दैव देतं पण कर्म नेतं

 ©® सौ. प्रतिभा परांजपे




सीनिअर डॉ. जानकी सिझर आटोपून ज्युनिअर डॉ. वर्षा कडे पहात म्हणाल्या 'पुढचं तू पहा मी कॅबिन मधे जाते'

'होय मॅम तुम्ही खूप थकल्या आहात,मी पहाते, बाळ बाळंतीण सुखरूप आहे स्टिचेस वगैरे मी करते."


"हो, आणि उद्या दोन नॉर्मल डिलिव्हरी आहेत" मॅडमनी जाता जाता आठवण दिली.


"हो मॅम  मी करेन हँडल," म्हणत वर्षा पुढच्या कामाला लागली.


तासभराने सर्व आटोपून वर्षा रूममध्ये आली. ओपीडीच्या बाहेर बरीच रांग होती.


पेशंट्स  पाहत असताना वर्षाला तिच्या आईचा म्हणजेच सुमनचा फोन आला

"वर्षा आज आश्रय मध्ये जायचं होतं ना तिकडच्या तुझ्या पेशंट ---


'मला जरा वेळ लागेल, तू पुढे जा मी येते तासभराने.'

पुढच्या तासभर वर्षाला उसंत नव्हती.


दर गुरुवारी ती व आई सुमन आश्रय नावें महिला वृद्धाश्रमात जात असत,  .

वर्षा वृद्धाश्रमात एका एनजीओ संस्थेतर्फे भेटायला जात असे तिथे अनेक वृद्ध, निराश्रित स्त्रिया असायच्या, त्यांना तपासून त्यांना लागतील अशी औषध देणे त्यांच्या शारीरिक समस्या जाणून घेत असे.


शेवटचा पेशंट पाहत असताना सिस्टरने कॉफी आणून वर्षा समोर ठेवली.

"मॅम कॉफी घ्या, आज तुम्ही जेवणही नीट केलं नाही."

कॉफी बिस्कीट घेऊन, फ्रेश होऊन वर्षा सरळ आश्रमाकडे निघाली.

आश्रमाच्या संस्थापक राणे मॅडम बरोबर खोलीत सुमन बसली होती.


"या डॉक्टर वर्षा" राणे मैडमनी‌ हसुन स्वागत केल.


"सॉरी काकू, आज जरा जास्त केसेस होत्या त्यामुळे जरा उशीर--"


 "आता जरा बस  आणि हा  घे  चिवडा, चकली , आश्रमातल्या बायकांनीच केलाआहे."


"अरे वा छान, बरं आज कुठल्या पेशंट आहे ?"


"त्या नवीन आठ नंबर वाल्या ,त्यांना पाहून घे."

"कोण आहे काही विशेष समस्या?"


"नाही ग-- येथे नवीन आलेल्या ना जे डिप्रेशन असते तसंच , बाकी अजून शारीरिक दुखणी असावी असे वाटत नाही, पण वया परत्वे काही त्रास."


 वर्षा रूम नंबर आठ मधल्या बाईंना  पाहून आली..

 सुमन वाट पाहतच होती.


घरी पोहोचेपर्यंत  वर्षा  व सुमन काहीच बोलल्या नाही.

दोघी कुठल्याशा विचारातच होत्या.  


रात्री झोपताना सुमन ने  विचारले, "वर्षा, ओळखलं तू आठ नंबर वाल्यांना?"


"हो s आई मी त्याच विचारात आहे. काय होत्या आणि काय झाल्या ग सुभेदार बाई".

इथे कोणी आणून सोडलं.?"


"त्यांच्या मुलीने अस राणे बाई म्हणाल्या."


सुमनच्या डोळ्यासमोर सुभेदार बाईंचं ते रूप आलं जे तिने अनुभवले होते.


'सुमन अग आज परत उशीर केला तू ? काम खोळंबली आहेत" सुभेदार बाई सुमन कडे रागाने पाहत म्हणाल्या.


सुमनला त्यांच्या चिडण्याची सवय झाली होती तिने हात भरभर चालवत काम सुरू केलं.

" सुमन उद्या जरा जास्तीचं काम आहे तेव्हा लवकर ये उद्या सोनाचा वाढदिवस आहे ."

सुमनला जरा बरे वाटले.


दुसऱ्या दिवशी, सुमनने वर्षाला सोनाचा जुना पण छान फ्रॉक घालून तयार केल व बरोबर घेऊन आली.

वर्षाच्याच वयाची  होती सोना.

वर्षा पहात होती ,सोनाने खूप छान गाऊन घातला होता पण ती जाड असल्याने तो तिला खूपच घट्ट बसला होता ,चेहऱ्यावर भडक मेकअप करून ती येता जाता अचरवचर खात होती.


तिला खाताना पाहून वर्षालाही भूक लागली होती पण मागायचं कसं हा विचार करून ती आत सुमन जवळ जाऊन बसली.

सुमनला लक्षात येत होते ,तिने बाईं कडे पाहिलं, सुभेदार बाईंनी  कळून न कळल्यासारख्या दाखवल.

"ताई, माझी लेक छान नंबरानी पास झाली." सुमन ने कौतुकाने सांगत वर्षाला बाईंच्या पाया पडायला सांगितले.

"बरं बरं पुरे झाले शिक्षण, त्यापेक्षा  काम शिकव तीला, हेच करायचे  पुढं जाऊन."सुभेदार बाईंनी तिला तिच्या परिस्थितीची जाणीव करून दिली कौतुकाचा एकही शब्द त्यांच्या तोंडून निघाला नाही.


वर्षाकडे पाहत 'अगं जरा आईची मदत कर.' म्हणत त्या वर्षाला ओरडल्या.


पार्टी सुरू झाली म्युझिक वर डान्स सुरू झाला. वर्षा सर्व पाहत होती तिचीही पावलं म्युझिक बरोबर पडू लागली .


सोनाच्या सर्व मैत्रिणी तिच्याकडे पाहू लागल्या," अरे वा --किती छान डान्स करते ही"

सोनाला ते काही सहन होईना, सुभेदार बाईंनी पण वर्षाला 'तू इथे का उभी आहे ? आत जाऊन काम कर' म्हणून पाठवलं .

सुमन ने तिला आपल्याजवळ बसवून घेतलं पटापट हात चालवू लागली .


पार्टीमध्ये सरबत दिले गेले नंतर प्लेट  मांडल्या. पण सोनाला  काहीच पसंत पडत नव्हते.

ती सगळ्यांसमोर आईवर ओरडली "मी म्हटले होते आपण मॅकडोनाल्ड किंवा झोमॅटो कडून मागवू पण तू  केली ही भिकारडी पावभाजी."

माझ्या मैत्रिणी हसतील म्हणून तमाशा केला व फोनवर ऑर्डर दिली.


थोड्याच वेळात बर्गर, पिझ्झा ,कोल्ड्रिंक्स,फ्रेंच फ्राय आणि पास्ता अशी पार्सल आली .

आता सोनाचा चेहरा फुलला.

पाव भाजी तशीच राहिली पण सुभेदार बाईंनी सुमन आणि वर्षाला तीही पोटभर खायला दिली नाही .

हिरमुसलेली वर्षा आणि चिडलेली सुमन घरी आल्या.

पुढे सुमनने वर्षाला त्या घरी कधीच नेले नाही.


दुसऱ्या दिवशी चितळे काकूंचा फोन "सुमन अग वर्षाचा रिझल्ट लागला ना काय झालं ?"

"ताई पास झाली छान पण-- आता पुढे मला नाही परवडणार हो हीच शिक्षण. मी एकटी, इतक्या घराची काम करुन ही जेमतेम मिळत.इतके पैसे?"

"असं नको करू--- शिकू दे तिला, मी पाहते आमच्या क्लब तर्फे मदत मिळते हुशार विद्यार्थ्यांना."


"काकू तुमच्या मुळे शिकले  हो माझी पोर."

चितळे काकूं मुळे वर्षाचे शिक्षण पार पडलं.

पुढे तिला मेडिकलला ऍडमिशन मिळाली मग मात्र वर्षांनी डॉक्टर होऊनच दाखवलं.

आज सुमनला ते सर्व आठवत होतं.


सुभेदार बाई आणि चितळे काकू परिस्थिती सारखीच. पण स्वभाव ?

चितळे काकू समाजसेवी, पण सुभेदार बाई पैशानी श्रीमंत पण मनाच्या अतिशय कृपण .

प्रतिष्ठेचा, पैशाचा गर्व आणि तोच स्वभाव सोना मध्ये उतरला अति लाडाने सोना हाताबाहेर गेली.

त्यांच्या स्वभावानेच त्यांचा घात केला. सोना जशी जशी मोठी होत गेली कोणाचेच काही ऐकत नसे, सुभेदार बाईंना ती जुमानतच नसे, अभ्यासातही जेमतेम फैशन आणि पार्ट्या मित्र यात लागलेली.


'आई झोप नाही येत कां ग?'


"होय गं"


"वर्षा, सुभेदार बाईंनी तुला ओळखले कां?"


"नाही गं आई --खरं तर त्यांची अवस्था पाहून मलाही कसतरीच झालं,

इतक्या मोठ्या घरच्या, पैसैवाल्या आणि आज ही अवस्था झाली त्यांची मुलगी आहे न सोना ?"

"हो तिने च आणुन सोडलं ह्यांना. तुला यायला वेळ होता म्हणून सहज मी गेले खोलीत बघायला नवीन कोण आहे तर बाई दिसल्या.


मी म्हणाले बाई मी सुमन, ओळख ल कां?

तर हात जोडून म्हणाल्या' खूप वाईट वागले ग मी तुम्हा सर्वांशी.'

मी विसरले बाई ते, तुमच्या कडे काम केले म्हणून आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटला.

'तुम्ही विसरला, मोठेपणा तुमचा. पण जसे करावे तसेच भरावे लागते.

मी पैसा, प्रतिष्ठा ह्यांच्या पुढे माणुसकी विसरले.मला वाटायचं पैशानी सर्व विकत घेऊ शकतो पण, प्रेम, आपलेपणा नाही घेऊ शकले,येवढेच काय मी सोनालाही तेच दिले तेच दामदुपटीने तिनें मला परत केलं.


सोनाचे बाबा गेले आणि  सोनावर कोणाचाच वचक उरला नाही. अभ्यासात तर तिला काडी चाही रस नव्हता, हे गेल्या नंतर ती माझ्याशी तसेच वागू लागली. काही सांगायला जावे तर उलट सुलट बोलायला लागली. एक आई म्हणून तिला माझ्या विषयी काहीच भावना नव्हत्या. यात तिच्या पेक्षा मीच जबाबदार आहे जे तिने मला वागताना पाहिल तेच ती शिकली.


माझेही वय झाले मी तिच्या वर अवलंबून राहायला लागले. सोनाने लग्न केलं आणि सर्व पैसा घर आपल्या नावांने करून घेतल. लग्नानंतर तिला माझी अडचण व्हायला लागली. एक दिवस मी तिला खूप बोलले तेव्हा म्हणाली हे घर, पैसा तिचा आहे, तुला आमच्यात जमतं नसलं तर सांग, आणि मग अचानक, एक दिवस तिने मला इथेआणून सोडलं.


आमच घर व  इतर सर्व विकून ती कुठे तरी दूर निघून गेली,आता कुठे व कशी आहे हे देखील मला नाही ठाऊक.बोलता बोलता बाईंच्या डोळ्याला धार लागली.


 इतके वर्ष आपलं तेच खरं करणाऱ्या, श्रीमंतीत जगलेल्या सुभेदार बाई आता अगदीच बिचाऱ्या झाल्या.


" दैव देत पण कर्म नेते "अशी त्यांची  गत झाली कुणाशिच प्रेमानं न वागणाऱ्या सुभेदार काकू आता प्रेमासाठी तरसत होत्या.


समाप्त
©सौ. प्रतिभा परांजपे

सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

ही कथाही अवश्य वाचा

छबी

बाबांची नव्याने ओळख

गुरुदक्षिणा


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने