©® मृणाल शामराज
लोचनानी शेतीचे, जमिनीचे सगळे कागदपत्र माँसाहेबांच्या संमतीने मुनीमजीकडून मिळवले. रावसाहेब आणि तिला मुनीमजी सगळे व्यवहार समजवून सांगत होते. रावसाहेब कायद्याची पुस्तकं वाचून माहिती काढत होते.
तिघेही शेतातून फेर फटका मारत होते. ओसाड पडलेल्या जमिनींची माहिती घेतं होते.
लोकांना हॆ सारं नवीनच होतं. आपल्यासारख्या सुती साडीतून मायेनी आपली चौकशी करत असणाऱ्या या वहिनीसाहेबांकडे ते कौतुकानं पहात होते.
आपल्या जहागीरीची झालेली वाताहत रावसाहेब विकल होऊन पहात होते. रात्रंदिवस त्यांची कायद्याची पुस्तकं वाचण चालू होतं. गढीवर वाढलेली वकिलांची वर्दळ पाहून दादासाहेब हादरून गेले. त्यांचे कान भरणारे लोकं होतेच.
एक दिवस रावसाहेब, माँ साहेब, लोचना बोलत बसले होते. लोचना आता पुढे काय करायचं सांगत असतांच दादासाहेब तिथं आले.
ते रागानी लालबुंद झाले होते..
"काय चाललंय सगळं? कालची आलेली ही मुलगी..हिला कुणी दिली सारी सूत्र??"
"दादासाहेब..." माँसाहेब त्यांना शांत करू पहात होत्या.
"मला डावलून काय परस्पर ही दौलत स्वतःच्या नावावर करणं चाललंय का?? हा असा खुळा.."
"दादासाहेब" लोचना आदबीनं पण काहींश्या ठाम आवाजात म्हणाली.
"हॆ खुळे नाही आहेत.. आजपर्यंत तुम्ही लक्ष दिल नाहीत. सगळी वाताहत होते आहे. मुनीमजी.. त्यांना दाखवा सर्व.."
मुनीमजींनी पेपर पुढे केले.
दादासाहेबांनी हॆ सर्व पाहिलं आणि ते ही आवक झाले.
आता काय.. कसा चालणार हा डोलारा.,लोचना हळूच पुढे आली. तिनं रावसाहेबांनाही खूण करून पुढे बोलावलं.
त्यांनी कायदेशीर रीतीने ह्यातून मार्ग कसा काढता येईल. ह्याच्यात पळवाटा कशा आहेत.. काय केलं की हॆ प्रश्न सुटतील.. एक एक गोष्ट रावसाहेब सावकाशीनं उकलून सांगत होते.
दादासाहेब, माँसाहेब आवाक होऊन बघत होते. हेच रावसाहेब आहेत का ते!
आणि लोचना... तिच्या डोळ्यात सार्थ अभिमान होता नवऱ्याबद्दल..
"शाबास... सुनबाई. अभिमान वाटतो तुमचा."दादासाहेब म्हणाले.
"चालू दया.. आमची काही मदत लागली तर अवश्य सांगा."
दादासाहेब तिथून निघून गेले.
लोचानांनी सगळ्या कुळांना एकत्र बोलवलं. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. उत्पन्नातला काही ठराविक हिस्सा त्यांना दयाचा ठरवून जमिनी रीतसर नावावर करून घेतल्या.
कुळ पण तिच्यावर खूष होतं. ते तिला सर्व प्रकारची मदत करायला तयार होते.
रावसाहेबांच्या मदतीने अभ्यास करून तिनं शेतीच उत्त्पन्न वाढवलं.. नियमित ती शेतात जात हॊती. नांगरणी, पेरणी पीक काढणं त्याची बाजारपेठ बघणं पैशाचे व्यवहार सगळ्यावर तिचं जातींन लक्ष होतं.
पडिक जमिनीचे plotting करून त्या विकणे.. जडजवाहीर ह्यांची मोजणी, त्यांचा हिशोब.. त्यांचा बंदोबस्त तिनं सगळी नीट घडी बसवली.
हाताखालचे जास्तीचे नोकर तिनं कमी केले. तिच्या देखरेखेखाली केललं सुग्रास जेवण सगळ्यांना आवडू लागलं. या वहिनीसाहेबांशिवाय आता वाड्यात पान हलेना.. सगळी समृद्धी परत येतं हॊती. रावसाहेब आता सगळीकडे लक्ष ठेवून होते..
माँसाहेब तर तृप्त झाल्या होत्या. आता त्यांना काळजी हॊती ती दीदीसाहेबांची.. ह्या लाडवलेल्या पोरींच कसं करायचं.
दीदीसाहेबांनी आरशात पाहिलं. स्वतःकडे बघत त्या खुदकन हसल्या.. किती लोभसवाण वाटलं रूपं त्यांना स्वतःच.. नुकतीच वाचून संपवलेली कादंबरी त्यांच्या मनात रुंजी घालत हॊती.. ती शृंगारिक वर्णनं त्यांनी परत परत वाचली हॊती.. ते आठवतच त्या आरशात बघत होत्या मनोमन लाजत होत्या.
सहज त्यांच लक्ष मागच्या अंगणात गेलं.. तिथं तरणा व्यंका लाकडं फोडत होता. त्याचं पिळदार अंग घामानं निथळत होतं. त्याची ती लयबद्ध हालचाल त्यांच मन वेडावत हॊती.
काहीतरी काम त्याला सांगण्यासाठी लोचना तिकडे आली. तिच्या ते लक्षात आलं. अलीकडे बरेचदा व्यंकुकडे वेधणारी दीदीसाहेबांची नजर तिला बरंच सांगून गेली. ती आत आली. रावसाहेब माँसाहेबाना काहीतरी समजवून सांगत होते.
"माँसाहेब, दीदीसाहेबांसाठी सोयरीक बघायची का.." तिचा तो कातर स्वर दोघांना काहीतरी सांगून गेला.
"हो.. आता थांबायला नकॊ. सगळं स्थिरस्थावर झालंय आता..चार, पाच स्थळ समोर आहेत..निंबाळ गावचे जोशी ह्यांचा मुलगा सगळ्यात उजवा आहे.हुशार, कर्तबगार देखणा... घरचंही चांगलं आहे.."
"सुनबाई, तुम्ही घ्याल तो निर्णय योग्यच असेल." रावसाहेबांनी पण किंचित हसून संमती दिली..
लोचनाने पुढाकार घेवून सारं ठरवलं आणि काही महिन्यात सर्व झालंही...
सगळं छान चाललं होतं. लोचनाचा राजवीर आता उच्च शिक्षणासाठी शहरात गेला होता.. मोठा देखणा, आणि बुद्धिमान होता तो. लोचानानं लहानपणापासून त्याला उत्तम घडवलं होतं. दीदीसाहेब त्यांच्या घरी सुखी होत्या मात्र दादासाहेब काही बदलले नव्हते..
माँसाहेबांनी मात्र आता योग्य निर्णय घायचा ठरवला.. त्यांनी गढी, जमीनजुमला, शेती, दागिने सगळ्यांची स्वतःच्या हयातीत व्यवस्थित वाटणी केली.
दीदी साहेबाना चोळीबांगडी म्हणून काही हिस्सा दिला. आता त्या खऱ्या अर्थाने मुक्त झाल्या होत्या.. तृप्त होत्या त्या.. वयपरतवे समाधानाने त्यांनी प्राण ठेवला.
दादासाहेब आपलं सगळं विकून शहरात स्थिरवले... पण लोचना मात्र हॆ सगळं सोडून कुठे जायला तयार नव्हती.
गणपती..पटवर्धनाचं कुलदैवत... हा उत्सव देवळात मोठ्या धूमधडक्यात साजरा व्हायचा.. अनेक नामवंत कलाकार इथं हजेरी लावायचे.. लोचना आता या सगळ्या रितिरिवाजात मुरली हॊती...
गच्चीवरून रंगरंगोटी केलेल्या मंदिराचे कळस कोवळ्या उन्हात लखलखत होते.
"मुनीमजी."
मुनीमजी अदबीन पुढे आले. त्यांना या वहिनीसाहेबांच कौतुक वाटायचं. माँसाहेबा नंतर त्या हा डोलारा ज्या पद्धतीने सांभाळत होत्या त्याचा त्यांना रास्त अभिमान होता.
"मुनीमजी, उत्सवाची सगळी व्यवस्था झाली ना.. कलाकारांची बिदागी.. शेवटच्या दिवशीचा प्रसाद.. सगळं नीट करा. आपला कुलाचार आहे तो."
मुनीमजींनी मान डोलवली..
उत्सव सुरु झाला..
दादासाहेब, वहिनीसाहेब त्या दिवशी येऊ शकणार नव्हते. म्हणून रावसाहेब आणि लोचना कार्यक्रमाला गेले.
सूर्य मावळला होता. त्याचं ते देखणं केशरीपण ओसरून आता सगळीकडे निळं काळेपण पसरू लागलं होतं. झाडातून वेलीच्या मांडवातून सोडलेले दिवे लखलखत होते.
मंदिरात मखरात बसलेला प्रसन्न गणराज दुर्वा, फुलांच्या हारामधून उठून दिसतं होता.. दोघांनीही गणरायाच दर्शन घेतलं. आणि ते सभागृहात आले..
खच्चून भरलेल्या सभागृहात ते आले.. सगळे कलाकार वाटच बघत होते.. बाजूला बसलेल्या प्रतिष्टीत स्त्रियांशी बोलण्यात लोचना गर्क हॊती.
अचानक ओळखीचा स्वर जाणवला म्हणून तिनं चमकून वर पाहिलं.. गंधार...
तो तिच्याकडेच बघत होता..हीच का ती..
लाल चंदेरी साडीतलं तिच घरांदाज सौंदर्य तो बघत होता.. वेगाने धावणाऱ्या काळाची पाऊलं नाही म्हटलं तरी जाणवत हॊती.. केसात.. रुपेरी बटा डोकवत होत्या.. पण तो खानदानीपणाचा बाज.. ते अंगावरचे ठसठशीत दागिने, ती डोळ्यातील जरब...
त्याच्याकडे बघताना तिला जाणवलं की तो ही तिच्याकडे बघतोय.. त्यांची नजरानजर झाली. तो हलकेच ओळखीच हसला.
तो आता समेवर आला. त्याचे स्वर तिचा पाठलाग करत होते.. आता त्यानी पुरिया संपवून छायामल्हार घेतला.
स्वर मुरल्यासारखे तिच्यात भिनू लागले... त्याच्या बरोबर एक सतरा अठरा वर्षाची गोड मुलगी हॊती.. ती त्याला संगत करत हॊती.
बहुदा त्याचीच मुलगी असावी.. गाण्याला उगाचचं आलो.. लोचना बेचैन झाली..ती रावसाहेबच्या कानात काहीतरी पुटपुटली.. आणि उठली..
गंधारनी सहज पाहावं तसं तिच्या कडे पाहिलं. त्याला ती कमालीची अस्वस्थ जाणवली.. तिनं घरं गाठलं..
बेचैनपणे ती वरांड्यात आली.. ते सूर तिथेही तिचा पाठलाग करत होते.. तिनं खडकन दार बंद करून घेतलं..
कार्यक्रम संपला.. रावसाहेबांनी गंधारच खूप कौतुक केलं. त्याला बिदगीच ताट पुढे केलं.
गंधारला आता परत त्या अश्रितपणाचं ओझं जाणवू लागलं.. ओळखीचं.. सवयीचं नातं निसटून हॆ राहिलेले पाश त्याला रुतू लागले.. तो उठून उभा राहिला.
मुनीमजींनी रावसाहेबांकडून ते बिदागीच ताट गंधारला दिलं.
गंधारनी ती बिदागी गणपती मंदिराच्या नवनिर्माणासाठी वापरावी अशी विनंती केली.. रावसाहेब ही आश्चर्यचकीत झाले.
उत्सव थाटात पार पडला.
काळ पुढे पळत होता.. राजवीर आता शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी परदेशात जाणार होता.
लोचना विचार करू लागली.. आता या जहागीरीच काय.. बरोबर आहे प्रवाहाच पाणी पुढेच वाहणार आणि एक दिवस रणवीर एका सुंदरश्या नाजूक मुलीला घेवून आला..
"आईसाहेब, ही स्वरा.. माझी बालमैत्रीण.."
तिचा मोहक चेहरा लाजेने लाल झाला. तिच्या विभ्रमाकडे चोरून पाहणारा राजवीर... तिला जाणवलं आपला लेक मोठा झालाय.. त्यानं एकदम दचकून तिच्याकडे पाहिलं.. ती आपल्या दोघांकडे पाहतेय या विचारानं तो अजूनच गोंधळून गेला.. लोचनाला सगळं न सांगताच उमजलं.
"ये ग... स्वरा.. किती छान नाव आहे तुझं.."
"अगं, आई तिचा आवाजही तितकाच गोड आहे..."
हळूहळू स्वराही खुलली... लोचनालाही मुलाचं सुखं महत्वाचं होतं. तिनं दोघांना जवळ घेतलं.
"तुझ्या आई, बाबांना घेवून ये ग.."
स्वरानी हो म्हणत मानेला नाजूक झटका दिला आणि एका दिवशी राजवीरने सांगितलं की आज संध्याकाळी स्वरा आई बाबांना घेवून येणार आहे.
तिनं सगळी ओटीची तयारी करून ठेवली. तिच्यासाठी सुंदर गुलबक्षी रंगाची बनारसी साडी आणली.. मासाहेबांनी तिला पहिल्यांदा आल्यावर दिलेला हार काढून ठेवला.. कंदी पेढ्याचा पुडा सजला.. हॆ लग्न होणारच होतं.. हॆ नक्कीच होतं.
पाच साडेपाच झाले असतील... स्वरा आली म्हणून ती दाराशी आली... आणि चकितच झाली.. स्वरा.. तिची आई... आणि.. आणि... तिच्या मागे गंधार....
तिला नियतीच्या योगायोगाची गंमत वाटली... ज्या पासून लांब पळावं तेच पाठीशी येतं होतं.
रावसाहेबांनी त्यांच स्वागत केलं..
तिने स्वतःला सावरलं... "या ना..." ती स्वराला घेवून आत आली..
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर गंधार म्हणाला, "खरं सांगू.. आम्ही आपल्या तोलाचे नाही आहोत.. पण या मुलांपुढे.."
त्याला पुढे बोलू न देता रावसाहेब म्हणाले... "अहो, आता काळ बदलला आहे. मुलांचा आनंद तो आपला आनंद.."
वातावरणात सहजता आली..
लोचनानं कुंकू लावलं तिला. साडी देऊन ओटी भरली...
बाळा साडी नेसून येतेस का...
गुलबक्षी बनारसी मधली स्वरा साक्षात लक्ष्मी दिसतं हॊती..
लोचानानं तिच्या गळ्यात तो हार घातला...
आज माँसाहेब हव्या होत्या..
"बेटा.. एखादं छान गाणं म्हणशील का??" रावसाहेब ख़ुशीत येऊन म्हणाले..
स्वरानी गंधार कडे बघितलं... त्यानी हलकेच मन डोलवली.
संध्याकाळ पसरत हॊती... तिची सोनेरी आभा सगळ्या वातावरणात पसरली हॊती.. स्वरानी सूर लावले..
राग पुरिया... आपला आवडता राग..
तिनं हळूच गंधार कडे बघितलं..
तो तिच्याकडेच बघत होता..
स्वराचा नाजूक करुण स्वर वाऱ्याबरोबर मंद पसरत होता...
लोचना हरवली हॊती फडकयांच्या वाड्यात... तोच स्वर... तेच सूर..
वा.. वा.. सगळ्यांच्या टाळ्यांनी स्वरा आणि लोचना दोघीही भानावर आल्या..
"खूप सुंदर बाळा.. असंच गात रहा... स्वरांना मुक्त लहरू दे... अडवू नकोस.."
गंधार हळूच डोळे टिपत होता... आणि लोचना... तीचे स्वर झंकरत होते... आज तिच्या सुनेच्या गळ्यातून.. गढीवर नवीन पायंडा घालत... मुक्तपणे...
समाप्त
©® मृणाल शामराज
सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा
