आनंद वाटल्याने वाढतो

©® शुभांगी मस्के




पहाटेपासुनचं पावसाने हजेरी लावलेली... समिर आणि राधाला आज ऑफिसला सुट्टी असल्याने, दोघांची सकाळ तशी उशीराच झाली.

हातात वाफाळत्या चहाचे कप घेवून, दोघेही पोर्चमधल्या झोपाळ्यावर.. निवांत गप्पा ठोकत बसले..

आठच महिने झाले होते समिर आणि राधाच्या लग्नाला.  लग्नानंतरचा पहिलाच पावसाळा होता दोघांचा.
"गारवा.... वा-यावर भिरभिर पारवा.. नवा... नवा..प्रियेSSSS.... नभातही.... चांदवा.. नवा नवा.
गारवा!!"

पोर्चमधल्या वळचणीवरुन टपटपणा-या थेंबांना हलके हलके उडवत, समीर गारवा ... गात होता...


"काहीही काय रे,  असे सुकलेले हात, ओले करतोयस!  किचकिच नाही का वाटत तुला".. राधा बोलली

"काय, unromantic आहेस यार तू! पावसाची... अन् किचकिच? बघ तर कसा रिमझिम बरसतोय..
रिमझिम रिमझिम..रूमझुम रूमझुम
भिगी भोगी रूत मे मैं और हम तुम..."
आल्हाददायक वातावरणातला गारवा, अंगावर झेलत.. मनपसंत गाण्याचा आनंद घेत समीर उत्तरला..

"झाडी वेलींवरची टपटप, वा-याच्या तालावर नाचत, बेधुंद होऊन.. सैरभैर झाल्यासारखा, टपटप आवाज करत, तुषारं उडवणारा पाऊस..तो गारवा... तो गारठा, पावसाचं हे रुप मला खूप म्हणजे खूप आवडतं.."
पावसाचं वर्णन करतानाचा समिरच्या चेह-यावरचा, तेजस्वी भाव, राधाला Wow... How romantic म्हणायला भाग पाडणारे होते. 

तरी, राधा चेह-यावर सुहास्य देत मध्येच बोलली, "मला नाही आवडतं, पाऊस..ती रिमझीम नाही आणि तो कोसळणारा तर नाहीच नाही. भिजायला तर मुळीच आवडत नाही. खिडकीतून बघायला तेवढा आवडतो. सुट्टी असायला हवी, फक्त"... राधा बोलता बोलता थांबली..

"अरे छाSS.. काय यार तू! काय मज्जा असते,पहिल्या पावसाची. एकदा येवून तर बघ, भिजून तर बघ..
प्रेमात पडशील!" जीभ दातांनी चावत, आई बघत तर नाही ना, ह्याची खात्री करत, समिरने वळचणीवरुन पडणा-या पावसाच्या थेंबांना तिच्या दिशेने भिरकावलं.

"ये काय करतोयस तू!" ती ताडकन उडी मारत पाळण्यावरुन उठली...
"बसू की नको!! की जाऊ आत? .. मी जातेय आणि निवांत बसते घरात".. राधा चिडलीच..

"नको नको... बसं गं.. बसं... ! गंमत केली बघ मी तुझी, " हात धरुन समीरने राधाला बाजूला बसवलं..

"तशा आपल्या, कोणत्याच सवयी मँच होत नाही.. अरेंज मॅरेज चा साईड इफेक्ट".. समिर हसत हसत बोलला...

"आठचं महिने झालेत, आयुष्य काढायचयं, समिर राजे". 

"मन मारुन जगायला तयार रहा!" राधाच्या कानाशी समीर पुटपुटला..

"आईला माहीती आहे, काय मस्त मज्जा येते ना गं, पाऊस एन्जॉय करताना".. समोरच खुर्चीत बसलेल्या सुचित्राताईनी होकारार्थी मान डोलीवली..

"तो, रिमझिम पाऊस... रफी, लता तर कधी गारवा. छान मस्त दूर दूर लॉंग ड्राईव्हला जायचं. मध्येच एखाद्या जागी रस्त्याच्या कडेला, गाडी लावायची.. गरमागरम वाफाळता चहा, सोबत गरमागरम कुरकुरीत भजी..

पत्र्यावरच्या टपटपणा-या थेंबांपासुन स्वत:चा वाचवत, त्या टपरीवर एखाद्या कोप-यात उभं राहून, आस्वानंद घ्यायचा." समिर बोलत असताना, आईंच्या चेह-यावर दरवळणारं हलकसं स्माईल राधाने एका नजरेत वेचलं..

"दरवर्षी.... एखाद दोन मित्रांना घेवून, असा पावसाळी प्लॅन असतोच, पण मी कमवायला लागलो तेव्हापासुन, किंबहूना कार घेतलीय तेव्हापासुन ह्या क्षणांची साक्षीदार आई पण असते"..

"काय?"आई तुम्ही पण!" आश्चर्य चकीत भाव चेह-यावर आणत राधा जोरात ओरडली....

"आणि बाबा??" राधाने विचारलं...

"बोअरिंग लोकांना, नो एंट्री!".. बोलताना एक तिक्ष्ण कटाक्ष समिरने राधाकडे टाकला...

"ये चल!! पाऊस आवडतं नाही म्हणून काही कुणी, लगेच बोअरिंग वगैर होत नाही हं!" इति राधा..

"बाहेर पाऊस आपलं काम करतो, आपण आपलं करायचं. खायचं प्यायचं आणि पलंगावर पांघरुन घेवून लोळत पडायचं.. ह्यातलं सुखं.. अनुभवल्याशिवाय नाही कळणार तुला. मी लोळत-पोळत नाहीच, सरळ गुडूप होते पांघरुणात..

बाहेर पाऊस... चार, पाच, सहा कितीही तास, झोपू शकते मी"... राधाचं, झोपेच गोड कौतुक गोड गोड शब्दात सुरु होतं.

"महाराणी, तुम्हाला झोपायला.. पाऊस कशाला हवाय? फक्त सुट्टीचा दिवस पुरेसा. ती पुण्याची लोक उगाच बदनाम, दुपारच्या झोपेपायी. इकडे घरी या, सुट्टीच्या दिवशी, रुममध्ये सुर्याचं एक किरण हजेरी लावेल तर शप्पथ".. राधाच्या झोपेच साग्रसंगित वर्णन करण्यात समिर गुंतला..

तर असे हे राधा समिर... एवढी निवडी सवयी वेगवेगळे असलेले....

'सुट्टीच्या दिवशी राधा दिवसभर झोपते, समिरला झोपायची सवयच नाही.. अर्ध्या पंधरा मिनिटाची डुलकी त्याला पुरेशी असते फक्त, मग दिवसभर घरात इकडून तिकडे माझ्या मागे मागे फिरत रहातो. पोरं घरात आपल्या सहवासात रहातं खरं, तरी'... न जाणो कशाच्या विचारात सुचित्राताईं काहीशा अस्वस्थ झाल्या..
समिरला पहिल्या पावसात भिजायला केवढं आवडतं..प्रत्येक पावसात, मनसोक्त भिजतो तो'.. लहानपणीच्या असंख्य आठवणी, सुचित्राताईंच्या डोळ्यासमोर तरळल्या..

'शाळा, कॉलेजमध्ये किंवा नोकरी लागल्यानंतर.. तो घरी नसताना जर का मृगतल्या पहिल्या पावसाने हजेरी लावली रे लावली की, पहिला पाऊस हुकला म्हणून केवढा चिडायचा. जेव्हा केव्हा चान्स मिळेल, तेव्हा मनसोक्त भिजून घ्यायचा. लेकाला असं मनसोक्त भिजताना पाहून, माझं ही मन सुखावल्या जात होतं.'

गरमागरम भजी सोबत कॉफीचे घोट घेत, बाहेरचा गारवा अंगावर झेलत, आम्ही दोघे मायलेक पहिला पाऊस छान एन्जॉय करायचो.'

'प्रत्येक, पावसाळ्यात, एकदा तरी फुटाळा तलावावर जावून, रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करुन, दोघे ही छान, निखा-यांवर भाजलेल्या, गरमागरम मस्का मारलेल्या कणसाचा आस्वाद दरवर्षी कितीदा तरी घेतो.' गतकाळाच्या आठवणी सुचित्राताईंच्या भोवताली पिंगा घालू लागल्या.

'कधीकाळात नव-याने दाखवलं नसेल सुख ते सगळं माझ्या लेकाने दाखवलं'... 'मौज मज्जा, मस्ती...आनंदाची लयलूटच केली त्याने जणू'
आयुष्याच्या ह्या संध्याकाळी, जगायचं राहून गेलं असं वाटतं नाही ते माझ्या लेकरामुळे'.. सुचित्राताई विचारात मनोमन सुखावल्या....

'पण आता मात्र.. त्याची जोडीदाराचं...!!' दुसऱ्याच क्षणी त्यांना लेकाच्या आयुष्यात, काहीतरी निसटून चाललय की काय असं ही वाटून गेलं'.... सुचित्राताई विचारात मग्न झाल्या.

"तू निवांत झोप!! आम्ही जाऊन येतो दोघे.. आई जायचंय आपल्याला.". सुचित्राताईंनी हलकेच मान डोलीवली..

सुचित्राताईं समाधानाचे सुहास्य घेवून उठल्या.. 

'लग्न झालं की मुल बदलतात, असं म्हणतात'.... 'माझं लेकरु मात्र आहे तसाच आहे.... सध्यातरी'.
'त्यांनी फिल केलेला आनंद खरतरं त्यांना दाखवायचा नव्हताच, लपवूनच ठेवायचा होता सर्वांपासुन'..

"आज काय करायचंयं?" इथनं उठलं की.. आवरायचं, खाण पिण आटोपलं की.. निवांत झोप काढायची", मनात ठरवूनच राधा उठली..

आज पाऊस तरी सुचित्राताई आणि सुरेशरावांच्या दिनक्रमात फार काहीच बदललेलं नव्हतं.. त्यांचा दिवस रोजसारखाच उगवला होता.
सकाळचा चहा, वेळेतच झाला होता. नाश्त्याची तयारी सुचित्राताईंनी करुन ठेवली होती. पाऊस असल्याने, अंगावरचे कपडे तेवढे अंघोळीच्या वेळीच, त्यांनी धुवून वाळत घातले होते.

रिमझिम पावसात पोर्चमध्ये आत पडलेली, प्राजक्ताची फुल त्यांनी वेचली. 
पारिजातकाच्या फुलांनी, देवघर सजवलं.. धुपदिप उदबत्तीच्या सुवासात, आरामात देवपुजा केली.. तुळशीला पाणी घातलं.. आवरुन, सावरुन.. फुलांची टोपली घेवून सोफ्यात बसल्या... मोगरा आणि अबोलीची फुल त्यांनी एक एक करुन धाग्यात गुंफली आणि छानसा गजरा बनवला.

गज-याला ओंजळीत घेवून, एकाच दिर्घ श्वासात मोगऱ्याचा सुवास तनामनात भरला...

"आता हा गजरा कुणासाठी?" पेपरमधून डोक वर काढत नाकावर उतरलेला चष्मा डोळ्यांवर सरकवत, सुरेशरावांनी टोमना मारला..

"कुणासाठी काय? माझ्यासाठी?" छातीठोकपणे बोलत त्या उत्तरल्या.

"हो पण काही तर निमित्त असावं की नाही,की उगाच". सुरेश रावांनी शब्दफेक केली..

"निमित्त.....! तुम्ही बोलताय... निमित्त! निमित्त शोधता शोधता.. आवडीनिवडी पुरवण्याच्या शोधात.. आयुष्य सरलं. ना निमित्त सापडलं ना कधी कोणती हौसमोज फिटली.

बायकोला गजरा आवडतो, तो केसात माळायला, निमित्त कशाला लागतं?  पण, त्यासाठी बायकोच्या आवडी निवडी, माहिती असायला हव्या की नको?" तिरकसपणे सुचित्राताईं बोलल्या.."कधी दोन पैशाचा गजरा आणावा वाटला नाही कधी तुम्हाला."

कधीकाळी, गावाला जाताना बस स्टँन्डवर, गळ्यात परडं अडकवलेली मुलं मुली, गजरा, वेणी घेतील या आशेने जवळ जवळ येत. त्यातल्या वेण्या गाजऱ्यांना बघून, पटकन उचलून घ्याव्या वाटायच्या. पण तुमची एकदोन पैशासाठी घासघीस चालायची आणि चाराण्याची ती वेणी!! पण... मिळाली नाही कधीच.

जबाबदारी आणि कर्तव्ये पार पाडता पाडता, आवडी निवडींचा विसरच पडला. फार मोठ्या अपेक्षा नव्हत्याच त्यामुळेच की काय छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधायला मन आपोआप शिकलं.

ना महागड्या साड्यांचा मोह होता ना दागिन्यांचा लोभ.. पण घरी परतताना, आपण आणलेल्या छोट्याशा गज-याने ही आपली बायको खुश होऊ शकते, ह्याची जाणिव आजतागायत होवू नये", सुचित्राताईं बोलताना हळव्या झाल्या..

"तू केसात खोचायचीस की.. ते देढासोबत सुगंधी शेवंतीच फुलं".. बरं दिसायचं तुला !" सुरेशराव बोलले...

"बरं, आत्ता रोज सायंकाळी फिरायला गेलो की... कोप-यावरच्या फुलवालीकडून छान एक गजरा आणत जाईल तुझ्यासाठी.. ठरलं तर मग!" सुरेशराव काहीशा मिस्किल्लपणे बोलले..

"इश्श!! काहीतरीच काय! वय राहीलय का आता,".. राधाकडे एक नजर फिरवतं, सुचित्राताई गोड लाजल्या...

"बाबा, गजरा आणून आईच्या हातात देऊ नका फक्त.. केसात माळावा लागेल तुम्हाला" सर्वांना ऐकू जाईल एवढ्या आवाजात राधा पुटपुटली..

"नाही गं बाई.. ह्या पिकल्या केसांना आता सवय नाही उरली कौतुकाची. दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत, अशी आमची गत. आपल्याच आनंदासाठी, हे असले उद्योग, रिकामपणाचे." सुचित्राताईंनी गज-याकडे बघितलं..

"आता, काही.. काही अपेक्षा नाही.. स्वत:कडून ना इतरांकडून".. वर बांधलेल्या पिकल्या केसांच्या जुड्यात सुचित्राताईंनी हलकेच आपल्या हाताने गजरा अटकवला.

"नवरा बायकोचं नातं, जसं वळवू तसं वळतं, एकमेकांच्या आवडी निवडी जपताना आपल्या जोडीदाराच्या चेह-यावरचा आनंद त्याच्या आवडीनिवडी जोपासता आणि त्यातून त्याला मिळणारा आनंद वेचता यायला हवा. एकमेकांच्या सुख दु:खाचे भागीदार होता होता हौस मौज, मज्जा, मस्तीचे ही साक्षीदार होता यायला हवं.

पती पत्नी म्हणजे संसार रथाची दोन चाकच... एकमेकांची मान सांभाळत, एकमेकांना साथ देत आनंद देता आणि घेता ही यायला हवा.
आजकाल ती हक्काची "स्पेस" की काय ती  एकमेकांना देण्याच्या नादात, आपल्या जोडीदाराच्या जगण्यातला आनंद हरवून बसलोय की काय असं आयुष्याच्या संध्याकाळी वाटायला नको, म्हणजे झालं!

आमची पिढी मन मारुन जगायला शिकली. आजची पिढी स्वतंत्र विचारांची, फार काही तुम्हाला सांगावं लागतं नाही.
फोटोत क्षण कैद करुन ठेवण्याचा तुमचा जमाना..पण फोटोतले क्षण कैद करता करता, एकमेकांच्या डोळ्यातल्या संवेदना वेचता यायला हव्यात.  मन सांभाळता यायला हवं, जपता यायला हवं...!!"
सुचित्राताईं बोलता बोलता थांबल्या..

राधा, सुचित्रा ताईंच बोलणं, शांतपणे ऐकून घेत होती. आपल्या मनाप्रमाणे जगताना, आपल्या जोडीदाराचं मन जपलं जातंय का? की त्याचा आनंद हिरावून घेतोय, राधा विचारात रमली.

जेवण खावण आटोपलं.. पावसाची रिपरिप सुरुच होती.. 
समिरने दुपारची डुलकी घेतली..राधा छान पांघरुणात गुडूप झालेली होती..

चार वाजले होते, थोडं बाहेर अंधारून ही आलं होतं... चहाची वेळ झालीच होती. 

आज तो घरी, मग आईने त्याला आवडतो तसा आल, वेलची, जास्ती दूध घालून बासुंदी चहा बनवून दिला...

"आई चल रेडी हो!! फिरुन येवू" समिरने सुचित्राताईना तयारी करायला सांगितलं.

"जायचं का!! काहीसं, प्रश्नचिन्ह चेह-यावर दाखवत," सुचित्राताईंनी विचारलं...

"हो जायचं म्हणजे..जायचचं!" समीर उत्तरला..

सुचित्राताई छानशी, साधी साडी नेसुन तयार झाल्या.. समिरनेही स्वतःच आवरून घेतलं. आवरताना, मुद्दामच रूम मधल्या वस्तूंचा खुडबुड खुडबुड आवाज करत होता.

समिर कार काढायला निघाला, तोच मागून धावपळपळत राधा बाहेर आली..

" मी .. मी"... म्हणत कारकडे धावली.

"अरे तू!! सांगितलं नाहीस तू येतेयसं म्हणून" समिरने राधाला विचारलं.

"अरे राधा येतेय ना आता, तुम्ही दोघेच जावून या. छान enjoy करा!" राधाकडून समिरकडे नजर वळवत, सुचित्राताई बोलल्या.

"काही नाही आई!! चला तुम्ही बसा बरं" राधाने कारचा समोरचा दरवाजा उघडला..
दरवाजातून कारमध्ये आतल्या दिशेने, बघत तिने आईला कारच्या फ्रंट सीट वर बसायला सांगितलं..

भूतकाळात मायलेकांनी जगलेल्या त्या सुखकारक आठवणींना तजेला देत असताना, आज राधा त्या क्षणांची साक्षीदार होणार होती... मागच्या सिटच्या मधोमध बसून, आई आणि समिरमधला संवाद जगणार होती..


वाचक मित्र... मैत्रीणींनो, खरचं रडत कुठत बसण्याचं दु:ख आजपेक्षा उद्या जास्ती होणार.. तेव्हा जगायचं सोडून का दिलं! ह्या प्रश्नाचं उत्तर स्वत:लाच देताना, कुठेतरी अपराधिक भावना मनात तयार होणार.. 

दात आहेत तर चणे नाहीत.. चणे आहेत तर दात नाहीत.. म्हणताना पश्चातापाची होरपळ अगतिक करुन जावू नये. तेव्हा प्रत्येक क्षण हवा तसा जगा.. परंतू तो जगत असताना, स्वतः बरोबर जोडीदार, आईवडिल, लेकराबाळांच्या दृष्टीने विचार करायला हवा. आनंद दिल्याने वाढतो हे मात्र नक्की लक्षात ठेवा.

©® शुभांगी मस्के

सदर कथा लेखिका शुभांगी मस्के यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा

हिस्सा

छबी

गुरुदक्षिणा




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने