छबी



©️®️ सायली जोशी.



"आई, वहिनी तुझी काळजी घेत नाही की काय? तब्येत बघ किती वाळली आहे तुझी! अगं, महिन्याभरापूर्वी मी आले होते तेव्हा किती छान दिसत होतीस आणि आज खूपच बारीक दिसतेस.
खायला, प्यायला नीट देते का गं ती? नाही म्हणजे खायची, प्यायची तरी आबाळ नको ना व्हायला." श्रावणी आईला म्हणत होती.

हे ऐकून स्वयंपाकघरातून चहा - नाष्टा घेऊन येणाऱ्या अनुराधाची पावले दारातच थबकली.
आता सासुबाई आपल्या नणंदेला काय उत्तर देतात हे ऐकायला तिचे आतुर झाले.

"अगं, तसं काही नाही. अनुराधा सगळं नीटनेटकं करते." विद्याताई आपल्या मुलीला म्हणाल्या.

"हो. ते दिसतचं आहे. मी इथे असते तर तुला काही कमी पडू दिलं नसतं. पण सासरहून इथे येऊन करणं शक्य नाही मला."

"मग मला तुझ्या घरी घेऊन चल." विद्याताई.

"नेलं असतं आई, पण मी नोकरी करते ना! घरचं सगळं जमत नाही गं. मग तुझ्याकडे कसं लक्ष देऊ मी?"

"मग इथे येऊन राहा. ते सोपं जाईल म्हणा. कधी पासून येतेस बघ."

"आई, चहा आणि नाष्टा करून घ्या. ताई, तुमच्या आवडीचे दडपे पोहे बनवले आहेत. ते घेऊन येते. आईंना चावायचे नाहीत म्हणून त्याच्यासाठी उपमा केला आहे." अनुराधा विद्याताईंना नाष्टा देऊन आत गेली. 

नाही म्हंटलं तरी तिच्या डोळ्यात पाणी आलंच. 'ताईंच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं मनाला त्याचा त्रास होतोच.'

"श्रावणी, तुझी वहिनी घरचं सगळं सांभाळून नोकरी करते. सध्या माझी तब्येत ठीक नाही म्हणून घरातून काम घेतले आहे तिने. हे तुला जमणार आहे का? मी तुझ्या घरी येते म्हंटल्यावर तू नोकरीचे कारण देऊन मोकळी झालीस. तुझी सासू अजूनही घरातलं सगळं बघते, हे काय मला माहित नाही की काय?"
यावर श्रावणी काहीच बोलली नाही.

"ताई, हे घ्या." अनुराधाने पोह्यांची डिश श्रावणी समोर धरली.

"अनु, तू नाष्टा केलास? आणि तुझ्या कामाची वेळ झाली असली तर जा. श्रावणी दिवसभर थांबणार असेल तर स्वयंपाकाचे बघेल ती."

"आई, जाणार आहे मी. हाफ डे घेऊन आली आहे. ऑफिसला तर जावंच लागेल. घरी बसून आमची कामं होत नाहीत बाई." बोलता बोलता श्रावणीला ठसका लागला.
"वहिनी, अगं मिरच्या घातल्यास की मिरचीचे झाड घातलेस या पोह्यात? किती तिखट झाले आहेत पोहे!"

"तिखट माणसाला सगळं तिखटच लागणार. खाताना जपून खावं. रागारागाने खाल्लं की असं होतं." विद्याताई आपल्या लेकीला पुऱ्या ओळखून होत्या. त्यांचे बोलणे ऐकून अनुराधा गालातल्या गालात हसली.

"ताई, मी जाते. तुम्ही थांबा. मी थोड्या वेळाने जेवणाचे बघेन. तुम्ही दोघी निवांत बोलत बसा. तसंही महिन्याभराने आला आहात. ऑफिसला सुट्टी टाका हवं तर."
अनुराधा श्रावणीच्या प्रतिसादाची वाट न पाहता आपल्या खोलीत गेली.

"बघितलंस आई, कशी वागते तुझी सून! म्हणे ऑफिसला सुट्टी टाक. अशा वरच्या वर सुट्ट्या मिळत नाहीत काही." श्रावणी फणकाऱ्याने म्हणाली.

"हो. रोजच बघते मी तिला. सगळ्यांशी छान वागते गं ती!" विद्याताई हसत हसत म्हणाल्या.

"आई, तू तिची आई आहेस की माझी? एकदाही माझी बाजू घेत नाहीस ते." श्रावणी रुसून म्हणाली.

"मी तुझी आई आहे आणि तिची सासू. पण ती माझ्या लेकिसारखी वागते. मग मी का तिच्याशी सासूसारखी वागू? तू उगीच तिचा दुस्वास करतेस. तरीही ती तुझ्याशी नीट वागते, हे आमचं भाग्यच म्हणायचं."

"घ्या..सुनेची बाजू घ्या. उद्या तिने डोक्यावर मिरे वाटले नाहीत म्हणजे मिळवले." श्रावणी.

"मी असा विचार करत नाही श्रावणी आणि तू मला पाहायला आली आहेस की भांडणं लावायला? एकदा म्हणतेस माझी तब्येत खराब झाली आहे आणि दुसरीकडे मला त्रास होईल असे बोलतेस. हे मला चालायचे नाही. तुझ्या बोलण्याच्या त्रासाने मला काही झालं तर निस्तरायला तू येणार नाहीस, हे पक्क ठाऊक आहे मला आणि घरची जबाबदारी पडली की हे असले विचार तुझ्या मनात यायचे नाहीत. 

ती नोकरीची नाटकं आधी बंद कर आणि घरची जबाबदारी घे. सासुबाई किती दिवस बघतील? त्यांनाही होत नसेल आता. त्यांच्या वयाचाही विचार करायला हवा." विद्याताई.

"आई, मी तुला बघायला आले होते. तुझी विचारपूस करायला आले होते आणि तुझं काही वेगळंच चाललं आहे." श्रावणी आवराआवर करत म्हणाली.

"हे तुझं माहेर आहे आणि ते तुझं सासर आहे हे विसरू नकोस. इथे लेकीसारखी वाग आणि तिथे सुनेसारखी. हीच अपेक्षा आहे माझी. बाकी आता विषय वाढवू नको." विद्याताई रागावून म्हणाल्या.

"मी निघते आई. आता फोनवरूनच तुझ्या तब्येतीची विचारपूस करेन. तुझं ऐकून घ्यायला पुन्हा इकडे कशाला येते मी!" श्रावणी आपली बॅग घेऊन बाहेर आली.

"हे काय? लगेच निघालात? स्वयंपाक करतेच आहे मी. जेवून जा. नाहीतर डबा तरी घेऊन जा." अनुराधा आपल्या खोलीतून बाहेर येत म्हणाली.

"नको गं बाई. आई ओरडेल मला आणि हे आदर्श सुनेचे नाटक फक्त माझ्यासमोर करतेस की रोज चालतं हे?" श्रावणी रागाने म्हणाली.

"ताई, मला असलं नाटक करायची गरज नाही. हे संस्कार आहेत..माझ्या आई -वडिलांनी दिलेले आणि माझ्या सासुबाईंनी माझ्यावर केलेले. ताई, मी ऐकून घेते म्हणून काहीही बोललेलं मला खपणार नाही." अनुराधा पहिल्यांदाच आपल्या नणंदेला सुनावत होती.
"आपण एखाद्या बाबतीत कमी पडलो की सारं जग तसंच दिसायला लागतं. तेच झालं आहे तुमच्या बाबतीत. बाकी काही नाही. ही तुलना, बरोबरी थांबवा आता तरी. आईंना याचा त्रास होतो."

"वा..माझ्या आईला चांगलचं ओळखतेस की, अगदी माझ्यापेक्षाही जास्त! तिच्या मनात माझ्या विरुद्ध काय, काय भरवतेस, देवच जाणे बाई." श्रावणी डोळे मोठे करत म्हणाली.

"मी काहीच भरवत नाही ताई. तुमचे वागणे सर्वांच्या नजरेत येते म्हणून बोलतात तुम्हाला. आता मला वाद घालायचा नाही. काही उणे - अधिक बोलले असेन तर सॉरी." अनुराधा सासुबाईंच्या खोलीत आली.
"आई..नक्की काय चुकतं माझं? ते तरी कळू दे मला."

बाहेर धाडकन दार लावल्याचा आवाज झाला.

"अनु, मी कधी काही बोलते का तुला? नाही ना? मग तू श्रावणीचं बोलणं मनावर घेऊ नको. तिला प्रत्येक बाबतीत खोट काढायची सवयच आहे."

"बोलणारा बोलून जातो. पण समोरच्याचं बोलणं मनाला लावून न घेणं खूप अवघड असतं. खास करून जेव्हा तुम्ही नीट वागूनही तुम्हाला कायम चुकीचं म्हंटल जातं ना तेव्हा..
ताई कायम असे का वागतात? मी तर कायम त्यांना मान देत आले."

"अनु, समोरची व्यक्ती आपल्याला मान देते आहे हे कळायला आणि तो मान घ्यायला तेवढी बुद्धी असावी लागते, मनात भावना असाव्या लागतात." विद्याताईंनी मायेने अनुराधाचा हात आपल्या हातात घेतला.
"ती माझी लेक आहे. तशीच तूही माझी लेक आहेस. पण दोघींत फरक इतकाच आहे की तू समजूतदार आहेस आणि ती अल्लड. एकदा का जबाबदारी अंगावर पडली की आपोआप सुधारेल ती. तोपर्यंत आपण तिचे कान पिळत राहायचे. जमेल तितकी समज देत राहायचे आणि कोणी काही बोललं म्हणून आपण आपलं काम सोडायचं नसतं. उलट दुप्पट उत्साहाने ते पार पाडायचं असतं."

"हो. आई, आता जास्त बोलू नका. त्रास होईल तुम्हाला. पडून राहा बघू. मी जेवणाची वेळ झाली की हाक मारेन." अनुराधा कामाला निघून गेली. विद्याताई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिल्या. 

तरुणपणातली आपलीच छबी जणू त्यांना अनुराधामध्ये दिसत होती. 'त्यावेळी आपल्याला जे सहन करायला लागलं ते आपल्या सुनेला सहन करायला लागू नये, म्हणून मी कायम तिच्या पाठीशी असेन.' असा विचार मनात येताच विद्याताईंच्या चेहऱ्यावर समाधान पसरले आणि एका वेगळ्याच समाधानाने त्या स्वतःला निरखत राहिल्या.

समाप्त.
©️®️ सायली जोशी.

सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा

गुरूदक्षिणा

हमारी मुठ्ठी मैं आकाश सारा

तिचं मातृत्व

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने