हेच माझं माहेर

© शुभांगी मस्के



अंगणात लेकीने रुजवलेला मोगरा, पांढ-या शुभ्र फुलांनी बहरला होता, "माझ्या मोग-याची काळजी नीट घेत जा गं!!" सासरी गेलेली लेक वारंवार आठवण काढून देते आणि माहेरी आली की बहरलेल्या मोग-याला प्रेमाने गोंजारते. 

तोही हसतो, खेळतो, बागडतो आणि बहरतो आनंदाने ती आली की, जणू ती येण्याची वाटचं बघत असतो फुलण्यासाठी.

उन्हाच्या झळाही विसावल्या होत्या, कातरवेळी बर्फाची शाल पांघरुन आसमंत शहराला होता. थंड वा-याची झुळूक अंगणातल्या झोपाळ्याला हलके हलके झोके देत होती. 

वा-याबरोबर मोगरा आणि झोपाळ्याची जणू स्पर्धाच सुरु होती. पोर्चमध्ये खुर्चीत बसलेल्या सुमतीताई थंड हवेचे झोके घेत बहरलेल्या पांढ-या शुभ्र मोग-याच्या सुगंधाची लयलूट अनुभवत होत्या.

दिवे लावणीची वेळ झाली तशा सुमतीताई देवघराकडे वळल्या. शुभंकरोती आणि छोटूल्या नातीचे पिहूचे स्वर , कर्र कर्र झोपाळ्याच्या आवाजात मिसळत होते. झुंजमुंज वाहणारा वारा, मातीचा सुवास आणि दरवळणारा उदबत्तीचा सुगंध आसमंत सुवासीत करीत होता.

आज्जी भूत भूत!!.. भूत! आहे तिथे, पिहू ओरडली, हलणा-या झोपाळ्याच्या सावलीला बघून पिहू घाबरली होती. सुमतीताईंच्या गालावर हलकेच हसू आलं. 'भूत नाही गं बाळा वा-याने हलतोय तो पाळणा' काही वर्षापूर्वी हेच वाक्य तेवढ्याच उंच स्वरात म्हटल्याचं आठवलं, तेही लाडक्या लेकीसाठी राधासाठी.

पावसाची एक सर अंगण ओलं करुन गेली होती. "येरे येरे पावसा तुला देते पैसा" म्हणत पिहू अंगणात गोल गोल गिरक्या घेऊ लागली. राधाही तिच्या लहानपणी पाऊस अंगावर झेलत गोल गिरक्या घ्यायची. लेकीच्या आठवणींनी मनामध्ये दाटी केली.

राधा सारखाच पिहूलाही आवडतो, झोपाळ्यावर बसून पाऊस बघायला. राधा तासनतास झोपाळ्यावर बसून पाऊस बघत, गाणं गायची. वा-याची तिच्या स्वरांशी जणू जुगलबंदी चालायची, तिचे लांब सडक केस वा-यावर सैरभैर उडायचे, मनसोक्त वा-याच्या वेगाने उंच उंच झोके घेत "एक झोका, एक झोका फिटे काळजाचा ठोका एक झोका" झोका! आनंदात गायची, सासरी रमलेल्या लेकीच्या आठवणीने सुमतीताईंचे डोळे पाणावले.

पिहूला पाळण्यावर बसवून तिच्या शेजारी त्याही बसल्या. हल्ली रोजचचं झालयं, सायंकाळचा वेळ त्यांचा झोपाळ्यावरच जातो. पिहूच्या इवल्या इवल्या हातांनी, एक एक फुल धाग्यात ओवून बनवलेला
मोग-याचा गजरा, कपाळावरुन गालावर रुळतो, तोच मानेला झटका देत पिहू तो गजरा मागे सरकवते, अगदी राधेसारखी.

झोपाळ्यावरचे उंचच उंच झोके, गज-यांची आवड, आणि पाऊस कित्ती साम्य दोघींमध्ये. एक पिढी दूस-या पिढीसाठी आठवणींचा ठेवाच तर ठेवते आणि मग तोच ठेवा आठवत राहातो सतत, आठवणी बनून मनाच्या गोड कप्प्यात, पुन्हा पुन्हा आठवण्यासाठी, राधेच्या आठवणींनी सुमतीताईंच्या भोवती पिंगा घातला.

पोरींच आयुष्यचं तसं. इवल्या इवल्या पावलांनी घरभर नाचायचं, बागडायचं आणि एक दिवस निघून जायचं, तू ही निघून जाशील तुझ्या आत्यासारखी. हे अंगण पुन्हा एकदा रिकामं होईल, माहेर बनून गजबजेलं तुझ्या मनात, सदैव..

याच अंगणात तुझ्याही आठवणी दरवळत राहतील मोग-याच्या सुगंधासारख्या,सभोवताली. सुमतीताईंनी, पिहूच्या केसावरुन हात फिरवत तिला कुरवाळलं.

दरवर्षी माहेरी येणारी लेक, यावर्षी येवू शकणार नाही. माहीत असूनही मनात एक वेगळीच हुरहूर लागून राहाते, लेकीची आठवण स्वस्थ बसू देत नाही. मनाची घालमेल होतेच. 

लेकीच्या माहेरपणासाठी आसुसलेली वेड्या आईची वेडी माया. हलके हलके झोके घेत सुमतीताई विचारात मग्न झाल्या.

खूप लहान होते, आईवडिल देवाघरी गेले तेव्हा. आठवणीत साठवता येईल एवढाही सहवास त्यांचा मला लाभला नाही. 

आज्जीने कसबसं सांभाळलं, लग्न झालं आणि मामा-मामीने सांगितलं, आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं. आमच्याकडून आता तू कशाचीच अपेक्षा न ठेवलेली बरी आणि नावाला असलेलं सुमतीताईंचं उरलंसुरलं माहेरपणही संपलं.

ह्यांच्या सततच्या बदलीच्या नोकरीमुळे, माहेरची उणीव कधी भासलीच नाही. सासूबाईंनी आई सारखा जीव लावला, आई सारखी माया केली आणि माझं सासरचं "माझं हक्काचं माहेर झालं". लवकरच सासूबाईही गेल्या आणि पुन्हा, माझं माहेरपण संपलं.

दोन्ही पोरांना, राधा आणि मल्हारला मात्र मामाच्या घराचं अप्रूप होतं. "झुकूझकू झुकूझुकू अगीनगाडी गाताना", आमचं मामाचं गाव कुठे आहे गं आई? त्यांच्या बालमनाला अनेकदा प्रश्न पडायचा. 

त्यांची मित्रमंडळी मामाकडे गेली की, मग मात्र त्यांना सांभाळणं कठीण व्हायचं. पण पर्याय नव्हता. आठवणींत जपण्यासाठी आजोळच्या आठवणींचा ठेवा त्यांच्या लेखी रिकामाच राहीला होता. याची खंत माझ्या मनात नेहमीसाठी राहीली ती राहीलीचं.

तेव्हापासून मनात ठरवलं. आपल्या वाट्याला न आलेलं माहेरपण, लेकीसुनांना द्यायचं. भरभरुन जगू द्यायचं त्यांना त्यांच्या हिश्शाच माहेरपण आणि नातवंडांना त्यांच्या मामाचं गाव आयुष्यभर आठवणीत कोरण्यासाठी.
आजपर्यत ठरवलेल्या सा-याचं गोष्टी सत्यात उतरण्याचा प्रयत्न केला, तो आनंद घेवूनचं त्या विचारात मग्न झाल्या.

उन्हाळ्याच्या सुट्टीत राधा माहेरी आली की, तिचे कीती लाड पुरवू, तिच्यासाठी काय करु नी काय नको होऊन जातं. तिच्या आवडीचे सगळे पदार्थ गरम गरम करुन खावू घालावे, सासरी इतरांना गरम गरम वाढताना थंड झालेलं अन्न खाणा-या लेकीच्या ताटात तव्यावरची गरम गरम पोळी वाढून तुपाची धार सोडावी. 

नातवंडांचे मनसोक्त लाड पुरवावे. सुमतीताई गालातल्या गालात हसल्या.

आई तु फार लाड करतेस, मग लाडावतात ते, आणि घरी गेले की, फार त्रास देतात.. राधाची नेहमीची लडिवाळ तक्रार असते. नातवंड म्हणजे दुधावरची साय, आम्ही नाही पुरवणार त्यांचे लाड तर मग कुणी पुरवायचे. हक्कचं त्यांचा तो. आई आणि लेकीमध्ये ह्यावरुन होणारी जुगलबंदी.. त्यांच्यात झालेली लडीवाळ तक्रार, एवढ्या वर्षात सुमतीताईंनी अनुभवलेलं लेकीचं माहेरपण क्षणात डोळ्यासमोर तरळलं..

लेकीच्या लांब सडक केसांना तेलाची मालिश करताना, जरा पातळ झालेल्या केसांची चिंता अजूनही वाटतेच. मांडीवर डोकं ठेवून झोपलेल्या लेकीचा अलगद् डोळा लागला की, तिचं डोकं खाली ठेवायला मन अजूनही तयार होत नाही.

हातात रिमोट घेवून निवांत बसलेल्या लेकीला आंघोळ करुन आवरुन घे, म्हणायचीही इच्छा होत नाही. कारण कित्येक दिवसात असा निवांतपणा तिच्या वाट्याला आलेलाच नसतो. खायला काय करु? या प्रश्नावर काहीही! तिचं उत्तर, तिच्या आवडीवरचं येवून थांबतं, आणि तिच्या आवडीच्या पदार्थांनीच घर दरवळतं. सुमतीताईं विचारात मग्न झाल्या.

मल्हारचं लग्न झालं आणि विभा घरात आली. काही महिन्यातच पिहूच्या रुपात अंगण नेहमीसाठी गजबजलं. लेकीचं माहेरपण सांभाळताना सुनेचं माहेरपणही जपावं लागणार होतं. मनावर दगड ठेवून तिला माहेरी पाठवल्यावर शांत घर खायला उठायचं. दोघीही ननंद भावजया मैत्रिणी प्रमाणे ठरवून आपापल्या माहेरपणाला जात आणि येत, सुमतीताई आठवणीत मग्न झाल्या.

मागच्या वर्षी, राधा उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरपणाला आली. राधाच्या सासूबाईंनी निरोप पाठवला, विहीणबाई तुमच्याशी जरा काम आहे? बोलायचयं थोडं... राधाला सोडायला तुम्हीच या? नाहीतर ठेवा तुमच्या लेकीला तुमच्याच घरी नेहमीसाठी. राधाला कळेचना सासूबाईंचं काय बिनसलं. भांडण वगैरे, पण तसही काहीच नव्हतं.

अखेर राधाच्या सासरी जायची सुमतीताईंनी तयारी केली. जावचं लागणार होत, लेकीच्या संसाराचा प्रश्न होता. लेकीला सासरी पाठवताना एक वेगळीच हूरहूर मनात दाटून यायची, आज तिच्या सोबत जाताना त्या खूप अस्वस्थ होत्या.

राधाच्या सासरी जाऊन काय होणार, या चिंतेने रात्रभर धड झोपही लागली नव्हती. किती दिवस रहावं लागणार काहीच अंदाज येत नव्हता?काय आणि कशाला बोलवलं असेल? काय काम असेल? कशाबद्दल आणि काय बोलायचं असेल? काहीच कळेना? या आणि अशा अनेक प्रश्नांनी जीव भंडावून सोडला होता. जावई ही काही बोलायला तयार नव्हते.

दुस-या दिवशी, राधाच्या सासरी अंगणात पोहचते न पोहचते तोच विहीणबाई आरतीचे ताट घेवून बाहेर आल्या. काय होतेय, सुमतीताईंना कळेचना. सुमतीताईंच्या पायांवर त्यांनी पाणी टाकलं, त्यांना औक्षण करुन त्यांनी त्यांना घरात नेलं.

"तुम्हाला हक्काचं माहेर पण द्यायसाठी बोलवलंयं", काहीही काळजी करु नका? फोनवर बोललेलं सारं विसरुन जा, राग पोटात घाला, माफ करा. राधाच्या सासूबाई बोलत होत्या.

दहा वर्षात एकदाही तुम्हाला लेकीकडे राहाण्याचा प्रसंग उद्भवला नव्हता. अनेक वर्षापासुन ऐकतेय, तुम्हाला माहेर नाही. तुम्ही येण्यासाठी करावी लागली थोडीशी गंमत. आयुष्याच्या संध्याकाळी द्यावं वाटलं तुम्हालाही माहेरपण. राधाच्या सासूबाईंच्या शब्दांनी सुमतीताईंचे डोळे अलगद् पाणावले.

आई, लेकीचं माहेरपण आनंदाने करतेच ना!!मग लेकीने नको का आईचं माहेरपण करायला कधीतरी. माहेरपण म्हणजे तरी काय हो? मायेची भावना, आपुलकीचा ओलावा, सुमतीताईंचे पाणावलेला डोळे बघून राधाच्या सासूबाई म्हणाल्या. माहेरी फक्त, लाड पुरवून घ्यायचे बरं का? जपून ठेवा हे डोळ्यातले अश्रु निरोप देताना येवूद्या माहेरच्या आठवणीत आणि क्षणात गालावर हसू आले दोघींच्याही.

राधाला विचारुन विचारुन, राधाच्या सासूबाईंनी त्यांना खाऊ पिऊ घातलं आवडीनिवडी पुरवल्या. मैत्रिणींसारख्या गप्पां रंगल्या, बहिणींसारखी आठवणींची देवाणघेवाण झाली. गप्पांमध्ये रमताना कधी डोळ्यात आनंदाश्रू तर कधी मन दु:खाने हळहळलं. लेकीच्या माहेरी जास्ती दिवस राहाणं चांगलं नाही. म्हणून चार दिवसात यायला निघाली, पण जाऊ देतील तेव्हा ना..अखेर अडवलचं.

दहा बारा दिवसांचं माहेरपण आटोपलं. निघायची वेळ आली, राधाच्या सासूबाईंनी साडीचोळीने ओटी भरली आणि म्हणाल्या, मला बहिण नव्हती, वाटलं कित्येक वर्ष शोधत असलेली बहिण तुम्हीच आहात, तुमच्या रुपात मला बहिण मिळाली. सुमती ताईंच्या मनातलं राधाच्या सासूबाईंच्या ओठावर आलं होतं.

बहिणीचं घर समजून येत चला दरवर्षी माहेरपणाला, राधाच्या सासूबाईंच्या वाक्याला मोडत राधाचे सासरे मध्येच बोलले, बहिणीचं कशाला भावाचं घरं समजून येत चला, हक्कानं!!

राधा दूरुनचं आईचं माहेरपण अनुभवत होती. आनंदाश्रू डोळ्यात तरळले होते. आईला हक्काचं माहेर मिळाल्याचा आनंद तिच्या डोळ्यातून जणू अश्रु बनून वाहात होता. सासरी निघालेल्या लेकीच्या मनाची घालमेल आणि निरोप देताना आईची अवस्था आज पात्र बदललेली होती.

आईच्या डोळ्यातले वाहणारे अश्रू राधाने पुसले. आई आता हेच तुझ्या "हक्काचं माहेर". हो बाळा आता "हेच माझं माहेर". लेकीच्या सासरी आनंद जपणारी माणसं आहेत, लेक सासरी सुखी आहे, एका आईसाठी याहून मोठ्ठा आनंद तो काय असणार होता.

मागच्या वर्षीच्या आठवणीने सुमतीताई भाऊक झाल्या. ह्यावर्षी सगळचं चित्र वेगळं होतं. कोरोनामुळे सगळेच आपापल्या घरात अडकले होते. ह्यावर्षी, लेकीसुनां आणि माझही माहेरपण राहूनच जाणार असं वाटतयं. सुमतीताई मनातल्या मनात पुटपुटल्या.

घाल घाल पिंगा वा-या माझ्या परसात..
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात..
 
रेडीओवरचं गाणं कानावर पडलं, आणि विचारात गुंतलेल्या सुमतीताई जणू भानावरच आल्या. उठल्या-उठल्या स्वयंपाकाला लागल्या, आज सुनेच्या आवडीची कटाची आमटी आणि पुरणपोळीचा बेत करायचं मनोमन ठरवलं. सुट्ट्या लागल्यापासून विभाने स्वयंपाक घराकडे फिरकुही दिलं नव्हतं.

सुमतीताईंची स्वयंपाक घरात लूडबूड सुरु होती. आई मी करते हो? सासूबाईंना स्वयंपाक घरात बघून वीभा स्वयंपाक घरात आली. गेली अनेक दिवस, तु करतेच आहेस ना, आता पुढचे काही दिवस, तु तुझ माहेरपण अनुभवं.

आईकडून पुरवून घेतेस तसे लाड पुरवून घे. हट्ट कर. आणि जगून घे तुझं राहून गेलेलं या वर्षातलं तुझ्या हिश्शाचं माहेरपण. विभाचा हात हातात घेत सुमतीताई बोलल्या.

सुमतीताईंच बोलणं ऐकताच, विभाच्या गालावरची खळी अजूनचं खुलली.. खरं सांगू आई, मला या घरात मी सासरी आहे असं वाटतचं नाही. सासूच्या रुपात तुम्ही आईची माया लावलीत, वडिलांसारखे सासरे आणि खोडी काढणारा, चिडवणारा, प्रेम करणा-या जोडीदाराच्या रुपात चागला मित्र मिळाला. त्यामुळे माहेरपणाची उणिव भासलीच नाही कधी. माझं सासर कधी माझं माहेर झालं, मलाच कळलं नाही. भाग्य लागत हो असं सासर मिळायला, विभाला गहिवरून आलं होतं.

आज मुद्दामचं,सुमतीताईंनी सगळा स्वयंपाक, विभाच्या आवडीचा केला होता.

आज कुठलाही सण नसताना, जेवणात कटाची आमची आणि पुरणपोळी... बघून, आज काय विशेष मल्हार ने विचारल्यावर विभा म्हणाली, "विशेष काही नाही, सासरच्या अंगणात माहेरची बरसात केलीय आईंनी. त्याची आज पुरणपोळी." 

खरतर कुणालाचं काही कळलं नव्हतं. माहेरपणाचं सुख विभाला मात्र मिळालं होतं.

आता, लॉकडाऊनमध्येही माहेरी जाण्याची खंत मनात उरणार नव्हती. सासरच्या अंगणात सासुरवाशिणीचं माहेरपण आज हे घर अनुभवणार होतं. 

हा मंदधूंद वारा आईच्या कानात लेक सुखी असल्याची बातमी पोहचवणार याची खात्री होती. डोळ्यात येणारे अश्रु फक्त दु:खाचे नाही तर आनंदाचेही असतात हे फक्त एका आईलाचं तर कळतं असतं.

कथा आवडल्यास, लाईक कमेंट करा, शेअर करायची झाल्यास, लिखाणात फेरबदल न करता, नावासह शेअर करा. साहीत्यचोरी हा गुन्हा आहे.

 

© शुभांगी मस्के

सदर कथा लेखिका शुभांगी मस्के यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने