©® शुभांगी मस्के
सकाळची लगबग आटोपली, मुलं नवरा ऑफिसला निघून गेला की, मधुरा सगळं लगबगीने आवरायची. नऊ, सव्वा नऊ वाजलेले असायचे. सोसायटीच्या गार्डनमध्ये जाऊन.. थोडी फिरून यायची आणि येताना आवारात असलेल्या मंदिरातून बाप्पाच दर्शन घेतलं की, घरच्या देवासाठी कोपऱ्यावरच्या फुलवाल्या दादांकडून रोज एक फुलांची पुडी विकत आण्याची.
घरी आली की, पूजा आरती.. झेंडू, निशिगंधा, गुलाबाच्या फुलांनी मधुराच देवघर कसं, सुगंधित आणि प्रसन्न वाटायचं.
नेहमी झेंडू, निशिगंधा, गुलाबाच्या फुलांनी सजणारं मधुराचं देवघर, या लॉकडाऊनपासून जणू फुलांविना कोमेजून गेल्यासारखं दिसत होते.
कोरोनामुळे ना कोणत्या सणासुदिचं औचित्य उरलं होतं ना पूर्वीचा तो उत्साह उरला होता. परीस्थितीपुढे सगळेच हतबल होते, वेळचं तशी होती, पर्याय नव्हता. घरच्या घरी राहून सुरक्षित रहाणं जास्ती अपेक्षित होतं.
कोरोनाचा प्रादुर्भाव, थोडा कमी व्हायला लागला, तशी नियमांमध्ये थोडी थोडी शिथिलता आली असली तरी स्वतःची काळजी घेत, नियमांचे पालन करणे अत्यावश्यक होत.
आज चतुर्थी असल्याने, निदान सोसायटीच्या पार्कमधून, बाप्पासाठी दुर्वा तरी खुडून आणाव्या या विचारात मधुराने, बऱ्याच दिवसानंतर.. बाहेर जायची तयारी दाखवली.
पायात चप्पल सरकवली तशी लेक बघता क्षणी ओरडली.
"अगं , कुठे जातेयस तू, चेहऱ्यावर असे दोन दोन मास्क चढवून" बाहेर जाण्याच्या तयारीत असलेल्या आईला बघून लेकीने टोकलच.
"अगं , कुठे निघालीस, एवढ्या तयारीने? कोरोना संपला नाही आहे काही अजून!" इति लेक
"अगं, येते जरा पाय मोकळे करून," लेकीच्या बोलण्याकडे साळसूदपणे दुर्लक्ष करत मधुरा पाचव्या मजल्यावरुन खाली उतरली.
एरवी छोट्या मोठ्यांच्या आवाजाने, सकाळी मॉर्निग वॉकला येणाऱ्या लोकांच्या लगबगीने, सतत गजबजलेलं, हास्य क्लबच्या मेंबर्सच्या खो खो हसण्याने खिदळणारं पार्क आज अगदीच शांत शांत होत.
बगीच्यात झाडांवर गुलाब, गेंदा, कण्हेर, तगरची झाडं लटपट फुलांनी डवरली होती. मधुराला प्रसन्न वाटलं. क्षण भर दोन चार फुलं देवासाठी आणि बाप्पांच्या आवडीच कण्हेर तोडण्याचा मोह ही तिला झाला..
"फुलझाडांना हात लावू नये, फुलं तोडू नये", अध्ये मध्ये झाडांच्या बाजूने लावलेल्या फलकाकडे तिचं लक्ष गेलं तसं तिने मोहाला बाजूला सारलं आणि फुलांनी डवरलेल्या फुल झाडांचं सौंदर्य डोळ्यात साठवत मॉर्निंग वॉकच्या ट्रॅक वरून एकटीच फेरफटका मारत चालत होती..
गर्द हिरव्या लॉनच्या गवतावर छोटी छोटी कुत्र्याची पिल्ल मनसोक्त बागडत होती. एकमेकांच्या अंगावर, नाचत, खेळत होती. खारुताई तिच्या पिल्लांसोबत, मनसोक्त इकडून तिकडे येरझा-या मारण्यात दंग होती. पक्षांचा सुमधुर किलकीलात तिला हवाहवासा वाटला..
पार्कमध्ये एका कोपऱ्यात असलेआल्या असलेल्या मंदिरातल्या बाप्पाचे तिने हात जोडून दर्शन घेतलं. सकाळच्या सोनेरी सूर्यप्रकाशात देऊळ जणू उजळून लख्ख झालं होतं.
घंटा वाजवता येऊ नये म्हणून मंदिरातली घंटा कापडाने बांधून ठेवली होती. सकाळपासून तग धरुन बसलेला टिमटिमता दिवाही आता फडफडायला लागला होता.
सोसायटीच्या ऑफिसचे, सेेक्रेटरीच बाप्पाची पूजापाठ करत असेल असं मधुराला वाटलं. तेवढ्यातचं आपलं सोवळं सावरत बिल्डींगमधले जोशी काका बाहेर डोकावले.
"सकाळ-सायंकाळी पंडीतजी येऊन बाप्पाची पूजा करुन जातात. एवढ्यातच त्यांना ही कोरोना झालाय म्हणे त्यांना, म्हटलं देव बंद झालाय मंदिरात, पूजा नको बंद व्हायला.
तेव्हा निर्णय घेतला, करावी आपणचं पूजा.. दोन चार फुलं इथलीच तोडतो आणि वाहतो बाप्पाच्या चरणी.. बाप्पाच्या पूजेसाठी फुळमाळ, नसल्याची खंत मात्र चोशी काकांनी बोलून दाखवली.."
बाप्पाचा चरणाशी लीन झालेल्या मधुराने, काकांच्या बोलण्यावर काहीच न बोलता फक्त च मान डोलावली...
चाफ्याच्या झाडाखाली, छान फुलांचा सदा पडला होता , तिने मोजकीच ताजी फुल वेचली. ती ओंजळीत घेऊन, चाफ्याचा सुगंध तिने श्वासात भरला.
ताज्या, तूर्रेदार दुर्वा तोडत असताना तिच लक्ष गेटबाहेर, एका म्हाताऱ्या आजीकडे गेलं.
डवरलेल्या कदंब वृक्षाच्या दाट सावलीत आजी तिथे दोन पायावर बसली होती. बाजूलाच एक टोपली, आजीबाई काहीतरी विकण्याच्या दृष्टीने तिथे बसली होती.
'एकीकडे कोरोना, एवढे पेशंट वाढतायत आहेत, म्हाताऱ्या माणसाने गपगुमान घरात बसावं,' आजीबाईला बघून मधुराच्या मनात विचार डोकावला.
"फुल घ्या फुल... ताजी ताजी फुल." आजीबाई ओरडत होती.
आज बाप्पाला दुर्वा बरोबरच फुल ही मिळतील, आशेने मधुरा पार्कच्या बाहेर बसलेल्या आजीकडे हण्यासाठी गेटकडे वळली.
कपाळभर लाल चुटूक कुंकू, गर्द हिरव्या रंगाचं जूनाट दोन चार जागी फाटलेलं पण शिवून शिवून घातलेलं लुगडं.. हाताला चिकटून बसलेल्या हातभर बांगड्या, गळ्यात डोळ डोरलं असलेल्या काळ्या मण्याची पोत. मागे केसांचा अंबाडा, सडपातळ... काळा सावळा रंग पण देखणी आज्जी.
"आजी फुल कशी दिली?" मधुराने विचारताच, फुलांवर झाकलेलं फडकं आजीने आपल्या सुरकुतलेल्या हातांनी बाजूला सरकवलं.
लाल, गुलाबी, पांढऱ्या रंगाची जास्वंदी, पांढरी सदाफुली, रंगीबेरंगी कन्हेराची फुल, स्वस्तिकची तगर हळूच टोपलीतून डोकावली.
हिरव्यागार २१ दुर्वांच्या जुड्या, बनवून टोपलीत आयत्या तयार होत्या. जास्वंदाची फुल अध्येमध्ये गुंफलेले, दाट पांढ-या तगर फुलांचे हारही होते.
"सांग ना बाई, कोणते फुल देऊ? कितीचे देऊ?" आजीने डोक्यावरचा पदर सावरत विचारलं.
"वीस रुपयाचे द्या आजी," मधुराने आजीला फुलं बांधायला सांगितले.
पळसाच्या पानांच्या पुडीत आजी फुलं बांधून देत होत्या.
"आज्जी या वयात का हो फिरता अशा? काम करायचं वय नाही हे तुमचं. घरी आराम करावा म्हाताऱ्या माणसानं, दिवस बरोबर नाहीत, बघताय ना सगळ्यांनी स्वतःला कसं घरात कोंडून घेतलंय, किती वेळची बघतेय, एका ही गिऱ्याईक फिरकला नाही तुमच्या कडे"...
मधुराच्या बोलण्याने आज्जीच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं...
आजीने लुगड्याच्या पदराने डोळ्यातलं पाणी हळूच टिपल.
"काय करु मा, करा लागते! म्हातारा हाय घरी....दाना नाही घरात. मी भलाई काढीन पाणी पिऊन दिस पण खाटल्यावर पडल्या पडल्या भूक लागते म्हाताऱ्याले, औषधपाणी घ्या लागते. भुकेनं तळमळते जीव त्याचा"
आजवर एवढं केलं, खस्ता खाल्ल्या त्यानं.. आता त्याच्या या अशा दिवसात"... आजी बोलता बोलता थांबली.
"मुलं नाहीत तुम्हाला ?" मधुराने पोरांबद्दल विचारल्या आज्जीने पोरांबद्दल बोलायचं टाळलं..
"लेकराबाळाचं सुख मिळाले नशिब लागते, तेवढं बलवत्तर नशिब नाही मा आमचं.
खूश अस्त्याल ती आपल्या संसारात.. खूश राहो म्हणजे झालं" आजी फक्त एवढचं बोलल्या.
"आजी पण तुमचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांची आता, कायदा पण तेच म्हणतो हो...." मधुरा बोलली.
"आईवडील चार पोरायले सांभाळू शकतील पण मायबापाचा सांभाळ आज कलयुगात, लेकरं नाही करू शकत बाई, आजकाल मायबापात ही वाटणी करत्यात.
लेकरायले एवढ्याच एव्हढ करू शकतो, त्यायले त्यायच्या पायावर उभ करू शकतो.. मग आम्ही सवताले नाही का सांभाळू शकत माय".. आजीने बोलताना, हलकेच डोळे पुसून घेतले.
"आज्जी खपतात का हो फुल, म्हणजे कुणी घेतात का?" मधुराने विचारलं.
"हो बाई कुणी घेते, कुणी कोरोनामुळ जवळ भटकत बी नाय."
जेवढी खपली तेवढी खपली बाकी रस्त्यावरच्या मारुतीच्या देवळात मारुतीच्या पायाशी वाहायची आणि परतून जायचं घरी.
"कुठे राहता आजी तुम्ही?"... मधुराने विचारलं...
"त्या तिकडे. रस्त्याच्या पलीकडे....
एका बिल्डरच्या, रिकाम्या जागेवर.. छोटंसं झोपड हाय आमचं"..
झोपडीत राहाणा-या त्या आजीने, आपल्या झोपडीच्या शेजारी वर्षभर बहरलेले असतील अशा फुलांची झाड लावली होती. सरकारी नळ शेजारीच असल्याने आजीची बाग छान बहरली, असल्याचं आजीने सांगितलं. ती बागच आता आजी-आजोबांच्या उपजिविकेचं साधन होतं.
आजीने जास्तीवास्ती फुल टाकत दुर्वांची जुडी, घरी बहरलेल्या नागवेलीच्या वेलीची छोटी छोटी दोन पान ही पुडीत बांधली.
" घे माय!" म्हणत २० रुपयाची फुलांची पुडी मधुराच्या पुढ्यात टाकली.
"आजी फुलांचे हार पण द्या आणि उद्यापासून दहा हार देत चला रोज. यावेळी मी येत जाईल घ्यायला." हारांसाठी ॲडव्हान्स म्हणून मधुराने आजीच्या हातावर शंभर रुपयाची नोट ही ठेवली.
रोज नित्यनियमाने फुल घेणारं गि-हाईक मिळालं या विचाराने मिळालेली नोट आजीने कपाळावर लावली. नाक तोंड मास्कने झाकलं होत. चेहऱ्यावर हसू लपलं असलं तरी मात्र आजीच्या डोळ्यातून आनंद ओसंडून वाहत असल्याचं मधुराला जाणवलं..
देवळात जोशी काका मंत्रोच्चारात व्यस्त होते. मधुराने आजीबाई कडून घेतलेले हार, दुर्वा आणि जास्ती वास्तीची फुल ही, जोशी काकांच्या शेजारी असलेल्या टोपलीत ठेवली.
जोशी काकांच्या चेहऱ्यावरही हलकस स्मित आलं.. जोशी काकांनी, बाप्पाच्या गळ्यात जास्वंदीचा हार घातला.. बाप्पाची मूर्ती जणू, जास्वंदीच्या फुलांच्या हारात छान उठून दिसत होती.
गरीब, गरजू, आजीला मदत केल्याच्या भावनेत, बाप्पाही
गालातल्या गालात मधुराकडे बघून गोड हसत असल्याचं मधुराला जाणवलं. मंदिरात इतरही देवांच्या मूर्तींच्या गळ्यात ताज्या, ताज्या फुलांच्या फुलमाळा होत्या.
आजच नाही तर आता रोज, मधुराचं फुला विना ओसाड वाटत असलेलं देवघर, फुलांनी साजनार होतं, आनंदात नाचणारं होतं.
येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये... आता फुलं नाही म्हणत पूजेत तडजोड करावी लागणार नाही, बाकी काही नाही तर, फुलं तरी देवांसाठी मिळतीलच, या विचारातच मधुरा घराच्या दिशेने वळली..
डोक्यावर टोपली घेऊन, घराच्या दिशेने निघालेल्या आजीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे, बघताना...मधुराच्या चेहऱ्यावर संतृप्त भाव दरवळला होता.
नवरात्रीत, गौरी गणपतीत, आता सवाश्न भोजनाचा प्रश्न मिटला. आजीला अजून कोणत्या रूपात मदत करता येईल, या विचारातच मधुरा घरी पोहचली.
"हमारी मुट्ठी मैं आकाश सारा.. जब भी खुलेगी चमकेगा तारा"..... टीव्ही वर गाणं सुरू होतं ... गाण्याचे शब्द कानावर पडले आणि आजीची प्रतिमा पुन्हा मधुराच्या डोळ्यासमोर आली.
आयुष्य जगण्याचा प्रवास किती ही खडतर असू देत.. जीवन जगण्याची उमेद, आयुष्य सुंदर बनवते. म्हणतात ना मनगटात ताकद असली की, काहीच अशक्य नाही.
©® शुभांगी मस्के
सदर कथा लेखिका शुभांगी मस्के यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा
.jpg)