लेकरांची तहान भागवण्यासाठी सध्या तरी ती एवढंच करू शकत होती.. लांबून तिची नजर झोपडीवर पडताच तिच्या काळजात धस्स झालं. घराजवळ जमा झालेली गर्दी पाहून ती धास्तावली. 

कशीबशी धीर एकवटत ती घराजवळ पोहोचली. घराबाहेर दोन चार शेजारणी टाहो फोडायला लागल्याने ती धावत झोपडीत शिरली.. आईची वाट बघणाऱ्या रखमीने, तहानेने अक्षरशः व्याकूळ होत बिना पाण्याचा जीव सोडला होता.

मंजीला धक्का सहन न झाल्याने ती धाडकन जमिनीवर कोसळली. तिच्या डोक्यावरचा आधीच चेंबलेला हंडा दाणकन कोसळला.. उंबऱ्यातूनच सारं पाणी लेकीच्या मृत शरीरावर कोसळलं.

ज्या लेकीने पाण्याविना तळमळून तळमळून जीव सोडला होता, तिच्या निष्प्राण देहावर आज अक्षरश: जलाभिषेक झाला होता. 

मंजीला जबरदस्त धक्का बसल्याने तिला भानावर आणण्यासाठी शेजारणी तिला गदागदा हलवत होत्या. पण मंजी मनातून इतकी सुन्न झाली होती कि तिचे अश्रू देखील त्या भेगाळलेल्या आयुष्याने होरपळून आटले होते.

शेजारपाजारची मंडळी सांत्वन करून निघून जात होती.. शेजारी म्हणजे तरी किती.. इन मीन आठ दहा झोपड्या... त्यात दिवसभर रणरणत्या उन्हानंतर आभाळ आता चांगलच काळवंडलेलं.

तासाभरातच आभाळ आणखी रूद्र स्वरूप धारण करत गर्जू लागलं.. पावसाची चिन्हं दिसताच जो तो आपापल्या झोपड्याला सावरण्यासाठी, किमान उद्या तरी वणवण न करता पावसाचं पाणी साठवण्यासाठी, घरात असतील नसतील तेवढी चीनपाटं अंगणात पन्हाळीखाली ठेवू लागला.

आता घरात मंजी प्रेताकडं एकटक बघत होती.. लेकीचा निस्तेज, पाण्यासाठी आसुसलेला चेहरा बघून ती ताडकन उठली.. कोपऱ्यात ठेवलेल्या देवाच्या मूर्तीसमोर दणादण पाय आपटत गेली आणि त्याला जाब विचारण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडू लागली.

"अरे मेल्या, किती अंत बघतो आता माझा.. ज्यानी नांदायला आणलं तो अर्ध्यावर संसार टाकून कुठं पालथा पडला कळंना झालंय... पोटचं लेकरू पाण्यासाठी तरसून तरसुन मेलं.

 तिच्या शेवटच्या कार्याला पण कुणी माणुसकी दाखवंना झालंय... सगळी पावसाच्या पाण्याच्या आशेनी घरला गेली. तुला दया यील अशी अपेक्षाच नाय.. पण तुला माझं वाटोळं झालेलं बघायचंय ना.. असं म्हणत तिने दीड वर्षाच्या तान्ह्याला जवळ घेतलं.

आणि देवासमोरची काडेपेटी पेटवत तिने लेकीच्या प्रेतावर काडी टाकली. 

पालापाचोळा जळावा तसा क्षणात प्रेताने पेट घेतला.. तिच्या कपड्याची आग् वाढून झोपडीला लागली.. तान्हं लेकरू बहिणीच्या आशेनी तिला उठवण्यासाठी गेलं आणि आगीच्या लोळांनी क्षणात प्रेतासकट लेकराला पण कवेत घेतलं.

तितक्यात इतका वेळ दाटून आलेला पाऊस सहस्त्र धारांनी कोसळू लागला.

आता आग धुमसून धुरानी वातावरण झाकोळलं गेलं.. दोन्ही लेकरं गमावलेली माय अर्धवट भाजलेल्या अवस्थेत ग्लानीत गेली होती.

बाजूच्या लोकांनी कशीबशी हातगाडी वर बसवून मंजीला लांबच्या दवाखान्यात नेलं.. सरकारी दवाखाना असल्याने पैश्याची काळजी करण्याचं कारण नव्हतं.. 

मंजी दिवसरात्र पाणी पाणी म्हणून बरळत होती.. कशीबशी दोन दिवसांनी शुद्धीवर आली खरी पण पोटातलं लेकरू मात्र गमावलं होतं. 

पण त्या परिस्थितीत तिला तेही सुख वाटून गेलं. कारण जिथं अन्न पाण्याविना दोन लेकरांना डोळ्यादेखत गमवावं लागलं, त्यापेक्षा भविष्यात वाढून ठेवलेल्या यातना तरी पोटतल्या जीवाला आता सहन कराव्या लागणार नव्हत्या.

दोन दिवसांनी दवाखान्यातून तिला घरी पाठवण्यात आलं. पण दवाखान्याच्या आवारातून बाहेर पडताना असंख्य भावनांचा कल्लोळ मनात माजला होता.

आता घरी वाट बघणारी लेक नव्हती. दुडूदुडू धावत येऊन बिलगणारं तिचं तान्हं लेकरू नव्हतं. एव्हढंच काय पण राहण्याचा आधार असलेली तुटकी मुटकी झोपडी पण जळून राख झाली होती.. मग आता पुन्हा गावात जाऊन करणार तरी काय!

मंजी दूरवर वाट फुटेल तिकडे चालत होती.. तब्येत साथ देत नव्हती.. प्रचंड थकवा आल्याने पायात गोळे येत होते.. डोळ्याच्या धारा थांबता थांबत नव्हत्या. 

कुठेतरी जीव द्यावा असं वाटत होतं. चालता चालता रात्र झाली.. काळ्या कुट्ट काळोखात रस्ताही दिसेना झाला होता. अंगात त्राण उरले नव्हते. मंजी रस्त्याच्या कडेला बसली. 

दुरून कुठेतरी एका गाडीचा प्रकाश दिसताच मंजीने गाडीला हात दाखवला. त्या टेम्पो मधील माणसाला मंजीची दया आली.

"ताई एवढ्या रातीची हितं काहून बसलीस? तुला म्होरच्या शहरात जायचं हाय का?" गाडी चालकाने मंजीला विचारले.

"व्हय दादा, मला तिथवर सोडतो का?".. मंजीने असे म्हणताच त्याने होकारार्थी मान डोलावली. आता पुढचा प्रवास सुरू झाला होता. 

खरं तर कुठं जायचं काहीच माहीत नव्हतं. पण काळ्या कुट्ट अंधाराच्या भितीपेक्षा तिला हा पर्याय ठीक वाटला.. संपूर्ण प्रवासात डोळ्यासमोर मात्र रखमीचं प्रेत, तिचा शेवटी तळमळणारा जीव, बहिणीला बिलगायला गेलेलं तान्हं, अन् जगात येण्याआधीच उध्वस्त झालेला पोटातील अंश.. सारं कसं फेर धरून नाचू लागलं.

पहाटे गाडी शहराच्या मुख्य रस्त्याला लागली. "ताई, मला पुढं लय लांब जायचंय".. तुम्हाला हितं उतरायचं, का पुढं जायचं?".. गाडीवाल्याच्या प्रश्नाने मंजी भानावर आली. 

डोळ्यातले अश्रू जळक्या लुगड्याला पुसत गाडीवाल्याला हात जोडत खाली उतरली.. गाडी भरधाव वेगाने पुढे निघून गेली.. 

आता पुन्हा पहाटेच्या सुमारास दूरवर नजर पोहोचेल तिथवर कुणी काळ कुत्रं सुद्धा दिसत नव्हतं. मंजी आता एका भिंतीच्या आडोश्याला टेकून बसली.. डोळ्यासमोर ग्लानी येत होती. ती निमूटपणे डोळे मिटून बसली..

बाजूला झोपडपट्टी असल्याने तिथे आता लोकांची सकाळची दिवसाची सुरुवात झाली होती. लहान लहान लेकरं उघडी वाघडी फिरत होती.. शहराच्या पाणी पुरवठ्याच्या मुख्य पाईप लाईनजवळ अश्या कितीतरी झोपड्यांमध्ये कित्येक संसार थाटले होते. 

लेकरं झोपडी बाहेर खेळत बागडत होती.. ते सारं बघून मंजीला तिच्या लेकरांची आठवण आली नसती तर नवलच... पुन्हा तिच्या डोळ्यांना धारा लागल्या. हे सारं बघताना डोळ्यासमोर अंधारी येत असल्याने मंजी निपचीत पडुन राहीली. 

इतक्यात कानठळ्या बसवणारा आवाज झाला. मंजीचा डोळा उघडताच समोरची भयाण परिस्थिती पाहून तिच्या अंगाचा थरकाप झाला.. नुकताच दिवस सुरू झालेला असतानाच झोपडपट्टीवासीयांची मात्र काळरात्र झाली होती.. पाइप लाइन फुटून सगळ्या झोपड्यांमध्ये पुराप्रमाणे पाणी शिरले होते. 

बागडणारी लेकरं अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात आयुष्य गमावून बसली होती. फक्त आक्रोश ऐकू येत होता. जो तो जीव वाचवून पळत होता.. 

मंजी मात्र आसूसल्या डोळ्यांनी एव्हढं पाणी बघून त्या पाण्याच्या लोटात स्वतःला झोकून देत होती. नजरेत खूप गहन भाव दडला होता. 

आजूबाजूचे लोक तिला ओरडून आवाज देत होते. पण परिस्थितीला सामोरे जाण्याऐवजी बायको पोरांना एकटं सोडून नवऱ्याने पळ काढला, पाण्यामुळं लेकरं दुरावली, आयुष्याच्या चटक्यांनी राहतं झोपडं गिळलं, अश्या उद्ध्वस्त आयुष्याला संपवण्यासाठीच त्या जीव जाळणाऱ्या पाण्यात तिने स्वतःला झोकून दिलं. 

आधीच कृष असलेला देह वाहत कुठल्या कुठे गायब झाला, दिसलाही नाही.. एका आयुष्यभर झाकोळलेल्या आयुष्यावर आज अखेर पडदा पडला होता. 

कदाचित माय लेकरांच्या दुराव्याने नियतीही हळहळली असावी, अन् त्यासाठीच कदाचित कालचक्राचा फेरा आज इथे येऊन अशा पद्धतीने थांबला असावा, असेच वाटून गेले. पण तिने सोसलेल्या आयुष्याच्या चटक्यांची तीव्रता अती दाहक असूनही आजही अव्यक्तच राहिली, हीच एक खंत..

वाचकहो, आपल्यासारखी जनता एक दिवस जरी पाणी येणार नसेल, तर किती त्रागा व्यक्त करते, पण आजही समाजात अनेक दुर्गम भागात पाण्याच्या घोटासाठी दूरवर पायपीट करूनही पाणी मिळत नाही. 

अन्नपाण्याविना अनेकांना जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे नैसर्गिक ठेवा, अन्न, पाणी यांची किंमत वेळीच ओळखून किमान त्यांचा वापर योग्य पद्धतीने होईल याकडे विशेष लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

नाहीतर अश्या मूलभूत गरजांअभावी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दिवसागणिक वाढतच जाईल, ही काळ्या दगडावरची रेघ असेल. तहानलेल्याला पाणी देऊन त्याचा आत्मा तृप्त करणे नक्कीच सहज शक्य असते.. फक्त त्यासाठी माणसातील माणुसकी मात्र जिवंत असायला हवी.


© वर्षा पाचारणे

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने