© धनश्री दाबके
"काकू, आज मीही चहा घेणार हा " प्रणवने दारात पाऊल टाकल्या टाकल्या जाहीर केलं.
"हो रे.. तू इथे आलास की चहाच घेतोस ते माहित नाही का आईला? आई, मला नकोय हा लगेच चहा. मी आधी फ्रेश होऊन येते" असं म्हणत मृणाल आत गेली.
"तुमच्या दोघांच्याही सवयी काही नवीन नाहीत मला मृणाल. प्रणवला आवडतो तसा मसाला चहा तयारच आहे माझा. हेही आत्ताच आलेत न ऑफिसमधून." रेखाताई बाहेर येत म्हणाल्या.
"या या जावई बापू. बसा. मस्त चहा टाकू." विनयराव म्हणाले.
"काय हो काका? किती वेळा सांगतो मी तुम्हाला की मला जावई बापू नका म्हणू म्हणून. उगीचच फार मोठं झाल्यासारखं वाटतं हो मला"
"अरे.. मग झालाच आहेस की तू आता मोठा. मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्टवर आहेस. स्वतःचं घर, चार चाकी. इतक्या लहान वयात एवढं सगळं मिळवलंस तू" विनयराव अभिमानाने म्हणाले.
"ते सगळं तुमच्या आणि काकूंच्या प्रेमामुळेच तर शक्य झालंय काका. तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं कोण जाणे." असं म्हणून प्रणव पंख्याखालची त्याची नेहमीची जागा पाहून फतकल मारून जमिनीवर बसला.
"हा काकू, आणा आता तो चहा इकडे. वाह ! तुमच्या हातचा चहा आणि तुमच्या घरातली संध्याकाळ मला आजही आवडते."
त्याला असा मन लावून चहा पितांना पाहून रेखाताईंना एकदम लहानपणीचा दहा बारा वर्षांचा प्रणव आठवला.
तेव्हाही असाच तो संध्याकाळी मृणालशी खेळायला म्हणून घरी यायचा. पण मृणालशी खेळण्यापेक्षा रेखाताईंच्याच मागे मागे जास्त असायचा. तेव्हाही हेच म्हणायचा की मला तुमच्याकडची संध्याकाळ खूप आवडते.
विनयराव ऑफिसमधून आले की लगेच त्यांना रेखाताईंच्या हातचा गरम गरम चहा लागायचा. रेखाताईंनीही त्यांच्या येण्याच्या वेळेला वेलची, आलं घालून उकळलेला चहा झाकण ठेवून मुरत ठेवलेला असायचा.
स्वैपाकघरातून येणारा तो चहाचा सुगंध व त्यात मिसळलेला देवघरातल्या केवड्याच्या उदबत्तीचा सुगंध दोन्हीही प्रणवला खूप आवडायचे.
मग ठरलेल्या वेळेला विनयराव आले की ते व रेखाताई दोघं मिळून छान गप्पा मारत चहा घ्यायचे. विनयराव आवर्जून मृणाल आणि प्रणवशीही गप्पा मारायचे. ते दोघंही दिवसभरातल्या, शाळेतल्या घडामोडी, मित्रमैत्रीणीं सोबत केलेल्या गमतीजमती सगळं सगळं त्यांना सांगायचे.
चहा पिऊन झाला की सगळे जण मिळून शुभंकरोती आणि मनाचे श्लोक म्हणायचे. प्रणवला ते सगळं फार आवडायचं. देवासमोर तेवत असलेल्या समईकडे पाहून खूप शांत वाटायचं त्याला. स्वतःच्या घरातल्या न आवडणाऱ्या संध्याकाळीसाठी जणू त्याचं मन तयार होऊन जायचं.
मग थोड्यावेळाने आई हाक मारायची आणि प्रणव घरी जायचा. तोपर्यंत त्याचे बाबा घरी आलेले असायचे. बरेचदा ते लटपटतच घरी यायचे. कधी स्वतःचे स्वतः तर कधी त्यांचे मित्र त्यांना आणून सोडायचे. पण त्या अवस्थेतही ते आई आणि प्रणववर फक्त आरडाओरडा करायचे.
आई दिवसभर स्वैपाकाची कामं करून थकलेली असायची. त्यामुळे कधीकधी तिचाही तोल जायचा व तिच्याकडून काही उत्तर मिळालं की बाबा अजूनच चिडून ओरडायचे. दोघांची भांडणं सुरू व्हायची आणि प्रणव कोमेजून जायचा. त्याला घरात थांबूच नये असं वाटायचं.
मृणालच्या घरातल्या शांत आनंदी वातावरणानंतर प्रणवला स्वतःच्या घरातली अशांत संध्याकाळ नकोशी व्हायची.
प्रणवला वाटायचं किती लकी आहे ही मृणाल. जिला इतके चांगले बाबा मिळाले आहेत. नाहीतर माझे बाबा! रोज दारू पिऊन घरी येतात, आरडाओरड करतात, जेवतात आणि झोपून जातात. सकाळ झाली की थोडे बरे असतात. आज मी नाही जाणार मित्रांबरोबर असं रोज सकाळी आईला सांगतात आणि संध्याकाळी मात्र न चुकता दारू पितात. संध्याकाळ झाल्यावरच नेमकं काय होतं या बाबांना.
वडील त्यांच्या व्यसनात गुंतलेले आणि आई दिवसभर राब राब राबून संसाराचा गाडा ओढण्यात गुंतलेली. त्यामुळे दोघांचंही प्रणवकडे असायला हवं तेवढं लक्ष नसायचंच. त्यात प्रणवने त्याच्या वडलांसारखं होऊ नये म्हणून आई त्याच्याशी फारच कडक वागायची.
सतत त्याला अभ्यासाला बसवायची. तो जरा कुठे इकडेतिकडे गेलेला तिला चालायचं नाही. पण आईचा चाळीत शेजारीच राहाणाऱ्या रेखाताई आणि विनयरावांवर मात्र खूप विश्वास होता. प्रणव त्यांच्याकडे गेलेला तिला चालायचं आणि बाबा यायच्या वेळेला प्रणव घरात नसलेलाच बरा असंही वाटायचं.
त्यामुळे रोज संध्याकाळी प्रणवने आई मी मृणालकडे जाऊ का असं विचारलं की ती लगेच त्याला पाठवायची. प्रणव तर वाटच बघत असायचा मृणालकडे कधी जायला मिळतय याची.
घरातल्या अप्रिय वातावरणामुळे हरवलेलं प्रणवचं बालपण रेखाताईंना दिसायचं आणि त्या अस्वस्थ व्हायच्या. एवढा सोन्यासारखा मुलगा पण त्याच्या नशिबात हे असलं कसलं बालपण . त्यांच्या मनात प्रणवबद्दल कणव दाटून यायची.
रेखाताई आणि विनयराव त्यांच्या परीने प्रणवला जपायचा प्रयत्न करायचे. शनिवार रविवारी मृणालला घेऊन बाहेर जायचे तेव्हा किंवा कधी कुठल्या पिक्चरला जायचे, कधी आईसक्रीम खायला जायचे तेव्हा प्रणवला आवर्जून त्यांच्या बरोबर बाहेर न्यायचे. त्याचे छोटे छोटे आनंद जपण्याचे प्रयत्न करायचे.
मुळातच शांत असलेल्या प्रणवचं अदबशीर वागणं बोलणं रेखाताईंना आवडायचं. प्रणव अभ्यासातही खूप हुशार होता. मृणालच्या दोन वर्ष पुढे होता. मग मृणाल बरोबरच रेखाताई प्रणवचाही अभ्यास करून घ्यायच्या.
खूप लहान वयातच प्रणव भरपूर अभ्यास करून खूप मोठं व्ह्यायचं आणि आईला सुखाचे दिवस दाखवायचे हे स्वप्न पाहू लागला. शाळेत चांगले मार्क मिळवून प्रगती करू लागला. विनयराव आणि रेखाताईंनी प्रणवला खूप प्रेम दिले. भविष्याची चांगली दिशा दाखवली.
जस जसा प्रणव मोठा होत गेला तस तसे त्याला काका काकूंनी त्याच्यावर केलेले उपकार आणि संस्कार कळायला लागले.
सततच्या दारू पिण्यामुळे प्रणवच्या बाबांची लिव्हर खराब होऊन ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचा शेवट झाला.
आई तशी आधीपासूनच एकटी होती पण वैधव्य आल्याने तिच्या काळज्यांमधे अजूनच भर पडली. दारू पिणारा असला तरी नावाला का होईना घरात एक पुरुष होता. तो गेल्यानंतर आईपुढे अजून काही अडचणी उभ्या राहिल्या. पण विनयराव आणि रेखाताईंनी सर्वतोपरी मदत केली आणि खंबीर आधार दिला.
बघता बघता काळ सरला. प्रणव आणि मृणाल कॉलेजला जायला लागले. बारावीत उत्तम मार्क मिळवून प्रणवने इंजिनियरींगला ॲडमिशन मिळवली. विनयरावांनी त्याच्या फीची जबाबदारी मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने उचलली.
"काका एक दिवस मी तुमचे सगळे पैसे नक्की परत करेन" असे म्हणून प्रणवने ती मदत स्विकारली आणि तो झपाट्याने अभ्यासाला लागला.
प्रणव लांबच्या कॉलेजमध्ये जायला लागल्यावर, प्रणव आणि मृणाल दोघांनाही आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही याची जाणीव झाली.
पण आपण जोपर्यंत काही बनत नाही तोपर्यंत मृणालचा विचारही करायचा नाही असं प्रणवने ठरवून टाकलं आणि त्यांचं नातं मैत्रीच्या पुढे कधी जाऊ दिलं नाही.
सुट्टीत घरी आला की मात्र प्रणव नेहमीप्रमाणे संध्याकाळी मृणालकडे जायचा.
त्याच्या लाडक्या काकूंच्या हातच्या चहाचा आणि केवड्याच्या उदबत्तीचा सुगंध मनात भरून घ्यायचा व भविष्याची सुंदर स्वप्नं रंगवायचा.
इंजिनिअरिंगची शेवटच्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतर कॅंपस इंटर्व्ह्यूमधेच प्रणवचं एका मल्टी नॅशनल कंपनीमध्ये सिलेक्शन झालं आणि त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही.
वर्षभरात मृणालचेही BCS पूर्ण झालं आणि तिनेही चांगली नोकरी पटकावली.
काकांनी त्यावेळी भरलेली फी जरी प्रणवने परत केली तरी त्यांचे उपकार मात्र प्रणव कधीच विसरला नाही. प्रणव आणि मृणालमधे नुसतीच मैत्री नाही याची कल्पना सगळ्यांना आली असल्याने दोघांच्या लग्नात काहीच अडचण आली नाही.
वडीलधाऱ्यांनी मोठ्या आनंदाने दोघांच लग्न लावून दिलं आणि दोन प्रेमात पडलेले जीव संसारात रमले.
आज प्रणवला वा वा करत चहा पितांना पाहून रेखाताईंना हा सगळा भूतकाळ आठवला आणि नकळत त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं.
इतक्यात हाश हुश करत घाम पुसत, आठ महिन्यांचं पोट सावरत मृणाल बाथरूम मधून बाहेर आली व पंख्याखालच्या खुर्चीवर बसली. तिला पाहून त्या अजूनच हळव्या झाल्या.
" काकू, काय झालं? कुठे हरवलात? " रेखाताईंच्या डोळ्यातलं पाणी पाहून प्रणवने विचारलं.
" काही नाही रे असंच.. तुला असं चहा पितांना पाहिलं ना तेव्हा लहानपणीचा तू आठवलास. असाच येऊन इथे बसायचास ना संध्याकाळी." रेखाताईंनी सांगितलं.
" हो काकू, मलाही आठवतात ते दिवस. काही म्हणजे काही विसरलो नाहीये मी. रोज संध्याकाळची चातकासारखी वाट बघायचो मी. तुमच्याकडे येऊन तुमच्या हातचा चहा पिण्यासाठी जो घरी आई मला कधीच द्यायची नाही. बाबांचा व्यसनामुळे धास्तावलेल्या आईला मला चहाचीही सवय लागू नये असं वाटायचं. असो.
पण आता मी ठरवलंय की मी काकांसारखाच वागणार आहे. कितीही बिझी असलो तरी संध्याकाळचा चहा मी मृणाल आणि आमच्या बाळासोबतच घेणार आहे." प्रणवही भावूक झाला होता.
"अरे हो, अजून बाळ यायचंय. त्याला तुझ्याबरोबर चहा प्यायला खूप वेळ आहे अजून." मृणाल म्हणाली.
" हो ग.. पण बाळ यायच्या आत तरी तू काकूंकडून त्यांच्यासारखा चांगला चहा करायला शिकून घेच. कारण संध्याकाळच्या खास वेळेला लागणारा चहाही तेवढाच खास व्हायला हवा ना" प्रणव म्हणाला आणि मृणालने त्याच्यावर डोळे वटारले.
समाप्त
© धनश्री दाबके
धन्यवाद.!!!
