©® मृणाल शामराज
सरस्वती मंदिर... ही शहरातील एक नामवंत शाळा.. आज वार्षिक स्नेहसंमेलन..शाळेची ती भव्य दगडी इमारत आज रंगीबेरंगी पताकांनी नटली हॊती. पटांगण लालचुटुक गालिचा अंथरलेल्या स्टेजनी नटलं होतं.
त्यावर नक्षीदार खुर्च्या विसावल्या होत्या. स्टेजच्या मागे सोडलेल्या झेंडूच्या माळा वाऱ्याबरोबर हलकेच डुलत होत्या स्टेजवर एका कडेला ठेवलेल्या टेबल वर मंद स्मित करीत असलेल्या धवल वस्त्रतल्या, हातात वीणा आणि पुस्तकं धरलेल्या सरस्वती देवीची सुंदर मूर्ती ठेवली हॊती.
झेंडूच्यात फुलांच्या माळेनी सजलेली कमरेएवढी लखलखीत पितळी समई कोपऱ्यात दीपप्रज्वलनासाठी सज्ज हॊती.
स्टेजच्या खाली गणवेशात बसलेली मुलमुली टिवल्याबावल्या करत हॊती. शिक्षक प्रवेशद्वाराशी पाहुण्याची वाट पाहत होते.. आता प्रतीक्षा हॊती फक्त येणाऱ्या प्रमुख पाहुण्याची.
थोड्याच वेळात माननीय जिल्हाधिकारी राघव साने यांच आगमन झालं.
त्यांच्या पाठोपाठ नामवंत शास्त्रीय गायक पंडित शशिधऱजीचं आगमन झालं..आसमंत टाळयांच्या कडकडाटानी व्यापून गेला. मुलं वाकून वाकून त्यांच्याकडे बघत हॊती. नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. सगळ्या वर्तमानपत्रातून, न्यूज चॅनेल वर ही बातमी गाजली हॊती..
दुसरे पाहुणे राघव साने, जे जिल्हधिकारी होते त्यांनी पण आपल्या चांगल्या सामाजिक कार्यानी जनमानसात प्रतिष्ठेचं स्थान मिळवलं होतं. त्यामुळे मुलांना दोघांनाही बघण्याची उत्सुकता हॊती.
पंडितजींना स्टेजवर आणण्यासाठी स्वतः राघव साने खाली उतरले. त्यांनी पंडितजीना हात धरून वर आणले. गणेश वंदन, सरस्वती स्तवन झालं. मुख्याध्यापक पाहुण्यांची ओळख करून दयायला उभे राहिले.
पंडितजीं बद्दल सांगून झाल्यावर, सरांनी राघव सानेचीं ओळख करून देताना सांगितलं की हॆ आपल्या शाळेचेच विद्यार्थी आहेत. दोघांसाठी टाळ्यांचा जोरात कडकडाट झाला.
पाहुण्यांनी दीप प्रज्वलन केलं.वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरवात झाली. मुलमुली आपलं गुणप्रदर्शन करत होते. पाहुणे कौतुकानी बघत होते..
कार्यक्रमाची सांगता होण्याची वेळ आली.. राघव साने मुख्याध्यपाकांच्या कानात कुजबुजले. त्यांनी मान डोलवली.. राघव साने उठले.. त्यांनी पंडितजीना वाकून नमस्कार केला. आणि खाली बैठकीवर बैसले.
त्यांनी खूण केली. वाद्यानी ताल धरला.. पंडितजी चकित होऊन सारं बघत होते.. आलाप घेतं तरल सूर पसरू लागले...
हॆ सुरांनो चंद्र व्हा.... पंडितजीचे डोळे विसफारले.. त्यांच्या कानाला काहीतरी ओळखीचं जाणवू लागलं..ते सूर त्यांच्या अंतःकरणात झिरपू लागले..त्यांनी निरखून पाहिलं...तेचं व्याकुळ, भावस्पर्शी डोळे.. तेच आर्त सूर..त्यांना तो दिवस आठवला..
हॆ शाळेचं पटांगण.. असाच बक्षीस समारंभ.. काळ मात्र चोवीस, पंचवीस वर्षापूर्वीचा.. कार्यक्रमाची सांगता करायला स्टेजवर एक सावळासा पण तरतरीत मुलगा आला. त्यांनी पंडितजीना आणि मान्यवरांना खाली वाकून नमस्कार केला आणि आत्मविश्वासानी आपल्या जागेवर येऊन बसला..
मुख्याध्यापक मोठ्या कौतुकानं त्याच्याकडे बघत होते. वाद्ये लागली. भैरवीला सुरवात झाली.. त्याच्या कोमल कंठातून सुरेल ताना बाहेर पडू लागल्या.. हॆ सुरांनो चंद्र व्हा... ते आलाप, त्या जागा त्या हरकती.. पंडितजी आश्चर्यचकित झाले..
एवढं कोवळ वय पण एवढी समज.. ते त्याचा आवाज ऐकता ऐकता त्याचा चेहरा बघत होते.. किती आर्तता हॊती आवाजात.. तेच विकल भाव चेहऱ्यावर..एक सुरेल तान घेवून त्यानं गाणं संपवलं..
टाळ्यांचा कडकडाट चालूच होता. कार्यक्रमासाठी आलेले पालक पण भारावून टाळ्या वाजवत होते.. केवळ तेरा वर्षाच्या मुलाचा हा आवाका.. पंडितजी उठून उभे राहिले.. त्यांनी त्याला जवळ बोलवलं. त्याच्या पाठीवर हात ठेवत ते म्हणाले..
"शाब्बास.. किती सुंदर गायलास पोरा..असंच गात रहा.. खूप मोठा हो..कार्यक्रम संपला की भेट मला.."
त्याच्या डोळ्यात पाणी आलं..खाली बसलेली त्याची आजी पण डोळे पुसत हॊती.
बक्षीस समारंभ सुरु झाला. मुलं बक्षीस घेतं हॊती टाळ्या वाजत होत्या.
त्यात एक नावं सारखं येतं होतं..
राघव साने..
आदर्श विद्यार्थी.. गणितात प्रविण्य.. सामान्य विज्ञान प्रविण्य.. खेळात सर्वोतम..तो दमदारपणे स्टेजवर येतं होता. हसत बक्षीस घेऊन जात होता...पंडितजी हॆ सारं पाहत होते.
समारंभ संपला. राघव आपल्या आजी बरोबर पंडितजीना भेटायला आला.
"बेटा, कमाल मुलगा आहेस तू.. तुझे आई,बाबा कुठे आहेत?? भेटून सांगायचंय त्यांना किती गुणी मुलगा आहे तुमचा."
राघव हमसून हमसून रडू लागला.
तेव्हा त्याची आजी म्हणाली, "हा माझा नातू.. मुलाचा मुलगा. ह्याच्या लहानपणी ह्याचे बाबा कार अकॅसिडेन्ट मधे देवाघरी गेले.. आता मी आणि हाच राहतो. थोडीफार शेती आहे आणि चार गाई आणि वासरू आहे. शेतीचा माल, गाईचं दूध विकून आम्ही चरितार्थ चालवतो. अभ्यासातही हा हुशार आहे. शिक्षकांची मदत घेवून स्वतः अभ्यास करतो."
पंडितजीनी जवळ घेवून त्याला थोपटलं, "बाळा, गाणं कुणाकडे शिकतोस?"
राघव एकदम कावरा बावरा झाला. चाचरत तो त्यांना म्हणाला.. रागवणार नसाल तर सांगतो..
"माझ्या बाबांना मी खूप मोठा माणूस व्हावं असं वाटत होतं. त्यांचा शास्त्रीय गायनाचा चांगला अभ्यास होता.ती आवड माझ्यात उपजतचं आली. मी दूध दयायला तुमच्या घरी यायचो. तुमचा रियाज चालू असायचा. दुधाचं रिकामं केलेलं भांड येईतो आणि नंतरही मी तिथे बसून राहायचो. ते सूर मला वेडं लावायचे.. माझा तिथून पाय निघायचा नाही. घरी आल्यावर मला जसं आठवेल, जमेल तसं म्हणत राहायचो.
माफ करा. दुसऱ्याच चोरून ऐकणं चुकीचं आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे.."
त्याच ते बोलणं आणि निष्पाप चेहरा पाहून भरावलेले पंडितजी म्हणाले, "बाळा, माफी कसली मागतोस ! एवढाली फी भरून मुलं क्लास बुडवतात., शिकायचा कंटाळा करतात. तु एकलव्यासारखं शिकलास.. पण तुला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे."
राघव खाली मान घालून म्हणाला, "उद्यापासून मी तुमच्या बंगल्यातल्या बागेला पाणी घालेन, गाडी पुसेन.."
त्याला मधेच थांबवत पंडितजी म्हणाले.. "तु बंगल्यावर यायचंस.. पण गाणं शिकायला.. हीच तुझी शिक्षा, आणि माझी गुरुदक्षिणा..."
पंडितजी राघवच्या डोक्यावर हात ठेवून निघून गेले.
दुसरा दिवस उजाडला.. आजीनी गाईचं दूध काढलं. सगळीकडे जावून राघव दुध देऊन आला. पंडितजीच्या नोकराने त्याला शाळा सुटल्यावर ये असा निरोप दिला. राघव खुशीतच घरी आला.. समोर त्याची लाडकी गाय कपिला आणि तिच लोभसवाण पिल्लू होतं. तो त्याच्याशी खेळू लागला..
तेवढ्यात राघव साने कुठे राहतो विचारत एक माणूस आला.. आवाज ऐकून आजी ही बाहेर आली.. तिने जरा घाबरतच विचारलं .." हो इथेच राहतो.. काय झालं?"
"काही नाही.. आजी, मी ऑल इंडिया सायकल मार्ट मधून आलोय."
आता राघवचं लक्ष त्याच्या हातातल्या नवीन कोऱ्या निळ्या चकचकीत सायकलीकडे गेलं.. तो कुतूहलाने बघत होता..
"हॆ पंडित शशिधरजीनी राघवसाठी पाठवलंय." सायकल देऊन तो माणूस निघून गेला.
राघवला हॆ स्वप्न आहे का खरं ते कळेना. त्यानं हळूच एक चिमटा स्वतःला घेतला..
त्या करकरीत सायकल वरून हात फिरवतांना त्याला आठवलं कोपऱ्यावर असलेल्या बंगल्यातल्या लिलीकडे अशीच सायकल हॊती.. ती शाळेत जाताना कसं आपण त्या सायकल कडे बघायचो.. किती आवडायची ती सायकल आपल्याला... आणि तशीच ही नवीन कोरी सायकल आज आपली आहे..
त्यानं आनंदात आजीला गोल फिरवलं.. आजी अरे.. अरे..म्हणेपर्यंत तिचं वासरू उधळलं होतं दूरवर.. आजीला दिसतं होता फक्त निळा रंग.. आणि भिरभिरणारी चाकं...
राघव आता रोज पंडितजीकडे सरावाला जावू लागला. एखाद्या भुकेल्या चकोराप्रमाणे असणारी त्याची तळमळ पंडितजींनी जाणली..
गुरु, शिष्य साधनेत रममाण होऊ लागले.. पण नियतीला त्याच हॆ छोटंसं सुखं पण बघवलं नाही.
छोट्याश्या आजाराचं निमित्त होऊन आजी पण देवाघरी गेली. आता राघव पूर्णपणे पोरका झाला..
राघवचा मामा त्याला घायला आला. त्यानं सगळी निरवानिरव केली. घरं, शेत विकून टाकलं. आता गाई आणि वासरू.. ते देऊन टाकताना मात्र राघव खूप रडला.
कपिला त्याला सोडून जायला तयार नव्हती. तिच्या डोळ्यातले ते करुण भाव.. ते वासरू त्याच्या पायापायात करत होतं... मायेचे सगळे पाशचं तुटले होते...
पंडितजीनी राघवला जवळ घेतं सांगितलं.. "बाळा.. खूप शिक. मोठा हो.. पण संगीताची साथ सोडू नकोस.."
जड पायांनी राघवनी हॆ गाव सोडलं. जाताना मात्र हट्टानी आपली सायकल त्यानं मामाच्या घरी नेली..
मामी पण खूप चांगली हॊती. , बापावीन असलेल्या या लेकराला त्यांनी खूप प्रेमानी सांभाळलं.. शहरात आल्यामुळे राघवच्या हुशारीला अजून पैलू पडले.. स्पर्धापरीक्षेत पण अव्वल येतं आज तो एवढ्या लहान वयात जिल्हाधिकारी झाला होता..
पंडितजीना हॆ सगळं डोळ्यासमोर तरळू लागलं.. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांसमोर उभा असलेला राघव दिसतं नव्हता.. राघवची अवस्थाही ह्याहून वेगळी नव्हती..
पंडितजींच्या सुरकुतलेल्या हातांना त्याच्या गरम अश्रुंचा स्पर्श जाणवला.. त्यांनी त्याला मिठीत घेतलं. सगळं पटांगण स्तब्ध होऊन हॆ पाहत होतं.
टाळयांच्या कडकडाटामुळे दोघेही भानावर आले.. राघव साने बोलायला उभे राहिले..
"नमस्कार.. काही ऋण ही न फिटणारी असतात.. तरी मी फुलं ना पाकळी देण्याचा प्रयत्न करत आहे..शाळेचं आणी माझ्या गुरूंचं ऋण फेडण्याचा हा छोटासा प्रयत्न.. मी शाळेत एक अध्यावत संगीतकक्ष बनवावा म्हणून देणगी देतं आहे.. आणि विनंती करत आहे की या कक्षाला पंडितजीच नाव देण्यात यावं."
सगळे भारावून गेले...
आज एका शिष्यानी त्याच्या गुरूला दिलेली ही खरी गुरु दक्षिणा हॊती ही..
©® मृणाल शामराज
सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा
