©® मृणाल शामराज
हळूहळू पसरू लागलेल्या काळोखातही मागे रेंगाळू पाहणारा सांजकिरण बेमालूम मिसळू पाहत होता. प्रशस्त व्हरांड्यात त्या शिसवी झोपळ्यावर लोडाला रेलून सुलोचनाबाई एका पायानी झोका देतं आठवणींना हिंदोळा देतं होत्या.
ही पटवर्धनांचीं गढी... पसरू पाहणाऱ्या रात्रींन दाटलेला तो गूढ अंधार... तो व्हरंड्यात दूरवर तेवणारा मंद zeroचा बल्ब... हलणाऱ्या झोपळ्याच्या कड्यांचा कर्रर्र कर्रर्र आवाज, त्या लांबलेल्या,वाऱ्यानी हलणाऱ्या झाडाच्या सावल्या...झाडावर उशीरा परतून आलेल्या एखाद्या पक्ष्याची फडफड... त्या अंधारात काहीतरी हरवलेलं शोधणारी सुलोचनाबाईसाहेबांची नजर...
मंद डुलणाऱ्या झोक्याबरोबर आठवणींचा एक एक पट उलगडू लागला.. नदीकाठी वसलेलं वेल्हे गाव... सुपीक काळीभोर माती.. बारामाही खळखळ वाहणारी नदी.. कष्टाळू रयत.. मग समृद्धीला काय कमी...
फडक्यांच घर.. गावातील प्रतिष्टीत घराणं.. सतशील आणि सज्जन.. घरात बाळबोध वातावरण.. सावकारीचा व्यवसाय.. घरात सुबत्ता.. पाच भावांवर झालेली ही सुलोचना...
नितळ शामल वर्ण.. चाफेकळी नाक, नाजूकसे ओठ.. निमुळती हनुवटी... आणि नाव सार्थ करणारे टपोरे पाणीदार डोळे.. विपुल केशसंभार..नुसतं एकटक बघत राहावं अशी देखणी,लाघवी .. हॆ कमी म्हणून की काय परमेश्वरानी कोमल, सुरेल आवाजाची देणगी दिलेली...
सगळ्यात सामावून जाणार आणि सगळ्यांना सामावून घेणारं हॆ घराणं..
लोचना कुशाग्र बुद्धीची...वडिलांबरोबर पेढीवर जायची.. पैशाचे व्यवहार, कुणालाही न दुखवता वसुलीची पद्धत, हिशेबाची रीत सगळं बारकाईने बघायची.. काका शेतात घेवून जायचे.. तिथं पिकाची माहिती.. मातीचा कस,नांगरणी, पेरणी.. शेतात रमायची ती .. अभ्यासात हुशार होतीच.
आईनी स्वयंपाक, रितभात सगळ्यात तरबेज केलेलं... लोकांना गोड बोलून आपलंस कसं करावं हॆ ही शिकवलेलं. वडिलांच्या मागे लागून तिनं गाणं शिकायची पण परवानगी मिळवली..
गंधार तिला गाणं शिकवायला येऊ लागला.
गंधर्व विद्यालयात तो आणि गुरुजी, त्याचे वडील शिकवायचे.. वयामानानुसार गुरुजी घरी शिकवायला येऊ शकत नव्हते. म्हणून गंधार येऊ लागला.
हाडाचा कलाकार तो.. उजळ वर्ण, कुरळे दाट केस, सतत स्वप्नात असल्यासारखे निळे डोळे, भरदार बांधा... स्वरांची ओळख नवी हॊती पण मुळातच सुरेल आवाज असलेली लोचना सुरात रमू लागली..
तो मन लावून शिकवायचा आणि ती तल्लीन होऊन गायची.
फडक्यांचा वाडा सुरांनी बहरायचा..सुरवातीच तिचं नवखं बुजणं सरलं..सूर लावता लावता सूर कधी जुळू लागले कळलं नाही.. तासंतास मैफिल रंगू लागली...
तिचा कोमल सूर त्याच्या निळ्या डोळ्यात तरंगु लागला. दोन हृदयात भिनलेले ते सूर स्वरातून झंकारू लागले..कुठलं तरी अबोध नातं आकार घेवू लागलं..
फडक्यांना कुणकुण लागली.. शिकवणी बंद झाली.. गंधर्व विद्यालय बंद झालं. गुरुजी, गंधार यांना गाव सोडून जावं लागलं.
लोचना आता स्वतः मधेच राहू लागली. उदबत्ती जळून जावी आणि मागे राख उरावी तसं झालं..सूर मौन झाले.. तिचं खळखळून हसणं विरलं.. वाडा सुन्न झाला.
नकळतच साऱ्या वातावरणात ताण आला.. विद्ध झालेल्या हरणीप्रमाणे असणारे लोचनाचे ते भावुक डोळे साऱ्या घराला घायाळ करू लागले.. फडक्यांनी आता वर संशोधन सुरु केलं..
मिरजेत असलेलं संस्थानिकाच घराणं... पटवर्धन.. तालेवार.. सगळं राजेशाही थाटाच.. मुबलक जमीनजुमला, शेतीवाडी.. अमाप संपत्ती.. जडजवाहीर...ती भव्य गढी..
हयाच्या मालकीणबाई माँसाहेब... नावाप्रमांणे करारी व्यक्तिमत्व.. शाही रिवाज कसे रक्तात भिनलेले.. जरब अशी की नजरेला नजर द्यायची काय बिशाद..दादासाहेब,रावसाहेब आणि दीदी सरकार... सगळ्यांना मोठ्या सरकारांच्या पश्चात वाढवलेलं...
दादासाहेब.. रांगड व्यक्तिमत्व.. धमन्यातून वाहणारा खानदानी माज.. सतत शिकारी.. गाणं बजावणं ह्यात रमलेले.. लहर असेल तर जहागीरीवर फेऱफटका...
वहिनीसाहेब.. त्यांच्या सौभाग्यवती... ह्याही बड्या घरातल्या.. आपल्याच तोऱ्यात...
रावसाहेब.. उच्चशिक्षित.. पण एकलकोंडे.. सतत आपल्या खोलीत बसून पुस्तकात रमणारे.. विद्येचा प्रचंड व्यासंग.. कुठल्यातरी घडून गेलेल्या दुर्घटनेमुळे मनावर ताण येऊन भित्रे झालेले.. सतत स्वतःत मग्न..
दीदी सरकार... लाडवलेल्या.. वयाच्या मनाने खूपच अल्लड.. अभ्यासापेक्षा नटण.. मुरडणं.. स्वप्नात रमणाऱ्या.. माँसाहेबाच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी किरकोळ.. संस्थानिकांना साजेश्या...
मुनीमजीनी शिफारस केली म्हणून माँसाहेब लोचनाला बघायला तयार झाल्या.
थोरल्या सरकारांपासून असलेल्या मुनीमजीवर माँसाहेबांचा विश्वास होता. फडके ती गढी बघून चकितच झाले.
लोचनाला तिची आई बाहेर घेवून आली. सोनसळी रंगाच्या इंदोरी साडीतली मोजकेच दागिने घातलेली, सात्विक चेहऱ्याची, घरांदाज वागण्यातली लोचना त्यांना खूप आवडली.. आणि आवडले ते निष्पाप पण करारी डोळे.
त्यांनी रावसाहेबांकडे बघितलं.. ते कुठल्या तरी विचारात गढलेले होते.
" रावसाहेब..काय म्हणतोय आम्ही? ह्यांना आपला वाडा दाखवा."
"अं. अं.. नकॊ.. तुम्हीच दाखवा."
"रावसाहेब.. तुम्हाला काय वाटतं?"
"तुम्हीच ठरवा."
लोचनानी न राहवून वर पाहिलं. रावसाहेब तिच्याकडेच पाहत होते..
किती केविलवाणे भाव दिसलें तिला त्यात...
माँसाहेबांनी दादासाहेबांकडे बघितलं..
त्यांनी संमतीने मान हलवली. माँसाहेबानी आपली पसंती दिली.
फडकयांच्या संमतीचा प्रश्नच नव्हता, आणि लोचनाचा तर नाहीच नाही. ती काय दावणीला बांधलेली गाय हॊती.. एव्हढं सगळं झाल्यावर तिच्या संमतीचा प्रश्नच नव्हता...
धाकट्या वहिनीसाहेब बनून ती आता वावरू लागली.भरजरी शालू, पैठण्यात, अंगभर लगडलेल्या दागिन्यात वावरणे तिला अवघड वाटू लागले..वैभव तर माहेरीही होतच पण हॆ जाचणार वाटायचं तिला.
तसं तर तिला काहीच कमी नव्हतं.. पण या एवढ्या मोठ्या गढीतला तो पोकळपणा तिला जाणवू लागला.. नाही म्हटलं तरी हॆ घरं आणि माणसं आता तिची हॊती..
रावसाहेब... सुरवात ती त्यांच्यापासूनच करणार हॊती... सुरवातीला ते तिला बिचकून असायचे. पण तिनं हळूच त्यांच्या आवडीच्या विषयाला हात घातला..
वेगवेगळ्या पुस्तकांवर ती त्यांच्याशी बोलू लागली. इतके दिवस त्यांच्या घुम्या स्वभावामुळे कुणी त्यांच्या जवळ फिरकत नव्हतं.
ते तिच्याशी खूप बोलायचे. लोचना पण चकित व्हायची.. किती वेगवेगळ्या विषयांच ज्ञान होतं त्यांच्याकडे./ती यायची ते आतुरतेने वाट पहायचे.
दादासाहेबांना तर कसलाच धरबंद नव्हता...वहिनीसाहेब त्यांच्या मोठेपणात आणि दिखाव्यात मग्न...
एकदा काही तरी काम होतं म्हणून ती माँसाहेबांच्या दालनात डोकवली तर माँसाहेब त्यांच्या आवडत्या आरामखुर्चीत पडून कसल्या तरी विचारात गर्क दिसल्या.
फिकटलेलं त्यांचं गोरेपण तिला खूप दिवसापासून आजारी असलेल्या सारखं मलूलं दिसलं. डोळे पाणावलेले होते की काय जाणे.. त्यांचं असं विकलपण तिला कातर करून गेलं..
तिची चाहूल लागताच त्यांनी चमकून पाहिलं.
"या.. सुनबाई. काय काम काढलंत? काही हवं आहे का?" सावध होऊन त्या म्हणाल्या.
"नाही.. माँसाहेब.. आज जेवणात तुमचं लक्ष नव्हतं.. तब्येत बरी आहे ना.. चौकशी करायला आले होते."
त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण थोडा सैलावला.. क्षणभर त्या स्मितीत झाल्या. आजवर अशी त्यांची मायेनी चौकशी कुणी केलीच नव्हती..
"थोडं अंग कसकसतंय एवढंच." त्या मोघम बोलल्या..
"माँसाहेब.. क्रोसिन आणि थोडा गरम चहा आणते.. म्हणजे बरं वाटेल."
त्यांच्या उत्तराची वाट न पाहता लोचना गेली सुद्धा..
थोडया वेळात क्रोसिन, चहाचा कप, बरोबर थोडा चिवडा आणि लाडू घेवून ती हजर झाली.
"अगं, येसू बरोबर पाठवायचं. तु कशाला त्रास घेतला.. खायला नकॊ मला"..
"माँसाहेब.. मी स्वतः आज रव्याचे लाडू केलेत.. खाऊन तरी बघा.."
त्या चकित होऊन बघतच राहिल्या. वहिनीसाहेब तर कधी स्वयंपाकघरात फिरकतच नव्हत्या.. कितीतरी वेळ त्या लाडूची चव त्यांच्या तोंडात रेंगाळत राहिली.. दोघीही स्तब्ध होत्या.
माँसाहेब विचार करत होत्या.. किती वेगळी आहे ही.. आल्यापासून सगळ्या गोष्टी बारकाईने बघतेय... गड्यांवर पण प्रेमळ वचक आहे हिचा..
"आई ग..." नकळत एक कळ पाठीतून गेली. त्यांना जाणवत होतं की आपण खूप थकलो आहोत. हा कोसळता डोलारा आता कोण बघणारं??
मोठे सरकार होते.. ते जातींन लक्ष दयाचे.. त्यांची जरब हॊती तशी.. आता दादासाहेब असे उधळे.. रावसाहेबांच लक्ष नाही... कुळानी मान वर काढलीये. उत्पन्न हवं तसं येतं नाहीये.. वारेमाप खर्च भागवताना कर्जाचा डोंगर उभा आहे.. अजून दीदीसरकारांच लग्न व्हायचंय.. तोलामोलाचं स्थळ बघायचं म्हणजे...
त्यांचा घसा कोरडा पडला.. त्यांना खूप अस्थिर, असुरक्षित वाटू लागलं..
त्यांना जाणवलं आपल्याला कुणाच्या तरी आधाराची गरज आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी जमा झालं.
"सुनबाई.." त्यांनी तिचा हात घट्ट धरला.
"माँसाहेब, मला लोचना.. म्हणालात तरी चालेल किंबहुना आवडेल मला.."
त्या किंचित हसत म्हणाल्या, "अगं, आजपर्यंत घराणं.. हॆ बेगडी वागणं.. वाहून थकलेय ग मी.. आता कुठं तरी थांबावंसं वाटतंय."
लोचनानं प्रश्नार्थक बघितलं...
माँसाहेब सांगत गेल्या.. लोचनाच्या डोळ्यात डोकवता डोकवता त्या स्थिर होतं गेल्या.. बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं.
"काळजी करू नका.. मी आहे.."तिनं त्यांचा हात घट्ट धरला.
तीचे डोळ्यातून एक वेगळेपण त्यांना स्पष्ट जाणवून गेलं.
"माँसाहेब... निघेल यातून मार्ग.. काळजी करू नका."
हिच्या हाती आपला भविष्यकाळ सुरक्षित आहे ह्याची जाणीव त्यांना झाली.. एक, एक सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून लोचनाला समजू लागल्या.
उन्हाचे गवाक्षातून येणारे कवडसे क्षणभर तिथे रेंगाळले.. ती आवाक होऊन ऐकत हॊती.
ते शब्द अर्थासहित तिच्या पर्यंत पोचायला वेळ लागतं होता. या भव्य गढीच आतून रुतलेले हॆ खोलपणं तिला भकासवाण वाटू लागलं.ती सुन्न झाली. माँसाहेबांचं तिच्या कडे वारंवार लक्ष जात होतं. त्यांची भिस्त आता तिच्यावर हॊती.
ती सावरली आणि आश्वासक हसली.
"माँसाहेब, काळजी करू नका. माझ्यावर असलेला विश्वास सार्थ करण्याची संधी तुम्ही मला दिलीत. आपण ह्यातून नक्कीच मार्ग काढू.."
लोचना गवाक्षात उभी हॊती. आभाळ निळ्या, काळ्या ढगांनी ग्रासलं होतं.. ती दूरवर टक लावून बघत हॊती. वाऱ्यानी तिच्या बटा चेहऱ्यावर विखूरल्या होत्या. चेहरा कुठल्या तरी चिंतेने ग्रासल्या सारखा वाटतं होता.
रावसाहेब जवळच पुस्तकं वाचत होते.. त्यांच लक्ष तिच्याकडे गेलं.. एकदम जोरात वीज कडाडली . लोचना क्षणभर थरारली. पण आता तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागली. पाऊस सुरु झाला होता. ती भिजत हॊती.. पण आता तिचा चेहरा प्रफुल्लित वाटत होता.. तिच्या प्रश्नाचं उत्तर बहुदा तिला सापडलं होतं.
रावसाहेबाना राहवलं नाही. ते उठले.
"काय.. काय विचार चाललाय एवढा? आम्हाला नाही का सांगणार?"
त्यांनी स्वतःहून पुढाकार घेवून विचारलेला प्रश्न लोचनाला भावला.
"मी सांगितलं तर कराल मला मदत?" तिनं त्यांचा हात हातात घेतं हळुवारपणे विचारलं.
तिचा हा समंजसपणा रावसाहॆबांना आवडला. त्यांनी होकारार्थी मान हलवली.
लोचनानं माँसाहेबांनी सांगितलेलं सगळं त्यांना सविस्तर सांगितलं. ते मुळापासून हादरले.. एवढं घडतंय पण आपल्याला काहीच माहिती नाही. माँसाहेब, या वयात.. एवढी जबाबदारी... आणि दोन मुलं असतांना.. त्यांना स्वतःची लाज वाटली. पण आपण करू शकू का काही...
क्षणभर ते बावरले..लोचनाला ते लक्षात आलं.त्यांचा हात घट्ट धरत ती म्हणाली. "मी आहे तुमच्या बरोबर.. दयाल ना मला साथ..."
बाहेर चमकणाऱ्या विजेचं तेज त्यांना तिच्या नजरेत दिसलं.त्यांनी नजरेनीच तिला होकार दिला.
क्रमश:
©® मृणाल शामराज
सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
